Heart Attack येऊन गेला, पण समजलंच नाही? असं होऊ शकतं का?

हृदयविकाराचा झटका, छातीत दुखणं

फोटो स्रोत, Alamy

फोटो कॅप्शन, दरवेळी छातीत दुखूनच हृदयविकाराचा झटका येईल असं नाही.
    • Author, क्लॉडिआ हॅमंड
    • Role, बीबीसी न्यूज

हृदयविकाराच्या झटक्याचे परिणाम जाणवणारे असतील असं आपल्याला वाटतं, त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष होणं शक्यच नाही. असंही आपल्या वाटत असतं. पण तसं असेलच असं नाही.

हृदयविकाराचा झटका येतो त्यावेळी छातीवर प्रचंड वजनाचं काहीतरी भार ठेवल्यासारखं वाटतं. भीती आणि अस्वस्थ वाटतं. चित्रपटात दाखवतात तसं लोक छातीला हात धरून कळवळतात. त्यांच्या डोळ्यात भीती दिसते. अगदी असं घडूही शकतं पण नेहमी तसंच घडेल असं नाही.

हृदयाला होणारा रक्तपुरवठा थांबतो तेव्हा हृदयविकाराचा झटका येतो. रक्तात निर्माण होणाऱ्या गुठळीमुळे असं होतं. शरीरात एवढं काही घडत असताना काहीजणांना छातीत जराही दुखत नाही. छातीत दुखत नसल्याने हृदयविकाराचा झटका येतो आहे हे समजत नाही आणि उपचार मिळायला उशीर होतो.

छातीत थोडं दुखत असेल तर अनेकांना ते अपचनामुळे दुखत असेल असं वाटतं. हॉस्पिटलमध्ये ईसीजी काढल्यानंतर हृदयविकाराचा झटका आल्याचं स्पष्ट होतं. याला 'सायलेंट हार्ट अॅटॅक' म्हणतात. 2016 मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानुसार हृदयविकाराच्या 45 टक्के केसेसमध्ये असं होतं.

या संशोधनासाठी 90च्या दशकातला डेटा जमा करण्यात आला. हृदयविकाराचं निदान होण्यामध्ये सुधारणा झाली आहे. त्यामुळे हृदयविकाराचा झटका येणाऱ्यांची संख्या आजच्या घडीला कमी असेल मात्र दरवर्षी असे अनेकजण आहेत ज्यांना हृदयविकाराचा झटका येऊन गेला आहे हे माहितीच नाही.

अनेक आजारी माणसांना आपण कशाने आजारी आहोत हे माहिती नाही. त्यांना जबड्याच्या इथे दुखतं. मान, हात, पोट, पाठ दुखत राहते. श्वास घ्यायला त्रास होतो. त्यांना खूप घाम येतो किंवा उलटी होते. अनेक लक्षणं एकत्रित होऊन दिसतात. छातीवर प्रचंड दाब पडल्यासारखं वाटून हृदयविकाराचा झटका येण्याऐवजी अशी लक्षणं दिसू शकतात. यामुळे निदानच होत नाही.

छातीत न दुखता हृदयविकाराचा झटका येणं हे स्त्रियांमध्ये प्रामुख्याने घडतं. यामुळे त्यांना वेळेवर उपचार मिळायला उशीर होतो आणि त्यांची या धक्क्यातून वाचण्याची शक्यताही कमी होत जाते.

हृदयविकाराचा झटका, छातीत दुखणं

फोटो स्रोत, Alamy

फोटो कॅप्शन, छातीत दुखणं

हे असं खरंच होतं का? हे पाहण्यासाठी कॅनडातील संशोधकांनी 2009मध्ये हृदयविकाराच्या झटक्याच्या लक्षणांचा शास्त्रोक्त अभ्यास केला. अँजिओप्लास्टी झालेल्या 305 रुग्णांना नेमकी काय लक्षणं जाणवली यावर त्यांनी काम सुरू केलं. अँजिओप्लास्टीमध्ये अडकलेल्या रक्तवाहिन्या एका फुग्याच्या माध्यमातून मोकळ्या केल्या जातात.

ही प्रक्रिया हृदयविकाराचा झटका येतो त्याच्याशी साधर्म्य वाटू शकते. त्यामुळे हे फुगे जेव्हा रक्तवाहिन्या मोकळ्या करण्यासाठी आत सोडण्यात आले तेव्हा तुम्हाला काय वाटलं असं रुग्णांना विचारण्यात आलं.

पुरुष आणि स्त्रियांच्या उत्तरांमध्ये छातीत दुखणं, हात दुखणं, श्वास घ्यायला त्रास होणं, घाम फुटणं, खायला नकोस वाटणं काही वेगळेपण जाणवलं नाही. मात्र महिलांना मानेत आणि जबड्यात छातीत दुखण्याच्या बरोबरीने जास्त त्रास जाणवू शकतो असं संशोधकांच्या लक्षात आलं.

बाकी अभ्यासांच्या निष्कर्षात अनियमितता जाणवली. छातीत दुखण्याच्या बाबतीत पुरुष आणि स्त्रियांना सारखाच त्रास होतो असं काही अभ्यासातून स्पष्ट झालं. काहींच्या मते पुरुष रुग्णांमध्ये छातीत दुखण्याचं प्रमाण जास्त असतं.

हृदयविकाराच्या बरोबरीने अन्य निदानांना सामील केल्याने निष्कर्षातला गोंधळ वाढतो. 2011मध्ये पुनर्आढावा घेण्यात आला. पुरुष आणि महिलांना हृदयविकाराच्या झटक्यासंदर्भात सारखाच त्रास होतो की विभिन्न याचा अभ्यास करण्यात आला.

हृदयविकाराचा झटका, छातीत दुखणं

फोटो स्रोत, iStock

फोटो कॅप्शन, हृदयविकाराचा झटका

अमेरिका, जपान, स्वीडन, जर्मनी, कॅनडा अशा विविध देशांमध्ये झालेलं संशोधन एकत्र करण्यात आलं. यातून 9,00,000 लोकांचा अभ्यास करण्यात आला. 26 सर्वोत्तम संशोधनातील डेटा घेण्यात आला, त्याचं पुन्हा विश्लेषण करण्यात आलं.

पुरुषांच्या तुलनेत महिलांना हृदयविकाराच्या झटक्याचं लक्षण असलेलं छातीत दुखणं कमी जाणवतं. मात्र त्यांना थकवा, अंधारी येणे किंवा चक्कर येणे, मान किंवा जबड्यात दुखणे, हात दुखणे असे त्रास अधिक जाणवतात. पुरुष तसंच महिलांना छातीत दुखण्याचा त्रास जाणवतो. मात्र एक तृतीयांश महिलांना तसंच एक चतुर्थांश पुरुषांना छातीत कोणत्याही त्रासाविना हृदयविकाराचा झटका येतो असं या अभ्यासातून स्पष्ट झालं. आपल्या शरीरात नेमकं काय घडलं याचा त्यांना अंदाज येत नाही.

ही लक्षणं किती गंभीर आहेत हे तुम्हाला लक्षात आलं नाही तर तुम्ही त्यादृष्टीने मदत मागणार नाही, उपचार केले जाणार नाहीत. छातीत दुखू लागल्यानंतर लोक साधारणत: दोन ते पाच तासांच्या अंतरात डॉक्टरकडे किंवा हॉस्पिटलमध्ये जातात.

हृदयविकाराचा झटका, छातीत दुखणं

फोटो स्रोत, Thinkstock

फोटो कॅप्शन, हृदयविकाराचा झटका

आपल्याला जे होतंय ते गंभीर आहे आणि जीवनमरणाचा प्रश्न होऊ शकतो यासंदर्भात लोकांची मानसिकता काय याचाही अभ्यास करण्यात आला.

हृदयविकाराचा झटका आलेल्या काही ठराविक महिलांची तपशीलवार मुलाखत घेण्यात आली. निम्म्याहून अधिक महिलांना काहीतरी वेगळं घडतंय हे लक्षात आलं होतं आणि त्या त्वरित डॉक्टरकडे गेल्या.

तिघींना सौम्य स्वरुपाची लक्षणं जाणवली. मात्र थोड्या वेळानंतर त्यांचा त्रास वाढला. त्यानंतर त्यांनी डॉक्टरकडे धाव घेतली. मात्र बाकी लोकांना हृदयात, छातीत नेमकं काय झालं हे कळलंच नाही. कारण शरीरात मामुली स्वरुपात दिसणारी लक्षणं हृदयविकाराच्या झटक्याशी संबंधित आहेत हे त्यांना ठाऊक नव्हतं. त्यांनी कोणाला सांगितलंही नाही. त्यांनी थांबून काय होतंय ते बघितलं.

छातीवर प्रचंड दाब पडल्यासारखं वाटणं म्हणजे हृदयविकाराचा झटका येणं. मात्र या आजाराचं हे एकमेव लक्षण नाही. बाकी अनेक छोटी मोठी लक्षणं हृदयविकाराचा झटका येऊ शकतो हे सूचित करतात. त्यामुळे फक्त चित्रपटात दाखवतात तसं छातीला धरून वेदना होण्याचं दाखवणं म्हणजेच हृदयविकाराचा झटका असं नाही.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)