सावधान! भारतीय तरुणांचं हृदय कमकुवत होतंय

फोटो स्रोत, iStock
- Author, सरोज सिंह
- Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी
दोन वर्षांपूर्वीची घटना. दिल्लीत कडाक्याची थंडी पडली होती. 29 वर्षीय अमित आपल्या घरी पांघरुणात गुरफटून निवांत झोपला होता. पहाटेच्या साखरझोपेत स्वप्नांच्या दुनियेत मश्गुल असतानाच त्याच्या छातीत अचानक दुखू लागलं. दुखण्याची तीव्रता एवढी की, तो झोपेतून खडबडून जागं होऊन उठला तेव्हा अख्खं शरीर घामाने निथळत होतं. त्यावेळी अमितला रुग्णालयात घेऊन जाईल असं कोणी घरात नव्हतं.
अमितने ते दुखणं सहन केलं. तासाभराने छातीत दुखायचं कमी झालं. मध्येच कधीतरी त्याचा डोळा लागला. झोप पूर्ण झाली तेव्हा अमित उठला. तेव्हा त्याला बरं वाटलं. त्रास जाणवत नसल्याने त्याने डॉक्टरकडे जाण्याचं टाळलं.
दुसऱ्या दिवशी मात्र दैनंदिन रुटिन फॉलो करताना अमितला त्रास जाणवू लागला. दुखणं जाणवण्याइतपत असल्याने त्याने डॉक्टरांकडे जाण्याचा निर्णय घेतला.
डॉक्टरांनी अमितला तपासलं आणि इको-कार्डियोग्राम करण्याचा सल्ला दिला. कार्डियोग्रामनुसार हे कळलं की 36 तासांपूर्वी अमितला जो त्रास झाला तो हार्ट अॅटॅक होता.
डॉक्टरांनी हार्ट अॅटॅकचं सांगताच अमितला धक्का बसला. तिशी ओलांडण्याच्या आधी एवढ्या कमी वयात हार्ट अॅटॅक कसा येऊ शकतो या विचारांनी त्याला घेरलं.
तरुण वयात हार्ट अॅटॅकची संख्या वाढतेय
तरुण वयाच्या मुलामुलींना हार्ट अॅटॅक येण्याचं प्रमाण भारतात वाढतं आहे.
24 मे रोजी माजी केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय यांचा मुलगा वैष्णवला हार्ट अटॅक आला. हा धक्का एवढा तीव्र होता की वैष्णवने आपले प्राण गमावले. तो फक्त 21 वर्षांचा होता. वैष्णव हैदराबादमध्ये MBBS अर्थात डॉक्टरकीचं शिक्षण घेत होता.

फोटो स्रोत, Thinkstock
बातम्यांनुसार रात्री उशिरा जेवलेल्या वैष्णवला थोड्याच वेळात छातीत दुखू लागलं. घरच्यांनी त्याला घराजवळच्या गुरु नानक हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, पण तरीही फारसा उपयोग झाला नाही.
तरुणांमध्ये हृदयाशीसंबंधित तक्रारी का?
अमेरिकेत प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनपर लेखानुसार 2015 पर्यंतच्या आकडेवारीनुसार भारतात 6.2 कोटी लोकांना हृदयाशी संबंधित आजार आहे. यापैकी 2.3 कोटी माणसांचं वय 40 पेक्षा कमी आहे. म्हणजेच 40 टक्के हृदयविकाराशी संबंधित रुग्णांनी वयाची चाळिशीही पार केलेली नाही. भारतीयांसाठी हे आकडे धोक्याची घंटा आहेत.

हृदय कमकुवत का?
- तणावपूर्ण आयुष्य
- खाण्यापिण्याच्या अनियमित वेळा
- उशिरापर्यंत काँप्युटरवर काम
- स्मोकिंग, तंबाखू, दारूचं व्यसन
- हवा प्रदूषण

जाणकारांच्या मते, भारतातल्या तरुणांमध्ये हार्ट अॅटॅकचं प्रमाण झपाट्याने वाढतं आहे.
Healthdata.orgया वेबसाईटनुसार, 2005 मध्ये अकाली मृत्यूच्या कारणांमध्ये हृदयाशी संबंधित आजार तिसऱ्या क्रमाकांचं कारण होतं. मात्र पुढच्याच वर्षी 2016 मध्ये हृदयाशी संबंधित व्याधी हे अकाली मृत्यूचं प्रमुख कारण ठरू लागलं.
दहा-पंधरा वर्षांपूर्वी हृदयविकार किंवा तत्सम आजार हे म्हाताऱ्या माणसांना होणारे आजार म्हणून मानले जात असत. मात्र गेल्या दशकभरात हृदयाशी संबंधित विकारांचं वेगळं चित्र समोर येत चाललं आहे.
कमकुवत हृदयाची कारणं
देशातले प्रसिद्ध कार्डियोलॉजिस्ट आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित डॉ. एस. सी. मनचंद्रा यांच्या मते, देशातल्या तरुणांचं हृदय खरंच कमकुवत होत चाललं आहे.
डॉक्टर मनचंदा सध्या दिल्लीस्थित गंगाराम हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. याआधी ते AIIMS मध्ये विभागप्रमुख म्हणून कार्यरत होते.
बदलती जीवनशैली कारणीभूत
हृदय कमकुवत होण्यामागे बिघडलेली जीवनशैली प्रामुख्याने कारणीभूत असल्याचं डॉक्टर मनचंदा यांनी सांगितलं.
29 वर्षांचा अमित किंवा 21 वर्षांचा वैष्णव यांना आलेल्या हार्ट अॅटॅकमागे बिघडलेली जीवनशैलीच असल्याचं डॉ. मनचंदा सांगतात.
अमितने 22व्या वर्षापासून ध्रूमपान करत असल्याचं बीबीसीला सांगितलं. 29व्या वर्षापर्यंत तो चेन स्मोकर झाला होता. मात्र हार्ट अॅटॅकनंतर सिगरेट पिणं सोडून दिल्याचं अमितनं सांगितलं. मात्र पुन्हा हार्ट अॅटॅकसदृश काहीही होऊ नये यासाठी अमितला रोज तीन औषधं घ्यावी लागतात.
वैष्णवच्या बाबतीत अशी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र हल्ली उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलांना प्रचंड ताणाला सामोरं जावं लागतं. विद्यार्थी आयुष्यातही खाण्यापिण्याच्या अनियमित वेळा, इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा अखंड वापर अशी जीवनशैली असते.
हार्ट अॅटॅक येतो कसा?
हार्ट अॅटॅकचं प्रमुख लक्षण म्हणजे- छातीत दुखणं. आपल्या चित्रपटांमध्ये हार्ट अॅटॅक म्हटलं की काही दृश्यं हमखास दाखवली जातात. छातीत दुखणारा माणूस हात हृदयाशी घेऊन पिळवटतो. वेदनेमुळे त्याच्या डोळ्यात भीती दिसते. दुखणं हाताबाहेर गेल्याने तो जमिनीवर पडतो. चित्रपटात दाखवलं जाणारं हे दृश्य प्रत्यक्षात नेहमीच तसं नसतं, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
दृदयाशी संबंधित गोष्ट म्हणजे छातीवर प्रचंड आघात झाल्यासारखं वाटणं असा समज आहे. असं बहुतांशी वेळेला होतंही पण दरवेळी असंच होईल असं नाही.

फोटो स्रोत, iStock
जेव्हा हृदयाला रक्तपुरवठा होत नाही तेव्हा हार्ट अटॅक येतो. साधारणत: धमन्यांच्या मार्गात अडथळा निर्माण झाला की हृदयाला होणारा रक्तपुरवठा विस्कळीत होतो. या कारणामुळे छातीत प्रचंड दुखतं. मात्र काही वेळेला छातीत दुखत नाही. त्याला सायलेंट हार्ट अॅटॅक म्हटलं जातं.
Healthdata.org या वेबसाईटनुसार जगभरातही हार्ट अटॅकने होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण सर्वाधिक आहे. 2016 वर्षात विविध कारणांनी होणाऱ्या मृत्यूंचा अभ्यास करण्यात आला. यापैकी 53 टक्के लोकांनी हार्ट अॅटॅकमुळे जीव गमावला.

हार्ट अटॅकची लक्षणं?
- छातीत दुखतं, अस्वस्थ वाटतं
- छातीतून हात, जबडा, मान, पाठ, पोट याकडे जाणाऱ्या मार्गात दुखतं
- मन अस्वस्थ होतं
- चक्कर येते
- प्रचंड घाम येतो
- श्वास घेण्यात अडचण
- उलटीसारखं वाटतं
- खोकल्याची मोठी उबळ येते. जोराजोरात श्वास घ्यावा लागतो.
- महिला, ज्येष्ठ नागरिक आणि डायबेटिस असणाऱ्यांना छातीत प्रचंड दुखत नाही. मात्र तरीही तो हार्ट अॅटॅक असू शकतो.

स्त्रियांना हार्ट अॅटॅकचा धोका कमी?
इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर के. के. अग्रवाल यांच्यानुसार स्त्रियांना मेनोपॉजपूर्वी हार्ट अॅटॅकची शक्यता कमी असते.
स्त्रियांच्या शरीरात स्रवणाऱ्या हार्मोनमुळे हार्ट अॅटॅकची शक्यता कमी होते. मात्र गेल्या काही वर्षात मेनोपॉजपूर्वीच्या वयात स्त्रियांना हार्ट अॅटॅक येत आहेत.
पब्लिक हेल्थ फाऊंडेशनच्या डॉ. श्रीनाथ रेड्डी यांच्या मते, स्त्रिया ध्रूमपान करत असतील, गर्भनिरोधक औषधांचं सातत्याने सेवन होत असेल तर हार्ट अॅटॅकची शक्यता वाढते.
मेनोपॉजनंतर पाच वर्षांनंतर स्त्रियांना हार्ट अॅटॅक येण्याची शक्यता पुरुषांच्या बरोबरीने असते.
स्त्रिया छातीत दुखण्याकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे त्यांना होणाऱ्या हृदयाशी संबंधित आजारांकडे उपचार होण्यास वेळ लागतो.
हार्ट अटॅकपासून वाचण्यासाठी काय करावं?
युवा वर्गाने आपल्या जीवनशैलीत थोडी शिस्त आणणं आवश्यक आहे असं डॉ. मनचंदा सांगतात. योगसाधना केल्यास हार्ट अॅटॅकचा धोका कमी होऊ शकतो. योग केल्याने तणाव कमी होण्यास मदत होते. मन एकाग्र होण्यास फायदा होतो, असंही डॉक्टर सांगतात.
हार्ट अटॅकपासून वाचायचं असेल तर ट्रान्स फॅट्सन दूर ठेवा
तरुण वयात येणाऱ्या हार्ट अॅटॅकपासून वाचण्यासाठी सरकारने काही पावलं उचलणं आवश्यक असल्याचं डॉ. मनचंदा सांगतात. जंक फूडवर सरकारने टॅक्स आकारायला हवा. तंबाखू आणि सिगरेटवर सरकारने कर बसवला आहे. तसंच जंक फूडच्या बाबतीत हवं. जंक फूडच्या पॅकेटवरही सिगारेटच्या पाकीटावर असतो तसा ठळक अक्षरात इशारा लिहायला हवा. हे केल्याने लगेच हार्ट अटॅकचं प्रमाण घटणार नाही पण जागरुकता वाढेल.
हार्ट अटॅकचा संबंध शरीरातल्या कोलेस्टेरॉलशी असतो असं सांगण्यात येतं. म्हणूनच खूप तेलकट पदार्थ खाणं टाळायला हवं. मात्र ही गोष्ट किती खरी आहे?
डॉ. मनचंदा यांच्या मते, कोलेस्टेरॉलपेक्षा ट्रान्स फॅटमुळे हार्ट अटॅकची शक्यता वाढते. ट्रान्स फॅट चांगल्या कोलेस्टेरॉलला कमी करतात आणि वाईट कोलेस्टेरॉलला वाढवतात.
वनस्पती तूप हे ट्रान्स फॅटचे मुख्य स्रोत आहेत. म्हणून यापासून दूर राहायला हवं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)










