भारताला समृद्ध करणारा असा राजा ज्याचं श्रीलंका, मालदीव, इंडोनेशियापर्यंत साम्राज्य, आशिया खंडात दबदबा आणि चीनशी व्यापार

तंजावरचं बृहदेश्वर मंदिर, राजेंद्र चोल पहिला याच्या कार्यकाळात बांधण्यात आलं होतं

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, तंजावरचं बृहदेश्वर मंदिर, राजेंद्र चोल पहिला याच्या कार्यकाळात बांधण्यात आलं होतं
    • Author, रेहान फजल
    • Role, बीबीसी हिंदी

भारताचा इतिहास समजून घेताना बहुतांशवेळा उत्तर भारतावरच लक्ष केंद्रित होतं. मात्र, दक्षिण भारतातील राजवटींनीदेखील तितकाच महत्त्वाचा प्रभाव टाकला आहे.

बंगालपासून ते दक्षिण भारत आणि तिथून पुढे श्रीलंका, मालदीव, इंडोनेशिया, आग्नेय आशियापर्यंत एका भारतीय साम्राज्यानं वर्चस्व निर्माण केलं होतं. ते होतं चोल साम्राज्य. वैभवशाली चोल साम्राज्य आणि आशिया खंडात प्रभाव निर्माण करणाऱ्या राजेंद्र चोलबद्दल जाणून घेऊया.

सन 850 च्या सुमारास दक्षिण भारतात पांड्य आणि पल्लव राजवटींमध्ये संघर्ष सुरू होता. या दोन्ही राजवटींमधील संघर्षाचा फायदा घेत एक अपरिचित राजानं तंजावरवर ताबा मिळवला. त्याचं नाव विजयालय.

हीच चोल राजवटीची सुरुवात होती.

सन 907 मध्ये चोल वंशाचा राजा पारंतक (पहिला) गादीवर बसला. त्यानं 48 वर्षे राज्यकारभार केला. मात्र पुढे चोल राजे कमकुवत होत गेले आणि त्यामुळे चोल राजवट लयाला जाऊ लागली.

सन 985 मध्ये राजराजा चोल (पहिला) गादीवर आला. त्यानंतर चोल राजवट पुन्हा भरभराटीला आली.

राजराजा चोल (पहिला) आणि त्याचा मुलगा राजेंद्र चोल या दोघांच्या नेतृत्वाखाली चोल राजवट आशिया खंडातील एक मोठी लष्करी, आर्थिक आणि सांस्कृतिक शक्ती झाली.

एक वेळ अशी होती की चोल साम्राज्य दक्षिणेत मालदीवपासून ते उत्तरेत बंगालमध्ये गंगा नदीपर्यंत पसरलेलं होतं.

रिचर्ड ईटन यांनी 'इंडिया इन द परिशियानेट एज' हे पुस्तक लिहिलं, "चोल राजांना 'तंजावरचे महान चोल' म्हटलं जाऊ लागलं. दक्षिण भारताच्या संपूर्ण किनारपट्टीवरील त्यांच्या राजवटीला 'कोरोमंडल' या नावानं ओळखलं जाऊ लागलं."

"आजदेखील ती ओळख कायम आहे. 'कोरोमंडल' हा शब्द 'चोलमंडल' या शब्दाचा अपभ्रंश आहे. त्याचा अर्थ 'चोल साम्राज्याचा विस्तार' असा होतो."

श्रीविजय राज्याशी शत्रुत्व

11 व्या शतकाची सुरुवात होईपर्यंत, बंगालच्या खाडीला लागून असलेल्या राज्यांमधील अर्थव्यवस्थांवर खमेर आणि चोल व्यापाऱ्यांचं वर्चस्व निर्माण झालं होतं.

चोल आणि खमेर या दोघांनाही या गोष्टीची जाणीव झाली होती की त्यांचं हित एकमेकांशी जोडलेलं आहे.

याच कालखंडात खमेर साम्राज्य देखील अतिशय विशाल आणि प्रभावशाली होतं.

आजचे कंबोडिया, थायलंड आणि व्हिएतनाम या देशांचा बराचसा भूप्रदेश खमेर साम्राज्यात येत होता. कंबोडियातील जगप्रसिद्ध अंगकोरवाट मंदिर खमेर राजांनीच बांधलं होतं.

वाई सुब्बायारालु यांनी 'साऊथ इंडिया अंडर द चोलाज' हे पुस्तक लिहिलं आहे.

नटराज हे मूलत: मध्ययुगीन भारतात चोल वंशाचं प्रतीक होतं

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नटराज हे मूलत: मध्ययुगीन भारतात चोल वंशाचं प्रतीक होतं

या पुस्तकात ते लिहितात, "अनेक शिलालेखांवर चोल आणि खमेर राजांमधील मैत्रीपूर्वी संबंधाचा उल्लेख आहे. तसंच सन 1020 मध्ये या दोन्ही राजवटींमध्ये रत्न आणि सुवर्ण रथांची देवाणघेवाण झाल्याचाही उल्लेख त्यात आहे."

"चीनमधील वाढती लोकसंख्या आणि त्यांना आलिशान, चैनीच्या वस्तूंमध्ये असलेला रस, या गोष्टीचा दोन्ही राजवटींना व्यापारी दृष्टीनं मोठा फायदा झाला होता."

या दोन्ही राजवटींचा एकच स्पर्धक किंवा शत्रू होता, ते म्हणजे श्रीविजय राज्य. श्रीविजय राजवटीचे राजा बौद्ध होते. आग्नेय आशियातील अनेक बंदरांवर त्यांचंच नियंत्रण होतं.

चीनकडे जाणाऱ्या सर्व जहाजांवर ते कर लावायचे. जी जहाजं कर देत नसत, त्यांच्यावर श्रीविजय राज्याचं आरमार हल्ला चढवून ती नष्ट करत असत.

श्रीविजय राज्याचा पराभव

श्रीविजय राज्याच्या राजांच्या धोरणामुळे चोल वंशाचे राजे नाराज झाले.

श्रीविजय राजवटीचे राजे एकीकडे चोल राजांना मैत्रीचे संदेश पाठवायचे. सध्या तामिळनाडूतील नागपट्टिनम बंदरात एक बौद्ध मठ बांधण्यासाठी ते धन देखील पाठवत होते.

तर दुसरीकडे ते चीनच्या राजांना सांगायचे की चोल राजवट छोटी आहे आणि ती त्यांच्या नियंत्रणाखाली आहे.

1015 मध्ये चोल राजा राजेंद्र चोल यानं चीनबरोबर राजकीय संबंध स्थापन केले. त्यानंतर त्याला श्रीविजयच्या या राजकीय डावपेचांबद्दल कळालं. मग त्यानं श्रीविजयचा राजा विजयतुंगवर्मन याला त्याची ताकद दाखवायचं ठरवलं.

1017 मध्ये झालेल्या लढाईत राजेंद्र चोलचा विजय झाला. त्यानं विजयतुंगवर्मनला कैद केलं.

त्यानंतर विजयतुंगवर्मननं त्याच्या मुलीचा विवाह राजेंद्र चोलशी करून त्याचं अधिपत्य मान्य केलं.

अत्यंत हिंसाचार आणि शत्रूच्या प्रदेशाचा विध्वंस

आता राजेंद्र चोल संपूर्ण आशिया खंडातील एक मोठा राजा झाला होता. शत्रूबरोबर लढाया करताना हिंसेचा वापर करण्यासाठी कुप्रसिद्ध झाला होता.

त्याच्या शत्रूंनी त्याच्यावर लढाया करताना युद्धाचे नियम मोडल्याचा आरोप केला होता.

चालुक्यांचं म्हणणं होतं की राजेंद्र चोलनं युद्धाच्या वेळेस संपूर्ण राज्याचा प्रचंड विध्वंस केला होता. "ब्राह्मण आणि महिलांची हत्या करण्यासदेखील तो मागेपुढे पाहत नसे."

तामिळनाडूत चोल वंशाच्या राजवटीत बांधण्यात आलेल्या किल्ल्याचे अवशेष

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, तामिळनाडूत चोल वंशाच्या राजवटीत बांधण्यात आलेल्या किल्ल्याचे अवशेष

अनिरुद्ध कणिसेट्टी यांनी 'लॉर्ड्स ऑफ द डेक्कन, सदर्न इंडिया फ्रॉम चालुक्याज टू चोलाज' हे पुस्तक लिहिलं आहे.

या पुस्तकात अनिरुद्ध लिहितात, "श्रीलंकेच्या इतिहासात देखील नोंदवण्यात आलं आहे की राजेंद्र चोल राजाचे सैनिक तिथल्या लोकांशी खूपच क्रूरपणे वागले होते."

"त्यांनी राजघराण्यातील महिलांचं अपहरण केलं होतं, तसंच अनुराधापूरमचा शाही खजिनादेखील लुटला होता. इतकंच नाही, तर त्यांनी बौद्ध मठांमधील स्तुपांची तोडफोड करून तिथे ठेवलेली रत्नंदेखील लुटली होती."

श्रीलंका आणि मालदीववर ताबा

सन 1014 मध्ये राजराजाचं निधन झाल्यानंतर राजेंद्र चोल गादीवर आला होता.

त्यानंतर सर्वात आधी त्यानं शेजारच्या पांड्य आणि चेरो राजांचा पाडाव केला होता. मग 1017 मध्ये त्यानं श्रीलंकेवर हल्ला चढवला होता.

त्या काळच्या शिलालेखांमधून समोर येतं की या हल्ल्यामागचा उद्देश तिथलं राज्य ताब्यात घेण्याचा नव्हता, तर तिथून जास्तीत जास्त सोनं आणि इतर मौल्यवान वस्तू आणण्याचा होता.

युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत पोलोन्नरुवाचा समावेश आहे, ते श्रीलंकेतील साम्राज्य आणि चोल वंशाचं प्राचीन शाही नगर होतं

फोटो स्रोत, Universal Images Group via Getty Images

फोटो कॅप्शन, युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत पोलोन्नरुवाचा समावेश आहे, ते श्रीलंकेतील साम्राज्य आणि चोल वंशाचं प्राचीन शाही नगर होतं

या हल्ल्याचा परिणाम असा झाला की संपूर्ण श्रीलंका बेट पहिल्यांदाच चोलांच्या नियंत्रणाखाली आलं.

वर्षभरानं, 1018 मध्ये राजेंद्र चोलनं आरमारी मोहीम आखली आणि त्यानं मालदीव आणि लक्षद्वीपवर हल्ला चढवला. मग हे दोन्ही प्रदेश चोलांच्या अधिपत्याखाली आले.

1019 मध्ये राजेंद्र चोल राजानं उत्तर कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्रात सैन्य पाठवलं. 1021 मध्ये त्यानं संपूर्ण दक्षिण भारतावर नियंत्रण असलेल्या चालुक्य आणि कल्याणचा पराभव केला.

गंगेचं पाणी दक्षिणेत आणलं

1022 मध्ये राजेंद्र चोल राजानं त्याचं साम्राज्य आणखी वाढवलं. तो 1,000 मैलांवरील गंगेचा किनारा आणि त्याच्याही पुढे त्यानं साम्राज्याचा विस्तार केला.

या मोहिमेदरम्यान त्यानं ओडिशा आणि बंगालच्या शक्तीशाली पाल वंशाचा राजा महिपाल याला चोलांच्या अधिपत्याखाली येण्यास भाग पाडलं.

तामिळनाडूत चोल राजवटीच्या काळात बांधण्यात आलेलं भगवान शिवाचं मंदिर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, तामिळनाडूत चोल राजवटीच्या काळात बांधण्यात आलेलं भगवान शिवाचं मंदिर

रिचर्ड ईटन लिहितात, "या मोहिमेत राजेंद्र चोलनं बंगालमधून अत्यंत मौल्यवान रत्नं, तिथल्या पवित्र देवतांच्या मुर्ती आणि पिंपांमध्ये गंगेचं पवित्र आपल्यासोबत आणलं. या मोहिमेची आठवण म्हणून त्यानं 'गंगईकोंड' हा किताब धारण केला."

"मग त्यानं 'गंगईकोंड चोलपुरम'ला नवीन राजधानी बनवलं. गंगईकोंड शब्दाचा अर्थ होतो - गंगा जिंकणारा."

ख्यातनाम इतिहासकार रोमिला थापर यांनी 'अर्ली इंडिया' हे पुस्तक लिहिलं आहे.

त्यात त्यांनी लिहिलं आहे, "विजय मिळाल्यानंतर गंगा नदीचं पाणी दक्षिण भारतात घेऊन जाणं हे उत्तर भारतावर दक्षिण भारतानं मिळवलेल्या विजयाचं प्रतीक होतं."

सुमात्रापर्यंत आरमारी मोहीम

राजेंद्र चोल राजानं राजधानीत भगवान शंकराला समर्पित असलेलं एक विशाल मंदिर बांधलं. 250 वर्षांहून अधिक काळ ते मंदिर शैव भक्ती आणि चोलांच्या वास्तुकलेचं प्रतीक होतं.

राजेंद्र चोलनं त्याच्या राजधानीत एक विशाल कृत्रिम सरोवर बांधलं. त्याची लांबी 16 मैल आणि रुंदी तीन मैल होती.

इंडोनेशियाचं प्रंबनन मंदिर, जे नवव्या शतकात बांधण्यात आलं होतं

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इंडोनेशियाचं प्रंबनन मंदिर, जे नवव्या शतकात बांधण्यात आलं होतं

बंगालमधील विजयानंतर आणण्यात आलेलं गंगेचं पाणी या सरोवरात टाकण्यात आलं. मात्र राजेंद्र चोल राजाला जास्त दिवस उत्तर भारतावर नियंत्रण राखता आलं नाही.

मालदिव आणि श्रीलंकेत विजय मिळवल्यानंतर राजेंद्र चोल खूपच उत्साही झाला होता. त्यानंतर तो आणखी एका परदेशी लष्करी मोहिमेची योजना बनवण्यात व्यस्त झाला.

यावेळेस त्यानं इंडोनेशियातील सुमात्रापर्यंत त्याचं आरमार पाठवण्याचा अभूतपूर्व निर्णय घेतला.

चोलांच्या आरमाराचा श्रीविजय राज्यावर आणखी विजय

त्याआधीच 1017 मध्ये राजेंद्र चोल आणि श्रीविजयच्या राजामध्ये लढाई झाली होती. त्यात राजेंद्र चोलच्या आरमाराचा विजय झाला होता.

या लढाईचा उल्लेख मलेशियातील कटाह शहरातील एका शिलालेखात सापडतो. त्यात राजेंद्र चोल राजाला 'कटाहचा विजेता' म्हटलं आहे.

मात्र 1025 मध्ये राजेंद्र चोल राजानं श्रीविजय राज्याशी लढाई करण्यासाठी सगळं आरमार पाठवलं होतं.

पॉल मुनोज यांनी 'अर्ली किंगडम्स' पुस्तक लिहिलं आहे.

त्यात त्यांनी लिहिलं आहे, "या मोहिमेत विजय मिळाल्यानंतर जो करार झाला, त्याअंतर्गत अंगकोरचा राजा सूर्यवर्मन यानं राजेंद्र चोलला मौल्यवान भेटवस्तू दिल्या. राजेंद्र चोलनं या मोहिमेसाठी आरमाराचा खूप मोठा ताफा पाठवला होता. तो बहुधा नागपट्टिनम या चोलांच्या मुख्य बंदरात एकत्र झाला होता."

विल्यम डेलरिंपलनं 'द गोल्डन रोड' हे पुस्तक लिहिलं आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे, "या मोहिमेसाठी सैनिकांबरोबरच हत्तीदेखील जहाजांवर चढवण्यात आले होते. श्रीलंकेतील एका बंदरातून जात चोलांनी या मोहिमेची सुरुवात केली होती."

इतिहासकार विल्यम डेलरिंपल यांनी त्यांच्या 'द गोल्डन रोड' या पुस्तकात चोल राजांच्या परदेश मोहिमांचा उल्लेख केला आहे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इतिहासकार विल्यम डेलरिंपल यांनी त्यांच्या 'द गोल्डन रोड' या पुस्तकात चोल राजांच्या परदेश मोहिमांचा उल्लेख केला आहे

"अनेक दिवस सागरी प्रवास केल्यानंतर, त्यांनी सुमात्रा, टकुआ पाह हे थायलंडमधील बंदर आणि मलेशियातील केदार बंदरावर अचानक हल्ला चढवला होता. ही दक्षिण आशियातील कोणत्याही राज्यानं देशाबाहेर सर्वाधिक अंतरावर केलेली सैन्य मोहीम होती."

या अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि यशस्वी मोहिमेनंतर राजेंद्र चोल राजाचा दबदबा आग्नेय आशियातदेखील निर्माण झाला.

1027 मध्ये राजेंद्र चोलनं या विजयी मोहिमेचा संपूर्ण वृत्तांत तंजावरच्या मंदिरातील एका भिंतीवर कोरला होता.

विजय आणि संगीता सखूजा यांनी 'राजेंद्र चोला, फर्स्ट नेव्हल एक्सपीडिशन टू साऊथ-ईस्ट एशिया' हे पुस्तक लिहिलं आहे.

यात त्यांनी लिहिलं आहे, "या शिलालेखांमध्ये ज्या सहा ठिकाणांचा उल्लेख आहे, त्यातील चार सुमात्रा, एक मलेशियाचा द्वीपकल्प आणि एक निकोबार बेटावर आहे."

"आज ज्याला सिंगापूर म्हटलं जातं, त्या ठिकाणाहूनदेखील राजेंद्र चोल आणि त्याचं सैन्य गेला असण्याची शक्यता आहे. कारण तिथेदेखील एक शिलालेख सापडला आहे. त्यात राजेंद्र चोलच्या अनेक किताबांपैकी एकाचा उल्लेख आहे."

चीनशी जवळचे संबंध

इतिहासकारांना वाटतं की आग्नेय आशियात जाण्यामागे राजेंद्र चोलच्या आरमाराचा उद्देश तिथे विजय मिळवणं हा नव्हता. तर व्यापार युद्धात लष्करी शक्तीचा वापर करण्याचा होता. जेणेकरून सागरी मार्गांवरील श्रीविजय राज्याची पकड कमी करता यावी.

केनेथ हॉल यांनी 'खमेर कमर्शियल डेव्हलपमेंट अँड फॉरेन क्रॅन्टॅक्स्स अंडर सूर्यवर्मन फर्स्ट' या पुस्तकात लिहिलं आहे, "या मोहिमांमागचा मुख्य उद्देश चीनबरोबर अधिक फायदेशीर व्यापारी मार्ग सुरू करण्याचा होता."

"त्याकाळी चीनमध्ये काळी मिरी, मसाले, जंगलातील उत्पादनं आणि कापसाला मोठी मागणी होती. चीनला या वस्तू निर्यात करून मोठा नफा मिळवता येईल, अशी आशा चोल राजांना होती."

राजेंद्र चोलनं श्रीविजय राज्याला बचावात्मक भूमिका घ्यायला भाग पाडलं आणि त्यानंतर चीनमध्ये त्याचा दूत पाठवला.

तामिळनाडूतील चिदंबरम येथील नटराज मंदिरदेखील चोल राजवटीतच बांधण्यात आलं होतं

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, तामिळनाडूतील चिदंबरम येथील नटराज मंदिरदेखील चोल राजवटीतच बांधण्यात आलं होतं

चीनच्या सम्राटासाठी तो दूत त्याच्यासोबत हस्तीदंत, मोती, गुलाब जल, गेंड्याची शिंगं आणि रेशमी कपड्यांसारख्या अनेक मौल्यवान भेटवस्तू घेऊन गेला.

काही दिवसांनी ग्वांगजो या चीनमधील शहरात एक मंदिर बांधण्यात आलं. त्या मंदिराचा काही भाग अजूनही अस्तित्वात आहे.

जॉन गाई यांनी 'तमिल मर्चेंट्स अँड द हिंदू-बुद्धिस्ट डायस्पोरा' हे पुस्तक लिहिलं आहे. त्यात जॉन यांनी लिहिलं आहे, "चीनमधील एका शिलालेखाती या गोष्टीचा उल्लेख आहे की चोल राजकुमार दिवाकर चीनमधील या मंदिराच्या देखभालीसाठी 1067 ते 69 पर्यंत धन पाठवत होता."

तामिळ व्यापारी चीनमधून जहाजांनी सुंगधित लाकडं, धूप बत्ती, कापूर, मोती, चीनी मातीची भांडी आणि सोनं कोरोमंडलच्या बंदरात आणायचे.

खमेर साम्राज्याबरोबरचे चोलांचे संबंध

राजेंद्र चोलाच्या वेळेस चोल साम्राज्य आणि खमेर साम्राज्यात मैत्रीचे संबंध होते. त्याचाच परिणाम म्हणून अंगकोरवाटमध्ये जगातील सर्वात मोठं मंदिर बांधलं गेलं.

हे मंदिर आजदेखील अस्तित्वात असून ते जवळपास 500 एकरांमध्ये पसरलेलं आहे.

हे मंदिर भगवान विष्णूचं आहे. या मंदिराचा परिसर इतका मोठा आहे की तो अंतराळातूनदेखील दिसतो.

ज्यावेळेस तंजावर आणि चिदंबरममध्ये चोल राजे मंदिर उभारत होते, जवळपास त्याच वेळेस अंगकोरवाटचं हे मंदिर बांधण्यात आलं होतं. त्यावेळेस हिंदी महासागरातील या दोन मोठ्या शक्तींमध्ये घनिष्ठ मैत्री होती.

कंबोडियातील अंगकोरवाट मंदिराला खमेर वंश आणि चोल साम्राज्याच्या मैत्रीचं प्रतीक म्हणूनदेखील पाहिलं जातं

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कंबोडियातील अंगकोरवाट मंदिराला खमेर वंश आणि चोल साम्राज्याच्या मैत्रीचं प्रतीक म्हणूनदेखील पाहिलं जातं

राजेंद्र चोल एक कुशल योद्धा तर होताच, त्याचबरोबर तो उत्तम प्रशासकदेखील होता. त्यानं अनेक गावांमध्ये उच्च दर्जाचे गुरुकुल सुरु केले. तिथे विद्यार्थ्यांना संस्कृत आणि तामिळ भाषेचं शिक्षण दिलं जायचं.

तंजावरव्यतिरिक्त त्यानं श्रीरंगम, मदुराई आणि रामेश्वरममध्ये अनेक भव्य मंदिरं बांधली. स्थापत्यकलेसाठी आजदेखील ही मंदिरं प्रसिद्ध आहेत.

राजेंद्र चोलबद्दल म्हटलं जातं की त्यानं फक्त समुद्रच जिंकला नाही तर लोकांची मनंदेखील जिंकली होती.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)