दिल्लीचा सुलतान मोहम्मद बिन तुघलकला एकाचवेळी संत आणि राक्षस का म्हटलं गेलं?

फोटो स्रोत, PENGUIN INDIA
- Author, रेहान फजल
- Role, बीबीसी हिंदी
1325 साली दिल्लीचा सुलतान गयासुद्दीन तुघलक बंगालमध्ये मोठा विजय मिळवून दिल्लीला परतत होता. त्याचवेळेस त्याचा एक मोठा अपघात झाला.
दिल्लीपासून काही किलोमीटर आधी त्याच्या स्वागतासाठी एक लाकडी मंडप बनवण्यात आला होता. हा मंडप सुलतानावरच कोसळला आणि त्यात सुलतानाचा मृत्यू झाला.
मध्ययुगीन इतिहासकार जियाउद्दीन बरनी यांच्या 'तारीख-ए-फिरोजशाही' या पुस्तकात या घटनेचा उल्लेख आहे. त्यात असंही लिहिलं आहे, "पावसात वीज पडल्यामुळे हा मंडप कोसळला होता."
सुलतान गयासुद्दीन यानं आधीच तुघलकाबादमध्ये एक मकबरा बनवून घेतला होता. त्याच रात्री सुलतानाला त्या मकबऱ्यात दफन करण्यात आलं.
अर्थात इतर काही इतिहासकारांनी मंडप कोसळण्याची ही घटना म्हणजे एक कारस्थान असल्याचंही म्हटलं आहे.
दरम्यान 3 दिवसांनी गयासुद्दीनचा मुलगा 'जौना' याला दिल्लीच्या गादीवर बसवण्यात आलं. त्यानं स्वत:ला नाव दिलं 'मोहम्मद बिन तुघलक'.
अशाप्रकारे दिल्ली सल्तनतच्या तीन शतकांच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त आणि चढ-उतारांच्या कालखंडाची सुरुवात झाली.
मोहम्मद बिन तुघलकच्या काळातच मोरक्कोचा प्रवासी इब्न बतूता भारतात आला होता. तो मोहम्मद बिन तुघलकच्या दरबारात 10 वर्षे होता.
मोहम्मद बिन तुघलकच्या वडिलांच्या काळातील इतिहासकार जियाउद्दीन बरनी यांनीदेखील त्याच्या दरबारात प्रदीर्घ काळ काम केलं.

फोटो स्रोत, Getty Images
प्रसिद्ध इतिहासकार अब्राहम इराली यांनी 'द एज ऑफ रॉथ' हे पुस्तक लिहिलं आहे. त्यात ते लिहितात, "बरनी यांनी मोहम्मद बिन तुघलकचा दरबारी असूनदेखील त्याच्या उणीवाचं आणि दुष्कृत्यांचं वर्णन केलं आहे. अर्थात त्यांनी त्याच्या काही चांगल्या कामाचं कौतुकदेखील केलं आहे."
"मात्र इब्न बतूतानं मोहम्मद बिन तुघलकबद्दल अधिक मोकळेपणानं लिहिलं आहे. कारण त्यानं भारतातून मायदेशी परतल्यानंतर हे लिखाण केलं होतं. त्यामुळे त्याला मोहम्मद बिन तुघलकवर टीका करण्याची कोणतीही भीती नव्हती."
दुहेरी व्यक्तिमत्व
मध्ययुगीन इतिहासकारांनी मोहम्मद बिन तुघलकाला दुहेरी व्यक्तिमत्वाचा माणूस म्हटलं आहे. म्हणजेच त्याच्यात अनेक चांगले गुण होते, तसंच अनेक दुर्गुण देखील होते.
एका बाजूला तो प्रचंड अहंकारी होता. तर दुसऱ्या बाजूला तो अत्यंत विनम्रदेखील होता. त्याच्या आयुष्यात अतिशय क्रौर्य दिसतं, त्याचप्रमाणे ह्रदयाला स्पर्श करणारी करुणादेखील स्पष्ट दिसते.

फोटो स्रोत, PENGUIN RANDOM HOUSE
इब्न बतूतानं 'रिहला' हे पुस्तक लिहिलं आहे. यात त्यानं मोहम्मद बिन तुघलकच्या व्यक्तिमत्वाचं अतिशय योग्य वर्णन केलं आहे.
इब्न बतूतानं लिहिलं, "या बादशाहाला एकीकडे भेटवस्तू देण्याची आवड होती. तर दुसरीकडे तो हिंसकदेखील होता. तो एका बाजूला गरीबांना श्रीमंत करायचा, तर दुसरीकडे त्यानं अनेकांची हत्यादेखील केली."
इतिहासकार रॉबर्ट सेवेल यांनी 'अ फॉरगॉटन एम्पायर' हे पुस्तक लिहिलं. त्यात त्यांनी म्हटलं, "एका बाजूला मोहम्म्द संत होता, ज्याचं मन राक्षसाचं होतं. तर दुसऱ्या बाजूला तो असा राक्षस होता, ज्याचा आत्मा संताचा होता."
हिंसक, क्रूर सुलतान
मोहम्मद बिन तुघलक नेहमीच नव्या पद्धतीनं विचार करायचा. मात्र तो व्यवहारवादी अजिबात नव्हता. त्याच्यात संयमाचा अभाव होता. तसंच तो दिलेला शब्द पाळायचा नाही.
त्या कालखंडातील जवळपास सर्वच इतिहासकारांना वाटतं की, मोहम्मद बिन तुघलकच्या बहुतांश योजना शेवटी त्याच्यासाठी आणि त्याच्या प्रजेसाठी एक भयानक दु:स्वप्न ठरल्या.
अर्थात त्यानं कधीही या अपयशाला स्वत:चं अपयश मानलं नाही. त्यासाठी त्यानं नेहमीच त्याच्या माणसांना दोष दिला.

फोटो स्रोत, ORIENTAL INSTITUTE BARODA
इब्न बतूता लिहितो, "सुलतान नेहमीच रक्ताला तहानलेला असायचा. तो लोकांच्या प्रतिष्ठेचा विचार न करता छोट्या छोट्या गुन्ह्यांसाठी कठोरातील कठोर शिक्षा द्यायचा. दररोज एका मोठ्या हॉलमध्ये साखळ्या, दोरखंड आणि बेड्यांनी बांधलेले शेकडो लोक आणले जायचे."
"यातील ज्यांना मृत्यूदंडाची शिक्षा मिळायची त्यांना तिथेच मारलं जायचं. ज्या लोकांना कठोर शिक्षा मिळायची, त्यांना अनेक यातना दिल्या जायच्या. ज्यांना मारहाणीची शिक्षा मिळायची त्यांना मारहाण केली जायची."
"तिथे रक्त सांडलं गेलं नसेल, असा एकही दिवस नव्हता. त्याच्या महालाच्या मुख्य प्रवेशद्वारावर रक्तच रक्त दिसायचं. मारण्यात आलेल्या लोकांचे मृतदेह इशारा म्हणून महालाच्या मुख्य द्वारावर फेकले जायचे."
"जेणेकरून सुलतानाच्या विरोधात कोणीही भूमिका घेण्याची हिंमत करता कामा नये. शुक्रवारचा दिवस सोडून आठवड्याच्या सर्व दिवशी मृत्यूदंड दिला जायचा."
ज्ञानी असूनही क्रूर
मध्ययुगीन राजे किंवा बादशाहांच्या तुलनेत ज्ञानी असूनदेखील मोहम्मद बिन तुघलक माणुसकी असलेला व्यक्ती होण्याऐवजी कठोर, क्रूर व्यक्ती झाला होता.
जियाउद्दीन बरनी यांनी त्यांच्या 'तारीख-ए-फिरोजशाही' या पुस्तकात लिहिलं आहे, "इस्लाम धर्माच्या पुस्तकात आणि पैगंबर मोहम्मदच्या शिकवणुकीत परोपकार आणि विनम्रतेवर भर देण्यात आला आहे. मात्र मोहम्मद बिन तुघलकनं या गोष्टींकडे कधीही लक्ष दिलं नाही."
इब्न बतूता लिहितो, "मोहम्मदचा मामे भाऊ बहाउद्दीन गुरचस्प यानं त्याच्या विरोधात बंड केलं. त्यावेळेस मोहम्मदनं त्याची कातडी सोलून काढली होती."

फोटो स्रोत, Getty Images
इब्न बतूतानं आणखी एका घटनेचा उल्लेख केला आहे. "एकदा एका धार्मिक मुस्लीम व्यक्तीनं मोहम्मदला हुकुमशहा म्हटलं. तेव्हा त्याला साखळदंडांनी बांधण्यात आलं आणि 15 दिवस उपाशी ठेवण्यात आलं. त्यानंतर देखील त्या माणसानं त्याचे शब्द परत घेतले नाहीत."
"मग सुलताननं त्याला जबरदस्तीनं मानवी विष्टा घाऊ घालण्याचा आदेश दिला. शिपायांनी त्याला जमिनीवर झोपवलं आणि चिमट्यानं त्याचं तोंड उघडलं. त्यानंतर सुलतानाच्या आदेशाचं पालन करण्यात आलं."
दहशत आणि क्रौर्य
दिल्लीच्या गादीवर बसणाऱ्या 32 सुलतानामध्ये फक्त दोनच सुलतान असे आहेत, ज्यांच्यावर क्रौर्याचा आरोप केला जाऊ शकत नाही.

फोटो स्रोत, Getty Images
मोहम्मद कासिम फरिश्तानं त्याच्या 'तारीख-ए-फरिश्ता' या पुस्तकात लिहिलं आहे, "जर त्याकाळच्या सुलतानांच्या दृष्टीकोनातून पाहिलं, तर क्रूरपणा आणि दहशत ही त्यावेळच्या सुलतानांची गरज होती. त्याशिवाय ते बादशाह राहू शकले नसते."
"मात्र मोहम्मदच्या काळात क्रूरपणा इतका वाढला होता की, त्याचा उलटा परिणाम झाला."
"त्याच्या क्रौर्यामुळे त्याची ताकद वाढवण्याऐवजी कमी झाली. मोहम्मद हा एक शिकलेला, सुसंस्कृत आणि प्रतिभावान व्यक्ती होता यात कोणतीही शंका नाही. मात्र आपल्या लोकांसाठी त्याच्या मनात कोणतीही दया आणि करुणा नव्हती."
परदेशी लोकांना दिली चांगली वर्तणूक
मोहम्मद बिन तुघलकच्या राजवटीत परदेशी प्रवाशांना चांगली वागणूक मिळाल्याचे उल्लेख अनेक इतिहासकारांनी केले आहेत.
इब्न बतूतानं याबाबतीत लिहिलं, "मी सुलतानसमोर जाताच त्यानं माझा हात त्याच्या हाती घेत म्हटलं की, तुमचं आगमन शुभ आहे. कसलीही चिंता करू नका."
बतूतानं लिहिलं आहे की, सुलतान मोहम्मदनं त्याला 6,000 टंका रोख दिले.
त्याला आधी तीन गावांची आणि नंतर दोन आणखी गावं वतन म्हणून देण्यात आली. त्यातून त्याला दरवर्षी 12,000 टंकाचं उत्पन्न मिळत होतं.

फोटो स्रोत, Getty Images
इब्न बतूतानं त्याच्या पुस्तकात लिहिलं आहे, "माझ्या सेवेसाठी सुलतानानं मला 10 हिंदू गुलाम देखील दिले. इतकंच नाही, तर मला दिल्लीचा काजी म्हणून नियुक्त करण्यात आलं. वास्तविक मला स्थानिक भाषा अजिबात येत नव्हती. परदेशी राजांच्या बाबतीत देखील सुलतानाची वर्तणूक अतिशय सौहार्दाची होती."
लेखक अब्राहम इराली यांच्या मते, "मोहम्मद बिन तुघलकनं चीनच्या राजाला भेट म्हणून 100 घोडे, 100 गुलाम, 100 नर्तकी, कपड्यांचे 1200 थान, जरीचे पोशाख, टोप्या, भाले, तलवारी, मोत्यांचं भरतकाम केलेले हातमोजे आणि 15 किन्नर पाठवले होते."
न्यायप्रिय मोहम्मद बिन तुघलक
दिल्ली सल्तनतच्या इतिहासाचा अभ्यास केल्यावर बादशाह आणि त्यांचं आई-वडिलांबरोबरचं नातं यासंदर्भातील अनेक पैलू समोर येतात.
विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी प्रमुख आणि इतिहासकार सतीश चंद्रा यांनी 'मेडिवल इंडिया: फ्रॉम सल्तनत टू मुघल्स' हे पुस्तक लिहिलं आहे.
त्यात सतीश चंद्रा यांनी लिहिलं आहे की, मोहम्मद बिन तुघलक त्याच्या आईचा खूप आदर करायचा. तो प्रत्येक मुद्द्यावर आईचा सल्ला घ्यायचा. अर्थात लष्करी छावण्यांमध्ये महिलांच्या उपस्थितीवर त्यानं बंदी घातली होती.
अनेक इतिहासकारांनी लिहिलं आहे की, सुलतानला मद्यपान देखील आवडायचं नाही.

फोटो स्रोत, IRFAN HABIB
मध्ययुगीन भारताचे प्रसिद्ध इतिहासकार प्राध्यापक इरफान हबीब यांनी 'इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ मेडिवल इंडिया' हे पुस्तक लिहिलं आहे.
त्यात इरफान हबीब लिहितात, "मोहम्मद बिन तुघलकचं वैशिष्ट्यं होतं की तो बाहेरून आलेल्या मुस्लीम आणि मंगोल लोकांव्यतिरिक्त हिंदूंना देखील महत्त्वाची पदं द्यायचा. त्याचबरोबर तो धर्मापेक्षा लोकांच्या गुणवत्तेला अधिक महत्व द्यायचा."
उदाहरणार्थ, तो अरबी आणि फारसी भाषेचा विद्वान होता. तसंच खगोलशास्त्र, तत्वज्ञान, गणित आणि तर्कशास्त्रात पारंगत होता.
इब्न बतूतानं मोहम्मद बिन तुघलकच्या न्यायप्रियतेची अनेक उदाहरणं दिली आहेत. "एकदा सुलतानच्या दरबारातील एका हिंदू व्यक्तीनं काजीकडे तक्रार केली की, सुलताननं त्याच्या भावाला विनाकारण मृत्यूदंडाची शिक्षा दिली. त्यानंतर सुलतान काजीच्या न्यायालयात अनवाणी गेला आणि त्याच्यासमोर मान खाली घालून उभा राहिला."
"काजीनं सुलतानाच्या विरोधात निकाल दिला. त्यानं सुलतानाला आदेश दिला की, दरबारी माणसाच्या भावाच्या हत्येसाठी त्यानं दंड भरावा. सुलताननं काजीचा हा निर्णय मान्य केला."
इब्न बतूता पुढे लिहितो, "एकदा एका माणसानं दावा केला की, सुलतानाकडे त्याची काही रक्कम बाकी आहे. या प्रकरणातदेखील काजीनं सुलतानाच्या विरोधात निकाल दिला. तो मान्य करत सुलतानानं ती रक्कम तक्रारदाराला दिली."
गरीबांना मदत करणारा दयाळू सुलतान
ज्यावेळेस भारतात अनेक ठिकाणी प्रचंड दुष्काळ पडला आणि राजधानीत एक मण गहू सहा दिनारला मिळू लागला. तेव्हा सुलतान मोहम्मद बिन तुघलकानं आदेश दिला की, दिल्लीतील प्रत्येक गरीब-श्रीमंत व्यक्तीला माणशी 750 ग्रॅम प्रमाणे 6 महिन्यांपर्यत रोज अन्नधान्याचं वाटप करण्यात यावं.
इब्न बतूतानं या घटनेबद्दल त्याच्या पुस्तकात लिहिलं, "सामान्य स्थितीत देखील सुलतानानं दिल्लीतील लोकांसाठी सार्वजनिक अन्नछत्र सुरू केले. त्यात दररोज कित्येक हजार लोकांना जेवण दिलं जायचं. सुलतानानं रुग्णांसाठी इस्पितळं आणि विधवा, अनाथांसाठी आधारगृहदेखील सुरू केले."
धर्माच्या बाबतीत मोहम्मद बिन तुघलकच्या विचारांमध्ये अनेक विसंगती होत्या. काही इतिहासकारांना वाटतं की, त्याच्या राजवटीत नमाज पढणाऱ्या लोकांना खूप कठोरपणे वागवलं जायचं.
मात्र, त्याचे समकालीन इतिहासकार जियाउद्दीन बरनी आणि अब्दुल मलिक इसामी यांना वाटतं की, सुलतान मोहम्मद बिन तुघलक वृत्तीनं धार्मिक नव्हता.

फोटो स्रोत, PENGUIN BOOKS
बरनी यांच्या मते, "त्यांनी सुलतानचे दरबारी असूनदेखील सुलतानच्या तोंडावर स्पष्टपणे सांगितलं होतं की, ज्याप्रकारे तो त्याच्या विरोधकांशी वागतो आहे, त्या वर्तणुकीला इस्लामी परंपरांमध्ये कोणतीही मान्यता नाही."
इतिहासकार इसामी यांनी याहून एक पाऊल पुढे जात मोहम्मद बिन तुघलकला 'काफिर' म्हटलं. त्यांनी सुलतानाला पुढे म्हटलं की, तुम्ही नेहमीच नास्तिक लोकांबरोबर दिसले आहात.
प्रत्यक्षात मोहम्मद बिन तुघलकच्या एका सवयीमुळे तत्कालीन मुस्लीम धर्मगुरू संतापले होते. ती म्हणजे, "सुलतान योगी आणि साधूंना संरक्षण देत होता."
अब्राहम इराली यांनीदेखील लिहिलं, "अती हिंसक वृत्तीचा असून देखील मोहम्मद बिन तुघलकावर जीनाप्रभा सूरी या एका जैन साधूचा प्रभाव होता. मोहम्मदला इतर धर्मांविषयी जाणून घ्यायची उत्सुकता होती, याची अनेक उदाहरणं आहेत. कारण त्याचा दृष्टीकोन आणि सांस्कृतिक रस व्यापक स्वरूपाचा होता."
राजधानी देवगिरीला हलवण्याचा वादग्रस्त निर्णय
जवळपास सर्वच इतिहासकारांचं एकमत आहे की, राजधानी दिल्लीहून महाराष्ट्रात दौलताबादला (देवगिरी) हलवणं हा मोहम्मद बिन तुघलकाचा सर्वात वादग्रस्त निर्णय होता.
सुलतानला वाटत होतं की, हा एक अत्यंत हुशारीचा निर्णय होता आणि तो यशस्वी व्हायला हवा होता. मात्र हा निर्णय यशस्वी झाला नाही.
बरनी लिहितात, "हा निर्णय अचानक आणि कोणाशीही चर्चा न करता घेण्यात आला होता. त्याच्या फायद्या-तोट्यांचा विचार करण्यात आला नव्हता. कारण हा सुलतानाचा वैयक्तिक निर्णय होता."
"मोहम्मदनं फक्त राजधानीच दौलताबादला नेली नाही, तर दिल्लीतील सर्व रहिवाशांनीदेखील दौलताबादला त्याच्यासोबत जावं असा आग्रह धरला, त्यामुळे हा निर्णय फसला."

फोटो स्रोत, Getty Images
दिल्लीतील अनेक लोकांनी दौलताबादला (देवगिरी) जाण्यास नकार दिला आणि ते आपापल्या घरात लपून बसले.
इब्न बतूता यांच्या मते, "सुलताननं सगळ्या शहरात लोकांचा शोध घ्यायला लावला. सुलतानाच्या शिपायांना दिल्लीच्या रस्त्यावर एक अपंग आणि एक अंध व्यक्ती सापडला. त्या दोघांना सुलतानासमोर हजर करण्यात आलं."
त्यांनी पुढे लिहिलं आहे, "सुलताननं आदेश दिला की, अपंग व्यक्तीला तोफेच्या तोंडी देण्यात यावं आणि अंध व्यक्तीला, दिल्ली ते देवगिरीपर्यंतच्या 40 दिवसांच्या प्रवासात रस्त्यावर फरफटत नेण्यात यावं. रस्त्यावर त्या व्यक्तीचे तुकडे होत गेले आणि देवगिरीपर्यंत फक्त त्याचा पाय पोहोचला."
ही बातमी ऐकताच, लपून बसलेल्या मोजक्या लोकांनी देखील दिल्लीतून पळ काढला. आता दिल्ली पूर्ण उजाड झाली. इतिहासकार लिहितात की, घाबरलेल्या लोकांनी त्यांचं सामान, फर्निचर आणि इतर वस्तूदेखील नेल्या नाहीत.
माघारी परतण्याचा निर्णय
मात्र देवगिरीला राजधानी हलवण्याच्या निर्णयामुळे दिल्लीच्या विनाशाची सुरुवात झाली होती.
बरानीनं लिहिलं आहे, "कधीकाळी दिल्ली इतकी समृद्ध होती की, या शहराची तुलना बगदाद आणि काहिराशी व्हायची. मात्र हे शहर इतकं उद्ध्वस्त झालं की इथे कुत्री-मांजरं देखील सापडत नव्हती."
"अनेक पिढ्यांपासून दिल्लीत राहणारे लोक निराश, हताश झाले. अनेकजण तर देवगिरीच्या रस्त्यातच मृत्यूमुखी पडले. जे देवगिरीला पोहोचले ते देखील दिल्लीपासून दूर राहण्याचं दु:ख सहन करू शकले नाहीत."
शेवटी मोहम्मद बिन तुघलकनं देवगिरीत आलेल्या लोकांना दिल्लीला परत जाण्याची परवानगी दिली.
ज्याप्रकारे दिल्लीतून दक्षिण भारतावर नियंत्रण ठेवण्यात अडचण येत होती, तसंच देवगिरीतून उत्तर भारतावर नियंत्रण ठेवणं शक्य नव्हतं, या गोष्टीची सुलतानाला जाणीव झाली होती.
अनेकजण आनंदानं दिल्लीला परतले. मात्र काहीजणांनी त्यांच्या कुटुंबासह देवगिरीत राहण्याचा निर्णय घेतला. अनेक जाणकारांच्या मते, देवगिरीतून अनेकजण दिल्लीत परतल्यावर देखील दिल्लीला जुनं वैभव मिळालं नाही.
नाणी बदलण्याचा निर्णय देखील अपयशी
मोहम्मद बिन तुघलकानं सांकेतिक चलन किंवा नाणी चालवण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णयदेखील चांगलाच वादग्रस्त ठरला होता.
14 व्या शतकात जगात चांदीचा तुटवडा भासत होता. त्यामुळे सुलतानानं चांदीच्या टंका नाण्यांऐवजी तांब्याची नाणी पाडली.
सांकेतिक नाणी चालवण्याची कल्पना सुलतानाला चीन आणि इराणकडून मिळाली होती. कारण त्यावेळेस या देशांमध्ये याप्रकारचं चलन वापरात होतं.
मात्र हा निर्णय यशस्वी करण्याची प्रशासकीय इच्छाशक्ती मोहम्मद बिन तुघलकाकडे नव्हती. तसंच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी त्याच्याकडे प्रशिक्षित लोकदेखील नव्हते.

फोटो स्रोत, Getty Images
प्राध्यापक सतीश चंद्रा त्यांच्या मेडिवल इंडिया या पुस्तकात लिहितात, "सुलतानाच्या या निर्णयाचा परिणाम असा झाला की, लवकरच बाजारात बनावट किंवा खोटी नाणी आली."
"लोक देवाण-घेवाण करताना, नाण्यांवर दिलेल्या मूल्याऐवजी नाण्यांच्या किमतीच्या प्रमाणात नाणी देऊ लागली. प्रत्येक व्यक्ती सरकारकडे तांब्याच्या खोट्या नाण्यांमध्ये रक्कम जमा करू लागला."
ज्यावेळेस सुलतानाच्या लक्षात आलं की, सांकेतिक चलनाची त्याची योजना अपयशी ठरली आहे, त्यावेळेस त्यानं हे चलन बंद करण्याचा निर्णय घेतला.
सुलतान मोहम्मद बिन तुघलकनं जाहीर केलं की, ज्यांच्याकडे तांब्याची नाणी असतील, त्यांनी ती सरकारी खजिन्यात जमा करावी आणि त्याबदल्यात ते सोने आणि चांदीची नाणी नेऊ शकतात.
जियाउद्दीन बरनी यांच्यानुसार, "यामुळे सरकारी खजिन्यात इतकी तांब्याची नाणी आली की एकप्रकारे त्यांचा डोंगरच तयार झाला. चलनाच्या बाबतीत अपयश आल्यामुळे सुलतानच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला. परिणामी जनतेच्या बाबतीत सुलतान आणखी कठोर झाला."
प्रसिद्ध इतिहासकार ईश्वरी प्रसाद यांनी 'अ शॉर्ट हिस्ट्री ऑफ मुस्लीम रूल इन इंडिया' हे पुस्तक लिहिलं आहे.
त्यात त्यांनी लिहिलं आहे, "राजवटीची गरज कितीही मोठी असली, तरी सामान्य जनतेसाठी तांब्याची नाणी हे तांबच होतं. जनतेला सांकेतिक चलनाची प्रक्रिया लक्षात आली नाही."
"भारतातील लोक परंपरावादी आहेत आणि ते बदलांविषयी साशंक असतात, तेही जेव्हा शासक भारतीय वंशाचा नसतो तेव्हा ही शंका अधिक असते, या गोष्टीवर देखील सुलतानानं लक्ष दिलं नाही."
सिंधमध्ये झाला सुलतानाचा शेवट
इतिहासातून हीच माहिती समोर येते की, मोहम्मद बिन तुघलकाचा कोणावरही विश्वास नव्हता. त्यामुळेच त्याच्या राजवटीत होत असलेल्या बंडांचा बिमोड करण्यासाठी तो एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात स्वत:च जायचा. त्याच्या या धोरणामुळे त्याच्या सैन्याची प्रचंड दमछाक झाली.
1345 मध्ये गुजरातमध्ये झालेलं बंड मोडून काढण्यासाठी मोहम्मद बिन तुघलक दिल्लीतून बाहेर पडला. मात्र त्यानंतर तो दिल्लीत पुन्हा कधीही परतला नाही.
या लष्करी मोहिमेच्या वेळेस सुलतानाच्या सैन्यात प्लेगचा आजार पसरला. गुजरातमध्ये सुलतानानं बंडखोर मोहम्मद तागीचा पराभव केला. मात्र सुलतान त्याला पकडू शकला नाही. कारण बंडखोर सिंधकडे पळाले.

फोटो स्रोत, Getty Images
दरम्यान मोहम्मद बिन तुघलकाला प्रचंड ताप आला. इतिहासकारांनी त्याबद्दल लिहिलं आहे, "बरा झाल्यानंतर सुलतान बंडखोर तागीचा पाठलाग करत सिंधमध्ये गेला. त्यानं सिंध नदीदेखील ओलांडली. मात्र त्याच दरम्यान त्याला पुन्हा ताप आला."
20 मार्च 1351 ला मोहम्मद बिन तुघलकानं सिंध नदीच्या किनाऱ्यावरील थट्टा शहरापासून जवळपास 45 किलोमीटर अंतरावर शेवटचा श्वास घेतला.
त्यावेळचे इतिहासकार अब्दुल कादिर बदायूं यांनी लिहिलं आहे, "सुलतानाला त्याच्या जनतेकडून प्रेम आणि आदर तर मिळालाच नाही. त्याची जनता त्याला नीट समजूदेखील शकली नाही. सुलतानाच्या मृत्यूमुळे प्रजेला सुलतानापासून आणि सुलतानाला प्रजेपासून मुक्ती मिळाली."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











