बादशाह अकबर : ज्यानं 49 वर्षे भारतावर सत्ता गाजवली, तो अखेरीस मुलाच्या बंडानं कोलमडला

फोटो स्रोत, Getty Images
- Author, रेहान फजल
- Role, बीबीसी हिंदी
भारताच्या इतिहासातील सर्वात शक्तीशाली, प्रभावशाली आणि महान राज्यकर्त्यांमध्ये बादशाह अकबर यांचं नाव घेतलं जातं. मुघल साम्राज्याचा भारतीय उपखंडात प्रचंड विस्तार करणाऱ्या या बादशाहला आयुष्याच्या अखेरच्या वर्षांमध्ये कौटुंबिक कलहाला तोंड द्यावं लागलं.
जवळच्या महत्त्वाच्या व्यक्तींना गमावण्याबरोबरच मुलगा सलीमबरोबर निर्माण झालेल्या तणावामुळे या महान बादशाहची अखेरची वर्षे तशी दु:खदच होती.
एकीकडे सर्वोच्च वैभव असलेला राज्यकर्ता आणि दुसरीकडे मुलाचं बंड, आजारपणानं खंगलेला पिता, या बादशाह अकबराच्या आयुष्यातील अपरिचित पैलूचा उलगडा करणारा हा लेख :
मुघल बादशहा अकबर यांचे अखेरचे दिवस आपल्या निकटवर्तीयांच्या मृत्यूच्या दु:खात गेले होते. त्या शेवटच्या दिवसांमध्ये एकीकडे अकबरची आई हमीदा बेगम आणि दोन मुलांचा मृत्यू झाला, तर दुसरीकडे त्यांच्या सर्वात मोठ्या मुलानंच त्याच्याविरोधात बंड पुकारलं.
तर बिरबल या अकबराच्या नवरत्नांपैकी एकाला आदिवासी टोळ्यांनी मारलं. त्यावेळेस बादशाह अकबर यांना इतकं अतीव दु:ख झालं की, त्यांनी दोन दिवस अन्नपाणीच घेतलं नाही. त्यांच्या आईनं खूप आग्रह केल्यानंतर त्यांनी अन्नाचं सेवन केलं.
एम. एम. बर्के यांनी 'अकबर द ग्रेट मुघल' हे बादशाह अकबर यांचं चरित्र लिहिलं आहे. त्यात ते लिहितात, "मुराद आणि दानियाल या अकबराच्या दोन मुलांचा दारूच्या व्यसनामुळे तरुणपणातच मृत्यू झाला, तर त्यांचा तिसरा मुलगा सलीम देखील व्यसनाधीन होता.
सलीमनं फक्त अकबराविरोधात बंडच केलं नाही तर अकबराचे सर्वात जवळचे सल्लागार अबुल फजल यांची देखील हत्या घडवून आणली. एक पिता म्हणून अपयशी असणं हे बादशाह अकबर यांचं आयुष्यातील सर्वात मोठं दु:ख होतं."
अबुल फजलच्या हत्येनं बसला धक्का
अबुल फजल यांच्या मृत्यूची बातमी बादशाह अकबर यांना शेख फरीद बख्शी बेग यांनी दिली. ही बातमी ऐकताच अकबर जोरात किंचाळले आणि बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळले.
अनेक दिवस ते खूप दु:खी होते. ते असद बेग यांना म्हणाले की, "जर सलीमला बादशाह बनायचं होतं तर त्यानं माझी हत्या करायला हवी होती आणि अबुल फजल यांना जीवनदान द्यायला हवं होतं"

फोटो स्रोत, Getty Images
असद बेग यांनी लिहिलं आहे की, "त्या दिवशी बादशाह अकबर यांनी दाढी केली नाही आणि अफूही देखील खाल्ली नाही. रात्रभर ते रडत होते. ते कित्येक दिवस रडत होते, दु:खात होते आणि या कृत्याबद्दल सलीमला दोषी ठरवत होते."
अबुल फजल यांच्या मृत्यूनंतर इनायतउल्लाह यांनी 'अकबरनामा' हे बादशाह अकबर यांचं चरित्र पूर्ण केलं. त्यात त्यांनी लिहिलं की, "या गुन्ह्यासाठी बादशाह अकबर यांनी सलीमला कधीच माफ केलं नाही."
शहजादा सलीमशी बिघडलेले संबंध
सलीम आणि बादशाह अकबर यांच्यातील दुरावा, बेबनाव अकबराच्या मृत्यूच्या 16 वर्षांपूर्वी सुरू झाला होता.
पहिल्या काश्मीर प्रवासाच्या वेळी अकबरांनी शाही जनानखान्यातील महिलांना आणण्याची जबाबदारी सलीमला दिली होती. मात्र, रस्ता खराब असल्याचं कारण सांगत तो एकटाच परतला होता.
'अकबरनामा'मध्ये अबूल फजल लिहितात की, "कदाचित ही गोष्ट खरी देखील असेल, मात्र, बादशाह अकबर आपल्या जनानखान्यातील महिलांची अत्यंत आतुरतेनं वाट पाहत होते. त्यांचा राग प्रसिद्ध होता."
"संतापलेले अकबर मुसळधार पावसात स्वत: घोड्यावर स्वार होत त्या महिलांना आणण्यासाठी गेले होते. त्यांनी आदेश दिला की, सलीमला त्यांच्यासमोर हजर करण्यात यावं."

फोटो स्रोत, Getty Images
त्या वर्षी 9 जुलैला अकबर यांना भयंकर पोटदुखीचा त्रास झाला.
अबुल फजल लिहितात, "वेदनेच्या भरात त्यांनी आपल्या मुलावरच विषप्रयोग केल्याचा आरोप केला. दोन वर्षांनी अकबर पुन्हा काश्मीरला गेले असता, सलीमनं विनापरवानगी त्यांच्या तंबूत शिरण्याची आगळीक केली. यावर रागावलेल्या अकबरांनी, सलीम त्यांच्या डोळ्यासमोर येता कामा नये असा आदेश दिला होता. मात्र, काही काळानं अकबरांनी सलीमला माफ केलं होतं."
सलीमनं केलं अकबराच्या अनेक आदेशांचं उल्लंघन
2 मे 1599 ला अकबराचा मुलगा मुराद याचा मृत्यू झाल्यावर, बादशाह अकबर यांनी त्याच्या जागी सलीमला दक्षिण भारतातील लष्करी मोहिमेवर पाठवण्याचा निर्णय घेतला.
मात्र, सलीम ठरल्या वेळेस पोहोचला नाही आणि अकबराला नाईलाजानं दुसरा मुलगा दानियाल याला दक्षिणेतील मोहिमेवर पाठवावं लागलं होतं.
बादशाह अकबर यांनी स्वत:देखील दक्षिणेत जाण्याचा निर्णय घेतला. अकबरांनी सलीमला मुघलांना विरोध करणाऱ्या मेवाडच्या राणाला नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी देखील दिली. मात्र, या आदेशाची देखील सलीमनं अंमलबजावणी केली नाही. सलीम अजमेर मध्येच थांबला आणि पुढे गेलाच नाही.

फोटो स्रोत, Atlantic
सलीमनं अलाहाबाद (आताचं प्रयागराज) ला जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी बादशाह अकबर यांच्या आग्रा या राजधानीच्या शहरातील अनुपस्थितीचा फायदा घेत मुघल सत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला.
अलाहाबाद (आताचं प्रयागराज) ला पोहोचल्यानंतर सलीमनं शाही खजिन्याच्या एका भागावर कब्जा केला आणि स्वत:ला बादशाह घोषित केलं.
असीरगड जिंकल्यानंतर बादशाह अकबर यांना अहमहनगरवर हल्ला करायचा होता. मात्र, सलीमचं बंड मोडून काढण्यासाठी त्यांनी लगेच परतण्याचा निर्णय घेतला.
अकबराचा सलीमला इशारा
मार्च 1602 मध्ये सलीमनं बादशाह अकबर यांना संदेश पाठवला की, तो अकबराची भेट घेऊन आदर व्यक्त करू इच्छितो. मात्र, अकबर यांना यात काहीतरी संशय आला आणि त्यांनी सलीमला भेटण्यास नकार दिला.
काही काळानं बातमी आली की 30 हजारांची फौज घेऊन सलीम आग्र्यावर चालून येतो आहे.

फोटो स्रोत, Getty Images
अबूल फजल लिहितात की, "बादशाह अकबर यांनी सलीमला कडक भाषेत संदेश पाठवला, तुझं हित यातच आहे की तू अलाहाबादला परत जा. जर तुला खरोखरच माझी सेवा करायची असेल तर तू एकटाच दरबारात ये."
"परिस्थिती काय आहे हे सलीमच्या लक्षात आलं आणि तो इटावावरून पुन्हा अलाहाबाद परतला. सलीम सत्तेच्या केंद्र स्थानापासून दूर ठेवण्यासाठी बादशाह अकबर यांनी त्याला बंगाल आणि ओडिशाचा सुभेदार म्हणून नियुक्त केलं होतं. मात्र सलीमनं तिथं जाण्यास नकार दिला होता."


सलीमने मागितली अकबरची माफी
यादरम्यान बादशाह अकबर यांची आई हमीदा बेगम आणि आत्या गुलबदन बेगम यांनी पिता-पुत्रातील तणाव कमी करण्याचे प्रयत्न सुरू केले.
त्यांनी बादशाह अकबर यांना विनंती केली की, त्यांनी सलीमला माफ करावं. या दोन्ही महिलांबद्दल अकबराच्या मनात खूप आदर होता. म्हणून त्यांनी त्यांचं म्हणणं मान्य केलं. त्यांनी आपली एक पत्नी सलमा सुलतान बेगम यांना सलीम घरी आणण्यासाठी पाठवलं.

फोटो स्रोत, Getty Images
अबुल फजल लिहितात, "त्यांच्याबरोबर बादशाह अकबर यांनी सलीमला भेट म्हणून एक हत्ती, एक घोडा आणि एक पोषाख पाठवला. सलीमसोबत सलमा आग्र्याजवळ आल्यानंतर त्यांनी एक निरोप पाठवला की त्यांच्या आजीनं त्याचा हाथ पकडून बादशाह समोर घेऊन जावं, जेणेकरून त्याला बादशाहच्या पायावर डोकं ठेवता येईल."
"दुसऱ्या दिवशी सलीमनं बादशाह अकबराच्या पायावर डोकं ठेवून त्यांची माफी मागितली. बादशहा अकबर यांनी त्याला आलिंगन दिलं आणि त्याची 350 हत्ती आणि 12 हजार सोन्याच्या नाण्यांची भेट स्वीकारली."
सलीमचं मन शांत करण्यासाठी अकबर यांनी आपला जिरेटोप काढून मुलाच्या डोक्यावर ठेवला. इतक्या ताण-तणावानंतर देखील अकबराचा वारसदार म्हणून सलीमच्या स्थितीत कोणताही बदल झालेला नाही, या गोष्टीचा हा संकेत होता.
आई हमीदा बानो यांचं निधन
मात्र 1604 येईपर्यंत पुन्हा एकदा सलीमच्या बंडाच्या बातम्या बादशाह अकबराच्या कानी पडू लागल्या. यावेळी सलीमला नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांनी स्वत: मोहिमेवर निघण्याचं ठरवलं.
मुसळधार पावसामुळे त्यांना मोहिमेवर निघण्यास उशीर झाला. त्याचवेळेस बातमी आली की त्यांची आई हमीदा बानो खूप आजारी आहेत. त्यामुळे बादशाह अकबर आग्र्याला परत गेले.

फोटो स्रोत, Twitter
'अकबरनामा'मध्ये इनायतउल्लाह लिहितात, "अकबर आपल्या आईच्या शेजारी बसले. त्यांनी अनेकवेळा आईशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र, त्यांना कोणतंही उत्तर मिळालं नाही. जगातील महान जिवंत बादशाहाचं त्याच्या आईशी शेवटचं बोलणं देखील झालं नव्हतं."
"29 ऑगस्ट 1604 ला हुमायूंची पत्नी आणि अकबराच्या आईनं बेशुद्ध अवस्थेतच शेवटचा श्वास घेतला. त्यानंतर अकबरानं डोक्यावरील केसांचं मुंडण केलं आणि मिशा देखील काढल्या. जिरेटोप देखील काढून ठेवला आणि शोक स्थितीत घालायचे कपडे परिधान केले."
पोटदुखीच्या आजारानं ढासळली अकबराची तब्येत
या घटनांनंतर प्रशासनावरील अकबराची पकड ढिली पडू लागली. त्या काळात अकबराची जी चित्रे बनवण्यात आली, त्यात दिसतं की त्यांचे केस पांढरे होऊ लागले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर दु:खाची छटा स्पष्टपणे दिसू लागली होती.
22 सप्टेंबर 1605 ला पोटदुखीमुळे बादशाह अकबर यांची तब्येत बिघडण्यात सुरूवात झाली. त्यांचे वैद्य हकीम अली जीलानी यांना बोलावण्यात आलं. हकीम यांनी बादशाहांना सांगितलं की कोणतंही औषध घेण्याआधी एक दिवस त्यांनी काहीही खाऊ-पिऊ नये.

फोटो स्रोत, Getty Images
दुसऱ्या दिवशी त्यांना फक्त सूप देण्यात आलं. या आजारपणाच्या काळात त्यांचा नातू खुसरो त्यांच्या जवळ असायचा. बादशाह अकबर यांना नेमका काय त्रास होतो आहे, त्यांना काय आजार झाला आहे, याचं आकलन हकिम अली यांना झालं नाही.
'अकबरनामा'मध्ये इनायतउल्लाह लिहितात, "आजारपणातील सुरुवातीच्या दिवसांमध्ये अकबर यांनी रोज झरोखा दर्शन देण्याची प्रथा पार पाडली. कारण ते गंभीर आजारी आहेत असं चित्र त्यांना सर्वसामान्य जनतेसमोर उभं करायचं नव्हतं."
"मात्र, नंतर ते अंथरुणाला खिळले. असं असतानाही ते बोलून शाही आदेश लिहून घेत होते. दहा दिवसानंतर त्यांना मोठा ताप आला आणि ते खूपच अशक्त होत गेले."

या बातम्याही वाचा :

सलीमच्या जागी खुसरोला तख्तावर बसवण्याची मोहीम
बादशाह अकबर यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये मान सिंह आणि अजीज कोका या त्यांच्या सर्वात जवळच्या दोन सहकाऱ्यांनी त्यांचा वारसदार निवडण्यासाठी दरबारातील इतर मंत्र्यांची बैठक बोलावली.
या दोन व्यक्तींनी सर्व दरबाराला आठवण करून दिली की, अकबर यांना सलीम आवडत नाही. ते सलीमच्या बाजूचे नाहीत.
असद बेग यांनी 'वाकया-ए-असद बेग' या त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे की, "मान सिंह आणि अजीज यांनी बैठकीला उपस्थित असलेल्या लोकांना सांगितलं की, सलीमला वारसदार किंवा उत्तराधिकारी बनवण्याची बादशाह अकबर यांची इच्छा नाही."
"त्यांनी सलीमच्या खुसरोच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. मात्र अकबर यांच्या दरबारातील सईद खाँ बराहा यांनी सलीमच्या नावालाच पाठिंबा दिला आणि ते बैठक सोडून बाहेर पडले."

फोटो स्रोत, Getty Images
सलीम त्यावेळी यमुना नदीच्या पलीकडच्या तीरावर तळ ठोकून होता. 'अकबर द ग्रेट मुगल' या पुस्तकात इरा मुखौटी लिहितात, "राजा मान सिंह यांनी सलीमचा गादीवरील दावा संपवण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर जेव्हा सलीम बोटीतून आग्र्याच्या किल्ल्यात आला तेव्हा त्याला अटक करण्याचा देखील त्यांनी प्रयत्न केला."
"मात्र, सलीम याला आधीच खबर पुरवण्यात आली होती की त्यानं किल्ल्यात येऊ नये नाहीतर त्याला अटक केली जाईल. त्यामुळे सलीम बोटीतून पुन्हा आपल्या महालाकडे निघून गेला."
सलीमच्या बाजूनं तयार झालं वातावरण
सलीम आपल्या महालात थांबून आपल्या भवितव्याचा काय निर्णय होणार याची वाट पाहू लागला. संध्याकाळपर्यंत सर्व वातावरण सलीमच्या बाजूचं झालं. सर्वात आधी शेख फरीद आणि सईद खाँ बराहा हे दोघे सलीमचं अभिनंदन करण्यासाठी पोहोचले.
त्यानंतर तर सलीमला पाठिंबा देण्यासाठी अकबराच्या दरबारातील लोकांची रीघ लागली. सईद खाँ यांनी सलीमला आश्वासन द्यायला लावलं की गादीवर बसल्यावर खुसरो किंवा ज्या लोकांनी आधी सलीमला पाठिंबा दिला नव्हता त्यांना कोणतीही शिक्षा देणार नाही.

फोटो स्रोत, Getty Images
संध्याकाळ होता होता सलीमला विरोध करणारे मिर्झा अजीज कोका देखील त्याचं अभिनंदन करण्यासाठी पोहोचले. मात्र, सलीमनं त्यांच्याबरोबर कोणतंही गैरवर्तन केलं नाही. जेव्हा मान सिंह यांची खात्री पटली की, खुसरोला कोणताही धोका नसेल, तेव्हा ते स्वत: खुसरोला घेऊन सलीमकडे गेले.
अकबराचं निधन
या गोष्टीचे संकेत मिळत नाहीत की, मान सिंह आणि अजीज यांनी स्वत:च्या बळावर खुसरोला बादशाह बनवण्यासाठी पुढाकार घेतला होता.
मुनिस फारूकी त्यांच्या 'द प्रिंस ऑफ द मुगल एम्पायर' या पुस्तकात लिहितात, "आपल्या कार्यकाळाच्या शेवटच्या क्षणापर्यंत बादशाह अकबर यांचा प्रयत्न होता की कोणत्या ना कोणत्या प्रकारे मुघल सत्तेवरील सलीमचा दावा मागे पडावा. तो वारसदार ठरू नये."
सलीम जेव्हा अकबराच्या शयनगृहात आला, तेव्हा अकबराचा श्वासोच्छवास सुरू होता. आपल्या वडिलांच्या इशाऱ्यावर त्याने अकबराचा मुकुट आणि कपडे परिधान केले आणि अकबराची तलवार आपल्या कंबरेला लावली.
ही बाबरची तलवार होती. बाबर यांनी देखील आपल्या मृत्यूआधी ही तलवार हुमायूँला दिली होती.

फोटो स्रोत, Getty Images
सलीमनं आपल्या वडिलांच्या पायावर डोकं टेकवलं. असद बेग लिहितात, "बादशाह अकबर यांनी आपल्या डोळ्यांनी सलीमला मुघल सत्तेची प्रतीकं परिधान करताना पाहिलं. त्यांनी हे देखील पाहिलं की त्यांचे दरबारी लोक नव्या बादशाहसमोर माना वाकवत आहेत. यानंतर त्यांनी शेवटचा श्वास घेतला. तो दिवस होता 27 ऑक्टोबर 1605."
त्यावेळेस बादशाह अकबर यांचं वय 63 वर्षांचं होतं. त्यांनी 49 वर्षे भारतावर राज्य केलं.
पार्वती शर्मा यांनी 'अकबर ऑफ हिंदुस्तान' हे अकबराचं चरित्र लिहिलं आहे. त्यात त्या लिहितात, "बादशाह अकबर यांनी सलीमला फक्त सत्तेचं प्रतीक असलेला मुकुट, पोषाख आणि तलवार दिल्या नाहीत, तर आपल्या काही खासगी वस्तू देखील दिल्या. यात तस्बीह (जपमाळा) आणि तावीज देखील होते."
वडिलांच्या मृत्यूच्या एक आठवड्यानंतर 36 वर्षांच्या सलीमनं त्यांची जागा घेतली. तो आता सलीम नव्हता आणि अकबरचा प्रिय 'शेखू बाबा' देखील नव्हता.
भारताचा बादशाह होणाऱ्या या व्यक्तीचं नवं नाव होतं, नूरउद्दीन मोहम्मद जहाँगीर.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











