जोधाबाई नाही तर ‘या’ राजपूत राजकुमारीशी अकबराचं लग्नं झालं होतं

फोटो स्रोत, Getty Images
स्वातंत्र्याच्या नंतरच्या 75 वर्षांच्या काळात मुघल बादशहा अकबराला केंद्रस्थानी ठेऊन दोन मोठे चित्रपट तयार करण्यात आले आहेत.
पहिला के. आसिफ यांचा 'मुघल-ए-आझम' आणि दुसरा आशुतोष गोवारीकर यांचा 'जोधा अकबर.'
'जोधा अकबर' चित्रपटात अकबर आणि त्यांच्या पत्नी जोधा यांच्याबाबतची काल्पनिक कथा दाखवण्यात आलीय.
ही कथा रुपेरी पडद्यावर साकारण्यापूर्वी निर्माते आशुतोष गोवारीकर यांनी अनेक इतिहासकारांचा सल्ला घेतला होता.
त्या सर्वांनी एका सूरात हे स्पष्ट केलं होतं की, जोधाबाई नावाची अकबराची कोणतीही पत्नी नव्हती.
पण इतिहासकारांच्या या सांगण्याचा, 'जोधा अकबर' च्या कथेवर काहीही परिणाम झाला नाही.
वेगळ्या शब्दांत सांगायचं झालं, एक चांगला बॉलिवूडपट तयार करण्यात तथ्यांचा काहीही अडथळा आला नाही.
नुकतंच मणिमुग्ध एस. शर्मा यांनी लिहिलेलं अकबराचं जीवनचरित्र प्रकाशित झालंय. 'अल्लाहु अकबर: अंडरस्टँडिंग द ग्रेट मुगल इन टुडेज इंडिया' यात त्यांनी याबाबत लिहिलं आहे.
"जोधा अकबर चित्रपटात जोधाबाई या राजा भारमल यांच्या कन्या आणि अकबर यांच्या एकमेव पत्नी असल्याचं दाखवलंय. पण वास्तव म्हणजे, आमेरच्या राजकुमारी हीरा कंवर किंवा हरखाबाई या अकबराच्या चौथ्या पत्नी होत्या," असं शर्मा यांनी लिहिलंय.
त्यांच्या मते, "अकबराची सर्वाधिक जवळीक ही त्यांची पहिली पत्नी रुकैय्या यांच्याशी होती. त्याचं कारण म्हणजे ते दोघं बालपणापासून सोबत होते आणि त्या त्यांच्या चुलत बहीण होत्या. पण पद आणि दर्जानं त्या अकबराच्या बरोबरीच्या होत्या. त्या लग्नानंतर मुघल बनल्या नव्हत्या, तर जन्मानेच मुघल होत्या."
मदतीच्या मोबदल्यात भारमल यांनी अकबराशी लावला हरखाचा विवाह
हरखाबाई आमेरचे राजा भारमल कछवाह यांच्या कन्या होत्या. आमेर एक लहान राज्य होतं. तिथं वारसा हक्कासाठी युद्ध पेटलेलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
आमेरच्या गादीवर ताबा मिळण्यासाठी राजा भारमल यांचा भाऊ पूरनमलबरोबर संघर्ष सुरू होता. त्यांचे शेजारी राठौरदेखील त्यांच्या राज्यावर नजर ठेवून होते.
राजा भारमल यांच्या भावाला मुघलांचे गव्हर्नर मिर्झा शफुद्दीन हुसैन यांचा पाठिंबा मिळत होता.
इरा मुखोटी 'अकबर द ग्रेट मुगल: द डेफनेटिव बायोग्राफी' हे अकबराचं आणखी एक जीवनचरित्र लिहिलेलं आहे. त्यांच्या मते, "राजा भारमल उत्तम राजकारणी होते. त्यांनी भावाच्या विरोधात सुरू असलेल्या संघर्षात विजय मिळवण्यासाठी अकबराकडून मदत मागितली आणि त्यांच्यासमोर कन्या हरखाबाईशी विवाहाचा प्रस्ताव ठेवला. त्यापूर्वीही अनेकदा राजपुत कुटुंबांनी मुलींचे विवाह विजयी प्रतिस्पर्धी कुटुंबांमध्ये केले होते."
त्यापूर्वी मारवाडच्या राव मालदेव यांनी त्यांच्या एका मुलीचा विवाह गुजरातचे सुल्तान महमूद आणि दुसऱ्या मुलीचा विवाह इस्लाम शाह सूरशी लावून दिला होता.
अकबरानं भारमल यांचा प्रस्ताव स्वीकारला आणि गव्हर्नरल मिर्झा शैफुद्दीन हुसैन याला राजा भारमल यांच्या कैद केलेल्या नातेवाईकांना सोडण्याचा आदेश दिला.
अकबराने केले नाही हरखाचे धर्मांतर
अजमेरहून परतताना सांभरमध्ये अकबरानं 20 वर्षीय हरखाबाई यांच्याशी विवाह केला होता. अकबरानं तिथून आगऱ्यापर्यंतचा 200 किलोमीटरचा रस्ता दोन दिवसांत पार केला होता.
हरखाबाई यांच्याबरोबर त्यांचे भाऊ भगवंत दास आणि भाचा मानसिंहदेखील आगरा इथं आले होते. या विवाहामुळं हरखाबाईंच्या पित्याला त्यांचं राज्य परत मिळालं आणि त्यांचे विरोधक तोंडावर पडले होते.
इरा मुखोटी यांनी त्यांच्या 'डॉटर्स ऑफ द सन' या दुसऱ्या पुस्तकातही हरखाबाईंबाबत लिहिलं आहे. "हरखाबाई या एक भरजरी आणि घेरदार घागरा-चोळी परिधान करून आगऱ्यात उतरल्या. त्यांचा चेहरा आणि खांदे एक चमकणाऱ्या ओढणीनं झाकलेले होते, पण त्यांच्या बाह्या झाकलेल्या नव्हत्या."
अकबरानं हरखाबाईंना 'मरियम-उज-जमानी' असं नाव दिलं.

फोटो स्रोत, Getty Images
1562 मध्ये अकबराच्या हरम म्हणजे जनानखाण्यात प्रवेश केलेल्या हरखाबाई यांना त्यांच्या सर्व धार्मिक प्रथा-परंपरा आणि श्रद्धा यासह प्रवेशाची परवानगी देण्यात आली.
त्या धर्मांतर न केलेल्या अकबराच्या पहिल्या बिगर मुस्लीम पत्नी होत्या.
"हरखा यांचे भाऊ आणि भारमल यांचे उत्तराधिकारी भगवंत दास आणि त्यांचा 11 वर्षांचा भाचा मानसिंह यांनादेखील अकबराच्या दरबारात स्थान देण्यात आलं. हरखा यांचा मुलगा सलीम मिर्झानं भगवंत दास यांची मुलगी आणि त्यांच्या भाचीशी विवाह केला, तेव्हा अकबरानं सुनेच्या घरी झालेल्या सर्व हिंदु विधींमध्ये सहभाग घेतला होता, असं अब्दुल कादीर बदायूँनी यांनी त्यांच्या 'मुंतखब-उत-तवारीख' या पुस्तकात लिहलंय.
"बादशहा अकबरानं राजकुमारीच्या घरापासून राजमहलापर्यंतच्या मार्गावर सगळीकडं सोन्याच्या मोहरा उधळण्याचा आदेश दिला. त्या मोहरा उचलून उचलून लोकांचे हात दुखले होते, असं म्हणतात," असं त्यांनी पुस्तकात लिहिलंय.
हरखाबाई यांच्यामुळंच अकबरानं तर स्वतः गोमांस खाणं बंद केलंच होतं, पण सोबतच दरबारातील लोकांच्या गोमांस खाण्यावरही बंदी घातल होती.
अकबराच्या या निर्णयाबाबत इतिहासकार बदायूँनी यांनी नाराजी दर्शवत लिखाण केलंय. "अकबर यांच्याबरोबर हिंदू लोक असल्यामुळंच त्यांनी गोमांस, लसून आणि कांदा खाण्यावर बंदी लावली होती. ज्या लोकांची दाढी वाढलेली असेल, त्यांच्या संपर्कात यायलाही ते कचरत होते."

फोटो स्रोत, BLOOMSBURY
"अकबरानं आणखी एक सवय लावून घेतली होते, ती म्हणजे वर्षातील काही महिने मांस न खाणं," असंही त्यांनी लिहिलंय.
अबुल फझल यांनी अकबरनामामध्ये अकबराच्या या नव्या सवयीचं कौतुक केलं आहे. "महामहीम यांना आता मांस आवडत नव्हतं आणि ते त्याबाबत अगदी मोकळेपणानं बोलायचे. ते केवळ गंगाजल पितात आणि त्यांच्यासाठी ते खास सोरोवरून मागवलं जातं. ते सुरुवातीपासूनच उपवास करायचे. हळूहळू त्यांनी याची संख्या वाढवली होती."
अकबरानं महाभारत आणि रामायण अशा हिंदू धर्मग्रंथांचे अुनुवाद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी मुद्दाम महाभारताच्या अुवादाची जबाबदारी संकुचित विचारसरणी असलेल्या बदायूँनी यांना दिली होती.
"अकबरनामासाठी बिशनदास यांनी तयार केलेल्या मिनिएचर म्हणजे लहान आकाराच्या पेंटिंगमध्ये हमिदाबानो बेगमला त्यांच्या सूनबाई म्हणजे हरखाबाईच्या शेजारी खुर्चीवर बसलेलं दाखवलं आहे. हरखाबाई यांच्या हातात चिमुकला मुलगा सलीम असल्याचं दाखवलं आहे. हरखाबाईंचा रंग सासूच्या तुलनेत सावळा आहे. मुघलांची महाराणी पदराआड नसलेलं हे केवळ एकमेव पेंटिंग असावं," असं इरा मुखोटी यांनी म्हटलंय.
अकबराने कमावलं होतं पिळदार शरीर
जहाँगीर यांनी वडिलांचं वर्णन करताना म्हटलं होतं की, त्यांचा रंग गव्हाळ होता. त्यांचे डोळे आणि पापण्या काळ्या होत्या. त्यांची उंची मध्यम आणि शरीर पिळदार होतं. त्यांची छाती रुंद आणि हात लांब होते.
त्यांच्या नाकाच्या डाव्या बाजुला अर्ध्या वटाण्याच्या आकाराचा एक तीळ होता. ते चांगल्या भाग्याचं प्रतिक मानलं जात होतं. त्यांचा आवाज दमदार होता आणि ऐकायला चांगला वाटत होता.
"अकबराचं कपाळ रुंद होतं. पापण्या लांब होत्या. नाकपुड्याही रुंद होत्या. दाढी कापलेली होती, पण त्यांच्या लहान आकाराच्या मिशा असायच्या. त्यांचे केस लांब होते. ते डाव्या पायानं काहीसं लंगडत चालायचे. त्यांना उंट, अरबी घोडे, कबूतर आणि शिकारी कुत्री आवडत होती," असं वर्णन जहाँगीर यांनी 'तुझक-ए-जहाँगिरी' या आत्मचरित्रात केलंय.

फोटो स्रोत, Getty Images
"बंदुकीनं नेम लावण्यात कोणीही त्यांचा हात धरू शकत नव्हतं. हुमाँयूनं त्यांना एक हत्ती भेट दिला होता. त्यानंतर त्यांना हत्तीवरून फिरण्याचा छंद लागला होता. बादशाह बनल्यानंतर जेव्हा त्यांचं वय अवघं, 14 वर्ष होतं, तेव्हा त्यांनी एका हत्तीची स्वारी केली होती," असं जहाँगीर यांनी लिहिलंय.
विविध प्रकारच्या पदार्थांची मेजवानी
अकबर यांची स्मरणशक्ती प्रचंड चांगली होती. ते दिवसातून केवळ एकदा जेवायचे. त्याचीही निश्चित वेळ नव्हती.
"अकबर काय खाणार, हे त्यांचे शाही हकीम ठरवायचे. जेवणात यखनी, भाजलेलं आणि भरलेलं मुर्ग-दो-प्याजा, मंद आचेवर शिजलेलं मांस (दमपुख्त) नान, दही, लिंबू आणि सुमारे 30 प्रकारची लोणची-चटण्या असं जेवण त्यांना वाढलं जायचं," असं खाद्य इतिहासकार सलमा हुसैन यांनी लिहिलंय.
"त्यांच्या दस्तरखान ( जेवणाचं टेबल) मध्ये एक खास पदार्थ असायचा. 'मुर्ग जमीनदोज'. त्यात कोंबडा पीठामध्ये गुंडाळून जमिनीच्या खाली शिजवला जायचा. त्यात आलं (अदरक), दालचिनी, काळेमिरे, जिरे, लवंग, वेलची आणि केसरचा वापर केला जायचा," असं त्या लिहितात.
अकबराच्या जेवणात लाल मिरची, बटाटे, टॉमॅटो नसायचे. कारण तोपर्यंत ते उत्तर भारतापर्यंत पोहोचले नव्हते. त्याशिवाय कलौंजी, मोहरी, तीळ आणि कढीपत्ता यांचा वापरही शाही स्वयंपाकघरात केला जात नसायचा.
"अकबराला खरबूज खूप आवडायचे. वर्षभर जगाच्या कानाकोपऱ्यातून त्यांच्यासाठी खरबूज मागवले जात होते," असं अबुल फझल लिहितात.

फोटो स्रोत, Aleph
अकबरानं त्यांच्यासाठी तयार केलेल्या स्वयंपाकातील काही भाग रोज गरिबांना खाऊ घालण्याचे आदेश दिलेले होते.
दरवर्षी अकबरासाठी कपड्यांचे एक हजार जोड शिवले जायचे. त्यापैकी 120 जोड हे 10-10 चे गठ्ठे करून कायम परिधान करण्यासाठी तयार ठेवले जायचे.
अकबर बहुतांश वेळा रेशमी कपडे परिधान करायचे आणि त्यावर सोन्याच्या तारांचं नक्षीकाम असायचं. तसंच त्यांना मोती परिधान करण्याचीही आवड होती, हे फादर अँटनी माँसरेट यांच्या लक्षात आलेलं होतं.
अकबराचे 'झरोखा दर्शन'
अकबर रात्रीच्या वेळी कमी झोपायचे. त्यांची प्रत्येक वाढदिवसाला सोनं, कपडे, तूप आणि मिठाई यांसारख्या बारा वस्तुंबरोबर तुला केली जात असे. त्यानंतर या सर्व वस्तू गरिबांमध्ये वाटल्या जायच्या.
"रोज सकाळी अकबराचा पहिला सार्वजनिक कार्यक्रम ठरलेला होता. तो म्हणजे महालाच्या खिडकीतून लोकांना दर्शन देणं. त्यांना एकदा पाहण्यासाठी महालाबाहेर लोकांची प्रचंड गर्दी जमलेली असायची,'' असं एस. एम. बर्के यांनी 'अकबर द ग्रेटेस्ट मुघल'मध्ये लिहिलं आहे.
त्यांच्या मते, "फतेहपूर सिक्रीमध्ये अशी परंपरा होती की, जोपर्यंत लोक राजाचं दर्शन घेत नाही, तोपर्यंत ते तोंड धुवत नसत किंवा काही खात पितही नसतं. या परंपरेमुळं लोकांना राजा जिवंत असल्याची खात्री तर पटत होतीच, शिवाय त्यांना राजा अधिक आपलासादेखील वाटू लागायचा. जेव्हाही अकबर यांचा दरबार भरायचा, तेव्हा नगारे वाजवून लोकांना याची माहिती दिली जात होती."

फोटो स्रोत, Getty Images
रोज पहाटे सूर्योदयापूर्वी अकबराला मधूर संगीत वाजवून झोपेतून उठवलं जायचं. झोपण्यापूर्वी अकबर त्यांचा वेळ तत्वज्ञ, सुफी आणि इतिहासकार यांच्याबरोबर घालवायचे. हजारो हत्ती असूनही त्यांना त्यांचा प्रत्येक हत्ती, घोडा, हरिण आणि कबुतरांची नावं पाठ होती.
अकबराच्या दरबारातील प्रोटोकॉल
सम्राट अकबर यांचा खुला दरबार भरायचा तेव्हा त्याठिकाणी उपस्थित असलेले सर्व लोक, त्यांच्यासमोर कुर्निसात करुन शीर झुकवायचे आणि ठरलेल्या जागी जाऊन उभे राहायचे.
"सिंहासनाच्या जवळ वयानुसार ज्येष्ठ राजकुमारांची जागा असायची. पण हा नियम नेहमी मोडला जायचा, कारण अकबर अनेकदा छोट्या राजकुमारांना त्यांच्या जवळ उभे करायचे. दरबार भरलेला असताना अकबर त्यांच्याजवळ सोनं आणि चांदीच्या मोहरांचा ढीग ठेवायचे. वेळो-वेळी ते खैरात किंवा भेट म्हणून ते वाटप करायचे," असं एस. एम. बर्के यांनी लिहिलं आहे.
बदायूँनी यांनीही एका घटनेचं वर्ण केलंय. जेव्हा त्यांनी हल्दी घाटीच्या युद्धानंतर रामप्रसाद हत्ती अकबरासमोर सादर केला होता, त्यावेळी त्यांनाही मूठभर सोन्याच्या मोहरा भेट म्हणून देण्यात आल्या होत्या.
"सम्राट अकबरांनी मोहरांच्या ढीगात हात घालत, माझ्या हातावर 96 मोहरा ठेवल्या होत्या," असं बदायूँनी लिहितात.
अकबर यांना कबूतरं उडवण्याचाही छंद होता. त्यांच्याकडं 20,000 पेक्षा अधिक कबूतर होते. पक्ष्यांबाबत त्यांना असलेली आवड पाहता इराण आणि तुराणचे राजे त्यांच्यासाठी कबुतरं भेट म्हणून पाठवायचे. शिकार करणं आणि पोलो खेळणं ही त्यांच्या मनोरंजनाची प्रमुख साधनं होती."

फोटो स्रोत, Getty Images
"हजारो लोकांना एका मोठ्या भागाकडून झेलम नदीकडं जनावरं हाकलण्यास सांगितलं जायतं. ही मोहीम सुमारे महिनाभर चालायची. ही जनावरं अंदाजे 10 मैलाच्या टप्प्यात आली की अकबर त्यांची शिकार करायला निघायचे. हे सर्व अंदाजे पाच दिवस चालायचं. अकबर शिकारीसाठी धनुष्य, तलवार, भाले आणि बंदुका यांचा वापर करायचे," असं अबुल फझ्ल यांनी 'आइन-ए -अकबरी' मध्ये लिहिलंय.
बादशहा अकबरांचा राग
तसं पाहता अकबर हे खूप मनमिळाऊ होते. पण त्यांना राग आला की, त्यावर नियंत्रण मिळवणं हे अत्यंत कठिण व्हायचं. त्यांच्या नाकपुड्या फुगायच्या डोळ्यातून जणू अंगार बाहेर पडू लागायचा. ते कधी-कधी हिंदीत घाणेरड्या शिव्यादेखील द्यायचे. त्यांचे आत्मचरित्र लिहिणारे अबुल फझल यांनी मुद्दाम त्याला उल्लेख वगळलेला नाही.
दरबारात कोणत्याही प्रकारचं गैरवर्तन केल्यास त्याला कठोर शिक्षा दिली जायची. त्यांचे वडील हुमायूं यांचे जवळचे मित्र शाह अब्दुल माली हे त्यांच्यासमोर आल्यानंतर घोड्यावरून खाली उतरले नव्हते, यासाठी त्यांनी त्यांना शिक्षा केली होती.
आणखी एक दरबारी लशकर खान यांना दरबारात दिवसा मद्यपान करून आल्यानं, आणखी कठोर शिक्षा मिळाली होती.
अबुल फझल यांनी आणखी एका घटनेचा उल्लेख केला आहे. "सम्राट अकबरांनी एकदा स्वतः त्यांच्या हाताने आधम खान याला बुक्का मारला होता. तसंच महालाच्या बाल्कनीतून खाली फेकत त्यांनी मृत्यूदंड दिला होता. अटका खान यांची हत्या केल्यामुळं आधम खान यांना ही शिक्षा देण्यात आली होती."

फोटो स्रोत, Aleph
"एकदा ते कुणालाही न सांगता अचानक सिंहासन असलेल्या कक्षात आले. त्यावेळी त्याठिकाणी एकाही सेवकाचा पत्ता नव्हता. केवळ मशाल पेटवणारा एकजण तिथं होता. तोही झोपलेला होता. ते पाहून अकबर एवढे चिडले की, त्यांनी मशाल पेटवणाऱ्याला मिनारावरून ढकलून मृत्यूदंड दिला होता," असं ते लिहितात.
"त्यांना एखाद्या खास व्यक्तीला त्यांच्याकडं बोलवायचं असेल तेव्हा ते त्याला 'खिलअत' पाठवायचे. कधी लांब गाऊन तर कधी पगडी किंवा शाल याच्या रुपात ते असायचं. बाहशाही नियमानुसार एखाद्या व्यक्तीला 'खिलअत' मिळताच त्याला त्यासमोर बादशहासमोर घालतात तसा दंडवत घालावा लागायचा. मत तो त्यावेळी कुठेही असो," असं इरा मुखोटी लिहितात.
"अकबर कधी-कधी भावूक व्हायचे आणि एखाद्या नीकटवर्तीय आणि कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूवर अगदी उघडपणे रडायचे," असंही त्या लिहितात.
अकबराच्या काळातच होते तुलसीदास, सूरदास आणि तानसेन
सम्राट अकबरांच्या काळातच हिंदीतील महान कवी तुलसीदास होऊन गेले होते. शाही दरबाराशी त्यांचा काहीही संबंध नव्हता पण त्यांना त्या काळातील वातावरणामुळं मदत नक्कीच मिळाली होती. कारण त्या काळात सर्व प्रकारच्या साहित्यिक बाबींना महत्त्वं दिलं जात होतं.
अकबराच्या काळात आणखी एक हिंदी कवी सूरदासदेखील होऊन गेले. अबुल फझल यांनी त्यांच्या रचेनत त्यांचा उल्लेख केला आहे. अकबराला संगीतातही रस होता. त्यांच्या दरबारात सर्वांत प्रसिद्ध गायक तानसेन होते.
अबुल फझल यांच्या मते, त्यांच्यासारखा संगीततज्ज्ञ गेल्या एक हजार वर्षांमध्ये जन्मला नव्हता. तानसेनने जेव्हा शाही दरबारात पहिल्यांदा त्यांची रचना ऐकवली होती, तेव्हा अकबरानं त्यांना दोन लाख रुपयांचं बक्षीस दिलं होतं. मालवाचे राजे बाज बहादूर हे राज्य गमावल्यानंतर अकबराच्या दरबारात आले होते.

फोटो स्रोत, Aleph
अबुल फझल यांच्या दरबारातील संगीततज्ज्ञांच्या यादीत बाज बहादूरच्या नावाचाही उल्लेख आहे. अकबराच्या दरबारात आलेले फ्रेंच प्रवासी फादर पिये दू झारीक यांच्या मते, 'जस-जसा काळ पुढं सरकत गेला तस-तसे अकबरानं नास्तिक बनण्याचे संकेत द्यायला सुरुवात केली होती.'
स्वतःच्या शासनकाळात सम्राट अकबाराचं अधिकृत नाव जलालुद्दीन मोहम्मद अकबर होतं. पण जीवनाच्या अखेरच्या टप्प्यावर येईपर्यंत त्यांनी गुपचूप नावातून मोहम्मद वगळून फक्त जलालुद्दीन अकबर बनले होते.
त्यांचं अनुसरण करत त्यांचा वारसदार आणि मुलगा जहाँगीरनंही नावासमोर मोहम्मद लावलं नव्हतं. ते स्वतःला केवळ नूरुद्दीन जहाँगीर म्हणायचे. मुघलांनी भारतावर सुमारे 300 वर्षं राज्य केलं. पण असं असलं तरी भारतीय इतिहासाशी संबंधित साहित्य आणि माध्यमांमध्ये मुघलांचं जे चित्रण करण्यात आलंय, त्यात अनेक त्रुटी आढळतात.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








