विक्रमादित्य हेमू : अकबराऐवजी भारताचा शासक बनला असता, पण...

विक्रमादित्य हेमू

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, विक्रमादित्य हेमू

हरियाणातील रेवाडीचा रहिवासी असलेल्या राजा हेमूला मध्ययुगातील नेपोलियन म्हटलं जायचं. याचं कारण हेमूने मध्ययुगीन भारतात जे काही मुस्लिम शासक होऊन गेले त्यादरम्यान अल्प काळासाठी का होईना पण 'हिंदू राज्य' स्थापन केलं होतं. त्याने आपल्या संपूर्ण कारकीर्दीत एकूण 22 लढाया जिंकल्या. यामुळेचं काही इतिहासकारांनी राजा हेमूला मध्ययुगातील समुद्र गुप्त ही पदवी दिली होती.

राजा हेमू एक उत्तम योद्धा आणि कुशल प्रशासक होता. त्याचा लढाऊ बाणा त्याच्या साथीदारांनी सोबतचं त्याच्या शत्रूंना ही माहीत होता. प्रसिद्ध इतिहासकार आर.पी. त्रिपाठी त्यांच्या 'राईज अँड फॉल ऑफ द मुघल एम्पायर' या पुस्तकात लिहितात, "अकबराच्या हातून हेमूचा झालेला पराभव दुर्दैवी होता. नशिबाने साथ दिली असती तर त्याचा हा पराभव झाला नसता."

प्रख्यात इतिहासकार आर सी मजुमदार यांच्या शेरशाहवरील पुस्तकात 'हेमू - ए फॉरगॉटन हिरो' हे एक प्रकरण आहे. या प्रकरणात ते लिहितात, "पानिपतच्या युद्धात झालेल्या एका अपघातामुळे हेमूचा विजय पराभवात बदलला. जर हा अपघात झाला नसता तर दिल्लीत मुघलांऐवजी हिंदू राजवंशाचा पाया घातला गेला असता."

एका साध्या कुटुंबात जन्म

हेमचंद्र यांचा जन्म 1501 मध्ये हरियाणातील रेवाडीच्या कुतुबपूर गावात झाला. त्यांचं कुटुंब किराणा माल विकण्याचं काम करायचं. अकबराचं चरित्र लिहिणारा अबुल फझल मात्र हेमचंद्रचं वर्णन तिरस्काराने करतो. तो म्हणतो, तो एक फेरीवाला होता जो रेवाडीच्या रस्त्यावर मीठ विकायचा.

हेमूचा व्यवसाय काहीजरी असला तरी शेरशाह सूरीचा मुलगा इस्लाम शाह याचं लक्ष वेधून घेण्यात तो यशस्वी ठरला यात तीळमात्र शंका नव्हती. हेमू लवकरच सम्राटाचा विश्वासू बनला आणि त्याला प्रशासनात मदत करू लागला. बादशहाने त्याला गुप्तचर व टपाल खात्याचं प्रमुख बनवलं. पुढे इस्लाम शाहलाही हेमूमध्ये लष्करी गुण दिसले. त्याने हेमूला आपल्या सैन्यात स्थान दिले जे शेरशाह सुरीच्या कारकिर्दीत ब्रह्मजीत गौरला मिळालं होतं.

आदिल शाहच्या कारकिर्दीत हेमूला 'वकील-ए-आला' म्हणजेच पंतप्रधानपदाचा दर्जा मिळाला.

दिल्ली काबीज केली

आदिलशाहला जेव्हा समजलं की हुमायूनने परत येऊन दिल्लीचं तख्त काबीज केलंय, तेव्हा आदिलशहाने मुघलांना भारतातून हुसकवायची जबाबदारी हेमूवर सोपवली.

हेमूने पन्नास हजारांचं सैन्य, 1000 हत्ती आणि 51 तोफा घेऊन दिल्लीकडे कूच केली. त्यानंतर काल्पी आणि आग्र्याचे राज्यपाल अब्दुल्ला उझबेग खान आणि सिकंदर खान हे तर घाबरून शहरं सोडून पळून गेले.

विक्रमादित्य हेमू

फोटो स्रोत, SPL

के.के. भारद्वाज त्यांच्या 'हेमू नेपोलियन ऑफ मेडिव्हल इंडिया' या पुस्तकात लिहितात, "दिल्लीचा मुघल सुभेदार, टारडी खान याने हेमूला रोखण्यासाठी व्यवस्था लावली. हेमूने 6 ऑक्टोबर 1556 ला दिल्ली गाठली आणि तुघलकाबाद इथं आपल्या सैन्यासह तळ ठोकला. दुसऱ्या दिवशी हेमू आणि मुघल सैन्यात चकमक झाली ज्यात मुघलांचा पराभव झाला. टारडी खान आपला जीव मुठीत घेऊन पंजाबच्या दिशेनं पळून गेला. तिथं अकबराचं सैन्य आधीच तळ ठोकून होतं. हेमू विजेता म्हणून दिल्लीत दाखल झाला आणि डोक्यावर शाही छत्र घेऊन हिंदू राज्याची स्थापना केली. महाराजा विक्रमादित्य ही पदवी धारण केली. त्याच्या नावानं नाणी काढली आणि दूरच्या प्रांतात सुभेदार नेमले."

बैरम खानाने टारडी खानचा वध केला

दिल्लीतल्या पराभवाची बातमी अकबराला त्याच्या 14 व्या वाढदिवसाच्या दोन दिवस आधी म्हणजेचं 13 ऑक्टोबर 1556 रोजी समजली. त्यावेळी अकबर पंजाबमधील जालंधरमध्ये बैरम खान यांच्यासोबत होता. अकबराला दिल्लीपेक्षा काबूल महत्त्वाचं वाटतं होतं. पण बैरम खानला ते मान्य नव्हतं.

पार्वती शर्मा अकबराचं चरित्र 'अकबर ऑफ हिंदोस्तान' मध्ये लिहितात, "अकबरापुढे जे पर्याय मांडून ठेवले होते ते स्पष्ट होते. एकतर त्याने हिंदुस्थानचा सम्राट बनावं किंवा नावाला सम्राट राहून काबूलच्या ऐषोआरामात परतावं. त्या दिवशी झालं असं की, दिल्लीवर हल्ला झाला असताना टारडी खान पळून आला. जेव्हा तो अकबराच्या छावणीत आला तेव्हा अकबर शिकारीला गेला होता. बैरम खानने टारडी खानाला त्याच्या तंबूत बोलावलं. थोडा वेळ बोलून बैरम खान त्याच्या संध्याकाळच्या प्रार्थनेसाठी वजू करण्यासाठी उठला.

"त्याचवेळी बैरमखानचे शिपाई तंबूत घुसले आणि त्यांनी टारडी खानला ठार केलं. अकबर जेव्हा शिकारीहून परतला तेव्हा बैरम खानच्या पीर मोहम्मदने त्याला टारडी खानच्या मृत्यूची बातमी दिली. बैरम खानने त्याच पीरमार्फत अकबराला निरोप पाठवला की त्याने जे पाऊल उचललयं त्याला अकबर पाठिंबा देईल. जेणेकरुन इतरांना ही कळेल की युद्धातून पळून आलेल्यांचं नशीब काय असतं."

हेमूने मोठ्या सैन्यासह पानिपतात उतरला

दुसरीकडे, जेव्हा हेमूला कळलं की मुघल बदला घेण्याच्या विचारात आहेत, तेव्हा त्याने लागलीच पानिपतकडे तोफखाना पाठवला. बैरम खानने सुद्धा अली कुली शैबानीच्या नेतृत्वाखाली 10000 लोकांची फौज पानिपतकडे रवाना केली. शैबानी हा उझबेक होता आणि प्रसिद्ध लढवय्यांमध्ये त्याची गणना व्हायची.

अबुल फजल अकबराचं चरित्र 'अकबरनामा' मध्ये लिहितो, "हेमूने दिल्ली फार लवकर सोडली. दिल्ली ते पानिपत हे अंतर 100 किमी पेक्षा कमी होतं. त्या भागात भीषण दुष्काळ पडला होता. त्यामुळे रस्त्यावर चिटपाखरू ही नव्हतं. हेमूच्या सैन्यात 30,000 अनुभवी घोडदळ आणि 500 ते 1500 हत्तींचा समावेश होता. हत्ती त्यांच्या सोंडेवर तलवारी आणि भाले घेऊन होते आणि त्यांच्या पाठीवर निपुण धनुर्धारी होते."

अबुल फजल

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अबुल फजल अकबराच्या दरबारात अकबरनामा सादर करताना...

"यापूर्वी मुघल सैन्याने रणांगणावर एवढे भले मोठे हत्ती पाहिले नव्हते. ते कोणत्याही पर्शियन घोड्यापेक्षा वेगाने धावू शकत होते. हे हत्ती घोडा आणि घोडेस्वाराला त्यांच्या सोंडेने उचलून हवेत फेकून देऊ शकत होते."

हेमू राजपूत आणि अफगाणांच्या मोठ्या सैन्यासह पानिपतला पोहोचला. जे.एम. शीलत त्यांच्या 'अकबर' या पुस्तकात लिहितात, "अकबरला या लढाईपासून थोडं दूर सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आलं होतं. बैरम खाननेही या लढाईपासून स्वतःला दूर ठेवलं आणि लढाईची जबाबदारी आपल्या खास लोकांवर टाकली."

हेमूने दाखवलं शौर्य

हेमू डोक्यावर चिलखत न चढवताचं लढाईत उतरला होता. तो मोठ्या मोठ्या गर्जना करून आपल्या साथीदारांचा उत्साह वाढवत होता. हेमू त्याच्या 'हवाई' नावाच्या हत्तीवर स्वार झाला होता.

बदायुनी आपल्या 'मुंतखब-उत-तवारीख' या पुस्तकात लिहितो, "हेमूने इतक्या विचारपूर्वक हल्ला चढवला होता की, त्याने मुघल सैन्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला दहशत निर्माण केली होती. मात्र मध्य आशियातल्या घोडदळाला पण हलक्यात घेता येणार नव्हतं. या घोडदळाने हेमूच्या हत्तींवर सरळ हल्ला करण्याऐवजी तिरके हल्ले चढवले. जेणेकरून हत्तीवर स्वार सैनिकांना खाली पाडता येईल आणि त्यांना घोड्यांच्या टापाखाली तुडवता येईल."

या लढाईचं वर्णन करताना अबुल फझल लिहितो, "ढगांप्रमाणे गर्जना करणाऱ्या आणि सिंहासारख्या गर्जना करणाऱ्या दोन्ही सैन्य एकमेकांवर तुटून पडले. अली कुली शैबानीच्या धनुर्धरांनी शत्रूंवर बाणांचा वर्षाव केला पण विजयाचा रोख दुसऱ्या बाजूने होता."

विक्रमादित्य हेमू

फोटो स्रोत, MITTAL PUBLICATIONS

पार्वती शर्मा लिहितात, "पानिपतच्या पहिल्या लढाईत अकबराचे आजोबा बाबर यांच्या 10,000 च्या सैन्याने इब्राहिम लोदीच्या 100,000 सैन्याचा पराभव कसा केला असेल याचा विचार अकबर त्यावेळी करत असावा. अकबराला कल्पना आली होती की बाबरकडे त्यावेळी एक गुप्त हत्यार होतं ते म्हणजे - दारूगोळा.

"पण तीस वर्षांनंतर अकबराकडे असं कोणतंच गुप्त हत्यार उरलं नव्हतं. तोपर्यंत दारू इतकी सामान्य झाली होती की अकबराने आपल्या तोफखाना प्रमुखाला आधीच आदेश दिला होता की, लष्करी मोहीम सुरू होण्यापूर्वी हेमूचा पुतळा दारूने भरून पेटवून द्यावा, जेणेकरून आपल्या सैनिकांचं मनोबल वाढेल."

हेमूच्या डोळ्याला बाण लागला

बाकी काही असो ना असो पण एका चमत्कार घडला आणि मुघल सैन्याचं मनोबल वाढलं. हेमूने मुघल सैन्याच्या उजव्या आणि डाव्या बाजूला दहशत निर्माण केली होती. अली कुली शैबानीचे सैनिक हेमूच्या सैन्यावर बाणांचा वर्षाव करून हा दबाव कमी करण्याचा प्रयत्न करत होते. अशातच त्यांचा एक बाण निशाण्यावर लागला.

विक्रमादित्य हेमू

फोटो स्रोत, Getty Images

अबुल फजल लिहितो, "हेमू घोडेस्वारी कधीच शिकला नव्हता. कदाचित याच कारणामुळे तो हत्तीवर बसून लढाई करत होता. तसेच हत्तीवर बसलेला सेनापती सर्व सैनिकांना दूरवरूनही दिसू शकत होता.

विक्रमादित्य हेमू

फोटो स्रोत, MURTY CLASSICAL LIBRARY OF INDIA

हे कदाचित दुसरं कारण असावं. त्यात हेमूने वरून कोणतंही चिलखत घातलं नव्हतं. हा एक धाडसी पण मूर्खपणाचा निर्णय होता. लढाई सुरू असताना अचानक उडणारा बाण हेमूच्या डोळ्यात घुसला आणि त्याच्या कवटीत अडकला."

विक्रमादित्य हेमू

फोटो स्रोत, JUGGERNAUT

हरबन्स मुखिया त्यांच्या 'द मुघल्स ऑफ इंडिया' या पुस्तकात मोहम्मद कासिम फेरिश्ता यांनी जे काही सांगितलं ते लिहून ठेवलंय. त्याप्रमाणे "या अपघातानंतरही हेमूने हार मानली नाही. त्याने डोळ्याच्या खोबणीतून बाण काढला आणि तो भाग रुमालाने झाकला. आणि एवढं होऊनही तो लढत राहिला. हेमूमध्ये सत्तेची भूक अकबरापेक्षा ही काही कमी नव्हती."

आणि बैरम खानाने हेमूचा शिरच्छेद केला

पण काही वेळातच हेमू त्या हत्तीच्या अंबारीत बेशुद्ध पडला. अशा प्रकारच्या युद्धात जेव्हा सेनापती जखमी होतो तेव्हा सैन्याचं मनोबल खच्ची होतं. या संधीचा फायदा घेत अकबर आणि बैरम खान रणांगणावर पोहोचले. त्यांना तिथं त्यांचे सैनिक लढण्याऐवजी विजयाचा आनंद साजरा करताना दिसले.

विक्रमादित्य हेमू

फोटो स्रोत, BLACKWELL PUBLISHING

निजामुद्दीन अहमद त्यांच्या 'तबाकत-ए-अकबरी' या पुस्तकात लिहितात, "एका शाह कुली खानने एका हत्तीला माहूतशिवाय भटकताना पाहिलं. त्याने आपल्या माहुतला हत्तीवर चढून त्या अंबारीत कोण आहे हे बघण्यासाठी पाठवलं. माहूत हत्तीवर चढला तेव्हा त्याला जखमी माणूस आढळला. काळजीपूर्वक पाहिल्यावर समजलं की तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून राजा हेमू आहे. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन कुलीखानने सम्राट अकबरापुढं तो हत्ती उभा केला. त्यापूर्वी त्याने हेमूला साखळदंडाने बांधलं."

विक्रमादित्य हेमू

अबुल फजल लिहितो, "20 हून अधिक लढाया जिंकलेल्या हेमूला 14 वर्षांच्या अकबरासमोर जखमी अवस्थेत हजर करण्यात आलं. बैरम खानने अलीकडेच सम्राट झालेल्या अकबराला त्याच्या शत्रूचा स्वतःच्या हातांनी शिरच्छेद करण्यास सांगितलं. अकबर जखमी हेमूला पाहून संकोचला. तो निमित्त करून म्हणाला, 'मी आधीच त्याचे तुकडे केलेत.' आजूबाजूला उभ्या असलेल्या काही लोकांनी बैरम खानच्या म्हणण्याला पाठिंबा देऊन अकबरला हेमूला मारण्यासाठी भडकावलं. पण अकबर जागचा हलला नाही."

विक्रमादित्य हेमू

फोटो स्रोत, Getty Images

अकबराने जखमी हेमूला आपल्या तलवारीने स्पर्श केला असं फेरिश्ताचं मत आहे. मात्र व्हिन्सेंट ए. स्मिथ आणि हरबन्स मुखिया यांच्या मते, अकबराने आपली तलवार हेमूवर चालवली. पण बैरम खाननेचं आपल्या तलवारीने हेमूचा शिरच्छेद केला असा सर्वसाधारण समज आहे.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाचं बलिदान दिलं

नीरोद भूषण रॉय यांनी त्यांच्या 'सक्सेसर्स ऑफ शेरशाह' या पुस्तकात लिहिलयं की, "हेमूने हिंदू आणि मुस्लिमांना नेहमीच आपले दोन डोळे मानले. पानिपतमध्ये त्याने भारताच्या सार्वभौमत्वासाठी मुघलांशी लढा दिला. त्याच्या सैन्याच्या उजव्या बाजूची कमान शादी खान काकर सांभाळत होता तर राम्या डावीकडे नेतृत्व करत होता."

हेमू जर आणखी काही वर्षे जगला असता तर त्याने भारतात हिंदू राज्याचा पताका लावली असती.

विक्रमादित्य हेमू

फोटो स्रोत, PARSHURAM GUPTA

व्हिन्सेंट ए. स्मिथ अकबराच्या चरित्रात लिहितात, "अकबर मूळचा परदेशी होता. त्याच्या रक्ताचा एक थेंबही भारतीय नव्हता. त्याच्या वडिलांच्या बाजूने तो तैमूरलंगच्या सातव्या पिढीचा वारसदार होता, तर त्याची आई पर्शियन वंशाची होती. याउलट हेमू हा भारताच्या मातीत जन्मला होता. भारताच्या गादीवर आणि सार्वभौमत्वावर त्याचा दावा होता. क्षत्रिय किंवा राजपूत नसतानाही हेमूने आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी रणांगणावर अखेरचा श्वास घेतला. यापेक्षा चांगला शेवट कोणता असेल?"

एक किराणा दुकानदार दिल्लीच्या तख्तावर मांड ठोकतो ही निदान त्याकाळात तरी फार मोठी गोष्ट होती. पण नशिबाने त्याला साथ दिली असती तर आज भारताचा इतिहास वेगळा असता.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)