गुलबदन बेगम : बाबरच्या या मुलीनं थेट ऑटोमन साम्राज्याच्या सुलतानाविरोधातच बंड केलं होतं

फोटो स्रोत, JUGGERNAUT BOOKS
- Author, शेरलेन मोलेन
- Role, बीबीसी न्यूज
भारतावर 1576 मध्ये मुघलांची सत्ता होती, तर अरब जगतात ऑटोमन साम्राज्य होतं. त्यावेळची ही गोष्ट आहे.
भारतात अकबर बादशहा होते, तर ऑटोमन साम्राज्य सुल्तान मुराद अली यांच्या नियंत्रणाखाली होतं.
या काळात मुघल साम्राज्याच्या एका राजकुमारीनं मक्का-मदीनाला प्रवास केला. हा प्रवास अत्यंत अविस्मरणीय ठरला.
मुघलकालीन भारतामध्ये प्रथमच एखादी महिला पवित्र हजच्या यात्रेसाठी गेली होती. हज हे इस्लामच्या पाच आधारस्तंभांपैकी एक समजलं जातं.
ही कहाणी मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर याच्या मुलीची, अर्थात गुलबदन बेगमची आहे.
53 वर्षे वयात फतेहपूर सिक्रीमधील ऐशोरामाचं जीवन त्यागून त्यांनी सुमारे सहा वर्ष चाललेल्या यात्रेला जाण्याचा निर्णय घेतला होता.
गुलबदन बेगम या यात्रेला एकट्या गेल्या नाहीत. त्यांच्याबरोबर जाणाऱ्या शाही परिवारातील महिलांच्या गटाचं त्यांनी नेतृत्व केलं होतं.
पण अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण ठरलेल्या या यात्रेशी संबंधित तथ्यांच्या नोंदी उपलब्ध नाहीत.
पुरुष इतिहासकारांनी महिला प्रवाशांचा 'मान-सन्मान' याचं कारण देत कदाचित त्यांच्या यात्रेशी संबंधित माहिती किंवा तथ्य जाहीर केली नसावी, असं इतिहासकारांना वाटतं.
यात्रेची अधुरी कहाणी
इतिहासकार आणि लेखिका रुबी लाल यांनी त्यांच्या 'वेगाबॉन्ड प्रिंसेस: द ग्रेट अॅडव्हेंचर्स ऑफ गुलबदन' मध्ये या प्रवासाचं वर्णन केलं आहे.
गुलबदन बेगम यांच्या या यात्रेमध्ये शौर्यकथांबरोबरच करुणा आणि बंडखोरी याच्याशी संबंधित घटनांचाही समावेश आहे.
गुलबदन बेगम या मुघल साम्राज्याच्या पहिल्या आणि एकमेव महिला इतिहासकार असल्याचं म्हटलं जातं.
त्यांनी हुमायूंनामा पुस्तकातून त्यांच्या जीवनातील अनुभव मांडले आहे. पण त्यांचं हे पुस्तकही अपूर्ण आहे. या पुस्तकाची अनेक पानं आजही सापडलेली नाहीत.
रुबी लाल यांनी पुस्तक लिहिण्यासाठी संशोधन करताना ऑटोमन साम्राज्याच्या इतिहासापासून ते फारशी आणि मुघल काळातील पांडुलिपींसह इतर सर्व दस्तऐवज तपासले आहेत.

फोटो स्रोत, RANA SAFVI
"त्यावेळी इतिहासकारांनी शाही हस्तींबाबत लिहिलेच्या रचनांच्या प्रती तयार होणं ही अगदी सर्वसामान्य बाब होती. अशा काळात गुलबदन लिखाण करत होत्या. पण तसं असलं तरी गुलबदन यांनी लिहिलेल्या पुस्तकाची एकही पूर्ण प्रत उपलब्ध नाही."
"एवढ्या शक्तीशाली महिलेनं अशा प्रकारच्या एकमेव प्रवासावर मौन बाळगणं हे बरंच काही सांगून जातं."
सत्ताकेंद्रापासून अंतर
गुलबदन यांचा जन्म काबूलमध्ये 1523 मध्ये झाला होता. त्यांच्या आईचं नाव दिलदार बेगम होतं. त्या बाबरच्या तिसऱ्या पत्नी होत्या.
गुलबदनच्या जन्माच्या वेळी बाबर घरापासून दूर राहायचे. तेव्हा ते हिंदुस्तानावर हल्ला करण्याच्या योजना आखत होते.
ही युद्धं सुरू झाली त्यानंतर बाबरचं घरी येणं कमी झालं. गुलबदन यांना लवकरच त्याची सवयही झाली.
पण कुटुंबातील या सर्वात शक्तीशाली व्यक्तीबरोबर कधी-कधी भेटण्याची संधी त्यांना पुढं अनेकदा मिळत राहिली.
वडील बाबर यांच्याबरोबरच सावत्र भाऊ हुमायूं आणि पुतण्या अकबर बरोबरही त्यांच्या भेटी अशाच सुरू होत्या.

फोटो स्रोत, Getty Images
कुटुंबातील पुरुष जेव्हा साम्राज्याच्या विस्तारासाठी युद्धांमध्ये रक्त सांडत होते, त्यावेळी गुलबदनही शक्तीशाली महिलांबरोबर मोठ्या होत होत्या. या महिला म्हणजे बाबर यांच्या आई, काकू, बहिणी, पत्नी आणि मुली होत्या.
या महिलांची दरबारी हालचालींमध्ये महत्त्वाची भूमिका होती. त्या राजा आणि राजकुमारांच्या विश्वासू आणि सल्लागारांच्या भूमिकेत असायच्या.
गुलबदन यांच्या लहानपणीही काही प्रवासांचे योग आले होते. बाबरनं आगऱ्यापर्यंत साम्राज्याचा विस्तार केल्यानंतर त्या वयाच्या सहाव्या वर्षी काबूल ते आगरा प्रवास करणाऱ्या पहिल्या मुघल महिला ठरल्या होत्या.
त्यानंतर अफगाण राजा शेरशाह सुरी यांनी त्यांच्या कुटुंबाला भारताबाहेर काढलं, तेव्हा त्या एक विवाहित महिला म्हणून काबूलला परत आल्या.
हे प्रवास अनेक महिन्यांचे असायचे. गुलबदन बेगम शाही कुटुंबातील इतर महिलांबरोबर डोंगरी भागांमधून फिरत धोकादायक प्रवास करायच्या.
या प्रवासादरम्यान शत्रूंबरोबरच इतरही सर्व अडचणींचा त्या सामना करायच्या.
रुबी लाल यांच्या मते, "मुघल महिलांना भटकंती करत जगण्याची सवय होती. युद्धात लढणाऱ्या पतीबरोबर कायम नवीन ठिकाणी किंवा तात्पुरत्या छावण्यांमध्ये राहण्याला त्या सरावलेल्या होत्या."
कदाचित प्रवास करण्याच्या याच सवयीमुळं त्यांनी पुतण्या अकबरकडे हज यात्रेला जाण्यासाठी परवानगी मागितली होती.
अकबराशी झाले बोलणे
सम्राट अकबराचं सर्वात मोठं स्वप्न मुघल साम्राज्याचा विस्तार हेच होतं. ते जस-जसे हिंदुस्तान काबीज करू लागले होते, तस-तसा त्यांनी एक पवित्र व्यक्ती म्हणून स्वतःची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला होता.
मुघल महिलांना पूर्णपणे वेगळं करत हरमच्या चार भिंतींआड ठेवण्याचा निर्णय घेणारा अकबर पहिला बादशहा होता.
"शाही हरममध्ये बादशहाशिवाय कुणालाही प्रवेशाची परवानगी नव्हती. या हरममध्ये सुंदर आणि अविवाहित मुली राहायच्या. मुघल बादशहा जणू ईश्वरासारखाच होता, याचाच हा पुरावा होता," असं रुबी लिहितात.
पण जीवनात आलेल्या या स्थिरपणानं गुलबदन यांचा जीव गुदमरायला लागला होता.

फोटो स्रोत, Getty Images
1576 च्या ऑक्टोबर महिन्यात त्यांनी अकबराला हजला जाण्याची इच्छा असल्याचं सांगितलं. एक मन्नत (नवस) पूर्ण करायचा असल्याचं त्यांनी सांगितलं.
अकबरानं या यात्रेसाठी सलिमी आणि इलाही अशी दोन आलिशान मुघली जहाजं त्यांना दिली.
या महिलांबरोबर सोने-चांदीनं भरलेल्या मोठ्या पेट्या होत्या. खैरात वाटण्यासाठी ही संपत्ती दिली होती. तसंच हजारो रुपये रोख आणि सन्मानाचे 12 हजार पोशाखही त्यांनी दिले होते.
"मुघलांची राजधानी असलेल्या फतेहपूर सिकरी या लाल दगडांच्या शहरातून सर्व महिलांचा ताफा निघाला होता. त्यावेळी त्यांना पाहण्यासाठी रस्त्यांवर सामान्य महिला आणि पुरुषांची गर्दी जमली होती," असं रुबी लाल यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटलं आहे.
पण मक्काच्या दिशेनं जाणारा सागरी मार्ग पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. ते मुस्लीमांची जहाजं लुटून जाळण्यासाठी कुख्यात होते. त्यामुळं या यात्रेची सुरुवातच धोक्यांनी झाली.
इराणमार्गे जाणारा रस्ताही तेवढाच जोखमीचा होता. कारण या मार्गावर कट्टरतावादी गट असायचे आणि ते भाविकांवर हल्ला करायचे.
त्यामुळंच गुलबदन आणि त्यांच्याबरोबर गेलेल्या महिला सुमारे एक वर्ष सूरतमध्ये अडकलेल्या होत्या. पोर्तुगीजांपासून वाचण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू होता.
त्यानंतर पुढचे चार दिवस तापलेल्या वाळवंटातून उंटावरून प्रवास करत त्या मक्कापर्यंत पोहोचल्या होत्या.
सुलतान मुरादविरोधात बंड
त्यांच्या प्रवासातलं सर्वात रंजक वळण मक्काला पोहोचल्यानंतर आलं. कारण त्याठिकाणी गेलेल्या सर्व महिलांनी पुढचे चार महिने अरब प्रांतातच राहण्याचा निर्णय घेतला होता.
"ज्याप्रकारे हरम सोडण्याबाबत त्यांचं एकमत झालेलं होतं. त्याचप्रकारे वाळवंट असलेल्या त्या जगात भटकंती करत अध्यात्माचा शोध घेण्यावरही त्यांचं एकमत झालं होतं," असंही रुबी यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटलं आहे.
गुलबदन आणि त्यांच्याबरोबर असलेल्या महिलांनी लोकांमध्ये दान वाटायला सुरुवात केली, तेव्हा त्यांची सगळीकडं चर्चा होऊ लागली.
मुघल साम्राज्याच्या राजकुमारी गुलबदन बेगमकडून दाखवल्या जाणाऱ्या या दयेमुळं ऑटोमनचे सुलतान मुराद नाराज झाले. कारण त्यांनी याचा संबंध अकबराच्या वाढत्या राजकीय सामर्थ्याशी जोडला.
त्यामुळं सुलतान मुराद यांनी चार शाही फरमान पाठवून गुलबदन आणि त्यांच्याबरोबरच्या मुघल महिलांना अरब प्रांतातून निघून जाण्यास सांगितलं.
पण गुलबदन यांनी प्रत्येकवेळी हे फरमान मान्य करण्यास नकार दिला.

फोटो स्रोत, WIKIMEDIA COMMONS
"एका मुघल महिलेनं केलेल्या बंडाची ही आधी कधीही न घडलेली अशी घटना होती. त्यामुळं स्वातंत्र्याबाबतचे त्यांचे विचार यावरून अगदी स्पष्ट होतात," असं रुबी लाल यांनी लिहिलं आहे.
त्यांच्या हट्टाला कंटाळलेल्या सुलतानानं या महिलांच्या विरोधात तुर्की भाषेतील एका विशिष्ट अशा शब्दाचा वापर केला. त्यामुळं अकबर नाराज झाला.
नंतर पाचव्या फरमानानंतर 1580 मध्ये गुलबदन आणि त्यांच्याबरोबरच्या महिला अरब प्रांतातून निघाल्या आणि दोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर 1582 मध्ये त्या फतेहपूर सिकरीला पोहोचल्या.
परतल्यानंतरही त्यांच्याकडं नवाब म्हणून पाहिलं गेलं. त्याचबरोबर अकबरानं त्यांना अकबरनामामध्येही त्यांचं योगदान देण्यास सांगितलं.
अकबरनामामध्ये गुलबदन बेगम यांच्या या प्रवासाचं सविस्तर वर्णन आहे. पण अरब प्रांतात त्यांनी घालवलेला वेळ आणि सुलतान मुराद यांनी त्यांना प्रांतातून परत पाठवण्याच्या घटनांचा उल्लेख मात्र कुठंही उपलब्ध नाही.











