माह चुचक : अकबराची सावत्र आई जी मुघल साम्राज्यासाठी डोकेदुखी ठरली, जिने काबुलवर राज्य केलं...

माह चुचक

फोटो स्रोत, PENGUIN

फोटो कॅप्शन, माह चुचक
    • Author, वकार मुस्तफा
    • Role, पत्रकार आणि इतिहास संशोधक, लाहोर

माह चुचक ही दुसरा मुघल सम्राट नसीरुद्दीन मुहम्मद हुमायून याची सर्वात धाकटी बेगम होती. तिच्या आई वडिलांचा उल्लेख इतिहासात कुठेच आढळत नाही. पण अरघानचा बैराम ओघलान आणि फरीदुन खान काबुली हे तिचे भाऊ असल्याचं सर्वज्ञात आहे.

शेरशाह सुरीकडून पराभव पत्करल्यानंतर हुमायूनने काबुल गाठलं होतं. तो सलग सहा वर्षं भारताबाहेर राहिला आणि याच दरम्यान त्याने लष्करी विचारसरणीच्या माह चुचकशी विवाह केला.

हुमायूनच्या पडत्या काळात त्याची पत्नी हमीदा बानो त्याच्या सोबत होती. पण हुमायूनने काबूलला जाताना हमीदा बानोला कंदाहारमध्ये सोडलं.

माह चुचकशी लग्न..

अॅन मेरी शामल लिहितात की, काबुलमध्ये गेलेल्या हुमायूनने माह चुचकशी लग्न केल्याचं जेव्हा हमीदा बानोला कळलं तेव्हा तिला फार दुःख झालं.

हमीदा बानोला वाटायचं की, हुमायूनचा आपल्यावर खूप जीव आहे आणि आपण सोडून त्याच्या मनात इतर कोणाचाही विचार येत नसावा. तिने हुमायूनवर इतका विश्वास ठेवावा त्याच्यामागे कारणही तसंच होतं. हुमायूनचा हमीदा बानोवर इतका जीव जडला होता की त्याने अवघ्या 40 दिवसात लग्न उरकलं होतं.

हुमायूनची बहीण गुल बदन बेगम तिच्या 'हुमायूननामा' या पुस्तकात लिहिते की, 'हुमायून सोबत लग्न करायला हमीदा बानो अजिबात तयार नव्हती. शेवटी माझी आई दिलदार बेगमने तिची भेट घेतली आणि तिला सांगितलं की, भविष्यात तुला कोणाबरोबर तरी लग्न करावंच लागेल. मग राजापेक्षा दुसरा कोणता व्यक्ती त्यासाठी योग्य असेल? सरतेशेवटी हमीदा बानो लग्नासाठी तयार झाली.'

काबूलचं महत्त्व

हुमायूनचा जन्म काबुलमध्येच झाला होता. काबुल वसवल्यानंतर हुमायूनचे वडील बाबर 1526 मध्ये भारत जिंकण्यासाठी मोहिमेवर निघाले.

HISTORICAL PICTURE ARCHIVE

फोटो स्रोत, HISTORICAL PICTURE ARCHIVE

बाबर सांगायचा की, काबुलचं वातावरण आणि इथली गोड फळं, यामुळे तो या शहराच्या प्रेमात पडला. पुढे आपलं दफनसुद्धा याच शहरात करावं अशी त्याची इच्छा होती.

बाबरच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा हुमायून आणि मिर्झा कामरान यांच्यात अंतर्गत कलह सुरू झाला. यात 1550 मध्ये हुमायून विजयी झाला.

दीड वर्ष काबूलमध्ये राहून हुमायून बल्खला गेला.

हुमायूनची बहीण गुल बदन बेगम तिच्या 'हुमायूननामा' या पुस्तकात लिहिते की, "अफगाण प्रदेशातील रोवाजच्या बागेतून जात असताना अफगाणी आघाचा (अधिकारी) घोड्यावरून खाली पडला, त्यामुळे तिथं तासभर थांबावं लागलं. त्यानंतर माह चुचकचा घोडा अडखळला. सर्वांच्या चेहऱ्यावर थकवा आल्याचं जाणवत होतं. यावेळी हुमायूनने सर्वांना पुढे जाण्याचा हुकूम केला आणि मागे राहून थोडी अफू ओढली, जेणेकरून तब्येतीत थोडी बहुत सुधारणा होईल. मागे राहिलेला हुमायून आता भराभर अंतर कापत पुढं आला आणि जथ्यात सामील झाला."

हुमायून नाराज असल्याचा आणखीन एक उल्लेख 'हुमायूननामा'त करण्यात आलाय. गुलबदन बेगम लिहिते की, डोंगर दऱ्यांमध्ये फिरून, संध्याकाळची वेळ आनंदाने व्यतीत करून हुमायून सकाळच्या प्रार्थनेसाठी बाहेर पडला. त्यानंतर त्याने बेगा बेगम, हमीदा बानो बेगम, माह चुचक बेगम आणि मला पत्रं लिहिलं. यावेळी हमीदा बानो बेगमने आम्हा सर्वांसाठी नऊ मेंढ्या पाठवल्या.

गुल बदन बेगमने हुमायून, माह चुचक आणि इतर बेगम ज्या संत्र्याच्या बागेत जायच्या त्या प्रवासाचा वृत्तांतही लिहिलाय.

पुढे शेरशाह सुरीच्या मृत्यूनंतर हुमायूनने भारतातील आपलं राज्य परत मिळवलं. पण थोड्याच दिवसांत पायऱ्यांवरून घसरून त्याचा मृत्यू झाला.

काबूलच्या बागा माह चुचकच्या ताब्यात

हुमायूनच्या मृत्यूनंतर हमीदा बानोचा मुलगा जलालुद्दीन अकबर वयाच्या 13 व्या वर्षी 14 फेब्रुवारी 1556 रोजी भारताचा शासक बनला. त्याच्या डोक्यावर त्याचा मामा बैराम खानचा वरदहस्त होता.

तिकडे माह चुचकने काबूलमध्ये आपल्या दोन वर्षांच्या मुलाला मिर्झा मुहम्मद हकीम याला सत्तेवर बसवून मुनइम खानच्या ताब्यात असलेला काबूल आणि निलाब तासचा प्रदेश मिळवला.

HISTORICAL PICTURE ARCHIVE

फोटो स्रोत, HISTORICAL PICTURE ARCHIVE

इतिहासकार मोनिस फारुकी यांच्या मते, मुनइम खानने त्याच्या ताब्यात असलेला काबूलचा प्रदेश त्याच्या मुलाकडे गनी खान याच्याकडे सोपविला. मात्र हुमायूनची 31 वर्षीय विधवा आणि मिर्झा हकीमची आई माह चुचकने याला विरोध केला आणि काबुलवर आपलीच सत्ता असावी असं म्हणत प्रतिकार केला.

रेखा मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, माह चुचक जेव्हा हुमायून समोर पहिल्यांदा आली तेव्हा ती लाजरी बुजरी होती. त्यावेळी हुमायूनने तिला तिचं नाव दोनदा विचारलं होतं. पण हुमायूनच्या मृत्यूनंतर तिच्या महत्त्वाकांक्षा समोर येऊ लागल्या होत्या.

अकबराविरोधात कटकारस्थानं

गनी खानला हटवण्यासाठी माह चुचकने, गनीखानचा नातेवाईक असलेल्या फझैल बेगशी संधान साधलं. आणि गनी खानचा काटा काढल्यावर फझैल बेगलाही ठार केलं. हुमायूनच्या जवळच्या एका अमीर शाह वली उटगा याने माह चुचकला मदत केली. त्याने मिर्झा हकीमच्या डोक्यावर हात ठेवला. पुढे उटागाचे इरादे धोकादायक वाटू लागले तेव्हा तिने हैदर कासिम कोहबारशी हातमिळवणी केली.

आणि असं करत करत माह चुचक एक राजकीय ताकद म्हणून उदयास आली. तिची राजकीय महत्त्वाकांक्षा इतकी वाढली की ती सम्राट अकबराविरोधात कटकारस्थानं रचू लागली. तिने अकबराच्या डोक्याला ताप करून ठेवला होता. काही इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार ती अकबराला ठसठसणाऱ्या जखमेप्रमाणे त्रास देत होती.

माह चुचकच्या राजकीय कारकिर्दीविषयी जास्त माहिती मिळत नाही. कारण तेव्हाच्या लेखकांना अकबराचा आश्रय होता, त्यामुळे तिच्याविषयीचं लिखाण खूपच कमी आहे. एवढंच काय, तर गुलबदन बेगमच्या 'हमायून नामा' मध्ये माह चुचकचा उल्लेख तीन ते चार वेळाच झालाय. त्यानंतर तिच्या विषयीचा उल्लेख इतका अचानक संपलाय की शेवटचं वाक्यही अपूर्ण राहिलंय.

कदाचित गुलबदन बानोकडे तिच्याविषयी सांगण्यासारखं बरच काही असेल किंवा तिच्याविषयी नंतर विस्ताराने लिहायची योजना असेल. पण गुलबदन बानोच्या पुस्तकाचा शेवट बंडखोर भाऊ मिर्झा कामरान याच्या डोळ्यात वार करून होतो.

या पुस्तकातलं शेवटचं वाक्य होतं, 'यानंतर हजरत बादशाह.'

यावरून अंदाज बांधता येतो की, दुसऱ्या कोणाच्या तरी म्हणण्यावरून या पुस्तकाचं लिखाण थांबविण्यात आलंय.

HISTORICAL PICTURE ARCHIVE

फोटो स्रोत, HISTORICAL PICTURE ARCHIVE

त्यामुळे अनेक गोष्टी सांगायच्या राहून गेल्या असाव्यात.

1563 साली अकबराने काबुल हस्तगत करण्यासाठी मुनईम खानच्या नेतृत्वाखाली सैन्य पाठवलं. पण माह चुचकने आपल्या सैन्याचं नेतृत्व करत जलालाबादजवळ विजय मिळवला. त्यामुळे अकबर जिवंत असेपर्यंत काबूल ताब्यात ठेवणं सोपं असणार नाही याची तिला खात्री झाली.

अकबराच्या शत्रूला आश्रय

तिरमिधच्या सय्यद घराण्यातील शाह अबुल मालीने अकबराला विरोध केल्यामुळे त्याला कैद करण्यात आलं होतं. पण लाहोरच्या तुरुंगातून निसटून सुरक्षित आश्रय शोधण्यासाठी तो काबूलला गेला. त्याने माह चुचककडे मदत मागितली.

माह चुचकने तिच्या सल्लागारांशी सल्लामसलत करून त्याचं स्वागत केलं. उदारपणे त्याला आपल्या आश्रयाखाली ठेवलं. एवढंच काय तर माह चुचकने आपली मुलगी बख्त अल-निसा (फखर अल-निसा) हिचा विवाह त्याच्याशी लावून दिला.

HISTORICAL PICTURE ARCHIVE

फोटो स्रोत, HISTORICAL PICTURE ARCHIVE

पण माह चुचकचं वर्चस्व आणि हस्तक्षेपाला शाह लवकरच कंटाळला.

शाह अबुल मालीने काबूलच्या राजकारणावर आपली पकड कायम करण्यासाठी माह चुचकच्या विरोधात कट रचला. त्याने 1564 मध्ये माह चुचक आणि तिचा सल्लागार हैदर कासिम यांची हत्या केली.

अकबरनामानुसार, पण माह चुचकचा मुलगा मिर्झा हकीम या हल्ल्यातून बचावला. बदख्शानच्या मिर्झा सुलेमानने अबुल मालीचा पराभव करून त्याला ठार मारलं आणि मिर्झा हकीमला काबूलवर सत्ता प्रस्थापित करायला मदत केली.

अकबरनामामध्ये असं म्हटलंय की, "काबूल मधील सर्वात शक्तीशाली महिला असलेल्या माह चुचकच्या वेशीवर मदत मागण्यासाठी आलेल्या कपटी वृत्तीच्या अबुल मालीने सिंधहून एक विनंती पाठवली. त्याने कवितेच्या रुपात आपली असहायता व्यक्त केली होती. तो म्हणतो, आपण या वेशीवर मान-सन्मानाच्या शोधात आलो नसून, नियतीपासून बचाव व्हावा म्हणून आलोय."

यावर सल्लागारांशी सल्लामसलत करून साध्या मनाच्या बेगमने मृदू भाषेत उत्तर दिलं. त्याला सन्मानपूर्वक काबूलला आणलं. त्याची चौकशी न करता आपली मुलगी फखर-उल-नासा बेगम हिचा विवाह त्याच्याशी लावून दिला. माह चुचकला याचं फळ अल्पावधीतच मिळालं आणि तिला आपला जीव गमवावा लागला.

"बुद्धीचा अभाव आणि संकुचित वृत्ती असलेला कपटी अबुल माली आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकला नाही. त्याने बेगमची मर्जी नाकारली आणि तिचा खून करण्यासाठी कारस्थान रचू लागला. 1564 साली एप्रिल महिन्यात बेगमच्या कानावर या गोष्टी येऊ लागल्या. बेगमला जेव्हा हकीकत कळली तेव्हा तिने आपल्या खोलीचा दरवाजा बंद केला. अबू मालीने दोन बदमाशांच्या साहाय्याने तिच्या खोलीचा दरवाजा तोडला आणि आत जाऊन बेगमची हत्या केली. बेगमला ठार केल्यानंतर तो मिर्झा मुहम्मद हकीमच्या शोधात निघाला. दुसऱ्या दिवशी त्याने हैदर कासिमला ठार केलं."

"पण बदख्शानींने त्याचा पाठलाग केला. त्याला पकडून मिर्झा सुलेमान यांच्यासमोर आणलं. दोन दिवसांनंतर अबुल मालीला बेड्या घालून मिर्झा हकीमसमोर उभं करण्यात आलं. मिर्झा हकिमने त्याला फासावर लटकवण्याचे आदेश दिले, पण माली गयावया करू लागला."

काबूलचं राज्यपालपद बहिणीकडे

पण त्याच्यावर दया न दाखवता त्याला फासावर लटकवण्यात आलं. अबुल मालीच्या मृत्यूनंतर बख्त अल-निसा बेगमचा (फखर अल-निसा बेगम) विवाह बदख्शानच्या ख्वाजा हसन नक्शबंदीशी लावून देण्यात आला. 1581 मध्ये मिर्झा हकीमने काबूलमधील पंजाबवर हल्ला केला आणि लाहोरच्या दिशेने पुढे सरकला. मात्र पंजाब प्रांताचा गव्हर्नर मानसिंगने त्याला रोखलं.

अकबराने मिर्झा हकीमाविरोधात युद्ध पुकारलं आणि आपलं सैन्य काबूलच्या दिशेने पाठवलं. आपण युद्ध हरतोय असं दिसल्यावर मिर्झा हकीम पळून गेला. अकबराने त्याला माफ केलं पण काबूलचं राज्यपालपद त्याची बहीण बख्त अल-निसा बेगम हिच्याकडे सोपवलं.

भविष्यात मिर्झा हकीमने असे काही उपद्व्याप केल्यास त्याला कोणतीही दयामाया दाखवणार नसल्याचा इशाराही अकबरने दिला.

अॅन वॉल्थॉल लिहितात की 'अकबर काबूल सोडून गेल्यानंतर मिर्झा हकीमने काबुलची गादी हस्तगत केली मात्र सर्व अधिकृत आदेश बख्त-उल-नासाच्या नावाने जारी करण्यात आले. अति मद्यपान केल्यामुळे मिर्झा हकीमचा मृत्यू झाला.'

मिर्झा हकीमच्या मृत्यूनंतर बख्त-उल-नासा बेगम आणि तिचा मुलगा मिर्झा वली अकबराचे दरबारी झाले. अकबराने त्यांना आनंदी ठेवण्यासाठी बरंच काही केल्याचा उल्लेख तुझक जहांगिरीमध्ये करण्यात आलाय.

1 जून 1608 रोजी बख्त अल-निसा बेगमचा तापाने मृत्यू झाला.

मौलाना मुहम्मद हुसेन आझाद दरबार-ए-अकबरीमध्ये लिहितात की, "अकबराचा लहान भाऊ असलेला मिर्झा हकीम अत्यंत अविचारी आणि पळपुटा होता. तो जिवंत असेपर्यंत सेवकांच्या हातच चमचा बनून राहिला होता."

माह चुचक बेगमची इतर मुलं, फारुख फल मिर्झा, सकीना बानो बेगम आणि आमना बानो बेगम यांना मोठ्या दर्जाची पदं कधी मिळालीच नाहीत, ती नेहमीच दुर्लक्षित राहिली.

त्यामुळे मिर्झा हकीमच्या मृत्यूनंतर माह चुचकशी संबंधित राजकीय घराणं अस्ताला गेलं. आणि इथून पुढं सुरू झाली सम्राट अकबराच्या प्रदीर्घ कारकिर्दीची सुरुवात.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)