दिल्लीकडे माघारी निघालेल्या औरंगजेबाचा नगरमध्येच शेवट कसा झाला? अशी होती औरंगजेबाची शेवटची 27 वर्षे

फोटो स्रोत, Getty Images
- Author, रेहान फझल
- Role, बीबीसी हिंदी
मुघल बादशाह औरंगजेब, 1681 मध्ये संपूर्ण तयारीनिशी दक्षिणेत उतरला. त्यावेळेस त्याच्याबरोबर प्रचंड मोठं सैन्य, संपूर्ण जनानखाना आणि तीन मुलं होती. फक्त त्याचा एक मुलगाच त्याच्यासोबत आला नव्हता.
ऑड्री ट्रुश्के या लेखिकेनं 'औरंगजेब : द मॅन अँड द मिथ' हे औरंगजेबाचं चरित्र लिहिलं आहे.
त्यात त्या लिहितात, "शामियानांबरोबर पुढे सरकणारं सैन्य, बाजार, बादशाहाचा जामानिमा, त्याच्यासोबत असणारे सरदार आणि नोकरचाकरांचा संपूर्ण ताफा, हे एक पाहण्यासारखं दृश्य असायचं."
"औरंगजेब एका जुन्या मुघल परंपरेचं पालन करत होता. ती परंपरा म्हणजे मुघलांची राजधानी नेहमी बादशाहसोबतच असायची. मात्र, इतर मुघल बादशाहांपेक्षा औरंगजेब याबाबतीत वेगळा होता. कारण एकदा दक्षिण भारतात म्हणजे दख्खनमध्ये आल्यानंतर त्याला पुन्हा कधीच दिल्लीला परतता आलं नाही."
औरंगजेबानं दिल्ली सोडून दक्षिणेकडे कूच केल्यानंतर जणूकाही दिल्ली उजाड झाली. लाल किल्ल्याच्या भिंतींवर मातीचे थर जमा झाले.


एकाकी म्हातारपण
औरंगजेबानं त्याच्या आयुष्यातील शेवटची तीन दशकं दक्षिण भारतातच वास्तव्य केलं. दख्खनमध्ये झालेल्या बहुतांश लढायांमध्ये त्यानं स्वत: नेतृत्व केलं होतं.
औरंगजेबाच्या सैन्यातील एक हिंदू सरदार भीमसेन सक्सेना यानं फारसी भाषेत 'तारीख-ए-दिलकुशा' नावानं आत्मचरित्र लिहिलं आहे.
त्यात भीमसेन सक्सेना म्हणतो, "मला या जगातील लोक खूप लोभी दिसले आहेत. इतकंच काय खुद्द औरंगजेब आलमगीरसारखा मुघल बादशाह, ज्याच्याकडे कशाचीही कमतरता नाही. तो देखील किल्ले जिंकण्यासाठी किती उतावीळ होता."
"काही दगडांवर अधिकार मिळवण्याची त्याची इच्छा इतकी प्रबळ होती की यासाठी तो स्वत: धावपळ करत होता."

फोटो स्रोत, PENGUIN VIKING
औरंगजेबाच्या राजवटीचा शेवटचा टप्पा त्याच्यासाठी फारसा सुखकारक नव्हता. त्याला या गोष्टीची जाणीव झाली होती की, संपूर्ण भारतभर मुघल साम्राज्याचा विस्तार करण्याची त्याची इच्छा धुळीला मिळाली होती.
प्रसिद्ध इतिहासकार जदुनाथ सरकार यांनी 'द शॉर्ट हिस्ट्री ऑफ औरंगजेब' हे पुस्तक लिहिलं आहे.
त्यात जदुनाथ सरकार म्हणतात, "म्हातारपणात औरंगजेब एकाकी झाला होता. एक-एक करत त्याचे सर्व जवळचे लोक मृत्यू पावले होते. त्याच्या तरुणपणातील फक्त एकच साथीदार त्याच्याबरोबर जिवंत होता. तो म्हणजे त्याचा वजीर असद खान."
"औरंगजेब जेव्हा संपूर्ण दरबारावर नजर फिरवायचा, तेव्हा त्याला सर्वत्र भित्रट, मत्सरी आणि चमचेगिरी करणारे तरुण दरबारी दिसायचे."
मुलांमध्ये क्षमतेचा अभाव
औरंगजेबाच्या मृत्यूच्या वेळेस त्याची तीन मुलं जिवंत होती. त्याआधी त्याच्या दोन मुलांचा मृत्यू झाला होता. यातील कोणामध्येही भारताचा बादशाह होण्याची क्षमता आणि कुवत नव्हती.
18 व्या शतकाच्या सुरुवातीला लिहिलेल्या एका पत्रात औरंगजेबानं, त्याच्या मुअज्जम या मुलाला कंदहारमध्ये विजय न मिळाल्याबद्दल धारेवर धरलं होतं.
औरंगजेबाचं हे पत्र 'रुकायते आलमगिरी'मध्ये संकलित करण्यात आलं आहे. त्या औरंगजेबानं लिहिलं आहे, 'एका नालायक मुलापेक्षा एक मुलगी असणं कधीही चांगलं.'
औरंगजेबानं त्याच्या पत्राच्या शेवटी त्याच्या मुलाला फटकारत लिहिलं आहे, "या जगात तू तुझ्या प्रतिस्पर्ध्यांना आणि देवाला तोंड कसं दाखवणार आहेस?"

फोटो स्रोत, Getty Images
औरंगजेबाला या गोष्टीची जाणीव नव्हती की, त्याच्या मुलांमध्ये त्याचा वारस होण्याची क्षमता निर्माण न होण्यासाठी तो स्वत:च जबाबदार होता.
इतिहासकार मूनिस फारूकी यांनी त्यांच्या 'द प्रिंसेज ऑफ द मुघल एम्पायर' या पुस्तकात लिहिलं आहे की, औरंगजेबानं त्याच्या शहजाद्यांच्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप करून त्यांची स्वायत्तता कमकुवत केली होती.
ऑड्री ट्रुश्के लिहितात, "1700 साल येता-येता औरंगजेब त्याच्या मुलांना प्राधान्य देऊ लागला होता. त्यामुळे त्या शहजाद्यांची अवस्था आणखी दुबळी झाली होती. कधी कधी तर औरंगजेब स्वत:च्या मुलांपेक्षा त्याच्या दरबारातील लोकांनाच अधिक महत्त्व द्यायचा."
"याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे औरंगजेबाचा मुख्य वजीर असद खान आणि सेनापती झुल्फिकार खान यांनी औरंगजेबाच्या सर्वात लहान मुलाला, कामबख्शला अटक केली होती."
कामबख्शला अटक होण्यामागचं कारण म्हणजे त्यानं औरंगजेबाच्या परवानगीशिवाय छत्रपती राजाराम महाराजांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. राजाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र आणि छत्रपती संभाजी महाराजांचे सावत्र भाऊ होते.
सर्वात जवळच्या लोकांचं निधन
दख्खनेतील मोहीम जसजशी लांबू लागली, तसतसं औरंगजेबाचं म्हातारपण वाढत चाललं होतं आणि त्याचं वैयक्तिक आयुष्य अंधकारमय होत चाललं होतं.
त्याची सून जहानजेब बानो हिचा मार्च, 1705 मध्ये गुजरातमध्ये मृत्यू झाला, तर औरंगजेबाचा बंडखोर मुलगा शहजादा अकबर (दुसरा) याचादेखील 1704 मध्ये इराणमध्ये मृत्यू झाला.
याच्या आधी 1702 मध्ये औरंगजेबाची कवयित्री मुलगी जेब-उन-निसा हिचादेखील मृत्यू झाला. त्यानंतर औरंगजेबाच्या भावंडांमध्ये एकटीच राहिलेल्या गौहर-आराचा देखील मृत्यू झाला.

फोटो स्रोत, Getty Images
औरंगजेबाला या सर्व गोष्टींचा खूप धक्का बसला होता. तो म्हणाला होता, "शहाजहानच्या मुलांपैकी फक्त तो आणि मीच जिवंत राहिलो आहोत."
औरंगजेबाचं दु:ख इतकंच नव्हतं. 1706 मध्येच त्याची मुलगी मेहर-उन-निसा आणि त्याचा जावई इजीद बख्श यांचादेखील दिल्लीमध्ये मृत्यू झाला.
औरंगजेबाच्या मृत्यूच्या काही काळ आधी त्याचा नातू बुलंद अख्तर याचा देखील मृत्यू झाला होता. औरंगजेबाच्या आणखी दोन नातवांचा मृत्यू झाला होता, मात्र औरंगजेबाला हे ऐकून मोठा धक्का बसेल म्हणून त्याच्या दरबारातील सरदारांनी ही बातमी दिली नव्हती.
दुष्काळ आणि प्लेगचं संकट
एकीकडे जवळच्या कुटुंबीयांचा मृत्यू होत होता तर दुसरीकडे दख्खनमध्ये त्यावेळेस पडलेल्या दुष्काळामुळे देखील औरंगजेबासमोरच्या अडचणींमध्ये वाढ केली होती.
औरंगजेबाच्या काळात भारतात आलेल्या निकोलाव मनुची या इटालियन प्रवाशानं 'स्टोरिया दो मोगोर' हे पुस्तक लिहिलं आहे. त्यात त्यानं लिहिलं आहे, "दक्षिणेत 1702 ते 1704 दरम्यान अजिबात पाऊस पडला नाही. त्यातून प्लेगच्या आजाराची साथदेखील सर्वत्र पसरली."
"दोन वर्षांमध्ये जवळपास 20 लाख लोकांचा मृत्यू झाला. भुकेनं व्याकुळ झालेले लोक चार आण्यासाठी (एक चौथाई रुपया) त्यांच्या मुलांना सुद्धा विकण्यास तयार होत असत. मात्र त्यांना विकत घ्यायला देखील कोणीही नव्हतं."

फोटो स्रोत, Getty Images
"सर्वसामान्य लोकांचा मृत्यू झाल्यावर त्यांना जनावरांप्रमाणेच दफन केलं जायचं. दफन करण्याआधी त्यांच्या कपड्यांची तपासणी करून त्यात पैसे आहेत की नाही हे पाहिलं जायचं. मग त्यांच्या पायाला दोरी बांधून तो मृतदेह ओढला जायचा आणि समोर येणाऱ्या कोणत्याही खड्ड्यात तो मृतदेह पुरला जायचा."
मनुचीनं लिहिलं आहे, "अनेकदा या मृतदेहांमुळे प्रचंड दुर्गंधी सुटायची आणि त्यामुळे मला उलटी व्हायची. चारी बाजूंना इतक्या माशा असायच्या की, जेवण करणं देखील कठीण होऊन बसायचं."
मनुची लिहितो, "ते त्यांच्या मागे झाडं आणि पीकं नसलेली वैराण शेती सोडून गेले. त्यांची जागा माणसांनी आणि जनावरांच्या हाडांनी घेतली. या सर्व प्रदेशातील लोकसंख्या इतकी घटली होती की तीन-चार दिवसांच्या प्रवासात कुठेही आग किंवा दिवा दिसायचा नाही."
उदयपुरी शेवटपर्यंत औरंगजेबासोबत राहिली
आयुष्यच्या शेवटच्या दिवसांमध्ये औरंगजेबाला त्याचा सर्वात लहान मुलगा कामबख्शची आई उदयपुरी हिचा सहवास खूप आवडायचा.
मृत्यूशय्येवर असताना औरंगजेबानं कामबख्शला लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं की, त्याच्या आजारपणात देखील उदयपुरीनं त्यांची साथ सोडलेली नाही. मृत्यूपर्यंत ती त्याची साथ निभावेल.
आणि तसंच झालंदेखील. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर काही महिन्यांतच उदयपुरीचा देखील मृत्यू झाला.

फोटो स्रोत, Getty Images
उत्तर भारतात बंडखोरीचे वारे
आयुष्याच्या शेवटच्या काळात औरंगजेबानं त्याचा मुक्काम अहमदनगर (आताचं अहिल्यानगर) इथे केला होता.
स्टॅनली लेन-पूल यांनी 'औरंगजेब अँड द डिके ऑफ द मुघल एम्पायर' हे पुस्तक लिहिलं आहे.
त्यात ते म्हणतात, "औरंगजेबाच्या उत्तर भारतातील प्रदीर्घ अनुपस्थितीमुळे तिथे गोंधळ निर्माण झाला. उत्तर भारतात राजपूत उघडपणे बंड करू लागले. आग्र्याच्या परिसरातील जाट डोकं वर काढू लागले. तर मुल्तानच्या जवळपासचे शीख देखील मुघल साम्राज्याला आव्हान देऊ लागले."
"मुघल सैन्य निराश झालं होतं. मराठ्यांमध्ये देखील मुघल सैन्यावर लपून छपून हल्ले करण्याची हिंमत आली होती."

फोटो स्रोत, VINTAGE
औरंगजेबानं त्याच्या सर्व मुलांना दूरवरच्या मोहिमांवर पाठवलं होतं. त्याला भीती वाटत होती की, त्यानं स्वत: त्याचे वडील, शहजहान यांच्याबरोबर केलं होतं, तेच त्याची मुलं त्याच्यासोबत देखील करतील.
अब्राहम इराली या आणखी एका इतिहासकारानं 'द मुघल थ्रोन : द सागा ऑफ इंडियाज ग्रेट एम्परर्स' हे पुस्तक लिहिलं आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे की, "औरंगजेबाच्या राजवटीत मुघल साम्राज्याचा विस्तार झाला. त्यांच्या राजवटीखालील प्रदेशात वाढ झाली. मात्र त्यामुळे मुघलांची ताकद वाढवण्याऐवजी ते कमकुवत झाले होते."
"त्या काळी मुघल साम्राज्याचा विस्तार इतका प्रचंड झाला होता की, त्याचा कारभार करणं कठीण झालं होतं. मुघल साम्राज्य स्वत:च्याच ओझ्याखाली दबलं होतं. इतकंच काय खुद्द औरंगजेब म्हणाल होता, अजमा-स्त हमाह फसाद-ए-बाकी (म्हणजे माझ्यानंतरची अराजकता)."
औरंगजेबाचं आजारपण
याव्यतिरिक्त औरंगजेबासमोरचा सर्वात मोठा प्रश्न होता, तो म्हणजे त्याच्या वारसदाराचा.
मनुचीनं लिहिलं आहे, "मुघल साम्राज्याची दावेदार असलेली बादशाह औरंगजेबाची मुलं आता स्वत:च म्हातारी होऊ लागली होती. औरंगजेबाच्या मुलांनंतर त्याच्या नातवांचा नंबर येत होता. मात्र, नातवांची दाढीदेखील पांढरी होऊ लागली होती. त्याच्या नातवांचं वयदेखील 45 वर्षांहून अधिक झालं होतं."
"दावेदारांमध्ये औरंगजेबाची पतवंडंदेखील होती. त्यांचं वय 25-27 वर्षे होतं. यातील फक्त एकचजण औरंगजेबाचा उत्तराधिकारी होऊ शकत होता. सत्तासंघर्षात इतर लोकांना एकतर त्यांचे हातपाय तोडून घ्यावे लागले असते किंवा जिवाला मुकावं लागलं असतं."

फोटो स्रोत, Getty Images
1705 मध्ये औरंगजेबानं वागिनजेरा हा मराठ्यांच्या किल्ला जिंकल्यानंतर कृष्णा नदीच्या काठावर एक गावात मुक्काम ठोकला. जेणेकरून त्याच्या सैनिकांना थोडा आराम मिळावा.
इथेच औरंगजेब आजारी पडला. त्याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात दिल्ली जाण्याच्या इराद्यानं तो अहमदनगर (सध्याचं अहिल्यानगर)च्या दिशेनं निघाला. मात्र तो त्याचा शेवटचा मुक्काम ठरला.
14 जानेवारी 1707 ला 89 वर्षांचा हा मुघल बादशाह पुन्हा एकदा आजारी पडला. काही दिवसात तो बरा झाला. त्यानंतर तो पुन्हा दरबार भरवू लागला.
मात्र, यावेळेस त्याला अंदाज आला होता की, आता त्याच्याकडे फार वेळ शिल्लक राहिलेला नाही. त्याचा मुलगा आजम याचा वाढता उतावीळपणा त्याला अस्वस्थ करत होता.
औरंगजेबानं मुलाला लिहिलं पत्र
इतिहासकार जदुनाथ सरकार लिहितात, "चार दिवसांनी औरंगजेबानं आजमची नियुक्ती माळव्याचा सुभेदार म्हणून केली आणि त्याला तिकडे पाठवलं. मात्र, शहजादा आजम चतुर होता. त्याच्या लक्षात आलं होतं की, त्याच्या वडिलांचा शेवट आता जवळ आला आहे. त्यामुळे त्यानं जाण्याची घाई केली नाही."
"तो अनेक ठिकाणी मुक्काम करत हळूहळू पुढे जात होता. मुलाला पाठवल्यानंतर चार दिवसांनी औरंगजेबाला मोठा ताप आला. मात्र, तरीदेखील तो हट्ट करत दरबारात आला आणि त्या स्थितीत देखील तो दररोज पाच वेळा नमाज पढला."

फोटो स्रोत, Getty Images
आयुष्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये औरंगजेबानं त्याच्या मुलांना दोन पत्रं लिहिली. त्यात त्यानं लिहिलं, "माझी इच्छा आहे की, तुम्ही दोघांनी सत्तेसाठी आपापसात लढू नये. मात्र, तरीदेखील मला दिसतं आहे की, माझ्या मृत्यूनंतर बराच रक्तपात होणार आहे."
"माझी देवाकडे प्रार्थना आहे की, प्रजेसाठी काम करण्याची इच्छा त्यानं तुमच्यात निर्माण करावी आणि राज्यकारभार चालवण्याची क्षमता तुमच्यात निर्माण करावी."
3 मार्च, 1707 ला औरंगजेब त्याच्या शयनकक्षातून बाहेर पडला.
जदुनाथ सरकार लिहितात, "औरंगजेब सकाळचा नमाज पढला आणि मग तसबीहचे मणी मोजू लागला. हळूहळू तो बेशुद्ध होऊ लागला आणि त्याला श्वास घेणं देखील कठीण होऊ लागलं."
"मात्र, शरीर कमकुवत असूनदेखील जपाच्या माळेवरील त्याची बोटं तशीच होती. जुम्याच्या दिवशी त्याचा मृत्यू व्हावा अशीच त्याची मनोमन इच्छा होती. अखेर औरंगजेबाची ही इच्छादेखील पूर्ण झाली."
मृत्यूपूर्वी औरंगजेबानं मृत्यूपत्र तयार केलं होतं. त्यात म्हटलं होतं की, त्याचा मृतदेहाचं दफन जवळच्याच एखाद्या ठिकाणी कोणत्याही ताबूतशिवाय करण्यात यावं.

फोटो स्रोत, Getty Images
औरंगजेबाचा मृत्यूनंतर दोन दिवसांनी त्याचा मुलगा आजम तिथे पोहोचला. शोक करून आणि त्याची बहीण जीनत-उन-निसा बेगमला धीर दिल्यानंतर आजम त्याच्या वडिलांचा मृतदेह थोडा अंतरावर घेऊन गेला.
त्यानंतर औरंगजेबाचा मृतदेह दौलताबादजवळच्या खुल्दाबादमध्ये सूफी संत शेख जैन-उद-दीन यांच्या कबरीशेजारी दफन करण्यात आला.
औरंगजेबाला 89 वर्षांचं आयुष्य मिळालं होतं. जदुनाथ सरकार यांनी लिहिलं आहे, "औरंगजेबाची स्मरणशक्ती जबरदस्त होती. एखाद्या व्यक्तीचा चेहरा एकदा पाहिल्यानंतर तो विसरत नसे. इतकंच नाही तर त्याला लोकांनी म्हटलेला एक-एक शब्ददेखील चांगलाच लक्षात राहायचा."
"शेवटच्या दिवसांमध्ये त्याला एका कानानं कमी ऐकू येऊ लागलं होतं. तसंच त्याच्या उजव्या पायात देखील त्रास होऊ लागला होता. त्यामुळे तो थोडा अडखळत चालत होता."
औरंगजेबाच्या मुलांमध्ये लढाई
औरंगजेबानं शाह आलम म्हणजे मुअज्जमला त्याचा वारसदार केलं होतं. तो त्यावेळेस पंजाबचा सुभेदार होता. मात्र औरंगजेबाच्या मृत्यूनंतर आजम शाह लगेचच तिथे पोहोचला होता. त्यानं स्वत:लाच बादशाह म्हणून घोषित केलं.
मग तो आग्र्याकडे निघाला, जेणेकरून त्याच्या बादशाह होण्याला विधिवत मान्यता मिळावी.

फोटो स्रोत, Getty Images
मनुची लिहितो, "तिकडे शाह आलमनंदेखील वडिलांच्या निधनाची बातमी ऐकून आग्र्याकडे कूच केलं. तो त्याचा भाऊ आजमच्या आधीच आग्र्याला पोहोचला. तिथे लोकांनी त्याचं जोरदार स्वागत केलं. जाजऊमध्ये दोन्ही भावांच्या सैन्यात लढाई झाली."
"योगायोगानं त्याच ठिकाणी अनेक वर्षांपूर्वी औरंगजेब आणि त्याचा भाऊ दारा शिकोह यांच्यादेखील लढाई झाली होती. या लढाई शाह आलमचा विजय झाला. दुसऱ्याच दिवशी, 20 जूनला त्यानं स्वत:ला बादशाह घोषीत करत मुघल तख्त हाती घेतलं."
मुघल साम्राज्याची अधोगती आणि शेवट
लढाईत पराभव झालेल्या आजम शाहनं भाऊ शाह आलमच्या हाती लागण्याआधी एका कटारीनं आत्महत्या केली.
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनीच शाह आलमचा देखील 1712 मध्ये मृत्यू झाला.
1712 ते 1719 या सात वर्षांच्या कालावधीत एकापाठोपाठ एक 4 मुघल बादशाह तख्तावर बसले. त्याउलट त्याआधीच्या 150 वर्षांमध्ये फक्त 4 मुघल बादशाहांनी भारतावर राज्य केलं होतं.
हळूहळू मुघल वंशाचा जुना दिमाख, रुबाब, नावलौकिक कमी होत गेला.

फोटो स्रोत, VINTAGE
जदुनाथ सरकार लिहितात, "स्वत:च्या कारकीर्दीत मोठं यश मिळवून देखील औरंगजेब राजकीयदृष्ट्या एक अपयशी बादशाह ठरला. त्याच्या मृत्यूनंतंर मुघल साम्राज्याची अधोगती होत ते लयाला गेलं. यासाठी फक्त औरंगजेबाचं व्यक्तिमत्व एवढंच कारण नव्हतं."
"असं म्हणणं देखील कदाचित योग्य ठरणार नाही की, फक्त त्याच्यामुळेच मुघल साम्राज्य लयाला गेलं. मात्र हे देखील तितकंच खरं आहे की मुघल साम्राज्याची अधोगती थांबवण्यासाठी औरंगजेबानं काहीही केलं नाही."
1707 मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य त्याच्या जुन्या वैभवशाली काळाच्या स्वप्नांमध्येच जिवंत होतं आणि जवळपास 150 वर्षे कशीतरी वाटचाल केल्यानंतर 1857 मध्ये बहादुर शाह जफरच्या मृत्यूबरोबरच मुघल साम्राज्याचा शेवट झाला.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











