'छावा' चित्रपट संभाजी महाराजांचं संपूर्ण आयुष्य मांडण्यात खरंच यशस्वी ठरला का?

छावा चित्रपटाचे पोस्टर

फोटो स्रोत, instagram/vickykaushal

फोटो कॅप्शन, छावा चित्रपटाचे पोस्टर
    • Author, अक्षय शेलार
    • Role, चित्रपट समीक्षक

'छावा' या संभाजी महाराजांवरील चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. पण या चित्रपटातून खरंच संभाजी महाराजांचं संपूर्ण चरित्र डोळ्यासमोर उभं राहतं का?

आपल्याकडील ऐतिहासिक चित्रपट किंवा इतिहासपटांचा विचार केल्यास त्यात एकीकडे संजय लीला भन्साळी आणि आशुतोष गोवारीकर यांचे सिनेमे आणि दुसरीकडे गेल्या काही काळात मराठीमध्ये एकापाठोपाठ बनलेले दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित चित्रपट अशी दोन टोके आढळतात. (अध्येमध्ये अक्षय कुमार अभिनीत चित्रपटांसारखे चित्रपटही येतात, पण तूर्तास त्यांचा विचार नको.)

इतिहासपटवजा चरित्रपट प्रकारातील हे चित्रपट पाहता एकीकडे प्रचंड आकर्षक, भव्य दृश्य देखावे दिसतात, तर दुसरीकडे तुलनेने कमी भव्य-दिव्य, भव्यतेपेक्षा मराठ्यांची सत्ता नि अस्मिता, स्वराज्य, शिवाजी महाराज अशा 'की वर्ड्स'वर भर देणारे काही चित्रपट आहेत.

दोन्ही प्रकारांची आपापली बलस्थानं आणि उणिवा असू शकतात. मात्र, यातील दुसऱ्या प्रकारातील चित्रपटांमध्ये व्यक्तिरेखांवर, दृक्-श्राव्य माध्यमावर कमी मेहनत घेतल्याचे प्रकर्षाने जाणवते.

स्पष्टपणे लिहायचे, तर केवळ भावनाप्रवण मांडणी आणि आक्रस्ताळेपणा यावर हे चित्रपट भिस्त बाळगून असतात.

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' हा चित्रपट वेगळा आहे, कारण यात भन्साळी-गोवारीकर यांच्या सिनेमातली भव्यता आणि लांजेकरांच्या सिनेमातील मांडणी यांचे मिश्रण पाहायला मिळते.

'छावा'मधील प्रमुख व्यक्तिरेखा आणि विषय नक्कीच रोचक आहे. 17 व्या शतकात, 1681 ते 1689 या अवघ्या नऊ वर्षांच्या कालावधीत छत्रपती संभाजी महाराजांनी दाखवले असामान्य कर्तृत्व शिवाजी सावंतांच्या याच नावाच्या कादंबरीचा विषय होता. हा चित्रपट त्याच साहित्यकृतीवर बेतलेला आहे.

नऊ वर्षांच्या कालावधीमध्ये शिवाजी महाराजांनंतर औरंगजेब आणि मुघल सत्तेसमोर आव्हान उभे करण्याचा पराक्रम संभाजी महाराजांनी दाखवला.

त्यांचे असामान्य शौर्य आणि नंतरच्या काळात झालेला क्रूर छळ यांविषयीच्या कथा आपण वाचलेल्या, ऐकलेल्या आणि दृक्-श्राव्य माध्यमात यापूर्वी पाहिल्या देखील आहेत.

'छावा'मध्ये याच कालखंडातील घटनाक्रम समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे.

ग्राफिक्स
ग्राफिक्स
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

चित्रपटाची मांडणी तशी सरळ आहे. दरबारातील वगैरे प्रसंग वगळता लहान-मोठ्या स्वरूपांच्या लढायांचे प्रसंग एकापाठोपाठ एक दाखवले जातात. हे प्रसंग हाच चित्रपटाच्या पटकथेचा ढोबळ ढाचा बनतात.

इतर प्रसंग त्यांच्या अवतीभोवती रचलेले आहेत, असे मी जेव्हा म्हणतो, तेव्हा त्यात अजिबातच अतिशयोक्ती नाही.

मला इतिहासपटांतील चित्रपटीय अभिव्यक्तीविषयी (सिनेमॅटिक लिबर्टी) काहीच आक्षेप नाही.

प्रदीर्घ चित्रपटात गोष्टी मांडत असताना त्यात नाट्यमयता आणण्यासाठी असे करणे गरजेचे असू शकते. खरी गोम आहे ती व्यक्तिरेखांची चरित्रे समोर मांडत असताना इतिहासाचे मिथकीकरण करण्यात.

यात जसा सामाजिक, राजकीय अथवा सांस्कृतिक इतिहास समाविष्ट असतो, तितकाच वैयक्तिक इतिहासही समाविष्ट होतो.

शिवाजी महाराज, संभाजी महाराज किंवा इतर सरदार असतील, ते अभेद्य आहेत, हे ठासवत असतानाच त्यांच्या व्यक्तिरेखांना त्यापलीकडे इतर काही छटा असू शकतात, याचा विसर चित्रपटकर्त्यांना (आणि पाहणाऱ्यांनाही) पडतो.

त्यामुळेच आपण जेव्हा इतिहासपट पाहतो, तेव्हा आपण खऱ्या-खोट्या पद्धतीच्या मिथकांची निर्मिती (आणि काही वेळा तर इतिहासाचे पुनर्लेखनदेखील) होताना पाहत असतो. ही निर्मिती अभिव्यक्तीच्या पलीकडे जाणारी असते, हे उघडच आहे.

चित्रपटांच्या दृष्टीने सध्याच्या काळाचा विचार केला, तर आपण फारच हिंसक काळात जगतो आहोत, असे म्हणावे.

'केजीएफ' (2018-2022), 'अ‍ॅनिमल' (2023) किंवा याहून बराच उत्तम असा 'किल' (2024) हे चित्रपट आठवून पाहा.

हे चित्रपट पाहता एखाद्या चरित्रपटामध्ये, विशेषतः छत्रपती संभाजी महाराजांसारख्या व्यक्तीच्या जीवनावर आधारलेल्या चित्रपटात हिंसा पुरेपूर झिरपली नसती तरच नवल! तुम्ही 'रक्ताचे पाट वाहणे' ऐकलं असेल, पण इथे तुम्हाला अक्षरशः 'रक्ताच्या नद्या' पाहायला मिळतात.

मुघलांचे क्रौर्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात चित्रपट अजिबातच कमी पडत नाही. अगदी मन आणि मेंदू सुन्न व्हावा, अशी ही करामत!

मात्र, 'छावा'मधील खेदजनक बाब म्हणजे क्रोध, हिंसा आणि आक्रोश नि ओरडणे, या बाबी इथल्या अनेक महत्त्वाच्या पात्रांचे गुणधर्म होऊन बसतात.

छावा चित्रपटातील दृश्य

फोटो स्रोत, instagram/vickykaushal

विकी कौशलने रंगवलेली संभाजी महाराजांची व्यक्तिरेखा असेल किंवा विनीत कुमार सिंग, आशुतोष राणा यांच्या व्यक्तिरेखा असतील, पदोपदी पेटून उठत ओरडणे, हीच त्यांची वैशिष्ट्ये बनतात.

क्रोधाच्या पलीकडे जाणारी आणखी कुठलीच भावना या साऱ्यांना जाणवत नसेल का? या प्रश्नाचे उत्तर चित्रपटकर्त्यांना तरी साहजिकरीत्या 'नाही' असेच वाटते. विशेष म्हणजे, ए. आर. रहमानचे संगीतही भडकपणामध्ये या पात्रांहून वरचढ ठरू पाहत आहे.

शिवकालीन इतिहास असो अथवा आणखी कुठला इतिहासपट, त्यातील मुघल पात्रांच्या आडून आताच्या काळातील मुस्लिमांविषयीचा द्वेष मांडला जात असल्याचं, इतिहासात इस्लामोफोबियाचं व्हॅलिडेशन शोधलं जात असल्याचं कायम पाहायला मिळतं. हा प्रकार आता इतका सवयीचा झाला आहे की, त्यात काहीच वावगे वाटत नाही.

त्यामुळे देशाभिमान, धर्माभिमान नि कट्टरता, इत्यादी गोष्टी गृहीतच धराव्या लागतात. इथेही त्याची काही उदाहरणे आढळतात. त्यामुळेच महाराजांच्या सैन्यातील मुस्लीम गुड मुस्लीम ठरतात, तर बाकी सारे बॅड मुस्लिम.

तरी अपवादाने का असेना, पण इथला औरंगजेब (अक्षय खन्ना) नेहमीच्या हिंदी किंवा मराठी चित्रपटांमधील काजळ लावलेल्या खलपात्रांच्या तुलनेत जरा गंभीरपणे घ्यावासा आहे. तो नुसताच हास्यास्पद वाटत नाही.

त्याचं वाढत जाणारं वय, लंगडत चालणं, न ओरडता बोलणं या साऱ्यातून विकी कौशलच्या कामगिरीच्या अगदी विरुद्ध असं खलपात्र पाहायला मिळतात.

याउलट विकी कौशलची व्यक्तिरेखा कायम आक्रमक पवित्र्यात आहे. दरबारात बसलेली असतानाही त्यात एक अस्वस्थ चूळबूळ, अशांतपणा जाणवत राहतो. या दोघांचीही कामे दाद द्यावीत अशी आहेत.

शिवकालीन इतिहासातील व्यक्तिरेखा किंवा घटना दाखवत असताना आपण कुणाच्या तरी भावना तर दुखावत नाही ना, कुणीतरी ऑफेंड तर होत नाही ना, ही एक भीतीची टांगती तलवार चित्रपटकर्त्यांवर असल्याचं जाणवतं.

दिग्दर्शक उतेकर आणि त्यांची टीमदेखील याला अपवाद नाही. त्यामुळे महाराजांना एखाद्या क्षणी तरी भीती किंवा किमान अस्वस्थता वाटत नसेल का? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला कुठल्याच सिनेमात पाहायला मिळत नाही, कदाचित मिळणारही नाही.

विकी कौशल

फोटो स्रोत, instagram/vickykaushal

फोटो कॅप्शन, छावा चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान विकी कौशलनं छत्रपती संभाजीनगरमधील क्रांतीचौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन केलं.

गेल्या काही काळातील चित्रपटांचा विचार केला, तर शिवाजी महाराजांना तर चित्रपटकर्त्यांनी कायम क्रोधित आणि आक्रमक हावभाव आणि देहबोलीसह समोर उभे केले आहे. हा पवित्रा भलताच आक्रमक नि अतिरेकी आहे!

आपण वेगवेगळ्या चित्रांचा आणि विविध बखरींमधील घटनांचा संदर्भ घेऊन पाहिले, तरी आक्रमकतेच्या पलीकडे जाणाऱ्या अनेक भावनांचा विस्तीर्ण पट पाहायला मिळतो. हेच संभाजी महाराजांनाही लागू पडत असणार ना?

उलट एक विशिष्ट चित्र रेखाटून इतिहासाचे आणि ऐतिहासिक व्यक्तींच्या जगण्याचे सुलभीकरण केल्याचेच सहसा पाहायला मिळते. त्यामुळेच त्या व्यक्तिरेखांच्या मनातील अनेकविध भावना, त्यांचे चातुर्य, मुत्सद्देगिरी पुरेशा प्रमाणात पाहायला मिळत नाही.

सगळे जग केवळ काळ्या-पांढऱ्यामध्ये (किंवा या केसमध्ये भगव्या नि हिरव्यामध्ये) रेखाटत आपण या व्यक्तिरेखांवर मोठा अन्याय करतो. पण, ते लक्षात कोण घेतो?

'छावा'च्या संदर्भात तर चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी त्यातील लेझीम नृत्याचे दृश्य पाहून ज्या घडामोडी झाल्या, त्यामुळे चित्रपटकर्त्यांना संपूर्ण गाणेच वगळून टाकावे लागल्याची घटना घडली आहे.

एक समाज म्हणून आपण कोणत्या गोष्टींना किती महत्त्व द्यायचे आहे, हे ठरवून टाकल्याची जी विचित्र उदाहरणे आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यातलेच हे आणखी एक उदाहरण मानावे लागेल.

संभाजी महाराज

संभाजी महाराजांची विद्वत्ता, स्वराज्य ही संकल्पना आणि तिच्या उभारणीसाठी केलेले प्रयत्न, इंग्रज किंवा पोर्तुगीजांशी असलेले संबंध, लहान वयातच एकेक करत वडीलधाऱ्या मंडळींचा मृत्यू पाहिल्यानंतरची मनोवस्था यांसारखे मुद्दे तर चित्रपटात येतच नाहीत.

हे मुद्दे तर सोडाच, पण (कदाचित पॅन-इंडियन अपीलच्या हट्टापायी) येसूबाईंच्या भूमिकेत रश्मिकाला घेतलेले असताना तिचे दाक्षिणात्य लहेजाचे मराठी-हिंदी उच्चार कुणालाही खटकू नयेत? म्हणजे पटकथेप्रमाणे मांडणीतही तपशीलांचा इतका अभाव असावा? सिनेमा तपशीलांतूनच तर आकार घेतो!

मात्र, 'छावा' काही तपशीलांचा चित्रपट नव्हे! हा कोलाहलाच्या काळातील चित्रपट आहे आणि कोलाहल नि अशांततेच्या काळात तग धरून राहण्यासाठी एकीकडे हिंसा आणि दुसरीकडे भावनाप्रवण चित्रण अशा दोन दगडांवर पाय रोवून ठेवणे गरजेचे असते, हे चित्रपटकर्त्यांना माहीत आहे.

त्यामुळे थिएटरमध्ये भावनाविवश झालेले स्त्री-पुरुष आणि दिल्या जाणाऱ्या घोषणा दाखवणाऱ्या रील्स म्हणजे चित्रपट उत्तम किंवा कदाचित महान असल्याची पावती असते, असेही एक अजब पुनर्लेखन येत्या काळात पाहायला मिळणार आहे. यापुढे तपशील किंवा इतिहास हे मुद्दे तसे दुय्यमच म्हणावेत, नाही का?

(लेखक चित्रपट समीक्षक आहेत. या लेखातील मते लेखकाची वैयक्तिक आहेत.)

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.