कुटुंबातील कलह, शिवाजी महाराजांची साथ सोडणं ते संभाजी महाराजांच्या दुःखद अंताची कहाणी

फोटो स्रोत, DR. KAMAL GOKHALE
- Author, रेहान फजल
- Role, बीबीसी हिंदी
छत्रपती शिवाजी महाराज यांचे थोरले सुपुत्र युवराज संभाजीराजे सन 1659 मध्ये केवळ दोन वर्षांचे होते. त्यावेळी त्यांनी आपल्या आईला गमावलं होतं. वडील शिवाजी राजे आणि आजी जिजाबाई यांच्या देखरेखीखाली त्यांची जडणघडण झाली.
महाराजांना औरंगजेबानं आग्रा इथं कैदेत ठेवलं होतं. त्यावेळी संभाजी महाराजही त्यांच्याबरोबर होते. महाराज तिथून निसटण्यात यशस्वी झाले. त्यावेळीही ते त्यांच्याबरोबर होते.
संभाजी राजांसाठी महाराजांनी एक शिक्षक नेमला होता. त्यांना सुरुवातीपासूनच संस्कृत भाषेची आवड होती. त्यामुळं नंतर त्यांनी त्यात प्राविण्य मिळवलं होतं.
सन 1670 नंतर छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांना महत्त्वाच्या प्रशासकीय कार्यात सहभागी करुन घेऊ लागले होते. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्यावेळी स्वाभाविकपणे सर्वच जण त्यांच्याकडे महाराजांचे उत्तराधिकारी म्हणून पाहू लागले होते. परंतु, याचदरम्यान महाराजांच्या कुटुंबात एका वादाला तोंड फुटू लागलं होतं.
वैभव पुरंदरे आपलं पुस्तक 'शिवाजी इंडियाज ग्रेट वॉरियर किंग'मध्ये लिहितात की, "छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी सोयराबाई यांनी 24 फेब्रुवारी 1670 मध्ये एका मुलाला जन्म दिला होता. त्याचं राजाराम असं नाव ठेवण्यात आलं होतं."
शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी राजाराम यांचं वय केवळ चार वर्षे होतं. परंतु, संभाजी महाराजांऐवजी राजाराम यांना महाराजांचे उत्तराधिकारी केलं जावं, अशी सोयराबाईंची इच्छा होती.
ते पुढं लिहितात, "शिवाजी महाराजांनी आठ विवाह केले. त्यांना संभाजी आणि राजाराम ही दोन मुलं झाली. त्यांनी इतर विवाह हे केवळ राजकीय उद्देशाने केले होते. त्यापासून त्यांना सहा कन्या झाल्या होत्या. महाराजांनी त्यांचे विवाह प्रतिष्ठित मराठा परिवारात केले होते."
संभाजी राजेंनी महाराजांची साथ सोडली
सन 1676 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे सुमारे एक महिना गंभीर आजारी होते. त्यावेळी दक्षिणेतील काही भागात महाराजांचे निधन झाल्याची अफवा पसरली होती.
नेमकं त्याचवेळी महाराजांच्या कुटुंबातील मतभेदांचे वृत्तही वाऱ्याच्या वेगानं पसरत होतं.
कमल गोखले 'शिवपुत्र संभाजी' या आपल्या पुस्तकात लिहितात की, "याच दरम्यान संभाजी महाराजांच्या कथित वाईट वर्तनाचे वृत्तही जोर धरू लागले होते. सन 1674 मध्ये शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर या बातम्या अधिक येऊ लागल्या होत्या. संभाजी राजेंना लोकांच्या नजरेत वाईट ठरवण्यात त्यांच्या सावत्र आई सोयराबाई यांचा हात होता."

फोटो स्रोत, DR. KAMAL GOKHALE/CONTINENTAL PUBLICATION
"हे खरं होतं की, शिवाजी महाराजांच्या कुटुंबात तणाव निर्माण होऊ लागला होता. संभाजी महाराजांना कुटुंबातील आपलं स्थान आणि त्यांच्याबाबत ज्या गोष्टी घडू लागल्या होत्या, त्यावर ते असंतुष्ट होते."
सन 1674 मध्ये संभाजी महाराजांच्या आधारस्तंभ, त्यांच्या आजी जिजाबाई यांचं निधन झालं.
13 डिसेंबर 1678 रोजी संभाजी महाराजांनी असं पाऊल उचललं की, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना मोठा धक्का बसला.
ते सातारा सोडून पेडगावला गेले जिथं त्यांनी मुगल सेनापती दिलेर खानशी हातमिळवणी केली. त्यावेळी संभाजी महाराज केवळ 21 वर्षांचे होते.
अस्वस्थ संभाजी महाराज
संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांची साथ का सोडली? यावर त्यावेळचे पुरावे प्रकाश टाकत नाहीत.
प्रख्यात कांदबरीकार विश्वास पाटील संभाजी महाराजांच्या चरित्रात लिहितात की, "दिलेर खानच्या अनुभवी डोळ्यांनी तरुण युवराजाच्या चेहऱ्यावरचे दुःखाचे भाव वाचले. 'रायगडमध्ये तुम्हाला कसं अपमानित करण्यात आलं आहे, याची पूर्ण कल्पना तुमचा भाऊ दिलेर खानला आहे,'" अशा शब्दांत त्यानं संभाजी महाराजांना दिलासा दिला.

फोटो स्रोत, Getty Images
"हत्तीवर स्वार होत जेव्हा संभाजी महाराज बहादूरगड किल्ल्यात दाखल झाले. त्यावेळी त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं होतं. परंतु, असं असूनही संभाजी महाराजांना तिथं अस्वस्थ वाटत होतं."
दिलेर खान संभाजी महाराजांपेक्षा 40 वर्षांनी मोठा होता. परंतु, तो तरुण युवराजांशी अतिशय मित्रत्त्वानं वागत होता.
दिलेरखानकडून संभाजी महाराजांचा भ्रमनिरास
मुघलांसाठी संभाजीराजेंना आपल्या बाजूनं आणणं हा एक मोठा विजय होता. परंतु, लवकरच संभाजीराजे आणि दिलेर खान यांच्यात मतभेदांना सुरुवात झाली.
एप्रिल 1679 मध्ये दिलेर खानने भूपालगड किल्ल्यावर हल्ला करुन ताबा मिळवला. त्यावेळी संभाजी महाराज त्याच्याबरोबर होते. दिलेर खानने किल्ल्यातील आणि स्थानिक गावातील लोकांना क्रूर वागणूक दिली.


जदुनाथ सरकार आपलं पुस्तक 'शिवाजी अँड हिज टाइम्स'मध्ये लिहितात, "दिलेर खाननं किल्ल्यात जिवंत राहिलेल्या 700 लोकांचे एक-एक हात कापले आणि त्यांना सोडून दिलं. गावकऱ्यांना गुलाम बनवलं."
दिलेर खाननं आदिलशाहीविरोधातही मोहीम चालवली. आदिलशाहचा सेनापती सिद्दी मसूदने विजापूरच्या संरक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांकडे मदत मागितली होती.

फोटो स्रोत, Getty Images
सेतूमाधवराव पगडी हे 'छत्रपती शिवाजी' या पुस्तकात लिहितात की, "त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्वरीत 10 हजार घोडेस्वार आणि धान्यांनी भरलेल्या 10 हजार बैलगाड्या पाठवल्या आणि दबाव कमी करण्यासाठी मुघलांच्या ताब्यात असलेल्या जालन्यावर हल्ला करुन त्यावर ताबा मिळवला."
ते पुढं लिहितात, "परिणामी दिलेर खाननं विजापूरला घातलेला वेढा मोडला. परतताना त्यानं तिकोटा गावावर हल्ला करुन तिथल्या 3 हजार सामान्य नागरिकांना कैद केलं. त्यानंतर तो अथणीला आला. तिथल्या नागरिकांवरही त्यानं अन्याय केला."
छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदारमतवादी कार्यशैलीत लहानाचे मोठे झालेल्या संभाजी महाराजांना दिलेर खानची ही शैली पसंत पडली नाही. दिलेर खान सामान्य नागरिकांप्रती अत्यंत क्रूर पद्धतीने वागत होता.
मुघलांबरोबर आपले संबंध जास्त दिवस टिकणार नाहीत, हे त्याचवेळी त्यांच्या लक्षात आलं.
अन् संभाजी महाराज घरी परतले
जदुनाथ सरकार लिहितात, "20 नोव्हेंबर 1679 रोजी संभाजी महाराज आपली पत्नी येसूबाई यांच्याबरोबर मुघलांच्या छावणीतून निसटले. येसूबाईंनी पुरुषांचा वेश परिधान केला होता. त्यांच्याबरोबर 10 सैनिक होते."

फोटो स्रोत, RANJIT DESAI
"घोड्यावर स्वार होत ते दुसऱ्या दिवशी विजापूर येथे पोहोचले. तिथं सिद्दी मसूदनं त्यांचं स्वागत केलं. चार डिसेंबरला ते पन्हाळ्याला पोहोचले. तिथं पिता-पुत्राची भेट झाली."
शिवाजी महाराज त्यांना उत्साहानं भेटले. परंतु, पिता-पुत्रातील दुरावा शेवटपर्यंत कमी झाला नाही. सुमारे एक वर्ष चाललेल्या संभाजी महाराजांच्या बंडामुळं मराठा साम्राज्यात प्रचंड खळबळ उडाली होती.
या भेटीनंतरही छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसाचा प्रश्न सुटला नाही.
कृष्णाजी अनंत सभासद हे छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र 'सभासद बखर'मध्ये लिहितात, "तुम्ही वेगळे राज्य निर्माण करण्याचा विचार करत आहात याची मला कल्पना आहे. मला दोन पुत्र आहेत, तुम्ही संभाजी आणि राजाराम."
"मी माझ्या साम्राज्याचे दोन भाग करीन. सध्या माझ्या राज्याचे दोन हिस्से आहेत, एक तुंगभद्र ते कावेरीपर्यंत आणि दुसरा तुंगभद्राच्या पलीकडे जो गोदावरी नदीपर्यंत जातो. मी तुम्हाला कर्नाटकचा प्रदेश देतो आणि उर्वरित प्रदेश राजाराम यांना देतो."
महाराजांच्या पश्चात कारभार संभाजी राजेंच्या हातात
तीन एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचं निधन झालं. ज्यावेळी ते मृत्यूशय्येवर होते, त्यावेळी याची माहिती संभाजी महाराजांना देण्यात आली नव्हती.

फोटो स्रोत, Getty Images
डेनिस किनकेड हे शिवाजी महाराजांच्या चरित्रात लिहितात की, "संभाजी महाराजांना जेव्हा महाराजांच्या आजाराची माहिती मिळाली. तेव्हा ते ताबडतोब पन्हाळ्याहून आपल्या ऊंटावरुन रायगडला रवाना झाले."
"प्रचंड उन्हात दिवस-रात्र प्रवास करत ते रायगडावर पोहोचले. परंतु, तोपर्यंत त्यांच्या पित्याचं निधन झालं होतं. रागाच्या भरात त्यांनी आपल्या ऊंटाची मान कापली. त्यानंतर त्यांनी त्याच ठिकाणी डोकं नसलेल्या ऊंटाचा पुतळा उभारण्याचा आदेश दिला."
संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे उत्तराधिकारी बनले.
औरंगजेबाच्या सैन्यानं संभाजी महाराजांना कैद केलं
सन 1681 ते 1682 दरम्यान औरंगजेबाने दक्षिण भारताची मोहीम सुरू करुन सर्व आव्हानं संपवण्याचा विडाच उचलला होता.
त्यानं विजापूर आणि गोवळकोंडावर ताबा मिळवत तिथल्या राजांना बंदी बनवलं.
सन 1689 मध्ये रत्नागिरीतील संगमेश्वर येथे संभाजी महाराजांनाही कैद केलं.
विश्वास पाटील लिहितात की, "संभाजी महाराजांना बहादूरगड येथील छावणीत नेण्यात आलं. औरंगजेबाच्या आदेशानुसार, संभाजी महाराजांना विदूषकाचे कपडे घालून त्यांना संपूर्ण शहरात फिरवण्यात आलं."
ते पुढं लिहितात, "एकेकाळी सोन्याच्या सिंहासनावर बसलेल्या छत्रपती संभाजी महाराजांना किरकोळ गुन्हेगाराप्रमाणं एका अशक्त ऊंटावर बसवण्यात आलं. त्यांच्या डोक्यावर कैद्यांसाठी वापरण्यात येणारी लाकडी टोपी ठेवण्यात आली."
"त्यांचे हात वर करून लाकडी फळीला बांधले होते. त्यांना आजूबाजूला पाहता येऊ नये म्हणून त्यांची मानही लाकडी फळीला बांधलेली होती."

फोटो स्रोत, Penguin India
जदुनाथ सरकार लिहितात, "छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलगा कैदी म्हणून आपल्यासमोर येताना पाहून मुघल बादशाहला अत्यानंद झाला होता."
"संभाजी महाराजांना औरंगजेबासमोर डोकं झुकवण्यास सांगितलं गेलं. पण महाराजांनी तसं करण्यास नकार दिला आणि त्यांनी औरंगजेबाच्या नजरेला नजर भिडवली. औरंगजेबानं त्याच रात्री संभाजी महाराजांचे डोळे काढून टाकण्याचे आदेश दिले."
या प्रसंगाचं वर्णन करताना डेनिस किनकेड लिहितात, "औरंगजेबानं संभाजी महाराजांना इस्लाम स्वीकारण्याचा आदेश दिला. पण त्यांनी तसं करण्यास नकार दिला. औरंगजेबाच्या आदेशावरून त्यांची जीभ कापण्यात आली."
"यानंतर, त्यांच्यापुढं पुन्हा एकदा औरंगजेबाचा प्रस्ताव आला. छत्रपती संभाजी महाराजांनी एक कागद मागितला आणि त्यावर त्यांचं उत्तर लिहिलं, 'अजिबात नाही, बादशाहनं मला त्याची मुलगी जरी दिली तरी नाही.'
छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू
औरंगजेबाच्या आदेशावरून डोळे काढल्यावरही संभाजी महाराजांना पंधरा दिवस यातना देण्यात आल्या.
डेनिस किनकेड लिहितात, "11 मार्च 1689 रोजी छत्रपती संभाजी महाराजांचे एक-एक अवयव कापण्यात आले. अखेरीस त्यांचं शिर धडापासून वेगळं करण्यात आलं."
अत्यंत क्रूर पद्धतीनं संभाजी महाराजांना त्रास देण्यात आला. मृत्यूनंतर त्यांचं कापलेलं शिर प्रमुख शहरांमधून फिरवण्यात आलं.
दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे छोटे पूत्र राजाराम यांना राजा करण्यात आलं. मुघलांनी त्यांचाही पिच्छा सोडला नाही.
वैभव पुरंदरे लिहितात की, मुघलांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी आणि मुलगा शाहू यांना बंदी बनवलं.
राजाराम आपली पत्नी ताराबाई यांच्याबरोबर जिंजी किल्ल्यात शरण आले. अखेरीस 1697 मध्ये ते दोघेही जिंजी किल्ल्यातून पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यानंतर त्यांनी औरंगजेबाला प्रत्युत्तर दिले.
सन 1699 मध्ये वयाच्या 30 व्या वर्षी राजाराम यांचं निधन झालं. परंतु, त्यांची पत्नी ताराबाई यांनी औरंगजेबाविरोधातील लढाई सुरुच ठेवली.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











