हर्निया म्हणजे काय? तो किती धोकादायक आणि त्यापासून वाचण्यासाठी काय काळजी घ्यावी?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, ओंकार करंबेळकर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
हर्निया. या आजाराचं नाव बहुतांश लोकांनी ऐकलेलं असतं. कुटुंबातील कोणाची तरी हर्नियावर झालेली शस्त्रक्रिया आपल्याला आठवत असते. हा आजार नक्की काय असतो, तसेच गेल्या काही वर्षांमध्ये अचानक तरुणांमध्ये हर्नियाचा त्रास का वाढला आहे याची कारणं आपण जाणून घेणार आहोत.
आधी हर्निया कशाला म्हणतात ते पाहू. सोप्या शब्दांमध्ये सांगायचे झाले तर आपल्या शरीरातल्या आतल्या भागात एखादा अवयव दुर्बल झालेल्या स्नायूतून किंवा उतींच्या आवरणातून बाहेर ढकलला जातो, तेव्हा या स्थितीला हर्निया असं म्हणतात.
हर्निया बहुतेकवेळा छाती आणि नितंबांच्यामधल्या भागात होताना दिसतो. अनेकदा त्याची लक्षणं कमी दिसतात किंवा कधीकधी दिसतच नाहीत मात्र पोटावर किंवा जांघेमध्ये सूज आलेला भाग दिसून येतो. हा सुजलेला भाग आडवं पडल्यावर आत जातो. तर खोकल्यावर किंवा ताण दिल्यावर तो दिसू लागतो.
हर्निया कशामुळे होतो? त्याचे प्रकार कोणते आहेत?
हर्निया होण्यासाठी अनेक घटक कारणीभूत ठरतात. कधीकधी हर्निया जन्मजात असल्याचंही दिसून येतं.
तर कधी पोटाचे स्नायू दुर्बल झाल्यामुळे, वजनं उचलल्यामुळे पोटावर आलेल्या ताणामुळे, लठ्ठपणामुळे, अनुवंशिक कारणांमुळे तसेच स्नायूंवर ताण आल्याने हर्निया झालेला दिसतो.
गरोदरपणातल्या पोटावर आलेल्या ताणामुळेही हा त्रास होऊ शकतो.
बहुतेक हर्नियाची लक्षणं दिसत नाहीत. पण काहीवेळेस रुग्णाला फारच अस्वस्थ वाटू लागते, वेदना होतात. अतीगंभीर स्थितीत गुंतागुंतीची स्थिती होते, त्यांना डॉक्टर तपासून शस्त्रक्रिया किंवा इतर उपचार सुचवतात.

फोटो स्रोत, Getty Images
हर्नियाचे इन्ग्विनल आणि फेमोरल असे दोन जांघेवर दिसणारे प्रकार आहेत. तर अम्ब्लिकल हा प्रकार पोटावर आपल्या नाभीजवळ होताना दिसतो. हा प्रकार बाळाला जन्मतः असू शकतो किंवा प्रौढ व्यक्तींनी पोटावर ताण दिल्यासही होऊ शकतो.

फोटो स्रोत, Getty Images
हिअटस हर्निया हा पोटातील अवयवांनी छातीच्या दिशेने डायफ्रॅमवर दाब दिल्यास होतो. अशा लोकांना छातीत जळजळ होणं हे प्रमुख लक्षण दिसून येतं. यामागची निश्चित कारणं माहिती नसली तरी वयोमानानुसार डायफ्रॅम कमकुवत झाल्यामुळे हा त्रास होत असावा. याशिवाय हर्नियात अनेक लहान प्रकार दिसून येतात.
हर्नियाची लक्षणं
हर्नियाची लक्षणं वेगवेगळी असतात. या लक्षणांबद्दल बीबीसी मराठीला सॉल्ट लेक, कोलकाता येथे असलेल्या मणिपाल रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या डॉ. शुभयू बॅनर्जी यांनी माहिती.
डॉ. बॅनर्जी हे लॅप्रोस्कोपिक आणि ऑंकोलॉजी शस्त्रक्रियांचे तज्ज्ञ आहेत.


ते या लक्षणांबाबत बोलताना म्हणाले की, “हर्नियाची लक्षणं तो कुठल्या प्रकारचा आहे आणि शरीरावर कुठे आहे यावर अवलंबून आहे. तो आडवं पडल्यावर आत जातोय का, त्यामुळे वेदना होतात का, अस्वस्थ वाटतंय का यानुसार त्यांची तीव्रता बदलते.
जांघेजवळ फुगवटा येणं किंवा तिथं घट्टपणाही जाणवतो. जर रुग्णाच्या आजाराने थोडा पुढचा टप्पा गाठला असेल तर त्याला मळमळणं, उलटी होणं असे त्रास होतात.
हर्नियाची काही लक्षणं दिसून येत नाहीत. त्यामुळे डॉक्टरांकरवी तपासणी करुन निदान होणं आवश्यक ठरतं. अशावेळेस शंका आल्यास तात्काळ डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे.”
हर्निया आणि वजनं उचलण्याचा व्यायाम
आताच्या आयुष्यात चांगली जीवनशैली असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी नियमित व्यायाम, चांगला आहार, झोप तसेच मानसिक स्वास्थ्य चांगलं असणं गरजेचं आहे.
आपल्याला दैनंदिन कामं करण्यासाठी काही विशिष्ट प्रमाणात स्नायूंची गरज लागते. त्यामुळे स्नायूंचे व्यायाम सुचवले जातात. तसेच वयोमानानुसार स्नायूंची क्षती होत जाते, ती भरुन काढण्यासाठीही व्यायाम सुचवले जातात.

फोटो स्रोत, Getty Images
परंतु वजन उचलण्याचा व्यायाम करणाऱ्यांनी काही खबरदारी बाळगली पाहिजे. जर अयोग्य पद्धतीने वजन उचलण्याचा व्यायाम केला तर हर्नियाचा त्रास होऊ शकतो.
ही स्थिती बहुतेकवेळा ज्यांचे स्नायू अत्यंत कमकुवत आहेत किंवा आधीपासूनच एखाद्याप्रकारचा त्रास होत असेल तर उद्भवते.
अशा लोकांना अतिवजनदार गोष्ट उचलणे किंवा पोटावर जोरात ताण देण्यामुळे हर्नियाचा त्रास होऊ शकतो तसेच आधीपासून असलेल्या हर्नियाचा त्रास वाढू शकतो.
वजन अयोग्य पद्धतीनं उचलणं, व्यायामाच्यावेळेस चुकीच्या पद्धतीने श्वासोच्छवास करणं यामुळे हा धोका वाढतो. चुकीच्या पद्धतीने वजनं उचलणं आणि अंतर्गत स्नायूंवर अतिरेकी ताण दिल्यास हर्नियासारखे त्रास उद्भवतात.
वजनं उचलण्याचा व्यायाम करण्यापूर्वी काय काळजी घ्यावी?
वेटलिफ्टिंग किंवा जीममधला वजन उचलण्याचा व्यायाम सुरू करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे.
अचानक मनात आलं म्हणून असे व्यायाम सुरू करू नयेत. व्यायाम करताना शरीराला झटके देऊन व्यायाम करू नयेत. डॉ. शुभयू बॅनर्जी यांनी याबाबत अधिक माहिती दिली.
ते म्हणाले की, “कोणताही व्यायाम सुरू करण्याआधी आपण डॉक्टरांना भेटून तपासणी करुन घेतली पाहिजे तसेच योग्य प्रशिक्षकांच्या देखरेखीखालीच तो केला पाहिजे.
व्यायाम सुरू करताना दररोज पाच ते दहा मिनिटांचा वॉर्म-अप व्यायाम केला पाहिजे. त्यानंतर थोडे कार्डिओ व्यायाम, स्ट्रेचिंगचे व्यायाम करुन मगच मुख्य व्यायामाला सुरुवात करावी.
व्यायाम करताना तुम्ही शरीराच्या स्थितीकडे लक्ष द्यावे, सावकाश आणि नियंत्रित हालचाली कराव्यात. एकदम जास्त वजन उचलू नये. प्रशिक्षकाने सांगितल्याप्रमाणे व्यायामाची तीव्रता कमी जास्त करा. त्याच्या मार्गदर्शनानुसार व्यायामाच्या हालचाली करताना श्वासोच्छवास करा. योग्य प्रमाणात पाणीही प्या. वेदना होत असल्या तर विश्रांती घ्या.”
मुंबईतील लिलावती रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या डॉ. नरेंद्र निकम यांनीही जीमचा व्यायाम करणाऱ्या तरुणांसाठी बीबीसी मराठीकडे काही माहिती दिली.
ते सांगतात, “जास्त तीव्रतेने वजन उचलण्याचे व्यायाम केल्यास हर्नियाचा धोका वाढू शकतो. जड वजन उचलल्याने ओटीपोटाच्या भिंतीवर दबाव येऊ शकतो आणि स्नायूंना अश्रू आणि हर्निया होऊ शकतो.
25-35 वयोगटातील जिममध्ये जाणाऱ्यांमध्ये इंग्विनल हर्नियाच्या प्रकरणांमध्ये अंदाजे 17% ते 20% वाढ होते आणि त्यांना मांडीच्या वेदनांच्या तक्रारी येतात. उपचार न केल्यास, रक्तस्त्राव, संसर्ग आणि रक्ताच्या गुठळ्या यासारख्या गुंतागुंतीची स्थिती होऊ शकते.
हर्नियाला प्रतिबंध करण्यासाठी, वजन उचलताना योग्य तंत्राचा अवलंब करणे किंवा योग, चालणे आणि पोहणे यासारख्या हर्निया-अनुकूल पर्याय स्विकारणे अत्यावश्यक आहे. वेदना झाल्यास, किंवा ओटीपोटात किंवा मांडीचा फुगवटा दिसल्यानंतर किंवा कोणत्याही प्रकारची अस्वस्थता असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. हर्निया टाळण्यासाठी वजन उचलणे सावधगिरीने केले पाहिजे.”
व्यायाम सुरू करताना दररोज वॉर्मअपचे व्यायामप्रकार केले पाहिजेत असं डॉ. निकमही सुचवतात. तसेच “खूप जास्त वजन उचलू नयेत. तीव्र वेदना जाणवत असेल तर व्यायाम बंद करा.” असं ते सांगतात.
हर्नियाच्या रुग्णांनी कोणता आहार घ्यावा?
हर्निया होण्याचा धोका टाळण्यासाठी आहारात बदल करणं गरजेचं आहे. वजन नियंत्रणात ठेवल्यास हर्नियाचा धोका टाळता येऊ शकतो.
हर्नियाचा त्रास असणाऱ्या रुग्णांनी आहाराची कोणती पथ्यं पाळावीत असा प्रश्न आम्ही मुंबईतल्या झायनोव्हा शाल्बी रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या आहारतज्ज्ञ जिनल पटेल यांना विचारला.
त्या म्हणाल्या, “अशा रुग्णांनी मद्यपान आणि धूम्रपान बंद केले पाहिजे. कारण त्यामुळे पोटातील उती कमकुवत होत असतात. हर्नियाचा त्रास असणाऱ्या लोकांनी फळं, संपूर्ण धान्य, सुकामेवा, बिया आणि तंतूमय पदार्थ म्हणजे फायबर्स असलेले पदार्थ आहारात जास्त घ्यावेत.
अशा लोकांनी पोट काठोकाठ भरेल, ताण येईल असे जेवण करू नये. आपल्या जेवणाची विभागणी लहान भागात करुन अन्नाचं सेवन करता येईल.
हर्नियाच्या रुग्णांनी अतिमसालेदार आणि आम्लयुक्त पदार्थ टाळावेत. भरपूर पाणी प्यावं. द्रव पदार्थ पोटात जातील याची काळजी घ्यावी. बद्धकोष्ठता टाळून पचन सुधारेल याकडे लक्ष द्यावे.”
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











