रक्ताचा कॅन्सर टाळण्यासाठी काय करावं? कारणं, लक्षणं आणि उपचार, जाणून घ्या सर्वकाही

फोटो स्रोत, Getty Images
- Author, ओंकार करंबेळकर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
कर्करोग म्हणजेच कॅन्सर हा शब्द ऐकला की त्यापाठोपाठ एकप्रकारची भीती, हळहळ आणि काळजी समोर येते. आता पुढे काय होणार या साशंक भावनेनं मनात घर केलं जातं. कर्करोग शरीरात आघात करत असतो तसं भीती आणि काळजी मनावरही आघात करत असते.
परंतु अशा स्थितीत आपली, कुटुंबीयांची काळजी कशी घ्यायची याची माहिती असणं आवश्यक आहे. शारीरिक, आर्थिक मानसिक संकटातून मार्ग काढण्यासाठी या आजाराची माहिती असणं गरजेचं आहे. सप्टेंबर महिना हा रक्ताच्या कर्करोगासाठी जागरुकता निर्माण करण्यासाठी पाळला जातो. या लेखात आपण रक्ताच्या कर्करोगाची सर्व माहिती आणि उपचार याबद्दल जाणून घेऊ.
रक्ताच्या कर्करोगाचे दोन मुख्य प्रकार आहेत. ल्युकेमिया आणि लिम्फोमा हे ते दोन प्रकार आहेत. ल्युकेमियाचे टीसेल, बी सेल, एन के सेल असे उपप्रकार आहेत. लिम्फोमा आणि मयेलोमास हे इतर प्रकार आहेत.
ल्युकेमिया म्हणजे काय?
ल्यूकेमिया हा एक प्रकारचा ब्लड कॅन्सर आहे. ज्यात व्हाईट ब्लड सेल्स म्हणजेच पांढऱ्या रक्तपेशी प्रभावित होतात. ब्लड कॅन्सर कोणालाही होऊ शकतो.
ब्लड कॅन्सर होताच कर्करोगाच्या पेशी शरीरात रक्त न बनवण्यात अडथळा आणतात. त्यामुळे शरीराला रक्ताची कमतरता भासते. तसेच ल्युकेमिया हा अस्थिमज्जा (bone marrow), वर हल्ला करतो.
लिम्फोमा म्हणजे?
लिम्फोमा कॅन्सर सर्वांत आधी रोगप्रतिकार क्षमतेच्या लिम्फोसाइट पेशींमध्ये पसरतो. या पेशीच संसर्गाशी लढत असतात आणि शरीराची रोगप्रतिकार क्षमता मजबूत करतात. या पेशी लिम्फ नोड्स, बोन मॅरो, स्प्लीन आणि थायमसमध्ये उपस्थित असतात. त्यावरच या कर्करोगाचा परिणाम होतो.

फोटो स्रोत, Getty Images
ल्युकेमिया आणि लिम्फोमाची लक्षणं
ल्युकेमिया आणि लिम्फोफाची लक्षणं आता पाहू. या लक्षणांबद्दल बीबीसी मराठीला तळेगाव येथील टीजीएच ऑन्को-लाइफ कॅन्सरचे सेंटर क्लिनिकल हेमॅटोलॉजिस्ट डॉ. सारंग वाघमारे यांनी माहिती दिली. त्यांनी दिलेली लक्षणांची माहिती पुढीलप्रमाणे
ल्युकेमियाची लक्षणं
- थकवा येणे : सतत थकवा येणे व अशक्तपणा जाणवणे
- जखम आणि रक्तस्राव: जखम भरुन यायला वेळ लागणे व जखम झाल्यास अधिक रक्तस्राव होणे.
- संक्रमण होणे : वारंवार, गंभीर किंवा दीर्घकाळ टिकणारे संक्रमण
- ताप: खूप ताप येणे किंवा थंडी वाजून येणे
- वजन कमी: अचानक वजन कमी होणे
- सुजलेल्या लिम्फ नोड्स: मान, काखेत किंवा मांडीवर सूज आढळून येणे
- दम लागणे: शारीरिक हालचाली दरम्यान दम लागणे
- त्वचेतील बदल: त्वचेवर लहान लाल ठिपके किंवा पुरळ,डाग दिसून येतात.
- त्वचेचा रंग बदलणे: त्वचेवर फिकट रंग दिसून येणे
लिम्फोमाची लक्षणं
- लिम्फ नोड्समध्ये सूज येणं
- खोकला आणि श्वास घेण्यासाठी त्रास होणं किंवा श्वास गुदमरणं
- ताप
- रात्री झोपल्यावर जास्त घाम येणं
- थकवा आणि अचानक वजन कमी होणं
- खाज आणि जळजळ होणं


रक्ताच्या कर्करोगाबद्दल मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटल येथे कार्यरत असणारे कर्करोग तज्ज्ञ डॉ. अतुल नारायणकर यांनी अधिक माहिती दिली.
ते म्हणाले, “ब्लड कॅन्सर असल्यास तुम्हाला खोकला येऊ शकतो किंवा छातीत दुखू शकते. याचे कारण म्हणजे फुफ्फुसे किंवा बरगड्यांच्या मधील जागेत (Spleen) असामान्य रक्तपेशी तयार होणे होय. जर तुमच्या अंगावर विचित्र पुरळ येत असतील, खाज सुटत असेल, जखमा होत असतील आणि त्यातून रक्तस्त्रावही होत असेल, तर हे ब्लड कॅन्सरशी निगडित लक्षण आहे. भूक न लागणे किंवा मळमळ होणे हे देखील ब्लड कॅन्सरचे लक्षण आहे. सतत अशक्तपणा आणि थकवा ही ब्लड कॅन्सरची लक्षणे आहेत. वारंवार आजारी पडणे किंवा संसर्गास सहज बळी पडणे, अचानक वजन कमी होणे ही देखील महत्त्वाची लक्षणं आहेत.”

फोटो स्रोत, Getty Images
ल्युकेमिया आणि लिम्फोमाची कारणे काय असू शकतात?
ल्युकेमिया आणि लिम्फोमाची नेमकी कारणे प्रमाणात अज्ञात आहेत, परंतु अनेक घटकांमुळे या आजारांची जोखीम वाढते.
अनुवांशिक घटक - अनुवांशिक बदलांमुळे ल्युकेमिया आणि लिम्फोमाचा धोका वाढू शकतो.काही अनुवांशिक विकार, जसे की डाऊन सिंड्रोम.
पर्यावरणीय घटक
रसायने: पेट्रोलमध्ये आढळणाऱ्या आणि रासायनिक उद्योगात वापरल्याजाणाऱ्या बेंझिनचा संपर्क काही प्रकारच्या ल्युकेमियाशी संबंधितआहे. अग्निशामक फोम AFFF मध्ये परफ्लुओरो आल्किल आणि पॉलीफ्लुरो आल्किल पदार्थ (PFAS) हे ल्युकेमियासाठी एक धोकादायक घटक ठरत आहेत.
रेडिएशन: विकिरणांच्या उच्च पातळीच्या संपर्कात येणे, जसे की अणुभट्टी दुर्घटनेमुळे, काही प्रकारच्या ल्युकेमियाचा धोका वाढू शकतो.
व्हायरल किंवा बॅक्टेरियाचे संक्रमण काही व्हायरस आणि जीवाणू, जसे की मानवी टी-लिम्फोट्रॉपिक व्हायरस (HTLV), ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस (HIV), एपस्टाईन-बॅर व्हायरस (EBV), हिपॅटायटीस सी आणि हेलिकोबॅक्टर पायलोरी, ल्युकेमिया आणि लिम्फोमाशी संबंधित आहेत.
कर्करोग उपचार इतर कर्करोगांसाठी करण्यात आलेली केमोथेरपी आणि रेडिएशनथेरपी हे ल्युकेमियाचा धोका वाढवू शकतात. धूम्रपान, सिगारेटमुळेही ल्युकेमियाचा धोका वाढतो.

फोटो स्रोत, Getty Images
ल्युकेमिया आणि लिम्फोमाचे निदान कोणत्या चाचण्यांनी होतं?
रक्त गणना चाचणी
पांढऱ्या रक्त पेशी, लाल रक्तपेशी आणि प्लेटलेट्सची असामान्य पातळी तपासण्यासाठी संपूर्ण रक्त गणना (CBC) चाचणी केली जाते. ल्युकेमियाच्या प्रकाराची पुष्टी करण्यासाठी बोन मॅरो बायोप्सी आणि फ्लोसाइटोमेट्री वापरली जाते.
लिम्फोमा
इम्युनोहिस्टोकेमिस्ट्रीसह सूक्ष्मदर्शकाखाली ऊती तपासण्यासाठी डॉक्टर लिम्फ नोड किंवा अस्थिमज्जेची बायोप्सी करतात.
एक्स-रे, सीटीकिंवा पीईटी स्कॅन सारख्या इमेजिंग चाचण्या देखील रोगाच्या स्टेजिंगसाठी सुजलेल्या लिम्फ नोड्सची तपासणी करतात. रक्त तपासणी उच्च पांढऱ्या रक्त पेशींची संख्या दर्शवते, जे लिम्फोमाचे लक्षण असू शकते.
ल्युकेमिया आणि लिम्फोमावर उपचार कसे केले जातात?
कर्करोगाचा प्रकार आणि त्याच्या टप्प्यावर त्याचे उपचार अवलंबून असतात.
ल्युकेमिया आणि लिम्फोमासाठी सर्वात सामान्य उपचार:
केमोथेरपी- ही कर्करोगाच्या पेशी मारण्यासाठी ठराविक औषधांचा वापर करते.
केमोथेरपी रेडिएशन थेरपीशी जोडली जाते, ती कर्करोगाच्या पेशींना मारून गाठ कमी करण्यासाठी उच्च दर्जाच्या रेडिएशनचा वापर करते.
स्टेम सेल- स्टेम सेल प्रत्यारोपणाने निरोगी पेशीं प्रत्यारोपित केल्या जातात.
टार्गेटेड थेरपी - ही विशिष्ट कर्करोगाच्या पेशी किंवा त्यांची वैशिष्ट्ये शोधण्यासाठी वापरली जाते.
इम्युनोथेरपी, ज्यामध्ये एक औषध समाविष्ट आहे, कर्करोगाच्या प्रकार आणि टप्प्यावर अवलंबून असते.
डॉ. सारंग वाघमारे सांगतात, “सीएआर टी-सेल थेरपी ही रुग्णाचे निरोगी रक्त आणि रोगप्रतिकारक शक्तीचे रक्षण करते. कोणत्याही प्रकारच्या रक्त कर्करोगाच्या पेशी नष्ट करू शकते.
TirabrutinibA अत्यंत निवडक इनहिबिटर जो सध्या जपान, दक्षिणकोरिया आणि तैवानमध्ये R/R PCNSL च्या उपचारांसाठी मंजूर करण्यात आला आहे.
"युएस मध्ये मोनोथेरपी म्हणून आणि मेथोट्रेक्सेटच्या संयोजनाचा वापर तपासण्यासाठी फेज II चा अभ्यास सुरू आहे. ACU-0943A STING agonist Aculeus Therapeutics द्वारेविकसित केले आहे जे या वर्षाच्या शेवटी AML च्या उपचारांसाठी क्लिनिकल विकासात प्रवेश करेल अशी अपेक्षा आहे," डॉ. वाघमारे सांगतात.
काही गुंतागुंतीच्या स्थिती
ल्युकेमिया आणि लिम्फोमामुळे काही गुंतागुंतीच्या स्थिती निर्माण होऊ शकतात. यामध्ये पुढील स्थितींचा समावेश आहे.
बोन मॅरो फेल्युअर- यात लिम्फोमा अस्थिमज्जावर परिणाम करू शकतो. त्यामुळे लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्त पेशी किंवा प्लेटलेट्सची कमतरता भासू शकते. यामुळे थकवा, अशक्तपणा, दम लागणे, रक्तस्राव, जखम आणि संसर्गाचा धोका वाढू शकतो.
न्युरोलॉजिकल गुंतागुंत- लिम्फोमा आणि ल्युकेमिया हे मज्जासंस्थेवर परिणाम करू शकतात. यामुळे चेतना नष्ट होते अथवा कमी होणे, इंट्राक्रॅनियल रक्तस्राव किंवा इस्केमिक स्ट्रोक होऊ शकतो. कर्करोगाच्या उपचारांमुळे वंध्यत्वासारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते, असंही डॉ. सारंग वाघमारे सांगतात. कर्करोगाचे निदान झाल्यास नैराश्याचा धोका वाढू शकतो.
ट्यूमर लिसिस सिंड्रोम- जेव्हा कॅन्सर थेरपी एकाच वेळी मोठ्या प्रमाणात ट्यूमर पेशी नष्ट करते.तेव्हा असे होण्याची शक्यता असते.
कॅन्सर टाळण्यासाठी काय करायचं?
आरोग्य चांगलं कसं राखावं आणि कर्करोगाला दूर कसं ठेवावं याबद्दल नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स येथे हिमॅटोलॉजी कन्सल्टंट आणि हिमॅटो ऑन्कोलॉजी प्रोग्रॅम कोऑर्डिनेटर ट्रान्सप्लांट म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉ. पुनीत जैन यांनी विस्तृत माहिती दिली.

फोटो स्रोत, Getty Images
आहार-
बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "कर्करोगाला रोखण्यासाठी विशिष्ट असा खात्रीशीर मार्ग नाही, परंतु आपल्या शरीराची नैसर्गिक प्रतिकार क्षमता बळकट करुन आपणं चांगलं आयुष्य जगू शकतो. त्यासाठी आहार, जीवनशैली, मानसिक स्थितीत सुधारणा असे बदल करू शकतो."
डॉ. जैन पुढे सांगतात, "तुमच्या आहारात फळे, भाज्या, धान्यं, प्रथिनं यांचा समावेश असला पाहिजे. बेरीवर्गातली फळं, गडद हिरव्या रंगाच्या पालेभाज्या तसेच सुकामेवा अशा पदार्थांतून अँटिऑक्सिडंटस मिळतात. हे अँटिऑक्सिडंट्स पेशींचं रक्षण करतात. याबरोबरच तुम्हाला चांगल्या प्रकारचे स्निग्ध पदार्थ घेता येतील. त्यामुळे इन्फ्लमेशन कमी होईल आणि प्रतिकारक्षमतेला बळ मिळेल."
डॉ. पुनीत जैन आहाराच्या सल्ल्यामध्ये प्रक्रिया केलेले अन्न, लाल मांस आणि साखरयुक्त पेयं टाळण्याचा सल्ला देतात. हे पदार्थ टाळल्यामुळे कॅन्सर होण्याचा तसेच इतर आजार होण्याचा धोका टळू शकतो, असं ते सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
व्यायाम-
शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहाणं, हालचाल करत राहाणं हे केवळ वजन आटोक्यात राहाण्यासाठी नाही तर प्रतिकारक्षमता बळकट राखण्यासाठीही उपयोगी आहे असं डॉ. पुनीत जैन सांगतात.
चालणं, योगासनं, पोहणं, नियमित खेळणं यामुळे रक्ताभिसरण चांगलं होतं, इन्फ्लमेशन कमी होतं, शरीरात ऊर्जा टिकून राहाते, मूड चांगला राहतो, मानसिक आरोग्य सुधारतं असं ते सांगतात.
तणाव नको-
डॉ. पुनीत जैन यांनी आहार आणि व्यायामासह महत्त्वाचा सल्ला सुचवला आहे तो म्हणजे तणाव दूर करण्याचा. अतिताणामुळे प्रतिकारक्षमतेवर परिणाम होतो आणि एकूणच आरोग्यावर विपरित परिणाम होतो असं ते सांगतात.
ध्यानधारणा, मित्रांबरोबर, कुटुंबीयांबरोबर वेळ घालवणं, छंद जोपासणं अशा गोष्टींनी ताण आटोक्यात आणता येतो असं ते म्हणतात. शारीरिक आरोग्याइतकं मानसिक आरोग्यही तितकंच महत्त्वाचं आहे असं ते सांगतात.
आता तातडीनं या गोष्टी करता येतील
डॉ. अतुल नारायणकरही कर्करोग टाळण्यासाठी काही उपाय सुचवतात. ते म्हणतात,
- कर्करोग टाळण्यासाठी योग्य जीवनशैली बाळगा.
- धुम्रपान, मद्यपान व तंबाखू यासारखी व्यसने टाळा
- सकस आहार घ्या, भरपूर हंगामी फळे आणि भाज्यांचे सेवन करा. प्रक्रिया केलेले मांस खाल्ल्याने विशिष्ट प्रकारच्या कर्करोगाचा धोका किंचित वाढू शकतो.
- वजन नियंत्रणात ठेवा. यामुळे प्रकारच्या कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो. यामध्ये स्तन, प्रोस्टेट, फुफ्फुस, आतडी आणि मूत्रपिंड या कर्करोगांचा समावेश आहे. शारीरीक दृष्ट्या सक्रिय जीवनशैली बाळगा.
कर्करोगाविरोधातील लढाई यशस्वी केलेल्यांनी संतुलित आहार घ्यावा. दररोज सक्रिय राहावे. नियमित तपासण्या कराव्यात. जीवनाची गुणवत्ता चांगली ठेवण्याची ही त्रिसूत्री आहे.
कर्करोगाच्या उपचारासाठी केमोथेरपी, रेडिएशन दिले जाते. त्याच्या होणाऱ्या दुष्परिणामांचा आणि आहाराचा जवळचा संबंध असतो.
संतुलित आहारामुळे मळमळ, थकवा आणि कमी होणारे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते. पचण्यास हलका आहार, थोडं परंतु पौष्टिक खाणे आणि भरपूर पाणी पिणे यातून दुष्परिणामांची तीव्रता कमी होऊ शकते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











