इस्लाम स्वीकारून लग्न करणाऱ्या भारतीय महिलेला पाकिस्तानात 'अटक', शीख समुदायाकडून काय आली प्रतिक्रिया?

फोटो स्रोत, Ahmad Pasha
- Author, एहतेशाम शामी
- Role, बीबीसी उर्दूसाठी, इस्लामाबादमधून
पाकिस्तानातील पंजाब प्रांताचे अल्पसंख्यांक मंत्री सरदार रमेश सिंग अरोरा यांनी पुष्टी केली आहे की प्रवासी (टुरिस्ट) व्हिसाद्वारे पाकिस्तानात येऊन लग्न करणारी भारतीय महिला सरबजीत कौर आणि त्यांचे पाकिस्तानी पती नासिर हुसैन यांना अटक करण्यात आली आहे.
रमेश सिंग अरोरा यांच्यानुसार, 48 वर्षांच्या सरबजीत कौर यांना गुरुवारी (8 जानेवारी) वाघा सीमेमार्गे भारतात पाठवलं जाऊ शकतं. तर त्यांच्या पाकिस्तानी पतीच्या विरोधात कारवाई केली जाईल.
सरजबीत कौर, 4 नोव्हेंबरला शीख यात्रेकरूंसोबत पाकिस्तानात गेल्या होत्या. त्यांच्या व्हिसाची कालमर्यादा 13 नोव्हेंबरपर्यंत होती. मात्र त्या भारतात परत आल्या नाहीत.
सरबजीत यांनी पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील शेखूपुराचे रहिवासी नासिर हुसैन यांच्याशी लग्न केलं होतं. त्यानंतर त्या पाकिस्तानातच राहत होत्या.
रमेश सिंग अरोरा यांनी बीबीसीला सांगितलं की 4 जानेवारीला ननकाना साहिबमधील पहरे वाली गावातील सरबजीत कौर आणि नासिर हुसैन यांच्या वास्तव्याबद्दल माहिती मिळाल्यावर गुप्तचर विभागाच्या टीमनं तात्काळ कारवाई केली.
त्यांचं म्हणणं होतं की या कारवाईदरम्यान सरबजीत कौर यांना त्यांच्या पाकिस्तानी पतीसह अटक करण्यात आली. आता त्यांना ननकाना साहिब पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. सध्या हे दोघेजण ननकाना साहिब पोलीस ठाण्याच्या अटकेत आहेत.
रमेश सिंग अरोरा यांच्यानुसार, पोलीस आणि इंटेलिजन्स ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी मिळून या प्रकरणाचा तपास केला.
यंत्रणांच्या तपासातून समोर आलं की सरबजीत कौर आणि नासिर हुसैन यांचा 2016 मध्ये टिकटॉकवर परिचय झाला होता. या दोघांनी अनेकवेळा व्हिसासाठी अर्जदेखील केले होते. मात्र कायदेशीर कारणांमुळे त्यांना व्हिसा मिळाला नव्हता.
अटक नाही तर प्रत्यर्पणाची तयारी : रमेश सिंग अरोरा
मंत्री रमेश सिंग यांनी बीबीसीच्या प्रतिनिधी शुमैला खान यांच्याशी झालेल्या संवादात, भर देत सांगितलं की सरबजीत कौर यांना औपचारिकपणे अटक करण्यात आलेली नाही. तर त्यांनी व्हिसाच्या अटींचं उल्लंघन करत ठरलेल्या कालावधीपेक्षा अधिक काळ देशात वास्तव्य केल्याबद्दल कारवाई करण्यात आली आहे.
ते म्हणाले, "त्या धार्मिक व्हिसाद्वारे आल्या होत्या. त्यांनी व्हिसाच्या अटींनुसारच देशात राहायला हवं होतं. पहिल्या दिवसापासूनच माझी स्पष्ट भूमिका होती."
ते पुढे म्हणाले की पाकिस्तानच्या कायद्याअंतर्गत, व्हिसाचा कालावधी संपल्यानंतर देखील देशात राहणाऱ्या लोकांचे प्रत्यर्पण केलं जातं. या प्रकरणात देखील अगदी असंच केलं जातं आहे.
मंत्री रमेश सिंग म्हणाले की सरबजीत कौर यांना हद्दपार करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इव्हॅक्यूई ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड (ईटीपीबी)च्या ताब्यात दिलं जाईल. हे बोर्ड धार्मिक स्थळांची देखरेख करतं आणि यात्रेकरूंशी निगडीत गोष्टींमध्ये ताळमेळ साधण्याचं काम करतं.
मंत्री असंही म्हणाले की सरकारनं पाकिस्तान सिख गुरुद्वारा प्रबंधक कमिटी (पीएसजीपीसी)कडे चिंता व्यक्त केली आहे आणि त्यांना विनंती केली आहे की भविष्यात येणाऱ्या पर्यटकांनी (प्रवासी) व्हिसाच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं.

फोटो स्रोत, AFP via Getty Images
ते म्हणाले, "जर यात्रेकरू त्यांच्या तीर्थयात्रेच्या ठरलेल्या नियमांचं पालन करत नसतील, तर यामुळे संपूर्ण प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. नानकाना साहिब सारख्या स्थळांशी खोलवर धार्मिक भावना जोडलेल्या आहेत. कोणत्याही प्रकारच्या गैरवापरामुळे फक्त अधिकारीच नाही तर खऱ्या यात्रेकरूंसाठी देखील गुंतागुंत निर्माण होते."
ते पुढे म्हणाले की नासिर हुसैन यांच्याबाबत सध्या मर्यादित माहिती उपलब्ध आहे. त्यांनी पुष्टी केली की नासिर यांची चौकशी केली जाते आहे. पुढील कारवाई तपासातून समोर येणाऱ्या निष्कर्षांवर अवलंबून असेल.
अधिकाऱ्यांनी सांगितलं की नासिर यांचा मोबाईल फोन फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. जेणेकरून एखाद्या कायद्याचं उल्लंघन झालं आहे की नाही, याची माहिती मिळू शकेल.
रमेश सिंग म्हणाले, "सध्या आमचं लक्ष सरबजीत कौर यांची हद्दपारी पूर्ण करण्यावर आहे."
भारतात परत पाठवण्याची मागणी करणारी याचिका
पाकिस्तानातील पंजाब मानवाधिकारचे माजी संसदीय सचिव दास महिंदर पाल सिंग यांनी सरबजीत कौर यांना भारतात परत पाठवण्याबाबत लाहोरच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
ही याचिका वकील अली चंगेजी संधू यांच्यामार्फत दाखल करण्यात आली आहे.

फोटो स्रोत, Ravinder Singh Robin/BBC
सोमवारी (5 जानेवारी) सरबजीत यांच्या हद्दपारीच्या बातम्यांवर व्हीडिओ वक्तव्य जारी करत महिंदर पाल सिंग म्हणाले, "स्वत:च्या इच्छेनं लग्न करणं हा सरबजीत कौर यांचा वैयक्तिक निर्णय होता. मात्र त्यांनी धार्मिक व्हिसाचा गैरवापर केला. त्यामुळे जगभरातील शीख समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या."
ते पुढे म्हणाले, "त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे. मात्र त्यांनी धार्मिक व्हिसाचा वापर या उद्देशासाठी करायला नको होता."
काय आहे संपूर्ण प्रकरण?
रमेश अरोरा म्हणाले की 4 नोव्हेंबर 2025 ला नासिर, गुरुद्वारा जन्मस्थान, ननकाना साहिबला गेले. तिथून ते सरबजीत कौर यांच्यासोबत त्यांच्या पूर्वजांच्या भागात म्हणजे फारूकाबाद, शेखूपुऱ्याकडे निघून गेले.
तपासातून असं ठरवण्यात आलं आहे की सरबजीत कौर यांना हद्दपार करण्यासाठी इव्हॅक्यूई ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड (ईटीपीबी)च्या ताब्यात दिलं जाईल.
हे बोर्ड पाकिस्तानातील कायद्यानुसार सरबजीत कौर यांना परत पाठवेल. तर त्यांच्या पतीची चौकशी मात्र सुरू राहील. त्यांच्या मोबाईल फोनची फॉरेन्सिक तपासणीदेखील केली जाईल. त्यानंतरच पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाईल.
नोव्हेंबर महिन्यात सरबजीत कौर यांनी न्यायालयात अपील केल्यानंतर लाहोर उच्च न्यायालयानं पोलिसांना त्यांना त्रास न देण्याचा आदेश दिला होता.
सरबजीत यांचे वकील अहमद हसन पाशा यांच्यानुसार, पंजाब पोलिसांनी 8 नोव्हेंबरला सरबजीत आणि नासिर यांचा शोध घेण्यासाठी त्यांच्या घरी धाड टाकली होती. तसंच त्यांच्यावर हे लग्न मोडण्यासाठी दबाव टाकला जात होता.
अहमद हसन पाशा यांच्यानुसार, या अपीलमध्ये न्यायालयाला विनंती करण्यात आली होती की पोलिसांनी सरबजीत कौर आणि नासिर हुसैन यांच्या वैवाहिक आयुष्यात हस्तक्षेप करू नये.

फोटो स्रोत, Police
सुनावणीनंतर लाहोर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जस्टिस फारूक हैदर यांनी पंजाब पोलिसांना, सरबजीत यांना त्रास न देण्याचा आदेश दिला होता. यासंदर्भात पंजाबच्या पोलीस महानिरिक्षकांना (आयजी) आदेश जारी करण्यात आला होता.
अर्थात शेखूपुरा पोलिसांचे प्रवक्ते राणा युनूस यांनी बीबीसीला सांगितलं की पोलिसांनी कोणत्याही भारतीय महिलेला किंवा त्यांच्या पाकिस्तानी पतीला त्रास दिलेला नाही. त्यांचं म्हणणं होतं की 'यासंदर्भात जे आरोप केले जात आहेत, ते वस्तुस्थितीच्या उलट आहेत. पोलिसांचा त्याच्याशी काहीही संबंध नाही.'
ते म्हणाले की "हे प्रकरण संवेदनशील आहे. त्यामुळेच अनेक यंत्रणांकडून त्याचा तपास केला जातो आहे आणि जो काही निर्णय होईल तो पाकिस्तानातील कायद्यांनुसारच घेतला जाईल."
सरबजीत यांच्या वकिलांचं म्हणणं आहे की त्यांनी 15 नोव्हेंबरला दोघांना त्यांच्या चेंबरमध्ये बोलावलं होतं. जेणेकरून अधिकाऱ्यांसमोर त्यांना त्यांचे जबाब नोंदवता यावेत. मात्र आश्वासन देऊनही दोघं पती-पत्नी आले नाहीत. नासिर हुसैन यांचा मोबाईल फोनदेखील बंद झाला होता.
इस्लाम स्वीकारला, मग लग्न केलं
सरबजीत कौर 4 नोव्हेंबरला शीख यात्रेकरूंच्या गटाबरोबर पाकिस्तानात आल्या होत्या. त्या दुसऱ्या दिवशी गुरुनानक यांच्या जन्मदिनानिमित्त नानकाना साहिबला जाणार होत्या.
मात्र 7 नोव्हेंबरला या महिलेकडून शेखूपुराच्या न्यायदंडाधिकाऱ्यांकडे (ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट) नोंदवण्यात आलेल्या जबाबानुसार, त्यांनी पाकिस्तानात आल्यानंतर त्यांच्या इच्छेनं इस्लामचा स्वीकार केला. नंतर नासिर हुसैन नावाच्या पाकिस्तानी नागरिकानं त्यांनी लग्न केलं होतं.
या जबाबात त्यांचे वकील अहमद हसन पाशा यांचं म्हणणं आहे की या लग्नाची नोंदणी शेखूपुराशी संबंधित युनियन कौन्सिलमध्ये करण्यात आली होती.
शेखूपुराचे न्यायदडांधिकारी मुहम्मद खालिद महमूद वडैच यांच्या न्यायालयात जी कागदपत्रं जमा करण्यात आली होती, त्यानुसार सरबजीत कौर यांनी कारी हाफिज रिझवान भट्टी यांच्यासमोर इस्लाम स्वीकारला होता. त्यानंतर त्यांचं 'नूर' हे इस्लामी नाव ठेवण्यात आलं होतं.
त्यांना 5 नोव्हेंबरला इस्लाम धर्म स्वीकारल्याचं प्रमाणपत्र जारी करण्यात आलं होतं.
न्यायालयात, विवाहाशी संबंधित जे कागदपत्र (निकाहनामा) सादर करण्यात आलं होतं, त्यानुसार, नासिर हुसैन यांचं वय 43 वर्षे आहे. तर वधूचं वय साडे 48 वर्षे आहे. या कागदपत्रानुसार, 10,000 रुपयांची हक मेहर निश्चित करण्यात आली होती.
यात असंही नमूद आलं आहे की नासिर हुसैन आधीपासूनच विवाहित आहेत. त्यांना दुसऱ्या लग्नाच्या परवानगीची आवश्यकता नाही.
भारतीय महिलेकडून न्यायालयात एक तक्रारदेखील दाखल करण्यात आली आहे. यात पोलिसांवर धमकी दिल्याचे आणि खोटा खटला दाखल केल्याचे आरोप करण्यात आले आहेत.
त्यांनी न्यायदंडाधिकारी मुहम्मद खालिद महमूद वडैच यांच्या न्यायालयात पाकिस्तानच्या दंड संहिता 200 अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या प्रकरणात म्हटलं आहे की 'त्यांनी स्वत:च्या इच्छेनं नासिर हुसैन यांच्याशी लग्न केलं.'
त्यांनी म्हटलं आहे की "माझं कोणीही अपहरण केलेलं नाही. मी माझ्या इच्छेनं लग्न केलं आहे. मी माझ्या आई-वडिलांच्या घरून फक्त तीन कपड्यांमध्ये आले आहे. मी माझ्यासोबत कोणतीही वस्तू आणलेली नाही."
या जबाबात त्यांनी दावा केला आहे की "मी लग्न केल्यामुळे पोलीस खूप नाराज झाले आहेत आणि 5 नोव्हेंबरच्या रात्री नऊ वाजता पोलीस अधिकारी जबरदस्तीनं आमच्या घरात शिरले. अधिकाऱ्यांनी सांगितलं की आमच्यासोबत चला. मात्र मी नकार दिल्यावर ते रागावले."
त्यांचं म्हणणं आहे की "मी आरडाओरडा केल्यावर शेजारीदेखील आले." सरबजीत यांनी न्यायालयाला विनंती केली होती की त्यांना आणि त्यांच्या पतीला पोलिस संरक्षण देण्यात यावं.
सरबजीत कौर आणि नासिर हुसैन यांचा 9 वर्षांपासून परिचय
सरबजीत या पंजाबातील कपूरथल जिल्ह्यातील आहेत. कपूरथला पोलिसांचं म्हणणं आहे की या प्रकरणाचा तपास सुरू आहे. सरबजीत जवळपास 2 हजार शीख यात्रेकरूंसोबत आल्या होत्या. हा जत्था 10 दिवसांच्या दौऱ्यानंतर 13 नोव्हेंबरला भारतात परतला होता. मात्र सरबजीत कौर त्यांच्यासोबत परत आल्या नाहीत.
बीबीसी पंजाबीनुसार, नोव्हेंबरमध्ये कपूरथलाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक धीरेंद्र वर्मा यांनी सांगितलं की माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता. इस्लाम धर्म स्वीकारल्याबद्दल आणि लग्न करण्याबद्दल कोणत्याही प्रकारची माहिती असल्याचा वर्मा यांनी इन्कार केला होता.
ते म्हणाले होते की प्रसारमाध्यमांमधून अशा बातम्या आल्या आहेत. मात्र पोलिसांकडे याबाबत कोणतेही ठोस पुरावे किंवा माहिती नाही.
बीबीसी पंजाबीचे सहयोगी प्रतिनिधी रविंदर सिंग रॉबिन यांच्याशी बोलताना शिरोमणि गुरुद्वारा प्रबंधक समितीचे सचिव प्रताप सिंग म्हणाले होते की समितीनं या प्रकरणात तपास केल्यानंतर निर्णय घेतला आहे की यापुढे कोणत्याही एकट्या महिलेला अशा गटांबरोबर पाठवलं जाणार नाही.
भारतातील प्रसारमाध्यमांमध्ये छापून आलेल्या बातम्यांनुसार, सरबजीत यांचा घटस्फोट झाला आहे. तसंच त्यांना आधीच्या लग्नातून दोन मुलं आहे. वृत्तांनुसार, सरबजीत यांचे पती जवळपास तीन दशकांपासून इंग्लंडमध्ये वास्तव्यास आहेत.

फोटो स्रोत, PRADEEP SHARMA/BBC
कपूरथला जिल्ह्यातील तलवंडी चौधरिया या गावातील एसएचओ निर्मल सिंग यांच्यानुसार, त्यांना या प्रकरणाबद्दल गावच्या सरपंचांकडून माहित झालं होतं.
तर पाकिस्तानातील वकील अहमद हसन पाशा यांचं म्हणणं आहे की नासिर हुसैन पेशानं जमीनदार आहेत.
त्यांनी बीबीसीला एक व्हीडिओ शेअर केला. त्यात सरबजीत असं म्हणत असल्याचं ऐकू येतं की त्यांचा भारतात घटस्फोट झाला आहे. त्यांनी स्वेच्छेनं इस्लाम स्वीकारून नासिर हुसैन यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.
सरबजीत यांचा दावा आहे की त्या नासिर हुसैन यांना 9 वर्षांपासून ओळखतात.
वकील अहमद हसन पाशा यांनी सांगितलं की सरबजीत आणि नासिर यांचा इन्स्टाग्रामवर संपर्क होता. या दोघांनी 6 महिन्यांपूर्वी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
वकिलांनी सांगितलं की हे दोघेही त्यांच्याकडे कायदेशीर मदत मागण्यासाठी आले होते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











