बुरखा न घातल्याने पत्नी आणि मुलींची हत्या करून त्यांना घरात पुरल्याचा आरोप; संपूर्ण प्रकरण काय?

घरातील खड्डा

फोटो स्रोत, ALTAF

फोटो कॅप्शन, पोलिसांचे म्हणणे आहे की फारुखने त्याच्या पत्नी आणि मुलांची हत्या केली आणि त्यांचे मृतदेह त्याच्या घरात पुरले.
    • Author, दिलनवाझ पाशा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

दारावरचा जाडजूड पडदा सरकावून आम्ही घरात प्रवेश करताच तिथं एक मोठा खड्डा दिसतो.

एका खोलीत जुना बेड आहे. दुसऱ्या खोलीत दोन खाटा आहेत, ज्यावर पांघरूणं पडली आहेत. एका कोपऱ्यात ठेवलेला गॅस स्टोव्ह आणि त्याच्या शेजारी ठेवलेली भांडी सांगतात की ही खोली या घराचं स्वयंपाक घरदेखील होती.

या घराच्या दोन्ही बाजूला उंच इमारती आहेत आणि मधोमध एक मोकळं अंगण, तिथं असलेली एक मातीची एक चूल अनेक दिवसांपासून थंड पडून आहे.

याच घरातून 16 डिसेंबर रोजी शामली पोलिसांनी शौचालयासमोर बनवलेल्या खड्ड्यातून तीन मृतदेह ताब्यात घेतले होते.

ताहिरा आणि तिच्या दोन अल्पवयीन मुलींच्या हत्येच्या आरोपांखाली पोलिसांनी तिचाच नवरा फारुख याला अटक केली आहे.

उत्तर प्रदेशच्या शामली जिल्ह्यातील कांधला भागातील मुस्लिमबहुल गढी दौलत हे गाव या हत्याकांडानंतर चर्चेत आलं आहे.

आजूबाजूच्या लोकांशी बोलून, अटक केलेल्या फारुखच्या जबाबांवरून आणि या हत्येचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर हे स्पष्ट होतं की लग्नानंतर ताहिराचं आयुष्य या घराच्या चार भिंतींमध्येच बंदिस्त झालं होतं.

ती कधीही घराबाहेर पडत नव्हती, तसेच नातेवाईक, शेजारी किंवा ओळखीच्या लोकांसोबतही ती कोणत्या संपर्कात नव्हती.

शामलीचे पोलीस अधीक्षक नरेंद्र प्रताप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान आरोपी फारूकनं सांगितलं की, बुरखा न घालता सार्वजनिक वाहतुकीनं आपल्या माहेरी गेल्यामुळे तो आपल्या पत्नीवर रागावला होता आणि हेच या हत्येमागचं मुख्य कारण आहे.

फारूकची आई असगारी यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या मुलाला कोणीही त्याच्या पत्नीला पाहिलेलं किंवा तिच्याशी बोललेलं आवडत नव्हतं. तो तिला कडक पडद्याआड ठेवत असे.

ताहिरा आणि फारुख यांना तीन मुली आणि दोन मुलं अशी पाच अपत्यं होती. थोरली मुलगी चौदा-पंधरा वर्षांची होती. त्यांची पाच मुलं कधी शाळा किंवा मदरशात गेली नाहीत.

नेमकं काय घडलं?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फारूकनं आपली पत्नी ताहिरा हिच्यासह 9-10 डिसेंबरच्या मध्यरात्री मोठी मुलगी आणि सर्वात लहान मुलगी यांची हत्या केली आणि नंतर ते मृतदेह घरात खोदलेल्या खड्ड्यात पुरले.

मोठी मुलगी चौदा-पंधरा वर्षांची होती आणि धाकटी मुलगी सहा-सात वर्षांची होती.

पोलीस अधीक्षक नरेंद्र प्रताप सिंह सांगतात की, "फारुखनं आपल्या जबाबात म्हटलं आहे की तो आपली पत्नी बुरखा न घालताच सार्वजनिक वाहतुकीनं प्रवास करत माहेरी गेल्यामुळे तिच्यावर नाराज होता आणि म्हणूनच त्यानं आपल्या पत्नीची हत्या करण्याचा निर्णय घेतला होता."

हयात असलेली फारूख तीन मुलं आणि फारूकच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास एक महिन्यापूर्वी ताहिरा आणि फारुख यांच्यात कशावरून तरी वाद झाला होता आणि ताहिरा अचानक बुरखा न घालता आपल्या माहेरी निघून गेली होती.

तिचं लग्न झाल्यानंतर, घरात प्रवेश केल्यापासून ताहिरानं घराचा उंबरठा ओलांडून सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याची ही पहिलीच वेळ होती.

पोलीस अधीक्षक नरेंद्र प्रताप यांनी सांगितलं की, 'आरोपीच्या चौकशीदरम्यान हे समोर आलं की ताहिरा एकटीनं कधीही घराबाहेर पडली नव्हती. कधी कधी आई-वडिलांच्या घरी जायची तेव्हा फारुख मजूर असूनही कार बुक करत असे. ती कधी बसमध्येही बसली नव्हती. पण त्या दिवशी वाद झाल्यानंतर ती बुरखा न घालता घरातून निघून गेली होती."

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फारूकला पत्नी ताहिराचं हे पाऊल अस्वीकार्य वाटलं.

पोलीस अधीक्षक नरेंद्र प्रताप सिंह

फोटो स्रोत, ALTAF

फोटो कॅप्शन, पोलीस अधीक्षक नरेंद्र प्रताप सिंह

नरेंद्र प्रताप सिंह सांगतात, "त्यानं एक संपूर्ण योजना आखली, बेकायदेशीर शस्त्रं खरेदी केली, कामगारांना घरात खड्डा खणायला लावला आणि मग ताहिराला हत्येच्या उद्देशानं तिच्या माहेरावरून परत बोलावलं."

पोलीस अधीक्षकांच्या म्हणण्यानुसार, "फारूकनं तपासादरम्यान सांगितलं आहे की, त्याचा हेतू केवळ पत्नीला ठार मारण्याचा होता. मुली जाग्या झाल्या होत्या, म्हणून त्यांनाही ठार मारलं."

पोलीस तपासातून समोर आलं आहे की, आरोपींनं तिघींचे मृतदेह एका कापडात गुंडाळून खड्ड्यात ठेवले आणि नंतर त्यांच्यावर माती ओतून दोन दिवसांनी त्यावर फरशी बसवली.

फारूकच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा तिन्ही मुलांनी त्यांची आई आणि दोन बहिणींबद्दल विचारलं तेव्हा फारूकनं त्यांना सांगितलं की, त्यांनी दुसरी खोली भाड्यानं घेतली आहे आणि त्या तिथेच राहत आहेत.

बारा वर्षांखालील या तीन मुलांनी दोन-तीन दिवस हॉटेलमधून जेवण आणून खाल्लं.

मग त्यांनी घराशेजारीच दुसऱ्या घरात राहणाऱ्या आपल्या आजी-आजोबांना आपली आई आणि बहीण घरी नसल्याची माहिती दिली.

फारूकची आई असघारी सांगतात, "मुलांनी मला सांगितलं की, आई आणि बहिणीला अब्बानं कुठंतरी पाठवलं होतं. आम्ही त्याला विचारलं तर त्यानं सांगितलं की, त्या एका भाड्याच्या खोलीत राहत आहेत. पण जेव्हा त्यानं कपडे जाळले तेव्हा आम्हाला संशय आला."

फारुख पोलिसांसोबत

फोटो स्रोत, ALTAF

फोटो कॅप्शन, पोलिसांच्या म्हणण्यानुसार, फारुखने (पांढऱ्या पोशाखात) आपल्या पत्नीची बुरखा न घातल्यामुळे हत्या केली.

आपल्या नाती आणि सून बेपत्ता झाल्यानंतर फारूकचे वडील दाऊद स्थानिक पोलीस ठाण्यात गेले आणि त्यांनी तिथं आपल्या मुलाबद्दल संशय व्यक्त केला.

पोलीस अधीक्षक नरेंद्र प्रताप सिंह यांच्या मते, "फारुख यांनी आधी दिशाभूल केली, पण नंतर त्यानंच दिलेल्या माहितीवरून 16 डिसेंबरच्या संध्याकाळी तिन्ही मृतदेह घरातील खड्ड्यातून बाहेर काढण्यात आले आणि घटनेत वापरण्यात आलेलं शस्त्र जप्त करण्यात आलं. खोलीतून रिकामे बॉक्सही जप्त करण्यात आले."

पोलिसांना आतापर्यंतच्या तपासात या घटनेत इतर कोणाचाही सहभाग असल्याचे कोणतेही संकेत मिळालेले नाहीत.

मात्र, हॉटेलमध्ये ब्रेड मेकर म्हणून काम करणाऱ्या आणि सामान्य जीवन जगणाऱ्या फारूकवर कोणाचा प्रभाव होता, याचा तपास पोलीस करत आहेत.

नरेंद्र प्रताप सिंह म्हणतात, "आम्हाला कोणावरही संशय नाही, पण फारुख कट्टरपंथी कसा झाला आणि त्यानं असा विचार कसा केला याचा आम्ही नक्कीच तपास करत आहोत. त्यानी केवळ पत्नीलाच नव्हे तर मुलींनाही त्यांच्या हक्कांपासून वंचित केलं."

फारूकनं आपल्या पत्नी किंवा मुलांचे आधार कार्ड बनवले नव्हते किंवा कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेतला नव्हता, असंही तपासादरम्यान पोलिसांना आढळून आलं.

फारूकची आई असघारी सांगतात, "मोठ्या मुलीचं आधार कार्ड ती अगदी लहान असताना बनवलं होतं, तेही आम्ही बनवलं होतं, फारुखनं कधीच कुणासाठी कागदपत्रं बनवली नाहीत."

ताहिराला घराबाहेर कधी कोणी पाहिले नाही

फारूकची आई असघारी यांच्या म्हणण्यानुसार, त्यांची सून ताहिरा कधीही घराबाहेर पडत नव्हती, ती कोणत्याही दु:खाच्या किंवा आनंदाच्या प्रसंगी उपस्थित राहत नव्हती.

"माझ्या मुलाला त्याच्या पत्नीला कुणी पाहिलेलं आवडत नव्हतं, आम्ही काहीही बोललो नाही कारण त्याचं स्वतःचं आयुष्य होतं. सुनेलाही यात काही अडचण नव्हती, तिनं कधी तक्रार केली नाही."

फारूकच्या नात्यातल्या एका बहिणीनं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सहा-सात वर्षांत तिनं एकदाही ताहिराचा चेहरा पाहिला नव्हता.

आणखी एका शेजाऱ्यानं सांगितलं की त्यांनी ताहिराला घराच्या बाहेर, उंबरठ्यावर, गच्चीवर किंवा बाहेर रस्त्यावर कधीही पाहिलं नव्हतं.

ते सांगतात, "आम्ही तिच्या मृत्यूनंतर तिचा मृतदेहच पाहिला. गावातील प्रत्येक मुलाला विचारा, ताहिराला घराबाहेर कधीच कुणी पाहिलं नसेल. तिनं कधीही घर सोडलं नाही, तिची मुलं बाहेर यायची आणि इतर मुलांबरोबर खेळायची."

ताहिरा

फोटो स्रोत, PARAS JAIN

फोटो कॅप्शन, ताहिराचा एकमात्र फोटो

ताहिरा अतिशय कडक बुरख्यात राहायची. पण मुस्लीमबहुल असलेल्या या गावात ही काही सामान्य परंपरा नाही. इथं अनेक महिला बुरखा न घालता सहजपणे घराबाहेर येत होत्या आणि जात होत्या.

चादरीनं अंग झाकलेल्या दोन तरून मुली सांगतात की, "तुम्ही बुरखा घालावा की नाही हा तुमचा निर्णय आहे, आम्ही तर शेतात जाऊन कामही करतो."

मात्र, इथे महाविद्यालयात जाणाऱ्या मुलींची संख्या खूपच कमी आहे.

ताहिराचा एक शेजारी म्हणतो, "इथे थोडा मागासलेपणा आहे, पण आता मुलं शाळेत जायला लागली आहेत. नवीन वयाच्या मुलीही शिकत आहेत."

पश्चिम उत्तर प्रदेशातील मुस्लिमबहुल भागात मुस्लिम महिलांसाठी बुरखा घालणं ही एक सामान्य परंपरा आहे.

महिलांनी पडद्याच्या आत राहायच्या प्रश्नावर फारूकची एक शेजारी म्हणतात, "हा वैयक्तिक पसंतीचा प्रश्न आहे. महिला गावाबाहेर जाताना बुरखा घालतात. मात्र, तो घालण्यावर कोणतंही बंधन नाही. अनेक महिला बुरखा घालत नाहीत. त्या शेतात काम करायलाही जातात. माझ्या स्वतःच्या कुटुंबात महिला बुरखा घालत नाहीत."

पोलिसांना ताहिराचा एक बाजूनं काढलेला फोटो सापडला आहे जो गावातच एका लग्नादरम्यान घेण्यात आला होता.

या एकमेव फोटोव्यतिरिक्त पोलिसांना ताहिराच्या अस्तित्वाचा कोणताही कागदोपत्री पुरावा सापडलेला नाही.

गावातील मुली

फोटो स्रोत, ALTAF

फोटो कॅप्शन, फारूकच्या आईचं म्हणणं आहे की, त्यांची सून कधीही घराबाहेर पडली नाही. त्यांचंही फारुखच्या घरी येणं जाणं नव्हतं.

ताहिराची स्वत:ची मुलंही पूर्ण विश्वासानं या फोटोत आपल्या आईला ओळखू शकत नाहीत.

एक मुलगी आणि एक मुलगा म्हणतात की ही त्यांची आई नाही, तर एक मुलगा आग्रहानं सांगतो की हा त्याच्याच आईचा फोटो आहे.

आपल्या सुनेचा चेहरा आठवणाऱ्या असगरी सांगतात की हा फोटो ताहिराचाच आहे आणि ती एकदा शेजारच्या एका लग्नाला गेली होती तेव्हा तो काढला होता.

ताहिरा 35-36 वर्षांची होती. लहान वयातच तिचं लग्न झालं आणि नंतर तिचं संपूर्ण आयुष्य दोन खोल्यांच्या घरापुरतंच मर्यादित राहिलं.

असगरीच्या मते, "तिच्यासाठी आणि मुलांसाठी कपडेही त्यांचा मुलगाच आणायचा, तिनं कधी बाजार पाहिला नाही."

मुलांना शाळेत जायची इच्छा आहे...

पत्नी ताहिरा आणि दोन अल्पवयीन मुलींची हत्या केल्यानंतर फारुख आता तुरुंगात आहे. त्यांच्या पश्चात दोन मुलं आणि एक मुलगी असा परिवार आहे.

फारूकची मुलं कधी शाळा किंवा मदरशाला गेली नाहीत. पण त्यांना वाचण्याची इच्छा असते.

मुलगी आपल्या आईसाठी प्रार्थना करत आहे आणि जपमाळ फिरवत कल्मा वाचत आहे.

शाळेत जाण्याच्या प्रश्नावर ती मान हलवत हो म्हणते, अचानक तिचा उदास चेहरा उजळून जातो. मग पुन्हा आईचा उल्लेख होतो आणि तिचा चेहरा पुन्हा कोमेजतो.

ताहिराची मुलं

फोटो स्रोत, ALTAF

फोटो कॅप्शन, फारूकची मुलं कधी शाळा किंवा मदरशाला गेली नाहीत.

आजीच्या मांडीवर बसलेली ही मुलगी म्हणते, "मला अभ्यास करावासा वाटतो, अम्मीची इच्छा होती की मी शाळेत जावं पण अब्बूंनी मला कधीच जाऊ दिलं नाही. एकदा काकांनी माझं अॅडमिशन घ्यायला सांगितलं होतं, तेव्हा मला खूप छान वाटलं होतं."

फारूकचा एक अल्पवयीन मुलगा कामावर जातो. दुसरा घरीच राहतो.

मुलांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा जेव्हा त्यांची आई त्यांना शाळेत पाठविण्याविषयी बोलायची, तेव्हा घरात वाद व्हायचे.

मुलांना शाळेत पाठविण्यासाठी आता प्रशासनाला पुढाकार घ्यायचा आहे.

पोलीस अधीक्षक नरेंद्र प्रताप सिंह म्हणतात, "आम्ही मुलांना प्रवेश मिळवून देण्यासाठी आणि त्यांना सरकारी सुविधांचा लाभ देण्याचा प्रयत्न करू. या प्रकरणावर जिल्हाधिकाऱ्यांशीही चर्चा झाली आहे. बाल कल्याण समितीला या दिशेनं पावलं उचलण्याची विनंती केली जाईल."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)