नवरा 2 दिवस ज्या सोफ्यावर बसत होता, त्याच सोफ्यात सापडला बायकोचा मृतदेह

- Author, प्रियांका जगताप
- Role, बीबीसी मराठी
घरात एकट्याच असलेल्या तरुणीची हत्या करुन तिचा मृतदेह सोफा कम बेडमध्ये लपवून ठेवण्यात आला होता. दोन दिवस नवरा आपल्या बायकोचा शोध घेत होता. पण त्याला हे ठाऊकच नव्हतं की तो ज्या बेडवर झोपत होता, बसत होता त्याच खाली त्याच्या बायकोचा मृतदेह आहे.
पुण्यातील हडपसर भागातील फुरसुंगी परिसरात ही घटना घडली आहे. या महिलेचे पती कामानिमित्त गावी गेले असताना आरोपीने तिची हत्या करून मृतदेह लपवून ठेवला. अद्याप आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत असं पोलिसांनी बीबीसी मराठीला सांगितलं.
स्वप्नाली उमेश पवार असं खून झालेल्या 24 वर्षीय महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नाली यांचे पती उमेश ड्रायव्हर आहेत. ते शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास प्रवासी घेऊन बीडला गेले होते.
कामावरून घरी परतले तेव्हा घराला बाहेरून कडी होती. कडी उघडल्यानंतर पत्नी घरात दिसली नाही. त्यामुळे त्यांनी पत्नीचा शोध घेतला.
मात्र, तिचा काही ठावठिकाणा लागला नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उमेश यांच्या तक्रारीच्या आधारे खून आणि दरोड्याच्या आरोपाखाली एफआयआर दाखल करण्यात आली आहे.


नक्की प्रकरण काय?
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला स्वप्नाली आणि उमेश या दोघांचेही आधी एक लग्नं झालेलं आहे. चार वर्षांपूर्वी या दोघांनी एकमेकांशी दुसरं लग्नं केलं होतं. ते हडपसर भागातील फुरसुंगीतील हुंडेकर वस्तीत राहायचे.
उमेश पवार कॅब चालक म्हणून काम करतात. 7 तारखेला ते कामानिमित्त बीडला गेले होते. त्याच दिवशी त्यांचे स्वप्नाली यांच्याशी शेवटचे बोलणे झाले होते. त्यानंतर त्यांचा त्यांच्या बायकोशी संपर्क होऊ शकला नाही.
दुसऱ्या दिवशी स्वप्नाली यांना ते वारंवार फोन करत होते पण त्यांचा फोन सतत बंद येत होता.
काळजीत पडलेल्या उमेश यांनी त्यांच्या एका मित्राला फोन करून आपल्या घरी जाऊन स्वप्नाली यांची माहिती घेण्यास सांगितले. मात्र त्यांचा मित्र घरी गेल्यानंतर स्वप्नाली घरी नसल्याचे आढळून आले.

फोटो स्रोत, punepolice.gov.in
त्यामुळे 8 तारखेला बायकोच्या चिंतेत असलेले उमेश बीडवरून घरी परत आले. घरी आले तेव्हा दाराला बाहेरून कडी लावली होती.
त्यानंतर त्यांनी मित्र आणि कुटुंबीय यांच्याकडे चौकशी केली. परंतु स्वप्नाली यांच्याबद्दल कुठेच काही माहिती मिळाली नाही. उमेश यांनी आपल्या पत्नीचा शोध सुरूच ठेवला होता.
मृतदेह कसा सापडला?
फुरसुंगीच्या पोलीस निरीक्षक मंगला मोढवे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले की, "दोन दिवसांपासून उमेश त्यांच्या पत्नीचा शोध घेत होते. त्यानंतर 9 तारखेला घरातील काही दागिने चोरीला गेले आहेत का याची घरात शोधाशोध सुरू केली."
"त्यावेळी सोफा-कम-बेड असलेल्या पलंगाच्या कप्प्यात स्वप्नाली त्यांना बेशुद्ध अवस्थेत सापडल्या. आपल्या पत्नीला अशा अवस्थेत पाहून त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी तपासासाठी एक पथक उमेश यांच्या घरी पाठवले. तेव्हा स्वप्नाली यांचा मृत्यू झाला असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांचा मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आला," मोढवे यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
दरम्यान, स्वप्नाली पवार यांचा मृत्यू कशामुळे झाला असावा याबद्दल देखील पोलीस निरीक्षक मंगला मोढवे यांनी खुलासा केला आहे.
"पोस्टमार्टम रिपोर्टनुसार गळा दाबून स्वप्नाली यांचा हत्या करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या मानेवर नखांनी ओरखडल्याच्या जखमाही आढळून आल्या आहेत," असं त्या म्हणाल्या.
"ज्या पलंगावर उमेश पवार झोपले होते त्याच पलंगाखाली त्यांच्या पत्नीचा मृतदेह कोणीतरी लपवला होता हे खुप दुर्दैवी आहे," असंही पुढे त्या म्हणाल्या.
स्वप्नाली यांच्या हत्येमागे कोणाचा हात?
7 तारखेला झालेल्या या हत्याकांडामागे पवार कुटुंबीयांच्या ओळखीतल्याच व्यक्तीचा हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
बीबीसी मराठीशी बोलताना मंगला मोढवे म्हणाल्या की, "संशयित आरोपी घरी भांडण झाल्याचं सांगून अनेकदा स्वप्नाली यांच्या घरी राहायला येत असे. शेजारी सगळ्यांना ते उमेश यांचे काका असल्याचे सांगायचे, परंतु संशयित आरोपी त्यांचा नातेवाईक नसल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे."
"स्वप्नाली यांचे पती उमेश पवार यांना दारूचं व्यसन असल्याने ते जास्त घरी नसायचे. शिवाय ते कॅब ड्रायव्हर असल्याने देखील जास्त वेळ घराबाहेर असायचे. त्यामुळे संशयित आरोपी बरेच दिवस त्यांच्याच घरी राहत असे," असंही त्या पुढे म्हणाल्या आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
स्वप्नाली यांच्या हत्येमागे नक्की काय कारण असू शकतं असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.
"खात्रीशीरपणे आत्ता काहीही सांगणं कठीण आहे. संशयित आरोपीला अटक केल्यानंतरच सगळं चित्र स्पष्ट होईल," असंही पुढे त्या म्हणाल्या.
मोढवे म्हणाल्या की, "त्या व्यक्तीचं नाव आम्ही आत्ताच सांगू शकत नाही. कारण आमची दोन पथकं अजूनही त्याच्या मागावर आहोत. बीड जिल्ह्यातील गेवराईमध्ये आमची शोध मोहीम चालू आहे. स्वप्नालीचा मृतदेह सापडल्यापासून त्या व्यक्तीचा फोन बंद असल्यामुळे तपासात अडचणी येत आहेत. परंतु लवकरात लवकर तो आमच्या ताब्यात असेल."
दरम्यान, उमेश आणि स्वप्नाली यांच्या लग्नाला जवळपास चार वर्षे झाली होती. ते एका भाड्याच्या घरात राहत होते, खून झाला त्यावेळी त्यांच्या इमारतीमध्ये सुरक्षा रक्षक किंवा सीसीटीव्ही देखील नव्हता. पोलिसांनी सांगितले की त्या इमारतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तपास चालू आहे.
या प्रकरणात अजून काय काय खुलासे होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











