उत्तर प्रदेशात शिक्षिका 'गुड टच-बॅड टच' शिकवत असताना, समोर आला 'लाजिरवाणा प्रकार'

पोलिसांनी आरोपीला अटक केली.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पोलिसांनी आरोपीला अटक केली.
    • Author, सय्यद मोजेझ इमाम
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

मुलांच्या लैंगिक शोषणाबद्दल गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं चर्चा होत आहे. फक्त भारतातच नाही, तर देशभरात हा एक चिंतेचा विषय आहे. उत्तर प्रदेशातील शाळेत विद्यार्थिनींना याच प्रकाराला तोंड द्यावं लागत असल्याचा धक्कादायक प्रकार घडला. देशात आणि जगभरात मुलांच्या लैंगिक शोषणासंदर्भात काय स्थिती आहे, याचा आढावा घेणारा उत्तर प्रदेशातील घटनेचा हा ग्राऊंड रिपोर्ट...

उत्तर प्रदेशातील ललितपूर जिल्ह्यातील एका सरकारी शाळेतील शिक्षक मित्रावर 'बॅड टच' चा आरोप झाला आहे.

या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक करून कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. मात्र आरोपीनं सर्व आरोप फेटाळले आहेत.

ही घटना तालबेहट पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या मधपुरा गावात घडली.

येथे एका सरकारी शाळेतील विद्यार्थिनींनी शिक्षिकेला सांगितलं की, शिक्षक मित्र त्यांना चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करतात.

यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. या घटनेचा तपास करण्यासाठी शिक्षण विभागानं एक जिल्हास्तरीय समिती स्थापन केली आहे.

शाळेच्या मुख्याधापिका सुषमा रिछारिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही विद्यार्थिनींनी या प्रकारचा चुकीचा स्पर्श केल्या जात असल्याची तक्रार शिक्षिकेकडे केली होती.

शाळेतील शिक्षिका विद्यार्थिनींना गुड टच आणि बॅड टचबद्दल माहिती देत असताना हा प्रकार समोर आला होता.

लाल रेष
लाल रेष

आरोपी शिक्षक मित्राविरोधात विद्यार्थिनींनी केलेल्या तक्रारीचं गांभीर्य लक्षात घेत शाळेच्या मुख्याध्यापिकांनी 18 ऑक्टोबरला याची तक्रार गट शिक्षण विभागाकडे केली होती.

यानंतर 22 ऑक्टोबरला अतिरिक्त शिक्षण अधिकारी त्यांच्या टीमसह या प्रकाराचा तपास करण्यासाठी शाळेत आले होते. त्यावेळी गावचे सरपंच देखील उपस्थित होते.

शिक्षण अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासातही विद्यार्थिनींकडून आधी दिलेली माहिती पुन्हा देण्यात आली. त्यात कोणताही बदल नव्हता.

तक्रार आणि अटक

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

रूप सिंह हे त्या गावचे सरपंच आहेत. त्यांनी बीबीसीला सांगितलं की, आरोपी शिक्षकानं हे सर्व आरोप फेटाळले आहेत.

शाळेच्या मुख्याध्यापिका सुषमा रिछारिया यांनी बीबीसीला सांगितलं की, त्या 2016 पासून शाळेत शिकवत आहेत. काही दिवसांपूर्वी त्या वैद्यकीय कारणासाठी रजेवर होत्या. त्यानंतर 14 ऑक्टोबरला त्या शाळेत पुन्हा रुजू झाल्यावर त्यांच्याजवळ ही तक्रार करण्यात आली.

मात्र मुख्याध्यापिकेचं म्हणणं आहे की, याआधी या प्रकारची तक्रार त्यांच्याकडे करण्यात आली नव्हती.

शिक्षण विभागातील अधिकारी, समर सिंह गौर यांनी बीबीसीशी बोलताना या घटनेला दुजोरा दिला. ते म्हणाले की, या घटनेचा तपास करण्यासाठी शिक्षण विभागानं जिल्हास्तरीय समिती स्थापन केली आहे.

गावच्या सरपंचांचं म्हणणं आहे की, तपासादरम्यान आरोपीनं सांगितलं होतं की, ते विद्यार्थिनींचे लाड करत होते. मात्र विद्यार्थिनींनी चुकीचा स्पर्श केल्याचा आरोप केला.

हा आरोप झाल्यानंतर 22 ऑक्टोबरला शिक्षण विभागानं आरोपी शिक्षक मित्राला शाळेतून काढून गट (ब्लॉक) स्तरावरील केंद्रात नियुक्त केलं.

या प्रकरणात जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे आणि या समितीकडून तपास अहवाल अपेक्षित आहे.

पोलीस अधीक्षक (सीओ) कुलदीप कुमार यांनी माहिती दिली की, आरोपीला अटक केल्यानंतर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

तालबेहटचे पोलिस अधीक्षक (सीओ) कुलदीप कुमार यांनी सांगितलं की आरोपीला अटक करण्यात आली आहे
फोटो कॅप्शन, तालबेहटचे पोलीस अधीक्षक (सीओ) कुलदीप कुमार यांनी सांगितलं की आरोपीला अटक करण्यात आली आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गावातील सरकारी शाळेतील अनेक विद्यार्थिनींनी शाळेतील शिक्षक मित्रानं चुकीच्या पद्धतीनं स्पर्श केल्याची तक्रार गावकऱ्यांकडे केली होती.

या घटनेमुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी एकत्र येत शाळेतील शिक्षक मित्राविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

तालबेहटचे पोलीस अधीक्षक कुलदीप कुमार यांनी पत्रकारांना सागितलं, "तक्रार झाल्यानंतर संबंधित कलमांअतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आणि आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली. आता या प्रकरणात पुढील तपास सुरू आहे."

मनोज कुमार या पालकांनी आरोप केला की, शाळेत विद्यार्थिनींना अश्लील व्हीडिओ दाखवले जात आहेत आणि त्यांच्याशी गैरप्रकार केला जात आहे.

शाळेतील सर्व कर्मचारी बदलण्यात यावेत, अशी मागणी मनोज कुमार यांनी केली आहे.

गावच्या सरपंचांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिक्षक मित्र 2006 पासून शाळेत कार्यरत आहे. आतापर्यंत त्यांच्याविरोधात याप्रकारची तक्रार करण्यात आलेली नव्हती.

गुड टच - बॅड टच काय असतं?

विद्यार्थ्यांचं शाळेत जे लैंगिक शोषण होतं, त्याबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी सरकारही मोहीम राबवत आहे.

शम्सी अकबर लखनौच्या यूनिटी कॉलेजमध्ये मानसशास्त्राच्या सहाय्यक प्राध्यापक आहेत. त्यांनी बीबीसीला सांगितलं, "आपल्या मुलांना गुड टच-बॅड टचबद्दल सांगणं आवश्यक आहे. फक्त सांगणंच नाही, तर त्यांना याबद्दल समजाऊन सांगणही महत्त्वाचं आहे."

प्राध्यापक शम्सी म्हणाल्या, "जर कोणी पाठीवर किंवा डोक्यावर थोपटलं तर तो गुड टच असतो. मात्र जर कोणी कपड्यांनी झाकलेल्या शरीराच्या इतर भागांना चुकीच्या पद्धतीनं स्पर्श केला तर तो बॅड टच ठरतो."

"हल्लीच्या काळात मुलांना हे सांगितलं पाहिजे की, अशा स्थितीत त्यांनी नाही म्हणावं, नकार द्यावा किंवा तिथून पळून जावं आणि आपल्या पालकांना त्यांच्यासोबत झालेल्या घटनेबद्दल सांगावं."

पोलिसांनी आरोपीला अटक केली.

शम्मी पुढे म्हणाल्या, "मुलांचं एक सुरक्षित वर्तुळ असतं. यात सर्वसाधारणपणे आई-वडील, सख्खे भाऊ-बहीण आणि आजी-आजोबांचा समावेश असतो. याशिवाय एक असुरक्षित वर्तुळ असतं. त्यात आईवडिलांचे मित्र, घरातील नोकरचाकर, वाहनचालक, शिक्षक आणि इतर नातेवाईक असू शकतात."

केरळ स्टेट लीगल सर्व्हिस ऑथोरिटीनं उच्च न्यायालयात एक अहवाल सादर केला आहे. त्यामध्ये गुड टच आणि बॅड टच हे शब्द हटवून सेफ, सीक्रेट टच किंवा अनसेफ टच किंवा अनावश्यक टच या शब्दांचा वापर करण्याची शिफारस केली आहे.

मुलांना माहिती देणं गरजेचं

श्रीलंकेतील चाइल्ड हेल्थ जर्नलमध्ये एक भारतीय अभ्यास छापण्यात आला आहे. उत्तर भारतातील 200 मुलांवर हा अभ्यास करण्यात आला होता.

हा अभ्यास रिमझिम त्यागी आणि शारदा विद्यापीठाचे बिंदू नायर यांनी केला आहे.

या अहवालानुसार, जेव्हा विद्यार्थ्यांना गुड टच-बॅड टचबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा असं आढळलं की 61 टक्के विद्यार्थ्यांना याबद्दल थोडंफार माहित होतं. मात्र 39 टक्के विद्यार्थ्यांना याबद्दल अजिबात माहित नव्हतं.

गुड टच-बॅड टच ची माहिती असणाऱ्या 61 टक्के विद्यार्थ्यांची त्यांना असलेली माहिती आणि त्यांच्यातील जागरुकता याच्या आधारे विभागणी करण्यात आली.

18 वर्षांखालील वयात लैंगिक शोषणाची सर्वाधिक प्रकरणं आफ्रिकेत नोंदवली जातात

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 18 वर्षांखालील वयात लैंगिक शोषणाची सर्वाधिक प्रकरणं आफ्रिकेत नोंदवली जातात

यामध्ये माहितीच्या आधारे 20 टक्के विद्यार्थी अती उत्तम (एक्सलंट), 63 टक्के विद्यार्थी गुड आणि 17 टक्के विद्यार्थ्यांना सरासरी पातळीवरचं मानण्यात आलं.

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन मध्ये छापून आलेल्या एका अहवालानुसार, 2009 मध्ये 22 देशांमध्ये करण्यात आलेल्या 65 अभ्यासांनुसार 7.9 टक्के मुलं आणि 19.7 टक्के मुली वयाच्या 18 व्या वर्षाआधी लैंगिक शोषणाचे बळी ठरतात.

याचं सर्वाधिक प्रमाण आफ्रिकेत 34.4 टक्के इतकं आहे. तर युरोपात 9.2 टक्के, अमेरिकेत 10.1 टक्के आणि आशियात 23.9 टक्के प्रमाण आहे.

भारतातील लैंगिक शोषण

भारतात मुलांचं लैंगिक शोषणापासून संरक्षण करण्यासाठी पोक्सो कायदा बनवण्यात आला आहे. या कायद्यात लैंगिक शोषणासाठी वेगळ्या तरतुदी करण्यात आल्या आहेत.

डिसेंबर 2023 मध्ये संसदेत एक प्रश्नाला उत्तर देताना महिला आणि बाल कल्याण मंत्र्यांनी सांगितलं होतं की मार्च 2023 पर्यंत पोक्सो अंतर्गंत नोंदवलेले 1,31,886 खटले न्यायालयात प्रलंबित आहेत.

राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड्स ब्युरो (NCRB)नुसार, 2021 मध्ये 53,874 गुन्हे नोंदवण्यात आले होते. यात उत्तर प्रदेशात 7,129, महाराष्ट्रात 6,200 आणि केरळमध्ये 6,070 गुन्हे नोंदवण्यात आले होते.

महिला आणि बाल कल्याण मंत्रालयानुसार, मार्च 2023 पर्यंत पोक्सो अंतर्गत 1,31,886 प्रकरणं न्यायालयात प्रलंबित आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, महिला आणि बाल कल्याण मंत्रालयानुसार, मार्च 2023 पर्यंत पोक्सो अंतर्गत 1,31,886 प्रकरणं न्यायालयात प्रलंबित आहेत.

2007 च्या महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाच्या सर्व्हे अहवालानुसार 1,25,000 लोकांशी बोलल्यानंतर समोर आलं आहे की, मुलांच्या लैंगिक शोषणाचं प्रमाण 53 टक्क्यांपर्यंत आहे. पीडितांमध्ये 20 टक्के मुलगे होते असं यात समोर आलं आहे. सर्व्हेनुसार लैंगिक शोषण करणारे बहुतांश लोक परिचयातील होते किंवा विश्वासातील आणि जबाबदार पदांवर असणारे होते.

पीआयबी नुसार, मे 2024 पर्यंत उच्च न्यायालयातून मिळालेल्या माहितीनुसार देशातील 30 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये 755 फास्ट ट्रॅक विशेष न्यायालयं काम करत आहेत. यामध्ये

410 न्यायालयं तर विशेषकरून पोक्सो न्यायालयं आहेत. या न्यायालयांनी 2,53,000 प्रकरणं निकाली काढण्यात आली आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)