'परीक्षेचे पेपर मिळवून देतो' या मोहात अडकवून घडलं होतं जळगाव सेक्स स्कँडल

- Author, रोहन नामजोशी
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
'जळगाव सेक्स स्कँडल' 1990 च्या दशकातल्या सगळ्यात खळबळजनक प्रकरणांपैकी एक होतं. केवळ महाराष्ट्रच नव्हे, संपूर्ण देश या प्रकरणाने हादरला होता.
जळगाव हे तेव्हा तसं मुख्य प्रवाहातल्या शहरांपैकी नसल्याने तिथलं सामाजिक वातावरण वेगळं होतं. त्यामुळे हे प्रकरण उघडकीस येईपर्यंत आणि दोषींना शिक्षा होईपर्यंत तपास अधिकारी आणि पीडित सगळ्यांना विविध पातळीवर झगडावं लागलं होतं.
जळगाव सेक्स स्कँडलच्या या संपूर्ण घटनाक्रमाचा उहापोह माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या 'मॅडम कमिश्नर' या आत्मचरित्रपर पुस्तकात केला आहे.
मीरा बोरवणकर यांचं महाराष्ट्रातील धडाडीच्या पोलीस अधिकारी म्हणून नाव घेतलं जातं.
जळगाव सेक्स स्कँडलचा तपास हा मीरा बोरवणकरांच्या कारकीर्दीतला अत्यंत महत्त्वाचा टप्पा होता. त्यांच्या पुस्तकातील 'अजित पवार आणि येरवाडा जमिनी'संदर्भातील प्रकरणाने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं होतं. या प्रकरणाची चर्चाही झाली. मात्र, याच पुस्तकात बोरवणकरांनी त्यांच्या कारकीर्दीतील इतरही मोठ्या घटनांचा उल्लेख केलाय.
याच पुस्तकात बोरवणकरांच्या नेतृत्वात तपास झालेल्या जळगाव सेक्स स्कँडलबद्दल स्वतंत्र प्रकरण आहे. महाराष्ट्राचं समाजमन ढवळून काढणारी अशी जळगाव सेक्स स्कँडलची घटना होती. या लेखातून आपण त्या प्रकरणाबद्दल आणि मीरा बोरवणकरांनी त्याबद्दल दिलेल्या माहितीबद्दल जाणून घेऊ.
थेट पोलीस महासंचालकांचा 'तो' फोन
1994 मध्ये मीरा बोरवणकर पुण्यात गुन्हे अन्वेषण विभागात कार्यरत होत्या. एकदा त्या कार्यालयात बसल्या असताना त्यांना तत्कालीन पोलीस महासंचालक शिवाजीराव बारवकर यांचा फोन आला. तेव्हा त्या रुढार्थाने कनिष्ठ पोलीस अधिकारी होत्या. त्यामुळे थेट महासंचालकांचाच फोन आल्यामुळे त्यांना आश्चर्याचा धक्का बसला.
बारवकर यांनी बोरवणकर यांना तातडीने जळगावला निघण्याचा आदेश दिला.
त्यावेळी बोरवणकर यांचा मुलगा लहान होता. त्या लहान मुलाला आणि एका मदतनीस यांना घेऊन त्यांनी तातडीने जळगावला जायचे आदेश दिले. पुढे एक वर्ष तिथे राहावं लागेल, याची त्यांना कल्पना नव्हती.

फोटो स्रोत, Meera Borwankar
जुलै 1994 मध्ये जळगावात मानवी तस्करी, बलात्कार आणि लैंगिक छळवणुकीचं एक रॅकेट उघडकीस आलं होतं. अनेक मुलींना, अगदी अल्पवयीन मुलींना ड्रग्स देऊन, त्यांचा छळ आणि बलात्कार करण्यात आला होता. हे कृत्य स्थानिक गुन्हेगार आणि राजकारण्यांनी केल्याचा संशय होता.
100 हून अधिक मुलींचा छळ केल्याचा तेव्हा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
ही बातमी तेव्हा वर्तमानपत्र आणि इतर माध्यमातून समोर आल्यामुळे जळगावचं वातावरण अक्षरश: ढवळून निघालं होतं.
तत्कालीन अतिरिक्त पोलीस महासंचालक अरविंद इनामदार हे या तपासाकडे बारीक लक्ष ठेवून होते.
दुसरीकडे, मीरा बोरवणकर यांच्या नेतृत्वात तपास करण्याचे आदेश पोलीस महासंचालक शिवाजीराव बारवकर दिले होते.
तपासाचे सुरुवातीचे दिवस
मीरा बोरवणकर जेव्हा जळगावात पोहोचल्या, तेव्हा शहरावर एक प्रकारची शोककळा पसरली होती.
महिला संघटनांचं जोरदार आंदोलन सुरू केलं होतं. महाराष्ट्र सरकारने महिला सनदी अधिकारी लीना मेहेंदळे, चंद्रा अय्यंगार आणि मीरा बोरवणकर यांची एक समिती तयार केली. प्रसारमाध्यमात आलेल्या बातम्यांमध्ये तथ्य असल्याचं या समितीने सांगितलं आणि एक एक करून पीडित महिला बोलण्यासाठी पुढे येऊ लागल्या.
या समितीच्या अध्यक्ष लीना मेहेंदळे यांच्याशी बीबीसी मराठीने संवाद साधला. त्यावेळी त्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर होत्या आणि त्यांची बदली नाशिकच्या विभागीय आयुक्त म्हणून पाठवण्यात आलं.
लीना मेहेंदळे सांगतात, “मी नाशिकमध्ये रुजू झाल्यावर जळगावला जाऊन सगळ्या परिस्थितीची पाहणी केली. तेव्हा नाशिकचे जिल्हाधिकारी अजय भूषण पांडे हेही एक चांगले अधिकारी होते. नंतर मीरा बोरवणकर आल्या आणि त्यांनी तपासाची सूत्रं हातात घेतली.
"ती एक सहा जणांची टोळी होती. अनेक महिला त्या छळवणुकीत अडकल्या होत्या. त्यामुळे या महिलांना आश्वस्त वाटेल, त्यांना दिलासा मिळेल हे पाहणं आमचं मुख्य काम होतं. त्यापैकी काहींना वाटत होतं की, प्रकरण उघडकीला आलं तरी चालेल, काहींना वाटत होतं की नाव उघडकीस येऊ नये, पण प्रकरण समोर आलं पाहिजे. काहींना वाटत होतं की आमचं नाव समोर येता कामा नये, मग प्रकरण उघडकीला नाही आलं तरी चालेल. त्यामुळे त्यांचा आत्मसन्मानाचा आदर करणं हेही आमच्यासमोरचं मुख्य काम होतं.”

तत्कालीन अतिरिक्त पोलीस महासंचालक अरविंद इनामदार सुद्धा जळगावात आले. त्यांनी तिथे नागरिक आणि पोलीस अधिकाऱ्यांबरोबर बैठका घेतल्या. मात्र, सातत्याने उठणाऱ्या अफवांमुळे पीडित महिला बोलण्यासाठी समोर येत नव्हत्या आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी फरार झाला होता.
त्या काळी जळगावात महिला पोलीस अधिकाऱ्यांचं प्रमाण अत्यल्प होतं. त्यामुळे अनेक पोलीस अधिकाऱ्यांना शेजारच्या जिल्ह्यातून बोलावण्यात आलं.
इनामदारांनी बोरवणकर यांना शहर सोडण्यास सांगितलं, कारण त्या शहराच्या ऐन मध्यभागी थांबल्या होत्या. त्यामुळे पीडित मुली आपली कहाणी सांगायला गेल्या की, आरोपींना ते लगेच कळत होतं. त्यामुळे मीरा बोरवणकर शहराच्या थोडं बाहेर राहण्यास गेल्या. त्या आणि त्यांचा एक वर्षाचा मुलगा तिथे राहू लागल्या. पण त्याचा खूप फायदा झाल्याचं त्या सांगतात.
तपासातले अडथळे, अडचणी आणि 'ते' पत्र
हळूहळू या प्रकरणातले धागेदोरे उलगडू लागले. बोरवणकर वेगळ्या बंगल्यात राहायला गेल्यावर त्यांच्याकडे पीडित मुली यायला लागल्या.
बोरवणकर त्यांच्या पुस्तकात लिहितात, “हळूहळू आमच्याकडे मुली येऊ लागल्या. त्यांच्यावरच्या छळाची गाथा सांगताना त्या रडत असत. त्या तासंतास माझ्या मुलाबरोबर खेळायच्या. मात्र, केस दाखल करायला नकार द्यायच्या. त्या आमच्याबरोबर जेवायच्या, काही वेळा हसायच्या, बहुतांश वेळा रडायच्या. त्यांची मानसिक स्थिती कायम अस्वस्थ असायची. काहीजणी शेवटी तक्रारी दाखल करायला तयार व्हायच्या, मात्र त्यांचे कुटुंब नकार द्यायचे. पालकांना त्यांच्या मुलींच्या लग्नाची चिंता त्यांच्या डोक्यात असायची. त्यामुळे पालक आमचं काहीही ऐकायचे नाहीत.
एकेदिवशी बोरवणकरांना जवळच्याच गावातल्या एका मुलीचं पत्र आलं. तिने लिहिलं की, तुम्हाला माझा नग्न फोटो आणि व्हीडिओ नक्कीच दिसेल. मात्र आता माझं लग्न झाल्यानं पोलिसांनी भेट देऊ नये, अशी तिने इच्छा व्यक्त केली. 'जर पोलिसांनी तिला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर मी आत्महत्या करेन,' अशी धमकी दिली. त्यामुळे आपण नाजूक वळणावरूनही जात असल्याचं बोरवणकरांच्या लक्षात आलं.
त्यानंतर पंडित सपकाळे, राजू तडवाई हे नगरसेवक आणि माजी आमदाराचा मुलगा संजय पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, या सगळ्या कारवाया होत असल्याचे पाहताच सर्व आरोपी पळू लागले. मुलींचे फोटो जाळू लागले. तरी शेवटी पोलिसांना दोन मुलींचे फोटो सापडले, त्यांचा ठावठिकाणा शोधला आणि त्यांच्याशी संपर्क साधला. या मुलींनी पोलिसांना त्यांच्यावर कसा अत्याचार झाला हे सांगितलं.
आरोपींच्या शोधासाठी विशेष पथकं स्थापन करण्यात आली. पोलिसांनी संपूर्ण जळगाव जिल्हा पिंजून काढला आणि आरोपींना शोधून काढलं. या रॅकेटचा म्होरक्या पंडित सपकाळे याला गुजरातेतून अटक करण्यात आली.
खोली नं 206, तिरुपती हॉटेल, जळगाव
परीक्षेचे पेपर मिळवून देतो या आमिषाने अनेक मुली या टोळीच्या जाळ्यात अडकल्याची माहिती मेहेंदळे यांनी दिली.
बोरवणकरांनी आत्मचरित्रात दिलेल्या माहितीनुसार, 'याशिवाय विद्यार्थिनींना जाळ्यात ओढण्यासाठी गँगमधील लोक जवळच्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचे. श्रीमंत, राजकीयदृष्ट्या सक्षम असणारी ही लोक तरुणींना लग्नाचं आमिष दाखवायचे. त्यानंतर ते मुलींशी शारीरिक संबंध ठेवायचे. त्याचं रेकॉर्डिंग करायचे. नंतर त्याचा वापर करून ब्लॅकमेल करायचे.'
'हे व्हीडिओ शेजारच्या जिल्ह्यात विकायचे असाही संशय त्यावेळी पोलिसांना आला होता. जळगावातील तिरुपती हॉटेलातील रुम नं 206 या कृत्यासाठी वापरली जात होती. या खोलीत एक कॅमेरा लावून ठेवत असत.'
'एकदा मुलगी जाळ्यात अडकली की, पीडितांच्या मित्रांशी सुद्धा लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं जायचं. पालकांना यातलं काही कळू नये यासाठी त्या बळी पडायच्या.'
'या सगळ्याला कंटाळून शेवटी तीन मुलींनी पोलिसांत तक्रार नोंदवली. कॉलेजमध्ये येऊन श्रीमंत आणि प्रभावशाली लोकांच्या ‘चार्म’ला त्या कशा बळी पडल्या याचं वर्णन त्यांनी केलं. त्याची जबरदस्त किंमत या मुलींना मोजावी लागली. हीच लोक शहरातील सर्व महत्त्वांच्या पदांवर होते.'
'एका कुटुंब झोपडीत राहत असताना देखील त्यांचं वीजेचं प्रचंड बिल आलं. कुटुंबातली बाई त्यात सुधारणा करायला गेली. त्यावेळी मुलगी घरात एकटी होती. हे पाहून दुसऱ्याने तिला फ्लॅटवर बोलावलं आणि तिच्यावर अत्याचार केला.'
'एका मुलीला तिच्या आईच्या ऑपरेशनसाठी पैसे हवे होते. या बहाण्याने एका नगरसेवकाने तिच्यावर अत्याचार केले. ती घटस्फोटित होती. हा अत्याचार बरेच महिने सुरू होता.'
प्रकरण कोर्टात उभं राहिलं
ज्येष्ठ पोलीस अधिकारी अरविंद इनामदार या सर्व प्रकरणावर लक्ष ठेवून होते.
या प्रकरणात चांगला सरकारी वकील हवा म्हणून त्यांनी मुंबईहून एक निष्णात वकील आणला गेला. मात्र तो अतिशय कडक शिस्तीचा होता. त्याचं तपास अधिकाऱ्याशी अजिबात पटायचं नाही. तो वारंवार धारेवर धरायचा. त्याच्याबरोबर काम करणार नाही असं एकमुखाने सर्व अधिकाऱ्यांनी सांगितलं. यामुळे अरविंद इनामदार प्रचंड संतापले. तरीही काहीतरी कारण काढून दुसऱ्या एका तितक्याच निष्णात वकिलाची नियुक्ती करण्यात आली.
हे प्रकरण कुठे चालवावं हे एक मोठं आव्हान होतं असं बोरवणकर लिहितात, “हे सर्व गुन्हे नोंदवायला प्रचंड उशीर झाल्याने आरोपींना लगेच जामीन मिळेल आणि ते पुन्हा पीडितांना ब्लॅकमेल करतील त्यामुळे पुणे येथे एका विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात आली आणि न्या. मृदुला भाटकर यांची न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यावेळी जळगावातलं वातावरण तापलेलंच होतं. अनेक पीडितांनी पुण्यात आश्रय घेतला होता. पुण्यातल्या अनेक कुटुंबांनी त्यांना आसरा दिला होता. नागरिक आणि पोलीस यांचं इतकं सहकार्य मी माझ्या करिअरमध्ये कधीही पाहिलं नाही.”

प्रकरण कोर्टात उभं राहिल्यावर पहिल्या दोन केसेसमधील पीडितांनी तक्रारच परत घेतली. इतकंच नाही तर जळगाव पोलिसांनी बळजबरीने तक्रारी नोंदवून घेतल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे सरकारी पक्षाला मोठा धक्का बसला.
एका मुलीची साक्ष नोंदवण्यासाठी आधी तिच्या आईला बोलावलं. आई खरं बोलली तर तिचं पाहून मुलीला हिम्मत येईल असा वकिलांचा कयास होता. मात्र झालं उलटंच. आईनेच साक्ष फिरवली. या प्रकाराने ती मुलगी जाम भडकली आणि तिने आईलाच शिव्या घातल्या आणि आपल्या साक्षीवर ठाम राहिली.
या प्रकरणात सहा बलात्काराच्या केसेस नोंदवल्या गेल्या आणि त्यांना शिक्षा झाली. 2000 साली या प्रकरणातील मुख्य आरोपी पंडित सपकाळे याची शिक्षा कोर्टाने रद्द केली. कारण त्याच्याविरुद्धचे पुरावे विश्वासार्ह नव्हते, असा निष्कर्ष कोर्टाने काढला होता.

फोटो स्रोत, Getty Images
लीना मेहेंदळे यांच्या मते, या प्रकरणातील साक्षीदारांना दोन-तीन वर्षांनी साक्षीला उभं केलं होतं. त्यामुळे त्यांना झालेली वेदना त्यांनी पुन्हा एकदा अनुभवण्याचा हा प्रकार होता. त्यामुळे ती साक्ष तितकी प्रभावी ठरली नाही. आता नवीन कायद्यानुसार पीडितांची साक्ष लवकरात लवकर नोंदवणं बंधनकारक आहे.
मीरा बोरवणकर यांच्या कारकीर्दीतला हा महत्त्वाचा टप्पा होता. या प्रकरणातून बरंच काही शिकल्याचं त्या सांगतात.
2018 साली मीरा बोरवणकर व्याख्यान देण्यास जळगावला गेल्या होत्या. एका छोट्या हॉलमध्ये कार्यक्रम होतं. आयोजकांनी त्यांना सांगितलं की, चांगला हॉल मिळाला होता. पण त्या हॉलचा मालक जळगाव सेक्स स्कँडलमधील आरोपी होता आणि तुम्हालाच तिथे कसं न्यायचं म्हणून ते ठिकाण रद्द केलं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








