मीरा बोरवणकरांच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, ‘बोरवणकरांमुळे जमीन वाचली हा दावा चुकीचा’

पुण्यातील येरवडा तुरुंगाबाहेरील जमीन खासगी बिल्डरला देण्याच्या प्रकरणात माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी आता थेट राज्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव घेतलं आहे. त्यावर अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
कुठल्याही ठिकाणी माझी सही नाही, कुठल्याही ठिकाणी मी यासंदर्भात मिटिंगला हजर नव्हतो, या प्रकरणाचा माझा अर्थाअर्थी संबंध नाही, असा दावा अजित पवार यांनी केला आहे.
मीरा बोरवणकरांमुळे नाही तर सरकारनेच जमीन देण्याचा निर्णय रद्द केला – अजित पवार
"ज्या कंपनीला जमीन देण्याचा निर्णय झाला होता त्या कंपनीचं नाव ईडीच्या प्रकरणात आल्यानंतर सरकारनेच त्या कंपनीला जमीन देण्याचा निर्णय रद्द केला, कुणामुळे हा निर्णय बदलला गेला नाही, काहीजण सांगतात माझ्या मुळे निर्णय बदलला. असं नाहीय. आज देखील जागा पोलीस खात्याच्या अखत्यारीत आहे," असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
सरकारच्या विरोधात जाणारे निर्णय मी कधीच घेतले नाहीत, असा दावासुद्धा अजित पवार यांनी केला आहे.
मीरा बोरवणकरांच्या आरोपांशी माझा संबंध नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
हा निर्णय आबांनी निर्णय घेतला, गृह खात्यानं निर्णय घेतला, मी काहीही केलं नाही, त्या प्रकरणाची कागदपत्र मी पुन्हा तपासली, असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं आहे.
त्या भूखंडाशी माझा संबंध नाही, शासनाचं नुकसान होईल असा निर्णय मी घेतला नाही. काम रखडू नये म्हणून हाच विषय सगळ्यांनी लावून का धरला असं त्यांना वाटलं, त्या म्हणतात त्यांनी बऱ्याच गोष्टी लिहतात. प्रसिद्धीसाठी काही जण खळबळ आरोप करतात, असा दावा अजित पवार यांनी केलाय.
तसंच चौकशी करा, मला फरक नाही, कारण माझी कुठे स्वाक्षरी नाही, मी कुठच्या समितीच्या बैठकीला उपस्थित नव्हतो, असंही त्यांनी म्हटलंय.
चौकशी कुणाची करता, जागा गृह विभागाकडेच आहे, जमिनीचं हस्तांतर का केलं नाही हे मला काय माहिती, असं उत्तर त्यांनी चौकशीच्या मुद्द्यावर दिलंय.
मीरा बोरवणकर यांनी काय म्हटलंय?
पुण्यातील येरवडा तुरुंगाबाहेरील जमीन खासगी बिल्डरला देण्याच्या प्रकरणात माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी आता थेट राज्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव घेतलं आहे.
"अजित दादा म्हणाले मॅडम तुम्ही यात पडू नका" असा थेट आरोप मीरा बोरवणकर यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत केला. या जमीन प्रकरणात टू जी घोटाळ्यातील आरोपी शाहिद बलवा याचा उल्लेखही त्यांनी केला आहे.
त्यांच म्हणाल्या की, " आपल्यामुळे येरवडा तुरुंगाबाहेरील 3 एकर जमीन खासगी बिल्डरच्या घशात जाण्यापासून वाचली आहे, त्यामुळे आता त्याच्या चौकशीची आवश्यकता मला वाटत नाही."
माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या 'मॅडम कमिशनर' या पुस्तकात अजित पवार यांचं नाव न घेता जिल्ह्याचे पालक मंत्री 'दादा' असा म्हणतं गंभीर आरोप केले होते.
त्यात त्यांनी अजित पवारांच्या नावाचा थेट उल्लेख केला नव्हता. पण माध्यमात बातम्या आल्यानंतर सोमवारी (16 ऑक्टोबर) दिल्लीतील प्रेस क्लबमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आपली भूमिका मांडली.
यावेळी त्यांनी थेट अजित पवार यांचं नाव घेतलं आहे. तसंचं खासगी बिल्डर म्हणून शाहिद बलवा होता, असाही खुलासा त्यांनी केलाय.

बोरवणकर यांनी म्हटंल की, मी माझ्या पुस्तकात 38 प्रकरणाचा उल्लेख केला आहे, पण माध्यमं एकच प्रकरणात प्रश्न विचारत आहेत. त्या पुण्यात पोलीस सेवेत असताना त्यांना या 3 एकर जमिनीचा लिलावाबद्दल विचारणा करण्यात आली होती.
"पोलीस हिताच्या विरोधात असल्यानं मी या जमीनीच्या लिलावाला ठाम विरोध केला, तत्कालीन पुणे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ही लिलाव प्रक्रिया सुरु होती. आधीच्या पोलीस आयुक्तांनी याला संमती दर्शवली होती. त्यांची बदली झाल्यानंतर या जागेबाबत मला विचारणा करण्यात आली. खासगी बिल्डरला जागा हस्तांतरीत करण्यास मी विरोध दर्शवला. त्यामुळे ही जागा वाचली. ही जागा आजही पोलिसांच्या ताब्यात आहे. ही जागा पुण्याच्या मध्यवर्ती भागात आहे," असं बोरवणकर यांनी म्हटलं आहे.
इथं पुणे पोलीस मुख्यालय किंवा पोलिसांसाठी वसाहत बांधावी, असं मी म्हटलं होतं. अशी मोक्याची जागा मिळणार नाही अशी माझी भूमिका होती.असं बोरवणकर या म्हणाल्या.
त्या पुढे म्हणतात की, "मी विरोध केल्यामुळे ती 3 एकर जागा खासगी बिल्डरला दिली गेली नाही. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीची गरज मला वाटत नाही. सरकारला जर चौकशी करायची असेल तर ते करु शकतात."
या प्रकरणी मला कुणीही नोटीस पाठवली तर मी त्याला उत्तर द्यायला तयार आहे,असं बोरवणकर यांनी म्हटलंय.
भ्रष्टाचाराबाबत बोलताना त्यांनी आरोप केला की, "राज्यात बिल्डर, राजकारणी आणि ब्यूरोक्रॅट्स यांचं संगनमत आहे. "
येरवडाचा मॅप अजित पवार यांनी फेकून दिला होता आणि तत्कालीन गृह मंत्री आर आर पाटील यांच्या विषयी काही शब्द वापरले होते का? असा प्रश्न विचारला असता, त्या म्हणाल्या की "अजित पवार यांनी मॅप फेकला होता. पण आर आर पाटील यांच्या विषयी काय बोलले हे मी सांगू शकत नाही."
बोरवणकर या दिल्लीतील पत्रकार परिषदेत आणखी काही खुलासे केले, त्यांनी सांगितलं की, "माझी सेवेची दोन वर्ष शिल्लक राहली असताना पुण्याच्या एडिशनल डीजी सीआयडी कार्यालयात मला बदली हवी होती, पण तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सांगितली आघाडी धर्म पाळतो म्हणून नियुक्ती होऊ शकत नाही. मग कारागृह विभागाचं पद घ्या असं सांगितलं मी ते स्वीकारलं कारण माझा कुटुंब पुण्यात राहत होतं."
"माध्यमांना मी सांगू इच्छिते की माझ्या पुस्तकात 38 प्रकरणांबाबात लिहिलंय पण माध्यम एकच विषयाबाबत प्रश्न विचारत आहेत.
मी पुस्तक एक वर्षापूर्वी दिलं होतं. दोन महिन्यापूर्वी पब्लिश झालं आहे. त्यामुळे आत्ताच हे पुस्तक आलं असा आरोप करण चुकीचं आहे," असं त्या म्हणाल्या
हेही नक्की वाचा
हा व्हीडिओ पाहिलात का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








