आईवर होणारे बलात्कार पाहाण्याची मुलांवर सक्ती

दक्षिण सुदान

फोटो स्रोत, AFP GETTY

संघर्षग्रस्त दक्षिण सुदानमध्ये महिलांवर बलात्कार होत आहेतच, पण त्या महिलांच्या लहान मुलांना हे बलात्कार पाहण्यास भागही पाडलं जात आहे, असं संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात म्हटलं आहे. इथं लैंगिक छळांनी कळस गाठला असल्याचं या अहवालात म्हटलं आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्कांच्या निरीक्षकांनी हा अहवाल तयार केला आहे. त्यात दक्षिण सुदानमधल्या 40 अधिकाऱ्यांवर युद्धाच्या काळातले गुन्हे तसंच मानवी हक्क उल्लंघनांच्या घटनांना जबाबदार धरले जाऊ शकते, असं म्हटलं आहे.

त्या अधिकाऱ्यांपैकी पाच जण कर्नल दर्जाचे अधिकारी आहेत तर तीन राज्यपाल आहेत.

या अधिकाऱ्यांची नावं जाहीर करण्यात आलेली नाहीत. पण त्यांना येत्या काही दिवसांत सुनावणीसाठी बोलावलं जाऊ शकतं.

काही पीडित नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना त्यांच्याच कुटुंबातील सदस्यांवर बलात्कार करण्याची जबरदस्ती करण्यात आली. त्याचाही उल्लेख संयुक्त राष्ट्रांनी आपल्या अहवालात केला आहे.

लैंगिक शोषणाचा उच्छाद

एका महिलेनं सांगितलं की, तिच्या 12 वर्षांच्या मुलाला आजीवर बलात्कार करण्याची सक्ती करण्यात आली.

दक्षिण सुदान

फोटो स्रोत, AFP GETTY

दक्षिण सूदानमध्ये लैंगिक शोषणानं उच्छाद मांडला असल्याचं मानवाधिकार आयोगाचे प्रमुख यास्मिन सूक यांनी सांगितलं.

नागरिकांचा छळ करण्याबरोबरच त्यांचा मृतदेहांची विटंबना केली जाते. गावांचीही नासधूस केली जाते, असं या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे.

दक्षिण सुदान

फोटो स्रोत, AFP

दक्षिण सुदानमध्ये वेगवेगळ्या गटांमध्ये संघर्ष सुरू आहे. 2015मध्ये शांतता करारावर सह्या झाल्या असल्या तरी इथला संघर्ष थांबलेला नाही.

हे मानवी हक्कांच्या पायमल्लीचे सगळे पुरावे संयुक्त कोर्टाकडे दिले जाणार आहेत. दक्षिण सूदानमधील प्राधिकरण आणि आफ्रिकन युनियन यांचं हे संयुक्त कोर्ट असेल.

परंतु सुदान सरकार अशाप्रकारे कोर्ट स्थापन करण्याबद्दल फार उत्सुक नाही. कारण या सरकारच्या समर्थक असलेल्या लष्करातले काही अधिकारी हे मुख्य आरोपींच्या यादीत आहे, अशी माहिती बीबीसीचे प्रतिनिधी वील रॉ़स यांनी दिली.

तर सुदान सरकारच्या प्रवक्त्यानं संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात नेमकं किती तथ्य आहे ते तपासण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. बरेचदा अशाप्रकारचे अहवाल पोकळ असतात, असेही त्यांनी म्हटलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)