‘त्यांनी माझ्या टॉपवर डोकं घासलं, हे मला खूप घृणास्पद वाटलं'

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जेम्स गॅलाघर, नॅटिली ट्रसवेल, जोनाथन समबर्ग
- Role, बीबीसी प्रतिनिधी
ब्रिटनमध्ये काही पुरुष डॉक्टर ऑपरेशन थिएटरमध्ये असताना महिला शल्यचिकित्सकांवर लैंगिक अत्याचार करत असल्याचं प्रकरण समोर आलं आहे.
महिला डॉक्टरांवर त्यांच्याच सहकार्यांनी लैंगिक अत्याचार केल्याचं ब्रिटनमधील नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या अभ्यासात आढळून आलंय.
ऑपरेशन थिएटरमध्ये शस्त्रक्रियेदरम्यान लैंगिक अत्याचार झालेल्या महिला डॉक्टरांशी बीबीसीने संवाद साधला.
हा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांचं म्हणणं आहे की, ब्रिटनमधील नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या रुग्णालयांमधील महिला डॉक्टर प्रशिक्षणार्थींवर वरिष्ठ पुरुष डॉक्टरांकडून लैंगिक अत्याचार होतात.
रॉयल कॉलेज ऑफ सर्जनने ही बाब अत्यंत चिंताजनक असल्याचं म्हटलंय.
नॅशनल हेल्थ सर्व्हिस मध्ये काम करणारे कर्मचारी म्हणतात की, शस्त्रक्रियेदरम्यान लैंगिक छळ, लैंगिक अत्याचार आणि बलात्कार हे उघड गुपित आहे.
न बोलता हे सगळं सहन करणाऱ्या अनेक महिला डॉक्टर आहेत.
या अभ्यासात असं म्हटलंय की, 'शस्त्रक्रियेदरम्यान पुरुष डॉक्टर महिलांच्या दोन स्तनांकडे बघत असतात. महिला डॉक्टरांना कधीकधी त्यांच्या पाठीमागे ताठरलेल्या लिंगाचा स्पर्श जाणवतो. जर तुम्ही सेक्ससाठी तयार असाल तर महिलांना त्यांच्या करिअरमध्ये चांगल्या संधी दिल्या जातात.'
युनिव्हर्सिटी ऑफ एक्सेटर, युनिव्हर्सिटी ऑफ सरे, वर्किंग पार्टी ऑफ सेक्शुअल मिसकंडक्ट इन सर्जरी यासारख्या संस्थांनी जे विश्लेषण केलं आहे ते बीबीसीला अभ्यासण्यासाठी देण्यात आलंय.
यात दोन तृतीयांश महिला शल्यचिकित्सकांनी त्यांचे वाईट अनुभव सांगितले आहेत. त्यांचा कशा पद्धतीने लैंगिक छळ होतो याचं अनुभवकथन त्यांनी यात केलंय.
एक तृतीयांश पीडितांनी सांगितलं की, त्यांच्याच पुरुष सहकाऱ्यांनी त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले.
ही प्रकरणं गेल्या पाच वर्षांतील असल्याचं अभ्यासात सांगण्यात आलंय.
मात्र, करिअर खराब होण्याच्या भीतीने महिला डॉक्टर या प्रकरणांची तक्रार करत नाहीत. तसंच नॅशनल हेल्थ सर्व्हिस, त्यांचं म्हणणं गांभीर्याने घेऊन त्यावर काही कारवाई करेल असाही विश्वासही त्यांना वाटत नाही.
त्यांनी माझ्या छातीवर डोकं घासलं
ज्युडिथ सांगते, तिला मोकळेपणाने बोलायची भीती वाटते. तिने आम्हाला तिची पूर्ण ओळख उघड करू नये असं सांगितलं. ती अनुभवी आणि कुशल सल्लागार शल्यचिकित्सक आहे.
ती सांगते की, तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये जेव्हा ती ऑपरेशन थिएटरमध्ये कनिष्ठ सहकारी म्हणून काम करायची तेव्हा तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला.
ती पुढे सांगते, "एक दिवस माझे सहकारी वरिष्ठ शल्यचिकित्सक घामाने डबडबले होते. ते तसेच पुढे सरकले आणि त्यांनी माझ्या छातीवर त्याचं डोकं ठेवलं. त्यांनी माझ्या स्तनांवर त्यांचं डोकं घासलं. त्यांनी माझ्या स्तनांवर त्यांचा चेहरा का घासला हे मला समजलंच नाही."
ज्युडिथने सांगितले की, दुसऱ्यांदाही जेव्हा त्यांनी असाच प्रकार केला तेव्हा तिने त्यांना घाम पुसायला टॉवेल आणून देऊ का, असं विचारलं.
"हे खूप घृणास्पद होतं, मला त्यावेळी लाज वाटली" असं ज्युडिथ म्हणाली.
ज्युडिथला हा प्रकार वाईट वाटला पण तरीही ती या प्रकरणावर गप्प राहिली.
ज्युडिथ म्हणते "ऑपरेशन थिएटरमध्ये तो व्यक्ती वरिष्ठ नाहीये. पण त्याचं महिलांसोबत असं वागणं चुकीचं आहे."
ही घटना ऑपरेशन थिएटरमध्ये घडली. पण रुग्णालयात सर्वत्र लैंगिक अत्याचार आणि लैंगिक छळ होतोय.

फोटो स्रोत, Getty Images
मी त्याला थांबवू शकले नाही
अॅनी...
काही कारणास्तव आम्ही तिची खरी ओळख उघड करू शकत नाही. तिला बीबीसीशी बोलायचं होतं. कारण बोलल्यामुळेच बदल घडेल यावर तिचा विश्वास आहे.
तिच्यावर झालेल्या बलात्काराबद्दल तिला स्पष्टीकरण द्यायचं नव्हतं. पण तिच्या संमतीशिवाय सेक्स झाला हे खरं आहे.
एका वैद्यकीय परिषदेदरम्यान काही डॉक्टरांची बैठक झाली.
त्यावेळी ती प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत होती आणि तो पुरुष डॉक्टर सल्लागार म्हणून काम करत होता.
अॅनी सांगते, मी त्याच्यावर विश्वास ठेवला. कधीकधी मदत हवी असल्यास तिने त्याची मदतही मागितली.
त्याने तिच्या विश्वासाचा गैरफायदा घेतला. तिथल्या इतर सहकाऱ्यांबद्दल तिला फारशी माहिती नव्हती आणि त्यांच्यावर विश्वास ठेवता येत नव्हता.
अॅनी सांगते, "एकदिवस मी जिथे राहत होतो तिथे तो माझ्या मागेमागे आला. मला वाटलं त्याला माझ्याशी काहीतरी बोलायचं असेल पण तो लगेच माझ्याकडे वळला आणि सेक्स करू लागला.''
'तेव्हा माझं शरीर दगड झालं. मी त्याला रोखू शकले नाही.'
"असं कधी घडेल मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. मला ते नको होतं. ते अनपेक्षितपणे घडलं."
दुसऱ्या दिवशी जेव्हा तिने त्याला पाहिले तेव्हा ती म्हणाली, "मी पूर्वीसारखी नाहीये."
"मला ते संपवायचं नव्हतं. आपल्यासोबत जे काही घडेल ते सहन करण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही अशी एक धारणा आपल्या समाजात आहे."
या घटनेचा अॅनीवर खूप परिणाम झाला. ती भावनिकदृष्ट्या खचली. इतकी वर्षं सरली तरीदेखील तिला ती भूतकाळातील आठवण एका भयानक स्वप्नाप्रमाणे सतावते. रुग्णाला तपासताना किंवा ऑपरेशन करताना देखील तिला या गोष्टी आठवतात.

फोटो स्रोत, Jonathan Scrub
डॉक्टर म्हणून आत्मविश्वास ढळतो
बरेच डॉक्टर अशा गोष्टींवर गप्प राहणंच बरं असा विचार करून थांबतात. प्रशिक्षणार्थी डॉक्टर ऑपरेशन थिएटरमध्ये सर्जिकल प्रशिक्षणासाठी वरिष्ठ डॉक्टरांवर अवलंबून असतात.
काही महिलांचं म्हणणं आहे की, ज्यांच्याकडे जास्त अधिकार आहेत अशा लोकांबद्दल बोलल्यास ते प्रशिक्षणार्थींच्या करिअरसाठी धोकादायक ठरू शकते.
लैंगिक अत्याचार आणि छळाच्या व्याप्तीचा अंदाज लावण्याचा पहिला प्रयत्न म्हणून या अहवालाकडे पाहिलं जातंय. हा अहवाल ब्रिटीश जर्नल ऑफ सर्जरीमध्ये प्रकाशित झाला आहे.
यात नोंदणीकृत महिला शल्यचिकित्सक आणि पुरुष शल्यचिकित्सकांना स्वतंत्रपणे सहभागी होण्यास सांगण्यात आलं होतं.
यामध्ये 1,434 लोक सहभागी झाले होते. त्यापैकी निम्म्या महिला आहेत. त्यांचा तपशील गोपनीय ठेवण्यात आला आहे.
त्यापैकी 63 टक्के महिलांना त्यांच्या सहकाऱ्यांकडून लैंगिक छळाचा सामना करावा लागला आहे.
30 टक्के महिलांवर सहकारी कर्मचाऱ्यांनीच लैंगिक अत्याचार केले आहेत.
11 टक्के महिलांनी सांगितलं की, त्यांना करिअरच्या संधीचं कारण देऊन शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडण्यात आलं.
सुमारे 11 बलात्काराच्या घटना उघडकीस आल्या आहेत.
90 टक्के महिला आणि 81 टक्के पुरुषांसोबत लैंगिक छळ झाला आहे.
पुरुषांचाही लैंगिक छळ
या अहवालात पुरुषांनाही त्रास देण्याच्या घटना समोर आल्या आहेत.
24 टक्के पुरुषांचा लैंगिक छळ झाला आहे. पण महिला आणि पुरुषांची परिस्थिती वेगळी असल्याचं या अहवालात म्हटलंय.
'ब्रेकिंग द सायलेन्स' या नावाने प्रसिद्ध झालेल्या दुसऱ्या अहवालात वैद्यकीय सेवा क्षेत्रातील लैंगिक छळाची समस्या सोडवण्यासाठी काही सूचना करण्यात आल्या होत्या.
या दोन्ही अहवालांमध्ये असं नमूद करण्यात आलंय की, सर्जिकल प्रशिक्षणाचे सर्वाधिकार पुरुष शल्यचिकित्सकांकडे असतात. त्यामुळे महिला शल्यचिकित्सकांना तणावाच्या परिस्थितीत काम करावं लागतं.
अशा महिलांच प्रमाण 28 टक्के आहे.

फोटो स्रोत, Getty Images
सरे विद्यापीठात सल्लागार शल्यचिकित्सक म्हणून काम करणाऱ्या प्राध्यापक कॅरी न्यूलँड्स सांगतात, "त्या तक्रार करत नाहीत, त्यांचं ऐकून घेतलं जात नाही म्हणूनच पुरुष शल्यचिकित्सक वाईट वागतात."
आपल्या कनिष्ठांकडून असेच अनुभव ऐकल्यानंतर प्राध्यापक कॅरी न्यूलँड्स यांनी लैंगिक छळाच्या विरोधात लढण्याचा निर्णय घेतला.
त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, बहुतेक घटनांमध्ये एका कनिष्ठ महिला प्रशिक्षणार्थीचा तिच्या वरिष्ठांकडून लैंगिक छळ केला जातो. हे छळ करणारे गुन्हेगार त्यांच्यावर देखरेखीचं देखील काम करतात.
"यामुळे मूकपणे सहन करण्याची पद्धतच सुरू होते. कारण, या गोष्टींबद्दल बोलण्याआधी प्रत्येकाला आपल्या भविष्याची आणि करिअरची भीती वाटते."
विश्वासाचा अभाव हे देखील कारण आहे
इथे आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे एनएचएस ट्रस्ट, द जनरल मेडिकल कौन्सिल, द रॉयल कॉलेज यांसारख्या संस्थांवरील विश्वासाचा अभाव.
जनरल मेडिकल कौन्सिल नोंदणीकृत डॉक्टरांना ब्रिटनमध्ये प्रॅक्टिस करण्याची परवानगी देते.
प्राध्यापक न्यूलँड्स म्हणतात, "तपासणी पद्धतींमध्ये मोठे बदल केले पाहिजेत. तरच वरील संस्थांमध्ये आणि आरोग्य सेवा क्षेत्रात काम करण्यासाठी आपण सुरक्षित आहोत असा विश्वास निर्माण होईल."
इंग्लंडमधील रॉयल कॉलेज ऑफ सर्जनचे अध्यक्ष टिम मिशेल म्हणाले की, हे निष्कर्ष धक्कादायक आहेत. ते बघूनच मला खूप वाईट वाटलंय.
अशा घृणास्पद वागणुकीमुळे लोकांचं जीवन उद्ध्वस्त झालंय. ऑपरेशन थिएटर असो वा एनएचएस ट्रस्ट किंवा इतर कुठेही असं वर्तन मान्य नाही.
मिशेल म्हणाले, "आमच्या अधिकार्यांनी असं वागणं अपेक्षित नाही."
एनएचएस ट्रस्ट, इंग्लंडच्या डॉ. बिंता सुलतान म्हणाल्या, "हा अहवाल वाचणं खूप कष्टप्रद आहे. त्यात स्पष्ट पुरावे आहेत. अहवालात असंही म्हटलंय की, रुग्णालये प्रत्येकासाठी सुरक्षित ठिकाणं बनावित यासाठी कारवाई करणं आवश्यक आहे."
"आम्ही त्या दिशेने आधीच ठोस पावले उचलली आहेत. ज्यांचा छळ झाला आहे त्यांनी तक्रारी दाखल कराव्या यासाठी आम्ही सहकार्य करू," असं त्या म्हणाल्या.
गेल्या महिन्यात जनरल मेडिकल कौन्सिलने डॉक्टरांच्या व्यावसायिक मानकांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत.
"रुग्ण आणि सहकाऱ्यांचा लैंगिक छळ मान्य नाही. अशा गंभीर घटनांमध्ये दोषी आढळलेल्या डॉक्टरांना ब्रिटनमध्ये प्रॅक्टिस करण्यास अपात्र ठरवले जाईल" असे मुख्य कार्यकारी चार्ली मॅसी यांनी सांगितले.
पण, ऑपरेशन थिएटर्समध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी अजूनही सुरक्षित वातावरण आहे का?
ज्युडिथ म्हणते, "प्रत्येक वेळी तुम्ही सुरक्षितच असाल असं नाही, आणि हीच गोष्ट मान्य करणं खूप भयानक आहे."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








