91 मुलांवर 246 वेळा बलात्कार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी कसं पकडलं?

फोटो स्रोत, Getty Images
91 मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आणि त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवून ऑनलाइन पोस्ट करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे.
या आरोपीवर 1600 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा आरोपी बाल संगोपन केंद्रात काम करायचा.
ऑस्ट्रेलिया आणि इतर काही देशांमध्ये बाल संगोपन केंद्रात काम करणाऱ्या या व्यक्तीने 15 वर्षे मुलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
या 45 वर्षीय पुरुषाला ऑगस्ट 2022 मध्ये अटक करण्यात आली होती.
या व्यक्तीला ऑगस्ट 2022मध्ये अटक करण्यात आली आहे. पण यातील कथित पीडितांपर्यंत पोहोचण्यासाठी, त्यांची चौकशी आणि ओळख पटवण्यासाठी पोलिसांना एक वर्ष लागले आहे.
आतापर्यंत पाहिलेल्या सर्वात वाईट घटनांपैकी ही एक केस असल्याचं पोलीस सांगत आहेत.
या व्यक्तीने 246 वेळा मुलांवर बलात्कार केला, तर 673 वेळा लैंगिक छळ केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
ऑस्ट्रेलियात सर्वात गंभीर गुन्ह्यांमध्ये जास्तीत जास्त जन्मठेपेची शिक्षा आहे.
मुलांचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ काढून ते ऑनलाइन पोस्ट केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याच्यावर यापूर्वी शेकडो गुन्हे दाखल केले आहेत.
मुलांवर केलेले सर्व अत्याचार त्याने रेकॉर्ड केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
या व्यक्तीच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये 4 हजार फोटो आणि व्हिडिओ सापडल्याचे पोलिसांनी सांगितले.
या व्यक्तीने क्वीन्सलँडमधील 10 बाल संगोपन केंद्रे, न्यू साउथ वेल्समधील एक आणि दुसर्या देशातील एका केंद्रात मुलांचं लैंगिक शोषण केल्याचं पोलिसांना आढळले.
“हे संपूर्ण प्रकरण जेव्हा जगासमोर येईल तेव्हा समाजासाठी ते 'खूप त्रासदायक' असेल," असं ऑस्ट्रेलियन पोलिसांतील सहाय्यक आयुक्त जस्टिन गॉफ यांनी म्हटलं आहे.
"या व्यक्तीने मुलांसोबत जे काही केले आहे ते कोणाच्याही कल्पनेच्या पलीकडचे आहे. पोलिसात दीर्घकाळ राहिल्यानंतर तुम्ही गुन्हे पाहून अवाक न होण्याचा प्रयत्न करता. पण हे एक भयानक प्रकरण आहे. त्यामुळे आम्हालाही धक्का बसला आहे.
ज्या 87 ऑस्ट्रेलियन मुलांवर कथित अत्याचार झाला होता त्यापैकी काही आता मोठे झाले आहे. त्यांची ओळख पटली आहे आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला आहे.
आणखी 4 कथित पीडितांशी संपर्क साधण्यासाठी ऑस्ट्रेलियन अधिकारी आता त्यांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
या मुलांचे फोटो आणि व्हिडीओ पाहताना त्यातील परिसरावरून तपास अधिकाऱ्यांनी एका बालसंगोपन केंद्राची माहिती मिळाली. तिथे तो आरोपी काम करत होता.
त्या माहितीच्या आधारे आरोपीची ओळख पटवून त्याला अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी 20 ऑगस्ट 2022 रोजी ब्रिस्बेन येथील केंद्राला वॉरंटसहित भेट दिली आणि चौकशी केली.
त्याआधी त्यांनी या माणसाच्या घरातून काही इलेक्ट्रॉनिक उपकरणं जप्त केली होती.
2021 आणि 2022 मध्ये या व्यक्तीविरोधात क्वीन्सलँड पोलिसांकडे दोनदा तक्रार करण्यात आली होती. पण त्यांच्याकडे त्याला ताब्यात घेण्यासाठी पुरेसे पुरावे नव्हते.
त्याला 21 ऑगस्ट रोजी ब्रिस्बेन मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर केले जाईल. कदाचित त्यानंतर त्याची ओळख जाहीर होऊ शकते.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








