पाकिस्तानातील क्वेटा रेल्वे स्टेशनवर सुसाईड बॉम्बनं भीषण स्फोट; 25 जणांचा जागीच मृत्यू

क्वेटा रेल्वे स्टेशन
फोटो कॅप्शन, क्वेटा रेल्वे स्टेशन
    • Author, जेमी व्हाइटहेड आणि सोफिया फरेरा सँटोस
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

पाकिस्तानच्या बलूचिस्तानातील क्वेटा रेल्वेस्थानकावर आज (9 नोव्हेंबर) भीषण बॉम्बस्फोट झाला.

या बॉम्बस्फोटात 25 जण मृत्युमूखी पडले असून, 46 हून अधिक लोक जखमी झालेले आहेत.

पाकिस्तानमधील कट्टरतावादी संघटना 'बलूच लिबरेशन आर्मी'ने या घटनेची जबाबदारी घेतली आहे.

कुठे कसा झाला आत्मघातकी हल्ला?

क्वेटा रेल्वे स्टेशनवरून पाकिस्तानमधील पेशावरकडे निघणाऱ्या रेल्वेसाठी सामान्यत: अधिक गर्दी असते.

ही रेल्वे निघायच्या वेळेसच हा स्फोट झाला असून मृतांव्यतिरिक्त कित्येक जण गंभीर जखमी झाले आहेत.

'सुसाईड बॉम्ब' अर्थात आत्मघातकी हल्ल्याच्या माध्यमातून हा स्फोट घडवण्यात आला असल्याची पोलीसांची माहिती आहे.

बलूचिस्तान प्रांतामध्ये अशा प्रकारच्या आत्मघातकी हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

हा प्रांत स्वतंत्र होऊन, या प्रांतातील साधनसंपत्तीवर नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीकोनातून हे हल्ले केले जात आहेत.

दुसऱ्या बाजूला पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, "ज्यांनी निष्पाप व्यक्तींच्या जीविताची आणि संपत्तीची अतोनात हानी केली आहे, त्यांना या कृत्याची मोठी किंमत मोजावी लागेल."

पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी म्हटलं आहे की, दहशतवादाच्या राक्षसाचा नायनाट करण्यासाठी सरकार आणि सुरक्षा दल पूर्णपणे सक्रिय आहेत.

शहराच्या आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटामध्ये आत्मघातकी हल्लेखोरासह किमान 25 लोक ठार झाले असून सुमारे 50 जण जखमी झाले आहेत.

वरिष्ठ पोलीस अधिकारी मुहम्मद बलोच यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट आत्मघातकी हल्ल्याद्वारे करण्यात आला असून हल्लेखोराने सहा ते आठ किलोंची स्फोटके आणली होती.

काय म्हणाले प्रत्यक्षदर्शी?

एसएसपी ऑपरेशन अधिकाऱ्यांनी बीबीसी बोलताना सांगितलं की, जाफर एक्स्प्रेसची वाट पाहणारे प्रवासी प्लॅटफॉर्मवर प्रतिक्षा करत असतानाच हा बॉम्बस्फोट झाला, त्यामुळे या स्फोटात प्रवाशांचाच जीव गेला आहे.

बॉम्बस्फोटाच्या सीसीटीव्ही दृश्यामध्ये देखील ही बाब स्पष्टपणे दिसून येते. कित्येक लोक रेल्वेची वाट पाहत रेल्वे स्टेशनवर बसले होते.

या घटनेतील प्रत्यक्षदर्शींच्या साक्षही समोर आल्या आहेत. क्वेटातील सरकारी कर्मचारी आणि घटनेतील प्रत्यक्षदर्शी असलेले नासिर खान यांनी पत्रकार मुहम्मद जुबैर यांना सांगितलं की, "मी माझ्या मित्राला सोडायला स्टेशनवर आलो होतो. आम्ही रेल्वे स्टेशनवर पोहचताक्षणी जोरदार स्फोट झाला. हा स्फोट इतका मोठा होता की, एकाच वेळी संपूर्ण स्टेशनवर हलकल्लोळ माजला."

नासिर यांनी पुढे म्हटलं की, "जेव्हा धूराचे लोट थोडेसे बाजूला झाले तेव्हा मी सर्वांत आधी माझी नजर मित्राला शोधू लागली. आमचं भाग्य असं की आम्ही दोघेही सुरक्षित होतो. मात्र, तिकीट खिडकीजवळ आमची नजर गेली तेव्हा दिसलं की कित्येक लोक जखमी होऊन पडले होते."

क्वेटा रेल्वे स्टेशन

आणखी एका प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने मुहम्मद जुबैर यांना सांगितलं की, "मी जवळपास आठ वाजता रेल्वे स्टेशनवर पोहोचलो होतो. मी ज्या रेल्वेतून प्रवास करणार होतो ती प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरुन सकाळी नऊ वाजता सुटणार होती.

मी चहा पिण्यासाठी एका दुकानाच्या दिशेने निघालो होतो, इतक्यात हा मोठा स्फोट झाला. नेमकं काय घडलं, ते अनेक सेकंदांपर्यंत काही कळतच नव्हतं. थोड्या क्षणातच पाहिलं तर सगळीकडे हाहाकार माजला होता."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)