रॉ एजंट भरतीसाठी पहाटे 3 वाजता व्हायची 'मानसिक' चाचणी, गुप्तचर संघटनेच्या जन्माची गोष्ट

फोटो स्रोत, Getty Images
- Author, रेहान फजल
- Role, बीबीसी हिंदी
भारत आणि पाकिस्तान यांच्यात 1965 मध्ये झालेलं युद्ध 22 दिवस चाललं पण त्याचा निकाल लागला नाही.
भारताचं पारडं युद्धात जड होतं यात शंका नाही. पण पाकिस्तानकडं शस्त्रांचा प्रचंड तुटवडा असल्याची गुप्तचर माहिती मात्र भारताकडं नव्हती.
खरंतर, 22 सप्टेंबरला शस्त्रसंधी झाली तेव्हा पाकिस्तानजवळील जवळपास शस्त्रसाठा संपुष्टात आला होता.
तसंच त्यांना कुठून शस्त्रसाठा उपलब्ध होण्याचीही शक्यता नव्हती. कारण अमेरिकेनं पाकिस्तानला शस्त्र पुरवण्यावर निर्बंध लादले होते.
रॉ (Research and Analysis Wing) चे माजी प्रमुख संकरन नायर यांनी त्यांच्या 'इनसाईड आयबी अँड रॉ द रोलिंग स्टोन दॅट गॅदर्ड मॉस' या पुस्तकात याबाबत लिहिलं आहे.
त्यानुसार "तत्कालीन लष्करप्रमुख जनरल जे.एन. चौधरी यांनी संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांना दिलेल्या अहवालात म्हटलं होतं की, भारतीय सैन्याला पाकिस्तानवर विजय मिळवता आला नाही त्याचं कारण म्हणजे आयबीने गुप्त माहिती मिळवण्याचं काम दिलेल्या हेरांना त्यात अपयश आलं होतं."


पण या सर्वामुळं जी टीका झाली त्यातून एक चांगली बाब घडली, ती म्हणजे एक नवीन गुप्तहेर संघटना रिसर्च अँड अॅनालिसिस विंग म्हणजेच 'रॉ' स्थापन करण्याचा निर्णय. देशाबाहेरील गोपनीय माहिती गोळा करण्याचं काम 'रॉ' कडं सोपविण्यात आलं.

फोटो स्रोत, MANAS PUBLICATIONS
रिलेटिव्ह अँड असोसिएट्स वेल्फेअर असोसिएशन
'रॉ' (RAW) ची स्थापना 21 सप्टेंबर 1968 रोजी झाली होती. रामेश्वर नाथ काव यांना या संघटनेचे प्रमुख बनविण्यात आले.
शंकरन नायर हे संघटनेतील दुसऱ्या क्रमाकांचे अधिकारी होते. या दोघांव्यतिरिक्त इंटेलिजन्स ब्युरोमधून 250 जणांची रिसर्च अँड अॅनालिसिस विंगमध्ये नियुक्ती करण्यात आली.
1971 नंतर रामनाथ काव यांनी सरळ कॉलेज आणि विद्यापिठांमधून रॉच्या सदस्यांची निवड करण्यास सुरूवात केली.
त्याचा परिणाम म्हणजे, रॉमध्ये काम करणाऱ्या अनेक लोकांच्या नातेवाईक आणि मित्रांनाच यात नोकरी मिळायला लागली. त्यामुळं या संघटनेला लोक गमतीनं 'रिलेटिव्ह अँड असोसिएट्स वेल्फेअर असोसिएशन' असं म्हणू लागले.

1973 नंतर मात्र ही परंपरा बंद झाली. तसंच ज्यांची थेट निवड झालेली होती, त्या सदस्यांनाही अत्यंत कठिण स्पर्धा परीक्षांचा सामना करावा लागला.
नितीन गोखले यांनी त्यांच्या 'आर.एन. काव, जंटलमन स्पायमास्टर' या पुस्तकात लिहिलं आहे की, "रॉ मध्ये भरती होण्यासाठीची पहिली पायरी असायची मानसिक क्षमतेच्या चाचणीची. उमेदवारांना पहाटे 3 वाजता एका ठिकाणी बोलावलं आणि ते पोहोचताच त्यांची बहुपर्यायी पद्धतीनं चाचणी घेतली. त्यात पास झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात आलं. एका संयुक्त सचिवांनी ही मुलाखत घेतली होती."
1973 साली निवड झालेले आणि अतिरिक्त सचिव पदावरून निवृत्त झालेले जयदेव रानडे यांच्या मते, "पुढील फेरीची मुलाखत रॉचे वरिष्ठ अधिकारी एन. एन. संतूक आणि संकरन नायर यांनी घेतली. यात निवड झाल्यानंतर 6 सदस्यीय समितीनं मुलाखत घेतली. त्यात एक परराष्ट्र सचिव, रॉ चे प्रमुख आर. एन. काव आणि एका मानसोपचार तज्ज्ञांचाही समावेश होता. माझी मुलाखत तब्बल 45 मिनिटे चालली होती."
दोन महिन्यानंतर रानडे यांना निवड झाल्याचं कळविण्यात आलं. त्यांच्यासह प्रताप हेबळीकर, चकरू सिन्हा आणि विधान रावल यां तिघांचीही निवड झाली होती.
रॉच्या विशेष सचिव पदावरुन निवृत्त झालेले राणा बॅनर्जी यांच्या मते, "1985 ते 1990 दरम्यान रॉमध्ये अशा पद्धतीनं आणखी काही लोकांची भरती झाली आणि त्यामुळं रॉ ही संघटना एक विशेष सेवा म्हणून नावारुपास आली. पुढं ही पद्धत बंद झाली. त्याची कारणं समोर आली नाहीत. पण आता 95 टक्क्यांपेक्षा अधिक एजंट्सची भरती भारतीय पोलीस सेवांद्वारेच केली जाते. तर आर्थिक इंटेलिजन्सच्या कामासाठी अबकारी किंवा आयकर विभागातून सदस्य निवडले जातात."
आयपीएस अधिकाऱ्यांमधून 'रॉ' सदस्य निवडण्यावर आक्षेप
रॉमधील काही जणांनी भारतीय पोलीस सेवेतून रॉचे सदस्य निवडण्याच्या प्रक्रियेवर टीका केली आहे.
रॉचे माजी प्रमुख विक्रम सूद यांनी 'द अनएंडिंग गेम' या त्यांच्या पुस्तकात हा विषय हाताळला आहे. "एखादा व्यक्ती पोलीस दलात अधिकारी पदावर पोहोचतो तेव्हा त्याचं वय 27 वर्षांच्या पुढं गेलेलं असतं. त्यानंतर 3 वर्षांनी तो रॉमध्ये येत असेल तर तो 30 वर्षांपेक्षा जास्त वयाचा झालेला असेल. त्या वयात त्याला एका नवीन कामासाठी बदलणं कठीण जातं. अशावेळी तो जास्त जोखमीची कामं करण्यास सक्षम ठरत नाही."

फोटो स्रोत, PENGUIN
विक्रम सूद यांच्या मते, "गुप्तहेर संघटनांमंध्ये पोलीस दलांतून लोकांना निवडणं तेवढं फायद्याचं राहिलेलं नाही. हा असा पेशा आहे ज्यात भाषेबाबतचं कौशल्य, माहिती काढण्याची कला महत्वाची असते. ते प्रशिक्षण पोलिसांना दिलेलं नसतं. तसंच गुप्तहेरांना आर्थिक, सायबर, वैज्ञानिक आणि सामरिक क्षेत्रातही पारंगत असणं आवश्यक असतं. पण आयपीएस अधिकाऱ्याला त्यासाठी प्रशिक्षित केलेलं नसतं."
रॉच्या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण कसे असते?
रॉमध्ये निवड झालेल्या सदस्यांना गुप्त माहिती मिळवण्याचं प्राथमिक प्रशिक्षण दिलं जातं. कोणत्याही एका परकीय भाषेत त्यांना निपुण बनवलं जातं.
बेसिक ट्रेनिंगनंतर त्यांना फिल्ड इंटेलिजन्स ब्युरोसोबत ठेवलं जातं. तिथं त्यांना अत्यंत थंडीत कसं काम करावं, घुसखोरी कशी करावी, पकडले गेल्यास स्वतःचं संरक्षण कसं करावं, प्रश्नांची उत्तरं कशी द्यावी तसेच नवीन संपर्क कसे वाढवावेत याचं प्रशिक्षण दिलं जातं.
प्रत्यक्ष मिशनवर जाण्यापूर्वी आत्मरक्षणासाठी 'क्रावमगा' चे ट्रेनिंग दिले जाते. हा एक इस्रायली मार्शल आर्टचा प्रकार आहे. त्यामध्ये समोरासमोरची लढाई जिंकण्यासाठी आधुनिक डावपेच शिकवले जातात.

फोटो स्रोत, Getty Images
राणा बॅनर्जी सांगतात की, "विदेशात जाण्यापूर्वी त्यांना अशा गोष्टी शिकवल्या जातात ज्या त्यांना नंतर फायद्याच्या ठरू शकतील. पूर्वीच्या काळी जशी 'डेड लेटर बॉक्स' ची चर्चा असायची. त्यात तुम्ही एखाद्या झाडाखाली एखादा कागद ठेवता. तेथून दुसरे कुणीतरी तो कागद उचलून घेईल. पण कागद ठेवण्याच्या आणि उचलण्याच्या प्रक्रियेत काही चिन्हांचा वापर करायचा असतो. त्यासाठी सांकेतिक भाषाही (कोड लँग्वेज) शिकवल्या जातात. "
दुतावासांमध्ये 'अंडर कव्हर' एजंट?
जगातील सर्वच देश त्यांच्या विदेशांतील दूतावासांचा वापर हेरांचा गोपनीय अड्डा म्हणून करत असतात.
विदेशात रॉचे सदस्यही भारतीय दूतावासांमध्येच तैनात केले जातात. बऱ्याचदा त्यांना खोट्या नावानं बाहेर पाठवलं जातं.
शोध पत्रकार यतीश यादव यांनी त्यांच्या 'रॉ अ हिस्ट्री ऑफ इंडियाज कोव्हर्ट ऑपरेशन्स' मध्ये लिहिलं आहे की, "यामागील मूळ कारण म्हणजे त्यांचं खरं नाव प्रशासकीय सेवेच्या यादीत नमूद असतं. एकदा रॉमध्ये काम करत असलेले विक्रम सिंह यांना विशाल पंडित या नावानं जावं लागलं होतं. त्यांच्या सर्व कुटुंबीयांचीही नावं बदलण्यात आली होती. विदेशात असताना गुप्तहेरांना एखादं अपत्य झाल्यास त्याचे आडनावही खोटेच ठेवावे लागते, तेच त्यांच्या नावाबरोबर कायमचं जोडलं जातं."

रॉचे माजी प्रमुख अमरजितसिंह दुलत यांनी एक खास किस्सा सांगितला.
"आमचा हाशीम कुरैशी नावाचा एक काश्मिरी मित्र आहे. त्यानं पहिल्यांदा भारताच्या विमानाचं अपहरण केलं होतं. तो मला एकदा विदेशात भेटला. हात मिळवत मी म्हणालो "माझं नाव दुलत आहे." त्यावर तो म्हणाला, "ते ठिकंय, पण खरं नाव सांगा."
मी हसून म्हणालो, "आता खरं नाव कुठून आणू. हेच माझं खरं नाव आहे."
नंतर तो म्हणाला, "खरं नाव सांगणारे, आतापर्यंत तुम्ही एकमेव भेटले."
ओळख गमावण्याची आणि देशातून हाकलण्याची भीती
कितीही सावध राहिलं तरी एक दिवस ओळख गमावून बसण्याची भीती कायम असते. हेर लगेच लक्षात येतात.
राणा बॅनर्जी सांगतात की, "भारत आणि पाकिस्तानदरम्यान एक राजनैतिक संकेत पाळला जातो. गुप्तचर संघटनेचे लोक एकमेकांच्या देशात पाठविण्याआधी त्यांची नावं संबंधित देशांना आधीच कळवली जातात. एकमेकांसोबत वाईट वर्तन करणार नाही याची हमी दिली जाते. कुणी मर्यादा ओलांडून काम करत असेल तर त्याला परत बोलावलं जातं."
"देशातून बाहेर काढण्याची भीती कायम सतावत असते. कारण एखाद्याची तीन वर्षांसाठी नियुक्ती केलेली असल्यास, तो मुलाबाळांच्या शिक्षणाची व्यवस्था करून ठेवतो. पण त्याला 6 महिन्यांतच देश सोडण्यास सांगितलं. तर त्याच्यासाठी कठिण प्रसंग उभा राहतो," असंही ते म्हणाले.

इतर काही महत्त्वाच्या बातम्या :

रॉ आणि आयएसआयची तुलना
आयएसआय ही पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आहे. त्यामुळं सहाजिकच तिची तुलना रॉसोबत केली जाते.
रॉचे माजी प्रमुख विक्रम सूद त्यांच्या 'द अनएंडिंग गेम' या पुस्तकात लिहतात की, "दोन्ही एजन्सींची तुलना करायची झाल्यास रॉला कोणत्याही प्रकारची अटक करण्याचा अधिकार नाही. तसंच कुणाच्याही घरी रात्रीच्या वेळी जाण्याची परवानगी नाही. रॉ देशांतर्गत हेरगिरी करत नाही. याऊलट आयएसआय मात्र ही सर्व कामं करते. रॉ पंतप्रधानांना उत्तरदायी असते. तर आयएसआय त्यांच्या लष्करप्रमुखांना रिपोर्ट करते. कागदावर मात्र आयएसआय पंतप्रधानानांच उत्तरदायी असल्याचं नमूद आहे."

फोटो स्रोत, Getty Images
आयएसआयचा इतिहास रॉपेक्षाही जुना आहे. तिची स्थापना 1948 साली ब्रिटिश सैन्यात काम करणारे ऑस्ट्रेलियन अधिकारी मेजर जनरल वॉल्टर जोसेफ यांनी केली होती.
रॉचे प्रमुख एसएस दुलत सांगतात की, "आयएसायचे प्रमुख राहिलेले असद दुर्रानी म्हणतात की, तुमचे रॉचे लोक आमच्यापेक्षा जास्त हुशार आहेत. आमच्याकडं येणारे बहुतांश सेनेचे जवानच असतात. त्यामुळं ते जास्त आक्रमक असतात. मीही दुर्रानी यांच्या मताशी सहमत आहे. आम्ही आयएसआयपेक्षा निश्चितच कमी नाही."
"मला पाकिस्तानमध्येही एकदा हा प्रश्न विचारला गेला होता. तेव्हा मी उत्तर दिले की, जर दुर्रानी साहेब म्हणत असतील तर त्यांचं योग्यच आहे असं मी मानेन. मात्र, आयएसआयसुद्धा एक मोठी संस्था आहे. तेवढ्या मोठ्या संस्थेचा प्रमुख असण्याचं भाग्य मला मिळालं असतं तर किती बरं झालं असतं," या वाक्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
रॉच्या अधिकाऱ्यांचा पाठलाग
रॉ आणि आयएसआयमधील संघर्षाचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. राणा बॅनर्जी यांनी अशीच एक आठवण सांगितली.
"मी 1984 पर्यंत पाकिस्तानात नियुक्त होतो. आमच्यासोबत कायम आयएसआयचे लोक असत. ते आमच्या घरासमोरच बसायचे. त्यांची शिफ्ट सकाळी साडेसात ते रात्री आठ वाजेपर्यंत असायची."

आम्हाला नजर ठेवणाऱ्यांना हूल देऊन कामं पूर्ण करण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं. त्यानुसार मी माझं काम करत होतो."
"एकदा ते माझा पाठलाग करत होते. मी दुसऱ्याच रस्त्याने जाऊन गाडी थांबवली. त्यांना माझी गाडी दिसली नाही, तेव्हा त्यांनी त्यांची कार माझ्या घराकडे वळवली. अर्थात मी तिथं नव्हतो. परत जाताना त्यांना माझी कार येताना दिसली तेव्हा मी मुद्दाम त्यांना डिवचण्यासाठी हात हलवला. त्यामुळं ते चांगलेच चिडले."
रॉच्या अधिकाऱ्यांचा कोपेनहेगनपर्यंत पाठलाग
रॉचे माजी प्रमुख संकरन नायर यांनी 'इनसाईड आयबी अँड रॉ, द रोलिंग स्टोन दॅड गॅदर्ड मॉस' या आत्मचरित्रात अनेक किस्से सांगितले आहे.
"1960 आणि 70 च्या दशकात खान अब्दुल गफ्फार खान यांचा मुलगा वली खान लंडनमध्ये निर्वासित म्हणून जीवन जगत होते. ते पाकिस्तानचे नवनियुक्त पंतप्रधान भुट्टो यांचे कट्टर विरोधक होते. राजकीय आणि नैतिक समर्थनासाठी त्यांना इंदिरा गांधींना एक संदेश पाठवायचा होता. त्यासाठी मला त्यांच्याकडं जाण्यास सांगितलं."
नायर यांच्या मते, "ही भेट कुठल्यातरी दुसऱ्या देशात घडवून आणावी लागणार होती. कारण लंडनमध्ये पाकिस्तानी दूतावास त्यांच्यावर नजर ठेवून होता. मी आधी लंडनला व तिथून डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगनला गेलो. नाश्ता करत असताना मला माझ्या पाठीमागील टेबलवर काही लोक उर्दू बोलत असल्याचं ऐकू आलं. ते आयएसआयचे हेर असल्याचा मला संशय आला. ते लोक नाश्ता सोडून गल्ल्यांमध्ये मला आणि वली खान यांना शोधायला लागताच माझा संशय खरा ठरला."

फोटो स्रोत, MANAS PUBLICATION
नायर यांनी तत्काळ भेटीची जागा बदलली. त्यांनी वली खान यांना त्यांची आवडती मिठाई के.सी. दास यांच्या रसगुल्ल्यांचा डबा भेट दिला. त्यामुळे ते अत्यंत खूष झाले.
भारतात परतल्यावर नायर यांनी वली खान यांचा संदेश पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यापर्यंत पोहोचवला.
संभाषण टॅप करण्याचा प्रयत्न
पाकिस्तानमध्ये रॉच्या गुप्तहेरांचे फोन नेहमी टॅप होत असत. त्यांनी कुटुंबियांसोबत केलेले संभाषणही टॅप केलं जात असायचं.
राणा बॅनर्जी आणखी एक किस्सा सांगतात, "इस्लामाबादमध्ये आमचा एक वेटर होता. तो अँग्लो-इंडियन ख्रिश्चन होता. त्याची एक वाईट खोड होती. तो मद्य सर्व्ह करण्याआधी एक दोन घोट प्यायचा. त्याने तसं करू नये म्हणून आम्ही असं सांगायचो की, पार्टी संपल्यावर आम्ही तुला ड्रिंक देऊ ते तू घरी घेऊन जा, पण तरी तो ऐकायचा नाही."
यामुळंच बॅनर्जींनी त्याच्यावर नजर ठेवायला सुरूवात केली. ते लिहतात, "एकदा मी पाहिलं, तो थोडा विचित्र पद्धतीने उभा राहून पायाने माचिससारखी डबी टेबलाखाली सरकवत होता. तो डायनिंग रुममध्ये एक हिअरिंग डिव्हाईस लपवत होता. मी ते डिव्हाइस बंद करून बाजूला ठेवलं. काही घडलंच नाही अशा वातावरणात पार्टी सुरूच होती. दुसऱ्या दिवशी आमच्या राजदूतांनी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडं याबाबत तक्रार केली."
टीका खूप होतात, मात्र कौतुक कधीच होत नाही..
1999 साली कंदहार विमान अपहरणाच्यावेळी भारताला तीन कुख्यात दहशतवाद्यांना सोडून द्यावं लागलं होतं. त्यावरून रॉवर प्रचंड टीका झाली होती.
एवढंच नाही तर रॉचे तत्कालीन प्रमुख एस.एस. दुलत हे मसूद अजहर आणि मुश्ताक अहमद जरगर या दोघांना आपल्या विमानात बसवून श्रीनगरवरून दिल्लीला घेऊन आले. तेथून जसवंत सिंह त्यांना कंदहारला घेऊन गेले.
ज्या पद्धतीनं आयसी-814 विमान अमृतसरवरून लाहोरला जाऊ दिलं गेले त्यावरूनही प्रचंड टीका करण्यात आली.
जगातल्या इतर गुप्तहेरांप्रमाणे रॉच्या गुप्तहेरांच्याही छातीवर कधी कुठलं शौर्यपदक लावलं गेलं नाही.
फार कमी लोकांना माहीत आहे की, कारगिल युद्धादरम्यान पाकिस्तानातून आलेल्या घुसखोरांविरोधात सुरुवातीची यशस्वी मोहीम सीमेवर तैनात रॉच्या 80 लोकांनीच राबवली होती. यापैकी अनेक जण जीवंत परतले नाही. मात्र त्यांची नावं उघड केली गेली नाहीत.

फोटो स्रोत, Getty Images
यतीश यादव 'रॉ अ हिस्ट्री ऑफ कोव्हर्ट ऑपरेशन्स' या पुस्तकात लिहतात की, "कारगिलच्या लाढाईनंतर रॉचे सदस्य त्यांचे साथीदार आणि मित्र युद्धात गमावल्यानंतरही शांतपणे उभे होते. रहमान असे गुप्त नाव असलेल्या एका गुप्तहेराने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडं देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्यांचे बलिदान सार्वजनिकरित्या स्विकारण्यात यावे, अशी मागणी केली होती. तत्कालीन सुरक्षा सल्लागार आणि पंतप्रधानांचे सचिव यांच्यापर्यंत हा प्रस्ताव पोहचला तेव्हा त्यांनी ही मागणी फेटाळून लावली."
यतीश यादव यांच्या मते, " कुठून तरी ही बीब वायपेयींच्या कानावर गेली. तेव्हा पंतप्रधान निवासात एका बंद सभागृहात त्या 18 अधिकाऱ्यांची नावं जाहीर करत कारगिल युद्धातील त्यांच्या कामगिरीबाबत मोठ्यानं वाचन करण्यात आलं.
रॉच्या इतिहासात पहिल्यांदा या योद्ध्यांना विशेष पदक प्रदान करण्यात आलं. वायपेयी यांनी रॉच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत हस्तांदोलन करून त्या अज्ञात वीरांच्या बलिदानासाठी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे कोणतेही रेकॉर्डींग करण्यात आले नाही. तसेच या कार्यक्रमाचे दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रामध्येही वार्तांकनही करण्यात आले नाही."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











