आणीबाणीः संजय गांधी यांना 'काम झालं नाही' असं सांगण्याची कुणाचीही हिंमत का नव्हती?

फोटो स्रोत, KEYSTONE/HULTON ARCHIVE/GETTY IMAGES
- Author, रेहान फजल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
राजीव गांधी आणि संजय गांधी दोघांनाही वेग आणि मशीन यांचं वेड होतं. एकीकडे राजीव गांधी विमान उड्डाण नियमांचं पालन करायचे तर दुसरीकडे संजय गांधी एखाद्या कारप्रमाणे विमान चालवायचे. हवेत विमानाच्या कसरती करणं, त्यांचा छंद होता.
1976 साली त्यांना हलक्या वजनाची विमानं उडवण्याचा परवाना मिळाला. मात्र, इंदिरा गांधी पायउतार होताच जनता सरकारने तो परवाना रद्द केला. पुढे इंदिरा गांधी सत्तेत परतल्यावर त्यांना त्यांचा परवाना परत मिळाला.
1977 पासूनच इंदिरा यांच्या कुटुंबीयांचे निकटवर्ती असणारे धीरेंद्र ब्रह्मचारी 'पिट्स S2A' हे दोन आसनी विमान आयात करण्यासाठी प्रयत्न करत होते. हे विमान खासकरून हवेत कसरती करण्यासाठी तयार करण्यात आलं होतं. अखेर 1980 साली कस्टम विभागाने विमान आयातीसाठी परवानगी दिली.
घाईगडबडीतच असेंबल करून सफदरगंज विमानतळावरच्या दिल्ली फ्लाईंग क्लबमध्ये हे विमान पोहोचवण्यात आलं. संजय गांधी यांना पहिल्याच दिवशी विमान उडवायचं होतं. मात्र, पहिली संधी मिळाली ती फ्लाईंग क्लबच्या इंस्ट्रक्टरना. संजय गांधी यांनी 21 जून 1980 रोजी पहिल्यांदा हे विमान उडवलं.
रहिवासी भागात पीट्सच्या तीन घिरट्या आणि…
दुसऱ्या दिवशी पत्नी मनेका गांधी, इंदिरा गांधी यांचे विशेष सहाय्यक आर. के. धवन आणि धीरेंद्र ब्रह्मचारी यांना घेऊन संजय गांधी यांनी विमान उडवलं. जवळपास 40 मिनिटं दिल्लीच्या आकाशात हे विमान उडत होतं.
दुसऱ्या दिवशी म्हणजे 23 जूनला माधवराव सिंधिया संजय गांधींसोबत विमानाची सफर करणार होते. मात्र, संजय गांधी माधवराव सिंधिया यांच्याऐवजी दिल्ली फ्लाईंग क्लबचे माजी इंस्ट्रक्टर सुभाष सक्सेना यांच्या घरी गेले. ते सफदरजंग विमानतळा शेजारीच रहायचे.
कॅप्टन सक्सेना यांना त्यांनी विमानत सोबत येण्याची विनंती केली. संजय गांधी आपली गाडी पार्क करायला गेले आणि कॅप्टन सक्सेना आपल्या एका सहाय्यकासोबत फ्लाईंग क्लबच्या मुख्य भवनात गेले. नि. कॅप्टन सक्सेना फार घाईत नसावेत. कारण त्यांनी एक चहा ऑर्डर केला होता.
त्यांनी चहाचा एक घोट घेतला होता, तेवढ्यात एक कर्मचाारी धावत त्यांच्याकडे आला आणि त्याने सांगितलं की संजय गांधी विमानात बसलेत आणि ते तुम्हाला बोलवत आहेत.
कॅप्टन सक्सेना यांनी त्यांच्या सहाय्यकाला मी 10-15 मिनिटात घरी येतो, असं सांगून घरी पाठवलं. कॅप्टन सक्सेना पिट्सच्या पुढच्या सीटवर बसले आणि संजय गांधी मागच्या सीटवर. संजय गांधी यांनी कंट्रोल हातात घेत विमान हवेत झेपावलं.
7 वाजून 58 मिनिटांनी त्यांनी टेक ऑफ केलं. संजय गांधी यांनी सुरक्षा नियमांचं उल्लंघन करत रहिवासी भागावरच तीन फेऱ्या मारल्या. ते चौथी फेरी मारणार तेवढ्यात सक्सेना यांच्या सहाय्यकाने खालून बघितलं की विमानाचं इंजिन बंद पडलंय. पिट्स विमान वेगात वळलं आणि थेट जमिनीवर आदळलं.
कंट्रोल टॉवरमध्ये बसून विमान बघणाऱ्यांच्याही काळजाचा ठोका चुकला. विमान अशोका हॉटेलच्या मागून अचानक गायब झालं होतं. कॅप्टन सक्सेना यांच्या सहाय्यकानेही विमान कोसळताना बघितलं होतं.
त्याने सायकल घेतली आणि वेगाने त्या दिशेने निघाला. घटनास्थळी पोहोचणारी ती सर्वात पहिली व्यक्ती होती. विमानाचे तुकडे तुकडे झाले होते. त्यातून धुराचे लोट निघत होते. पण विमानाला आग लागली नव्हती.
रानी सिंह 'Sonia Gandhi : An Extraordinary Life' या पुस्तकात लिहितात, "कॅप्टन सक्सेना यांच्या सहाय्यकाने बघितलं की संजय गांधी यांचा मृतदेह विमानाच्या मलब्यापासून चार फुटाच्या अंतरावर पडला होता. कॅप्टन सक्सेना यांच्या शरीराचा खालचा भाग विमानाच्या मलब्याखाली दबला होता. वरचा भाग बाहेर होता."
"त्यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री विश्वनाथ प्रताप सिंह एक, अकबर रोडवर इंदिरा गांधी यांना भेटण्यासाठी गेले होते. ते इंदिरा गांधी यांची वाट बघत होते. तेवढ्यात व्ही. पी. सिंह यांनी ऐकलं की इंदिरा गांधी यांचे सहाय्यक आर. के. धवन म्हणत होते की मोठा अपघात झाला आहे. अस्ताव्यस्त केसात इंदिरा गांधी बाहेर आल्या आणि धवन यांच्यासोबत अॅम्बेसेडर गाडीत बसून निघाल्या."
"त्यांच्या पाठोपाठ व्ही. पी. सिंहही घटनास्थळी पोहोचले. इंदिरा गांधी पोहोचण्यापूर्वीच अग्निशमन दलाच्या जवानांनी विमानाच्या मलब्यातून दोन्ही मृतदेह बाहेर काढले होते. दोन्ही मृतदेह हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी अॅम्ब्युलंसमध्ये ठेवले जात होते."
प्रसिद्ध पत्रकार विनोद मेहता यांना एकदा विचारण्यात आलं, "इतिहास संजय गांधींकडे कसं बघेल?"
यावर त्यांचं उत्तर होतं, "इतिहास कदाचित संजय गांधींकडे विशेष लक्ष देणार नाही किंवा त्यांना दृष्टीआडही करेल. माझ्या दृष्टीनं तर संजय गांधींचं भारतीय राजकारणातलं अस्तित्व एखाद्या अचानक उठणाऱ्या 'बीप'प्रमाणे होतं. ज्याचा आवाज फक्त काही काळापुरता लक्ष वेधून घेतो आणि नंतर विरून जातो."
हे झालं विनोद मेहतांचं मत. पण असे अनेक लोक आहेत जे भारतीय राजकारणातील संजय गांधींच्या भूमिकेकडं वेगळ्या नजरेनं पाहतात.
पुष्पेश पंत जवाहरलाल नेहरू विद्यापीठात अर्थात जेएनयूमध्ये प्राध्यापक होते.
त्यांच्या मते, "संजय गांधींमध्ये काहीतरी वेगळंपण होतं. तसंच भारताला आणखी चांगलं करण्याचा दृष्टिकोनही त्यांच्याकडे होतं. आज त्यांची भलामण करताना पाहून कदाचित लोक मला गांधी कुटुंबाचा चमचा ठरवतील."
"पण आणीबाणीच्या दरम्यान कुटुंब नियोजनाचा आग्रह संजय यांनी केला नसता तर देशाला कधी 'छोटा परिवार, सुखी परिवारा'चं महत्त्व समजलं नसतं."
संजय यांची डेडलाईन
"कुटुंब नियोजनाच्या अंमलबजावणीत जबरदस्ती करण्यात आली. त्यामुळे काँग्रेस पक्ष जनमानसापासून दूर गेला," पंत सांगतात.

फोटो स्रोत, NEHRU MEMORIAL LIBRARY
कुमकुम चड्ढा या हिंदुस्तान टाईम्सच्या वरिष्ठ पत्रकार आहेत. त्यांनी संजय गांधी यांच्याबद्दल विस्तारानं वार्तांकन केलं होतं. चड्ढा सांगतात, "कुटुंब नियोजनाची अंमलबजावणी कशी करावी याबाबत संजय यांनी त्यांच्या माणसांना नेमक्या काय सूचना दिल्या होत्या हे मला माहिती नाही. पण मला हे माहिती आहे की, प्रत्येकासमोर त्यांनी एक विशिष्ट ध्येय ठेवलं होतं."
"कोणत्याही परिस्थितीत हे ध्येय गाठण्याचं त्यांच्या माणसांनीही मनात पक्कं केलं होतं."
त्या पुढे सांगतात, "काम झालं नाही, असं संजय यांच्याकडे जाऊन सांगण्याची कुणाची हिंमत नव्हती. सर्व कार्यकर्ते संजय यांना खूप घाबरत असत. एकीकडे भीतीचं वातावरण होतं, तर दुसरीकडे संजय यांच्याकडेही संयमाचा अभाव होता."
"त्यांनी दिलेली डेडलाइन एक दिवस आधीचीच असे. यामुळेच संजय यांच्या मार्गदर्शनाखाली जे लोक काम करत होते ते खूप घाईघाईने करत असतं आणि याच वेगामुळे संजय यांच्या कामाचे उलटे परिणाम दिसायला लागले."
"त्याकाळी भारतात आणीबाणी होती. सगळीकडे सेन्सॉरशिप होती. तुम्ही जे काही करत आहात ते चुकीचं आहे. करू नका, असं संजय यांना सांगायची कोणात हिंमत नव्हती."
"अर्थात मला नाही वाटत संजय गांधी त्यावेळी हे असं काही ऐकायच्या मनस्थितीतही होते. याप्रकारच्या गोष्टी ऐकण्याचा त्यांचा स्वभावही नव्हता", कुमकुम चड्ढा पुढे सांगतात.
संजय गांधी आणि गुजराल यांच्यातली खडाजंगी
आणीबाणीच्या काळात विरोधी पक्षनेत्यांना अटक करण्याचा आदेश देणे, आक्रमकपणे आणीबाणीची अंमलबजावणी करणे आणि सरकारी कामांत तसा कुठलाही अधिकार किंवा पद नसताना हस्तक्षेप करणे हे गंभीर आरोप संजय गांधी यांच्यावर होते.

फोटो स्रोत, NEHRU MEMORIAL LIBRARY
इंद्रकुमार गुजराल आपलं म्हणणं ऐकणार नाहीत, असं जेव्हा संजय यांना वाटलं तेव्हा गुजराल यांना पदावरून हटवण्यात आलं.
जग्गा कपूर त्यांच्या 'व्हॉट प्राइस पर्जरी - फॅक्ट्स ऑफ द शाह कमिशन' या त्यांच्या पुस्तकात लिहितात, "प्रसारित करण्यापूर्वी आकाशवाणीचं समाचार बुलेटिन आपल्याला दाखवावं, असा आदेश संजय गांधी यांनी गुजराल यांना दिला."
"गुजराल यांनी मात्र हे शक्य नसल्याचं सांगितलं. इंदिरा गांधी दरवाजाजवळ उभं राहून संजय आणि गुजराल यांच्यातील चर्चा ऐकत होत्या. पण त्यावेळी त्याकाहीच बोलल्या नाहीत."
कपूर पुढे लिहितात, "तुम्ही तुमचं खातं व्यवस्थितपणे सांभाळत नाही आहात, असं दुसऱ्या दिवशी सकाळी इंदिरांच्या अनुपस्थित संजय गांधी यांनी गुजराल यांना सांगितलं."
"यावर गुजराल यांचं उत्तर होतं, 'जर तुला माझ्याशी बोलायचं असेल तर सभ्य भाषा वापरावी लागेल. माझं आणि पंतप्रधानांचं नातं तेव्हापासूनच आहे जेव्हा तुझा जन्मसुद्धा झाला नव्हता. तुला माझ्या कामात अडथळा आणण्याचा काहीएक अधिकार नाही."
मार्क टली यांच्या अटकेचे आदेश
त्याच्या पुढच्याच दिवशी संजय यांचे खास मित्र मोहम्मद युनूस यांनी गुजराल यांना फोन करून सांगितलं की, दिल्लीतलं बीबीसीचं कार्यालय बंद करा. सोबतच बीबीसीचे तत्कालीन ब्युरो चीफ मार्क टली यांना अटक करा.

फोटो स्रोत, NEHRU MEMORIAL LIBRARY
कारण त्यांनी कथितरित्या खोटी बातमी दिली होती की, जगजीवन राम आणि स्वर्ण सिंह यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे.
मार्क टली त्यांच्या 'फ्रॉम राज टू राजीव' या पुस्तकात लिहितात,
"युनुस यांनी गुजराल यांना आदेश दिला की मार्क टली यांना बोलावून घ्या. त्यांची चड्डी उतरवा आणि चाबकाचे फटके द्या. नंतर त्यांची तुरुंगात रवानगी करा."
"एका विदेशी पत्रकाराला अटक करणं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचं काम नाही," असं गुजराल यांनी युनुस यांना उत्तर दिलं.
मार्क टली पुढे लिहितात, "फोन ठेवताच त्यांनी बीबीसीच्या बातम्यांचा मॉनिटरिंग रिपोर्ट मागवून घेतला. त्यानुसार कळलं की, जगजीवन राम आणि स्वर्ण सिंह यांना कैदेत ठेवल्याची कोणतीही बातमी बीबीसीनं दिली नव्हती.
गुजराल यांनी त्याच रात्री ही गोष्ट इंदिरा गांधींपर्यंत पोहचवली. पण, सद्यस्थितीत माहिती आणि प्रसारण मंत्रालय कडक शिस्तीत चालवण्याची गरज असल्यानं तुमचं खातं काढून घेत असल्याचं इंदिरा गांधींनी त्यांना कळवलं."
रुखसाना सुल्तानशी जवळीक
आणीबाणीच्या काळात जी माणसं संजय गांधींच्या जवळ होती, त्यांनी आणीबाणीच्या काळात याचा पुरता वापर करून घेतला आणि संजय यांची जनमानसातील प्रतिमा खराब करण्यात त्यांनीच मोठी भूमिका निभावली.
यातलीच एक व्यक्ती म्हणजे अभिनेत्री अमृता सिंगची आई रुखसाना सुल्तान.

फोटो स्रोत, NEHRU MEMORIAL LIBRARY
कुमकुम चड्ढा सांगतात, "संजय गांधी आणि रुखसाना सुल्तान यांच्याबद्दलच्या चर्चेला उधाण आलं होतं. रुखसाना यांनी मात्र याबाबत जाहीरपणे सांगतिलं होतं की, संजय त्यांचे खूप जवळचे मित्र आहेत. आणीबाणीच्या काळात रुखसाना यांच्या हातात बरीच ताकद एकवटली होती."
"याच ताकदीचा त्यांनी वाईट पद्धतीनं वापर केला. मग तो कुटुंब नियोजनात असो की जामा मशिदीच्या सौंदर्यीकरणात.
लोक संजय गांधी यांचा तिरस्कार यामुळेही करत होते की, रुखसाना त्यांच्या नावानं अनेक कार्यक्रम घेत असत. तुम्ही हे चुकीचं करत आहात असं संजय यांना ठणकावून सांगणारा त्यांचा कोणताही मित्र नव्हता. "
फटकळ आणि सुस्पष्ट
संजय गांधींची प्रतिमा फटकळ अशी होती. आपल्या सहकाऱ्यांबद्दल मग ते वयाने मोठे का असेनात संजय यांच्या मनात कोणताही आदर नव्हता.

फोटो स्रोत, NEHRU MEMORIAL LIBRARY
पण संजय गांधी यांचे निकटवर्तीय आणि काँग्रेसचे नेते जनार्दन सिंह गहलोत सांगतात की, "संजय अजिबात कठोर नव्हते. ते स्पष्टवक्ते होते. त्यांच्या या वृत्तीला भारतातील लोक आजही स्वीकारू शकले नाहीत."
"आज राजकारणात चमच्यांचा बोलबोला आहे, सर्वच राजकारणी गोडगोड गोष्टी करतात. संजय या सर्वांपासून खूपच वेगळे होते. यामुळेच संजय यांच्याकडे कठोर म्हणून बघितलं जायचं. पण ते अजिबात तसे नव्हते."
ते पुढे सांगतात, "जी बाब संजय यांना चांगली वाटत असे तिच्याबद्दल ते तोंडावर बोलत असत. त्यांचा पंचसूत्री कार्यक्रम देशाच्या कल्याणासाठीच होता, हे देशवासीयांनी काही कालावधीनंतर स्वीकारलं."
संजय गांधींचे सहकारी आणि राज्यसभेचे खासदार असलेले संजय सिंह सांगतात, "संजय गांधींचे दोन-तीन गुण मला खूपच आवडले. एक म्हणजे ते स्पष्टवक्ते होते. आढेवेढे न घेता सरळसरळ बोलत असत. सौम्य होते. त्यांची वर्तणूक खूप चांगली होती."
"कमीत कमी बोलण्यातून हवा तो संदेश लोकांपर्यंत पोहचायला हवा, याची ते नेहमी काळजी घेत."
"सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे एखाद्या कामाला हो म्हटल्यानंतर त्यात ते स्वत:ला पूर्णपणे झोकून देत. तसंच ही इतरांनीही करायला हवं, अशी त्यांची अपेक्षा असे", असं गहलोत सांगतात.
वेळेवर नजर
संजय गांधी यांची नकारात्मक प्रतिमा बनवण्यात त्यांच्या कथित कठोर व्यक्तिमत्वाची भूमिका मोठी होती.

फोटो स्रोत, NEHRU MEMORIAL LIBRARY
'द संजय स्टोरी' या संजय यांच्यावरील पुस्तकात विनोद मेहता लिहितात, "1 अकबर रोडवर राहणाऱ्या संजय गांधींचा दिवस सकाळी आठ वाजता सुरू होत असे. त्यावेळी जगमोहन, किशनचंद, नवीन चावला आणि पीएस भिंडर यांच्यासारखे अधिकारी आपल्या रोजच्या कामाचा अहवाल देण्यासाठी तिथं उपस्थित राहत असत."
"त्यावेळी संजय यांच्याकडून त्यांना पुढील कामासाठी आदेश मिळत असत. यातले बहुतेक जण संजय यांना सर म्हणत."
"संजय फक्त एक-दोन शब्द बोलत असत", असं जगदीश टायटलर सांगतात. "ओरडताना मी त्यांना कधीच पाहिलं नाही. त्यांचे आदेश काचेसारखे स्वच्छ असत. तसंच त्यांची स्मरणशक्ती खूपच चांगली होती."
टायटलर पुढे सांगतात, "बरोबर 8 वाजून 45 मिनिटांनी मेटाडोरमध्ये बसून संजय गुडगावस्थित मारुतीच्या कारखान्यात जाण्यासाठी निघत असत. संजय वेळेचे काटेकोरपणे पालन करणारे होते."
"12 वाजून 55 मिनिटांनी ते दुपारच्या जेवणासाठी घरी परतत असत. कारण इंदिरा गांधींचा आदेश असायचा की, दुपारचं जेवण कुटुंबातील सर्वांनी सोबत करायला हवं."
"दुपारी दोन नंतर संजय लोकांना भेटायला सुरुवात करत. यामध्ये केंद्रीय मंत्री, राज्यांचे मुख्यमंत्री आणि युवक काँग्रेसच्या नेत्यांचा समावेश असे."
"भेट घेण्यास इच्छुक असणाऱ्यांना दिला जाणारा वेळ 4 वाजून 7 मिनिटं, 4 वाजून 11 मिनिटं आणि 4 वाजून 17 मिनिटं असा असे. ज्यावेळी कोणी खोलीत प्रवेश करत असे त्यावेळी संजय ना त्यांच्या आदरार्थ उभे राहात ना त्यांच्याशी हस्तांदोलन करत." टायटलर सांगतात.
'मारुती'ची सुरुवात
नारायण दत्त तिवारी उत्तर प्रदेश आणि झारखंडचे मुख्यमंत्री झालेले आहेत. शिवाय ते आंध्र प्रदेशचे राज्यपालसुद्धा होते.

फोटो स्रोत, NEHRU MEMORIAL LIBRARY
त्यांच्या मते, "संजय गांधी यांना विनाकारण बदनाम करण्यात आलं आणि त्यांच्या योगदानाची उंची योग्यप्रकारे मोजण्यात आलेली नाही."
"संजय गांधी यांचा पंचसूत्री कार्यक्रम योग्य आणि व्यावहारिक होता असं आज सर्वांना वाटतं. कुटुंब नियोजनाशिवाय देशातली गरिबी कमी होणार नाही, असं त्यांना वाटायचं."
तिवारी पुढे सांगतात, "वृक्षलागवडीचं आंदोलन आणि देशांतर्गत वस्तूंचं उत्पादन हा संजय यांच्या कार्यक्रमाचा उद्देश होता. त्यांनी वर्कशॉपमध्ये मारुती कारची डिझाईन बनवण्याचा प्रयत्न केला."
"आज मारुती कारचं भारतात उत्पादन होत आहे आणि निर्यातही होत आहे. परंतु याची सुरुवात संजय गांधींनी केली होती."
वेगाने गाडी चालवण्याची सवय
सामान्य लोकांत संजय गांधींची प्रतिमा 'मॅन ऑफ अॅक्शन' अशी आहे. असा 'मॅन ऑफ अॅक्शन' ज्याच्याजवळ संयमाची कमतरता आहे.
असं असलं तरी, सिगरेट-दारूचं काय साध्या चहाचंही व्यसन संजय गांधींना नव्हतं.

फोटो स्रोत, NEHRU MEMORIAL LIBRARY
जनार्दन सिंह गहलोत सांगतात, "वेगाने गाडी चालवायला संजय यांना आवडत असे. एकदा मी, संजय गांधी आणि अंबिका सोनी पंजाबच्या दौऱ्यावरून परतत होतो."
"गाडी स्वत: चालवायची संजय यांना सवय होती. त्यांच्या गाडीचा वेग बघून आमचे हात- पाय गळून गेले होते. गाडीचा अपघात तर होणार नाही ना असे विचार आमच्या मनात येत होते. जेव्हा आम्ही त्यांना याबद्दल टोकलं - तेव्हा 'भीती वाटते का?' असं त्यांनी विचारलं."
ते पुढे सांगतात, "विमान चालवण्यासाठी संजय ज्यावेळी घरातून निघाले त्यावेळी त्यांना थांबवा, असं मेनका गांधींनी इंदिरांना म्हटलं होतं.
पण इंदिरा गांधी घराच्या बाहेर पोहोचण्यापूर्वीच संजय आपली मेटॅडोर घेऊन निघून गेले होते. त्याच दिवशी संजय यांना अपघात झाला."
गहलोत म्हणतात, "संजय कॅम्पा कोला आणि पेप्सीही पीत नसत. पान का खाता? असं ते लोकांना विचारत. मला वाटतं की, संजय देशातील युवकांना विधायक मार्गावर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते."
ते नेहमी कुर्ता-पायजमा घालत असत. इतरांसारखं सायंकाळी जीन्स आणि टी शर्ट घालून फिरत नसत."
कमलनाथ यांच्या ड्राईंग रूममध्ये संजय यांचे चित्र
संजय गांधींच्या साथीदारांवर ते असंस्कृत आणि बिनडोक म्हणून टीका करण्यात येऊ शकते. पण संजय गांधी यांच्या प्रति त्यांची निष्ठा वाखाणण्याजोगी होती. विशेषत: त्यावेळी जेव्हा सर्व देश संजय यांच्या विरोधात होता.

फोटो स्रोत, NEHRU MEMORIAL LIBRARY
कुमकुम चड्ढा सांगतात, "कमलनाथ हे त्या निष्ठावानांपैकीच एक. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना आणि संजय यांच्या मृत्यूनंतर अनेक वर्षं त्यांचं चित्र कमलनाथांनी ड्राईंग रूममध्ये ठेवलं होतं."
"एकदा मी त्यांना विचारलं की, आता संजय गांधी गेले. कुणाला त्यांच्याविषयी बोलावं वाटत नाही आणि तुम्ही त्यांचं चित्र लावून ठेवलं आहे.
त्यावर कमलनाथांचं उत्तर होतं, "इंदिरा गांधी माझ्या पंतप्रधान आहेत. पण संजय माझे नेते आणि मित्रही होते. काही लोकांना त्यांच्याबद्दल एक प्रकारची अंधभक्ती आणि स्नेह होता."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)









