का उतरले आहेत शरद पवार मैदानात?

शरद पवार

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, अभिजीत कांबळे
    • Role, बीबीसी मराठी

आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस. पवारांनी हा वाढदिवस साजरा केला आहे राज्य सरकारविरोधात आंदोलन करून! हिवाळी अधिवेशनादरम्यान सरकारविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादीनं नागपूरमध्ये काढलेल्या 'हल्ला बोल' मोर्चाचं नेतृत्व खुद्द शरद पवार यांनी केलं आहे.

1996 मध्ये शरद पवार लोकसभेवर निवडून गेल्यापासून ते पुन्हा विधानसभेत परतलेले नाहीत. तेव्हापासून ते देशपातळीवरील राजकारणात सक्रिय आहेत. 2004 पासून राज्य सरकारच्या कारभारावर ते बोलत असले, तरी ते प्रत्यक्ष आंदोलनात वगैर उतरले नव्हते. मात्र आता थेट शरद पवार मैदानात उतरले आहेत.

पवारांच्या या मैदानातल्या एंट्रीचं अनेकांना आश्चर्य वाटलं आहे. स्वतः शरद पवारांना मैदानात का उतरावं लागलं, असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जातोय.

राष्ट्रवादीची दुसरी फळी प्रभावहीन?

राज्य सरकारच्या विरोधातल्या मोर्चाचं नेतृत्व पक्षाच्या राज्य पातळीच्या नेतृत्वाने का करू नये, असा स्वाभाविक प्रश्न अनेकांच्या मनात येईल. राज्य पातळीवर सर्वांना मान्य होईल आणि जनतेतूनही पाठिंबा मिळेल असं नेतृत्व राष्ट्रवादीत नाही काय?

महाराष्ट्र टाइम्सचे दिल्लीतील वरिष्ठ सहाय्यक संपादक सुनील चावके यांच्यानुसार, "शरद पवारांना स्वत: मैदानात उतरावं लागतंय, याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी फळी विश्वासार्ह राहिलेली नाही. शरद पवारांनी 1999 मध्ये राष्ट्रवादीची स्थापना केली. त्यावेळी त्यीनी नेतृत्वाची नवी फळी निर्माण केली. मात्र 15 वर्षं महाराष्ट्रात सत्तेत राहिल्यानंतर ही फळी विश्वासार्ह राहिली नाही."

शरद पवार सभा

फोटो स्रोत, GAJANAN UMATE/BBC

"काही नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. या परिस्थितीत शरद पवार हे राष्ट्रवादीचे एकमेव विश्वासार्ह नेते राहिले आहेत. अर्थात पवारांना याबाबत आत्मपरीक्षण करावं लागेल की ही वेळ का आली?"

राजकीय अपरिहार्यता?

पवारांच्या अचानक आक्रमक होण्याचे इतरही अनेक संदर्भ असल्याचं मानलं जात आहे. राज्य सरकारविरोधात थेट रस्त्यावर उतरण्यात पवारांचा राजकीय हेतू काय आहे?

'लोकमत'चे समूह संपादक दिनकर रायकर पवारांच्या या भूमिकेचं विश्लेषण करताना सांगतात की, "शरद पवारांना या वयात रस्त्यावर उतरून मोर्चाचं नेतृत्व करावं लागतंय याचं कारण राजकीय अपरिहार्यता हेच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचं अस्तित्व दाखवून देण्यासाठी, पक्ष जिवंत ठेवण्यासाठी पवारांना मोर्चाचं नेतृत्व करत मैदानात उतरावं लागत आहे. एकप्रकारे राष्ट्रवादीसाठी ही अस्तित्वाची लढाई असल्यानंच पवार रणांगणात उतरले आहेत."

"वय झालं असलं तरी मी थकलेलो नाही, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी रस्त्यावर उतरून लढू शकतो, हा संदेशही पवारांना द्यायचा आहे," असंही रायकर सांगतात.

भाजपच्या विरोधात असल्याचा संदेश?

2019 साली होणाऱ्या निवडणुकांआधी शरद पवारांना भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेण्याची गरज आहे, असं राजकीय निरीक्षक मानतात. भाजपला राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मदत केली होती. मोदी शरद पवारांची वारंवार स्तुती करत असतात. त्यामुळे ते प्रभावीपणे विरोधी पक्ष म्हणून लोकांसमोर उभे राहू शकत नाहीयेत का?

शरद पवार सभा तयारी

फोटो स्रोत, Gajanan Umate/BBC

"शरद पवारांची भाजपशी जवळीक उघडच आहे. म्हणून त्यांना हे दाखवून द्यायचं आहे की भाजप विरोधात आम्ही टक्कर देत आहोत. स्वतः मोर्चाचं नेतृत्व करून भाजपच्या विरोधात भूमिका घेत असल्याचा संदेश देण्याचा पवारांचा प्रयत्न आहेच," दिनकर रायकर सांगतात.

निवडणुकांची तयारी?

दीड वर्षांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. पवारांच्या याच वेळी आक्रमक होण्याचा संबंध निवडणुकांशी तर नाहीये?

'इंडियन एक्स्प्रेस'च्या सीनियर एडिटर शुभांगी खापरे यांनी याबाबत विश्लेषण करताना म्हटलं आहे, "2014 मध्ये महाराष्ट्रातील जनतेनं काँग्रेससोबतच राष्ट्रवादीलाही नाकारले. अजूनही जनता राष्ट्रवादीला स्वीकारेल अशी परिस्थिती दिसत नाही."

"2019 च्या निवडणुकांचा विचार केला तर राष्ट्रवादीसमोर मोठं आव्हान आहे. पक्षाची बांधणी नव्यानं करण्याचंही आव्हान राष्ट्रवादीसमोर आहे. या आव्हानांवर मात करायची तर शरद पवारांनाच आक्रमक भूमिका घ्यावी लागेल", असं त्या सांगतात.

शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीर

शरद पवारांची सुरुवातीची ओळख 'शेतकऱ्यांचा नेता' अशीच होती. आता शेतकऱ्यांच्या समस्या घेऊन पवार मैदानात उतरले आहेत.

शरद पवार सभा

फोटो स्रोत, GAJANAN UMATE/BBC

ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक प्रताप आसबेंच्या मते, "शरद पवार स्वत: रस्त्यावर उतरत आहेत कारण कृषी क्षेत्रातील परिस्थिती अतिशय गंभीर असल्याचं त्यांना वाटत असणार. मात्र गेल्या 3 वर्षांत कृषी क्षेत्राची परिस्थिती बिकट झाली आहे.

हमीभावासारख्या मागण्या मान्य झाल्या नाहीत. उलट 'लव्ह जिहाद' किंवा गोहत्या या गोष्टींवर लोकांचं लक्ष वळवून ध्रुवीकरण केलं जातंय. अशा परिस्थितीत सर्व शक्ती पणाला लावली पाहिजे, असं वाटूनच 78 व्या वर्षी पवार रस्त्यावर उतरले आहेत."

इतक्या दीर्घ कालावधीनंतर शरद पवारांसारखा नेता आंदोलनात उतरतो ही राज्याच्या राजकारणातील महत्त्वाची घडामोड आहे. पवार आता राज्यात पूर्णपणे सक्रिय होणार, असाही याचा अर्थ मानला जातोय.

हे वाचलं का?

हे पाहिलं का?

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : मंगळाचं रहस्य उलगडेल हे पृथ्वीवरचं सर्वात तरुण बेट

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)