शरद पवारांबद्दलच्या या 5 गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

फोटो स्रोत, Gettyimages
- Author, प्राजक्ता धुळप
- Role, बीबीसी मराठी
भारतीय राजकारणातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा आज 77वा वाढदिवस. यशवंतराव चव्हाणांचा राजकीय वारसा सांगणारे शरद पवार गेली सात दशकं राजकारणात सक्रिय आहेत. राजकारणाखेरीज साहित्य, शिक्षण, सांस्कृतिक, क्रीडा अशा अनेक क्षेत्रांमध्ये ते लीलया वावरतात.
12व्या महिन्याच्या 12 तारखेला जन्माला आलेल्या पवारांबद्दलच्या या 5 इंटरेस्टिंग गोष्टी:
1. ... आणि घाशीराम जर्मनीत पोहोचला
ज्येष्ठ नाट्यकर्मी विजय तेंडुलकर यांनी लिहिलेलं आणि डॉ. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेलं 'घाशीराम कोतवाल' हे नाटक जोरदार गाजलं. 80 च्या दशकात या नाटकाचा प्रयोग जर्मनीत होणार होता. पण या नाटकाला काहींचा विरोध होता.
नाटकात काम करणारी अनके मंडळी पुण्यात राहत होती. जर्मनीला विमानाने जाण्यासाठी त्यांना मुंबईचा प्रवास करणं आवश्यक होतं.
विरोध करणाऱ्यांनी शिवसेनेच्या मदतीने पुणे-मुंबई रस्त्यावर खोपोलीजवळ गाड्या अडवण्याची योजना आखली. पण ही माहिती अगोदर नाटकातील मंडळीना कळल्यामुळे डॉ. जब्बार पटेल आणि डॉ मोहन आगाशे यांनी पुण्यात शरद पवारांची भेट घेतली.
किर्लोस्कर समूहाचे चंद्रकांत किर्लोस्कर यांच्याशी पवारांचे मैत्रीचे संबंध होते. पवारांनी किर्लोस्करांना अडचण सांगितली आणि ताबडतोब 'घाशीराम कोतवाल'च्या टीमसाठी पुणे-मुंबई चार्टर विमानाची सोय केली.
2. पवार जेव्हा पूजा करतात...
मी विज्ञानवादी आहे, असं म्हणणाऱ्या शरद पवारांना जाहीरपणे पूजा-आरत्या करताना कुणी फारसं पाहिलं नाही. पण मुख्यमंत्री असताना त्यांनी सपत्निक विठ्ठल-रखुमाईची पूजा केली होती.
अनेकदा जाहीरपणे देव-धर्माबद्दल चिकित्सकपणे पवार बोलतात. पण तेच पवार आग्रहास्तव पूजाअर्चाही करतात. भीमाशंकरच्या गेस्टहाऊसमध्ये रात्री झोपलेले असताना पवारांच्या अंगावरून साप गेला. पण त्यांना काहीही इजा झाली नाही. त्यानंतर पत्नी प्रतिभाताई या भीमाशंकरच्या मंदिरात नवस बोलल्या आणि त्यांच्या आग्रहास्तव शरद पवारांनी भीमाशंकरला अभिषेक घातला होता, असं पत्रकार संजय मिस्कीन सांगतात.
पवारांच्या गावी म्हणजे काटेवाडीत हनुमानाचं मंदिर आहे, तिथेही गावकऱ्यांच्या आग्रहास्तव अनेक वर्षं ते अभिषेक करत होते.
3. 'पुतना मावशी'ची माफी
शरद पवार 1987 साली पुन्हा काँग्रेसमध्ये आले आणि 1988 साली ते महाराष्ट्राचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. त्यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या 285 भूखंडांच्या भ्रष्टाचाराचं प्रकरण खूप गाजलं.
हे भूखंड खाल्ल्याचा आरोप थेट शरद पवारांवर होता. जनता दलाच्या नेत्या मृणाल गोरे आणि शिवसेनेचे त्यावेळचे आमदार छगन भुजबळ यांनी पवारांवर हा आरोप केला होता. भूखंडाची आरक्षणं कशी वाटली गेली आणि बदलली गेली, याविषयी पवारांनी जाहीरपणे खुलासा केला नव्हता.
मृणाल गोरे यांनी भूखंड घोटाळ्याविषयी विधानसभेत आरोप केला, तेव्हा शरद पवार यांनी संतापून त्यांना 'पुतना मावशी' असं म्हटलं. पण नंतर पवारांनी मृणाल गोरेंची माफीही मागितली. या घोटाळ्यावरचे आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत.
4. लेक माझी लाडकी!
शरद पवार आणि प्रतिभा पवार यांनी लग्नानंतर एकच मूल होऊ देण्याचा निर्णय घेतला होता. 1969ला त्यांना मुलगी झाली. खरंतर त्या काळात 'मुलगा हवाच' अशी समाजाची कर्मठ मानसिकता होती.

फोटो स्रोत, AFP
पण जवळपास पाच दशकांपूर्वी पवारांचा हा निर्णय काळाच्या पुढचा होता. आजही कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रिया बहुतांश महिलाच करतात. पण शरद पवारांनी स्वत: नसबंदी करत आदर्श घालून दिला.
5. 'IPLचे जनक'
T-20 स्पर्धा भारतात होऊ शकते, असं BCCIचे अध्यक्ष असताना शरद पवारांना वाटलं. त्यासाठी त्यांनी ललित मोदींना प्रोत्साहन दिलं.

फोटो स्रोत, SAJJAD HUSSAIN
भारतामध्ये IPL सुरू झालं याचं श्रेय खरं शरद पवार यांनाच द्यावं लागेल, असं रवी शास्त्री यांनी दिलीप सरदेसाई स्मृती व्याख्यानात म्हटलं होतं. IPL सुरू करण्यासाठी ललित मोदींनी प्रयत्न केले, पण त्याला शरद पवारांचं पाठबळ मिळालं नसतं, तर हे केवळ अशक्य होतं, असं शास्त्री म्हणाले. शरद पवार हे 2005 ते 2008 या काळात BCCIचे अध्यक्ष होते.
'IPLसंदर्भात होणाऱ्या प्रत्येक बैठकीला शरद पवार आपल्या हातात फायलींचा गठ्ठा घेऊन येत असत. त्यातील प्रत्येक पान त्यांनी वाचलेलं असे. त्यांचा अभ्यास पाहून मला आश्चर्याचा धक्का बसला. त्यांचं निरीक्षण हे सूक्ष्म आणि दृष्टी व्यापक असल्यामुळेच भारतात IPL सुरू झालं' असं रवी शास्त्री यांनी या व्याख्यानात म्हटलं होतं.
संबंधित बातम्या:
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








