सीआयएसाठी काम करणाऱ्या 'रॉ'च्या डबल एजंटची हेरगिरी अशी झाली होती उघड...

फोटो स्रोत, SOCIAL MEDIA
एप्रिल 2004 मधली घटना...
'रॉ' या भारताच्या गुप्तचर संस्थेच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ ऑफिस संपल्यानंतर घरी जाणाऱ्यांची मोठी रांग लागली होती. कारण विचारल्यावर कळलं की, घरी जाणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या ब्रिफकेसची तपासणी सुरू आहे.
'रॉ'च्या 35 वर्षांच्या इतिहासात असं यापूर्वी कधीच घडलं नव्हतं. संरक्षण खात्याशी संबंधित संस्था आणि सैन्य मुख्यालयात एक-दोन महिन्यांमधून एखादवेळी अशी झाडाझडती व्हायची.
मात्र, ही झाडाझडती कोणत्याही एका व्यक्तीला लक्ष करून घेण्यात आलेली नाही, असं पुढच्याच साप्ताहिक बैठकीत 'रॉ' प्रमुख सी. डी. सहाय यांनी स्पष्ट केलं.
या कारवाईचा उद्देश केवळ रॉची सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करणे, एवढाच होता. या बैठकीला 'रॉ'चे संयुक्त सचिव रबिंदर सिंहदेखील हजर होते.
मात्र, ते भलतेच चिडले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वागण्याची ही पद्धत नाही, असं जोरजोरात ओरडतच ते बाहेर आले.
खरंतर रबिंदर सिंह यांच्यासाठीच ही संपूर्ण कवायत करण्यात आल्याचं 'रॉ - अ हिस्ट्री ऑफ इंडियाज कॉवर्ट ऑपरेशन्स' या नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तकाचे लेखक यतिश यादव सांगतात.
त्या दिवशी त्यांच्या ड्रायव्हरकडून त्यांना कळलं होतं क, गेटवरच सर्वांच्या ब्रिफकेसची तपासणी सुरू आहे. जेव्हा रबिंदर सिंह यांची ब्रिफकेस उघडण्यात आली तेव्हा त्यात काहीच आक्षेपार्ह आढळलं नव्हतं.
रबिंदर सिंह यांच्यावर 'रॉ'ची पाळत
रबिंदर सिंह गेल्या अनेक वर्षांपासून सीआयए (सेंट्रल इंटेलिजन्स एजेंसी) या अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेसाठी डबल एजेंट म्हणून काम करत होते. ते भारताची गुप्त माहिती अमेरिकेपर्यंत पोहोचवायचे.
मात्र, 'रॉ'ची काउंटर इंटेलिजंस युनिट त्यांच्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून पाळत ठेवून असल्याची त्यांना अजिबात खबर नव्हती. त्यांच्या घरासमोर फळं विकणारी, दाढी असलेली प्रौढ व्यक्ती 'रॉ' एजेंट आहे, याची त्यांना जराही कल्पना नव्हती. इतकंच नाही तर त्यांचा ड्रायव्हरचं त्यांची सर्व खबर संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवत होता.
रबिंदर सिंह अमृतसरमधल्या एका जमीनदार कुटुंबातले होते.

ते जाट शिख समाजाचे होते. पण, त्यांनी आपले केस कापले होते. भारतीय सैन्यात अधिकारी पदावर त्यांची नियुक्ती झाली होती. सैन्यात असतानाच त्यांनी 'ऑपरेशन ब्लू स्टार'मध्ये भाग घेतला होता. यानंतर काही काळातच त्यांना 'रॉ'मध्ये प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात आलं होतं.
'रॉ'मध्ये काम केलेले निवृत्त मेजर जनरल विनय कुमार सिंह त्यांच्या 'इंडियाज एक्स्टर्नल इंटेलिजंस - सिक्रेट्स ऑफ रिसर्च अँड अॅनालिसिस विंग' या पुस्तकात लिहितात, "संपूर्ण कारकिर्दीत रबिंदर यांचे वरिष्ठ तसंच त्यांचे सहकारी त्यांना एका सामान्य अधिकारी मानायचे."
"सुरुवातीला त्यांना अमृतसरमध्ये पोस्टिंग देण्यात आली होती. तिथे त्यांना सीमेपार पाकिस्तान आणि आयएसआयकडून शीख फुटिरतावाद्यांना देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाविषयी माहिती गोळा करण्याची जबाबदारी देण्यात आली होती.
यानंतर आधी त्यांना पश्चिम आशिया आणि त्यानंतर हॉलंडमधल्या हेग शहरात नियुक्त करण्यात आलं. तिथेसुद्धा त्यांना शीख कट्टरपंथीयांच्या कारवायांवर लक्ष ठेवण्याचं काम देण्यात आलं होतं."
'रॉ'चे प्रमुख म्हणून निवृत्त झालेले ए. एस. दुलत यांनीदेखील त्यांच्या 'काश्मीर, द वाजपेयी इअर्स' या पुस्तकात म्हटलं आहे, "भारतीय विमानाचं अपहरण करणाऱ्या हाशिम कुरैशीने मला सांगितलं होतं की, हॉलंडमध्ये रबिंदर अत्यंत खराब अधिकारी म्हणून ओळखले जायचे."
"स्त्री लंपट आणि व्यसनी अशी त्यांची प्रतिमा होती. ते खूप फुशारक्याही मारायचे. त्यामुळे बरेचदा अनोळखी लोकांसमोरही बरंच काही बोलून जायचे जे त्यांनी बोलायला नको."
सत्तरच्या दशकापासूनच सीआयए भारतात सक्रीय
सीआयए सत्तरच्या दशकापासूनच भारतात आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत असल्याचं गुप्तचर विभागामध्ये लपून राहिलेलं नाही.
थॉमस पॉवर्स यांनी सीआयए प्रमुख रिचर्ड हेल्म्स यांच्यावर 'द मॅन हू केप्ट द सिक्रेट्स' हे पुस्तक लिहिलं आहे. 1971 साली इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळात एक सीआयए एजंट असल्याचे थेट संकेत त्यांनी या पुस्तकात दिले आहेत.
इतकंच नव्हे तर सुप्रसिद्ध स्तंभलेखक जॅक अँडरसन यांनीही हे म्हटलं आहे. वॉशिंग्टन पोस्टमध्ये 22 नोव्हेंबर 1979 च्या अंकात 'हू वॉज द सीआयए एजंट इन इंदिरा गांधी कॅबिनेट' या शीर्षकाखाली छापून आलेल्या लेखात यासंबंधी अनेक अंदाज बांधण्यात आले होते.

फोटो स्रोत, PUBLICATION
1998 साली भारताने अणुचाचणी केली. यावरूनही सीआयएची बरीच नाचक्की झाली होती. या चाचणीसंबंधी सीआयएने अमेरिकन सरकारला पूर्वकल्पना दिली नाही, असे आरोप करण्यात आले होते.
त्याकाळी हे अमेरिकेचं सर्वात मोठं 'गुप्तचर अपयश' मानलं गेलं होतं. तेव्हा भारतातल्या शीर्ष स्थानावर अमेरिकी गुप्तचर यंत्रणेचा एखादा हेर असायला हवा आणि त्या एजेंटद्वारे भारताची गुप्त माहिती अमेरिकेला मिळायला हवी, याची प्रकर्षाने गरज भासू लागली.
90 च्या दशकात हॉलंडच्या भारतीय दूतावासात कौन्सिलर म्हणून काम करताना सीआयएने रबिंदर सिंह यांना भरती केलं असावं, असं भारतीय गुप्तचर विभागातल्या सूत्रांना वाटतं.
सहकाऱ्यांना महागड्या हॉटेलमध्ये मेजवानी
'रॉ'मध्ये विशेष सचिव स्तरावरील अधिकारी म्हणून काम केलेले आणि रबिंदर सिंह यांच्यावर पाळत ठेवणारे अमर भूषण यांनी पुढे या घटनेवर आधारित एक कादंबरी लिहिली होती. या कादंबरीचं नाव होतं 'एस्केप टू नो व्हेअर'.
या पुस्तकात त्यांनी लिहिलं आहे, "संशयित (रबिंदर सिंह) दुसऱ्या विभागात काम करणाऱ्या ज्युनिअर ऑपरेशन डेस्क सांभाळणाऱ्या रॉ अधिकाऱ्यांकडून माहिती काढण्याच्या प्रयत्नात असायचा."

फोटो स्रोत, PUBLICATION
"ते त्यांना आपल्या खोलीत किंवा घरी किंवा मग महागड्या हॉटेलमध्ये मेजवानी द्यायचे. 1992 साली नैरोबीच्या पोस्टिंगदरम्यान रबिंदर यांना हृदयविकाराचा त्रास सुरू झाला. मात्र, बायपास सर्जरीसाठी त्यांच्याजवळ पैसे नव्हते.
अमेरिका आणि कॅनडामधल्या मित्रांकडून मदत मिळाल्यानंतरच व्हिएन्नामधल्या एकेएच हॉस्पिटलमध्ये त्यांचं ऑपरेशन करण्यात आलं. कुठल्यातरी परदेशी गुप्तचर संस्थेने हे पैसे पुरवल्याचं कळलं तर मला आश्चर्य वाटणार नाही."
सिक्युअर इंटरनेट प्रोटोकॉलचा वापर
रबिंदर सिंह यांच्यावर जेव्हापासून पाळत ठेवण्यात आली तेव्हापासून रॉचे गुप्तहेर रबिंदर इतर अधिकाऱ्यांशी जे काही बोलायचे ते ऐकत.
यतीश यादव सांगतात, "रबिंदर यांच्या कामाची पद्धत अत्यंत साधारण होती. ते गुप्त अहवाल घरी न्यायचे. त्यानंतर अमेरिकेने दिलेल्या महागड्या कॅमेऱ्यातून त्या अहवालाचे फोटो काढायचे. सर्व फायली एका बाहेरच्या हार्ड डिस्कमध्ये स्टोअर करायचे आणि सिक्युअर इंटरनेट प्रोटोकॉलच्या माध्यमातून आपल्या हँडलर्सना सर्व कागदपत्रं पुरवायचे. त्यानंतर ती हार्ड डिस्क आणि आपल्या दोन लॅपटॉपमधून सर्व फाईल्स डिलेट करायचे. रबिंदर सिंहने जवळपास 20 हजार कागदपत्रं अशा प्रकारे बाहेर पाठवली होती."
रबिंदर वर्षातून किमान दोन वेळा नेपाळला जायचे. यावरूनही 'रॉ'ला संशय आला होता.

फोटो स्रोत, Getty Images
'रॉ'कडे याचे पुरेसे पुरावे होते की, रबिंदर या नेपाळ ट्रिपच्या माध्यमातून काठमांडूमधल्या अमेरिकन अधिकाऱ्यांना विशेषतः सीआयएच्या स्टेशन चीफला भेटायचे. हे सीआयए स्टेशन चीफ त्यावेळी काठमांडूमधल्या अमेरिकी दूतावासात काउंसलर इकॉनॉमिक अफेअर्सच्या कव्हरमध्ये काम करायचे.
मेजर जनरल विनय कुमार सिंह आपल्या 'इंडियाज एक्स्टर्नल इंटेलिजन्स' या पुस्तकात लिहितात, "रबिंदर बरेचदा ऑफिसमधल्या आपल्या केबिनचं दार बंद करून गुप्त कागदपत्रांची फोटोकॉपी करताना आढळले होते. अमेरिकेत राहणाऱ्या आपल्या मुलीच्या साखरपुड्यासाठी अमेरिकेला जायची परवानगी त्यांनी मागितली होती. मात्र, रॉ प्रमुखांनी ही विनंती अमान्य केली होती."
परदेशातली 'रॉ' एजंट्सची नावं सीआयएला दिली
रबिंदर यांनी जो दगा दिला त्याने भारताचं किती नुकसान झालं? हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
एका गुप्त सूत्राचं म्हणणं आहे की, रबिंदर पळून गेल्यानंतर जो तपास करण्यात आला त्यावरून असं कळलं की, त्यांनी आपल्या हँडलर्सना परदेशात काम करणाऱ्या रॉ एजेंट्सची एक यादी दिली होती.
'रॉ'च्या काउंटर इंटेलिजन्स युनिटने पुढे जो तपास केला त्यावरून असं आढळलं की, रबिंदर यांनी सीआयएच्या आपल्या हँडलर्सना कमीत कमी 600 ई-मेल पाठवले होते. शिवाय, वेगवेगळ्या ई-मेल आयडीवरून त्यांनी देशातली माहिती बाहेर पुरवली होती.
रबिंदर यांचं पितळ उघडं पडल्यानंतरही 'रॉ' अधिकारी रबिंदर यांना जाणीवपूर्वक गुप्त माहिती पुरवत होते का?

फोटो स्रोत, Getty Images
के. के. शर्मा असं कोडनेम असणाऱ्या 'रॉ'च्या एका अधिकाऱ्याने यतीश यादव यांना सांगितलं होतं की, जानेवारी 2004 पासून एप्रिल 2004 दरम्यान एजेंसीच्या 55 हून जास्त अधिकाऱ्यांनी या डबल एजंटला गुप्त माहिती पुरवली होती.
मेजर जनरल विनय कुमार सिंह लिहितात, "रबिंदर यांना जाणीवपूर्वक रॉच्या मॉनिटरिंग स्टेशनने इस्लामाबादमध्ये अमेरिकी मिशनकडून इंटरसेप्ट करण्यात आलेली माहिती पुरवली. रबिंदरने अशाच प्रकारची अधिक माहिती मागितली तेव्हा 'रॉ'चा त्यांच्यावरचा संशय अधिक बळावला."
पाळत ठेवली जात असल्याची खबर लागल्यावर
भारतातून पलायन करण्याच्या दोन आठवड्यांपूर्वी रबिंदर यांना आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचं कळलं होतं.
यतीश यादव सांगतात, "ते 'रॉ'च्या सुरक्षा युनिटला म्हणाले होते की, त्यांचं ऑफिस स्वीप करावं. जेणेकरून त्यांच्या ऑफिसमध्ये लावण्यात आलेली गुप्त उपकरणं शोधून काढता यावी. ज्या रात्री रबिंदर सिंह नेपाळला पळाले त्यांच्या घराबाहेर पाळत ठेवून असलेल्या रॉच्या पथकाने त्यांच्या पत्नीला घरातून बाहेर पडताना बघितलं. त्यानंतर त्यांच्या पत्नी एका परिचित मित्रासोबत घरी परतल्या. तो मित्र रात्रीच्या जेवणानंतर घरी परतला. 'रॉ'च्या टीमने रबिंदर आणि त्यांच्या पत्नीला घरातून बाहेर पडताना बघितलं नाही."

"दुसऱ्या दिवशी सकाळी घरात कुठलीच हालचाल दिसली नाही आणि त्यानंतर धावपळ सुरू झाली. पत्र देण्याच्या बहाण्याने 'रॉ'चे गुप्तहेर घरात घुसले तेव्हा घरातल्या नोकराने सांगितलं की, एका लग्नासाठी दोघंही पंजाबला गेले आहेत."
बाय रोड नेपाळ तिथून अमेरिका
पुढे 'रॉ'ला कळलं की, रबिंदर आणि त्यांच्या पत्नी परमिंदर बाय रोड नेपाळला गेले.

फोटो स्रोत, R K YADAV
'रॉ'वर 'मिशन रॉ' हे आणखी एक पुस्तक लिहिणारे आर. के. यादव सांगतात, "रबिंदर आणि त्यांच्या पत्नीला त्यांच्या एका नातेवाईकाने कारमध्ये बसवून नेपाळला पोहोचवलं होतं. 'रॉ'ला हे शोधून काढण्यात यश आलं की, भारतीय सीमेजवळच्या नेपालगंजमधल्या ज्या हॉटेलमध्ये हे जोडपं उतरलं होतं त्या हॉटेलचं बिल काठमांडूमधल्या सीआयएचे स्टेशन चीफ डेव्हिड वसाला यांनी भरलं होतं. इतकंच नाही तर त्यांच्यासाठी रुमदेखील वसाला यांच्याच नावाने बुक करण्यात आली होती.
नेपालगंजमधल्या 'स्नेहा' या हॉटेलमध्ये ते दोघं थांबले होते. तिथून काठमांडूमधल्या सीआयएच्या सेफ हाउसमध्ये दोघांना शिफ्ट करण्यात आलं होतं. तिथेच त्यांना राजपाल प्रसाद शर्मा आणि दीपा कुमार शर्मा या नावाने दोन अमेरिकी पासपोर्ट देण्यात आले. 7 मे 2004 रोजी हे दोघंही वॉशिंग्टनला जाणाऱ्या ऑस्ट्रियन एअरलाइंसच्या फ्लाईट नंबर 5032 मधून रवाना झाले."
ब्रजेश मिश्रांमुळे अटकेला उशीर
'रॉ'च्या अधिकाऱ्यांनी तत्कालीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ब्रजेश मिश्र यांना रबिंदरला अटक करण्याची परवानगी मागितली होती. मात्र, त्यांनी यावर तात्काळ निर्णय घेतला नाही, असं म्हटलं जातं.

फोटो स्रोत, Getty Images
यतीश यादव सांगतात, "असं वाटतं जणू मिश्रा रबिंदरपासून पिच्छा सोडवू इच्छित होते आणि तो स्वतःहूनच इथून निघून जावा, अशी त्यांची इच्छा होती. त्यावेळी भारतात निवडणुका होत्या. अशावेळी 'रॉ'मध्ये सीआयएचा गुप्तहेर असल्याची बातमी सरकारला राजकीय नुकसान करणारी ठरू शकली असती. त्यांनी रबिंदर हेरगिरी करत असल्याबाबत आणि त्यांच्या अमेरिकी हँडलर्सची अधिक माहिती मागितली. कदाचित ही घोडचूक होती."
या घटनेनंतर हा प्रश्नही विचारण्यात आला की एखादी व्यक्ती कुठल्यातरी परदेशी सरकारसाठी हेरगिरी करत असल्याचं कळाल्यानंतर 'रॉ'ला त्याच्या अटकेसाठी सरकारकडून परवानगी घेण्याची गरजच काय?
सीआयएने फेटाळले आरोप
मे महिन्याच्या मध्यात 'रॉ' प्रमुख सी. डी. सहाय यांनी दिल्लीत सीआयएच्या स्टेशन चीफला बोलावलं आणि रबिंदर अमेरिकेला पळून गेल्याबाबत अमेरिकी सरकारला काही माहिती आहे का, अशी विचारणा केली.
अपेक्षेप्रमाणेच अमेरिकेने रबिंदर किंवा त्यांच्या पत्नीसंबंधी कुठलीही माहिती नसल्याचं सांगितलं.
'रॉ'चा अधिकारी सीआयएच्या संपर्कात असल्याचाही त्यांनी इनकार केला. गुप्तहेरांच्या दुनियेत ही परंपरा आहे की, पकडले गेल्यानंतर त्यांचे हँडलर्स जी व्यक्ती त्यांच्यासाठी काम करायची तिला ओळखही दाखवत नाहीत.

फोटो स्रोत, R K YADAV
5 जून 2004 रोजी राष्ट्रपतींनी राज्यघटनेच्या कलम 311 (2) अंतर्गत रबिंदर सिंह यांना नोकरीवरून बडतर्फ केलं. या कलमांतर्गत राष्ट्रपतींना राष्ट्रहितासाठी कुठल्याही प्रकारची विभागीय चौकशी न करता केंद्र सरकारच्या कुठल्याही अधिकाऱ्याला नोकरीवरून काढून टाकण्याचा अधिकार आहे.
मी यतीश यादव यांना विचारलं की, रबिंदर सिंह एक प्रकारे आपलं घर पूर्णपणे खुलं सोडून अचानकच अमेरिकेला पळून गेले, हे विचित्र वाटत नाही का?
यतीश यादव म्हणतात, "हेरगिरीच्या दुनियेत पकडले गेल्यानंतर पळून जाण्यासाठी तुमच्याकडे काही तास किंवा मिनिटांचाच अवधी असतो. त्यावेळी तुम्ही काय सोडून जात आहात, हे बघितलं जात नाही. शिवाय, तुमचं जे काही नुकसान होतं त्याची भरपाई देण्यासाठी हँडलर्स तयार असतात."
रबिंदर सिंहचा मृत्यू
'रॉ'च्या इतिहासातलं हे अप्रिय प्रकरण काही काळासाठी दफन करण्यात आलं होतं. मात्र, रबिंदरला कधीही क्षमा करण्यात आली नाही.
यतीश यादव सांगतात, "2016 सालच्या शेवटी वॉशिंग्टनहून एका डिप्लोमॅटिक बॅगमध्ये एक कोडेड मेसेज आला. डबल एजंट रबिंदर सिंहचा मृत्यू झाल्याचं त्यात सांगण्यात आलं होतं. पुढे ही माहिती मिळाली की, मेरीलँडमधल्या एका रस्ते अपघातात रबिंदरचा मृत्यू झाला. हेसुद्धा कळालं की, काठमांडूमार्गे अमेरिकेला गेल्यानंतर काही महिन्यातच सीआयएने रबिंदरला सोडलं होतं."
रबिंदर यांचे शेवटचे दिवस खूप हलाखित गेले. सीआयएने त्यांना मदत करणं बंद केल्याने त्यांच्याकडे पैसा अजिबात नव्हता. सीआयएच्या एका माजी उपसंचालकाद्वारे चालवण्यात येणाऱ्या एका थिंक टँकमध्ये नोकरी मिळवण्याचाही त्यांनी प्रयत्न केला होता. मात्र, त्यातही त्यांना यश आलं नाही.
देशाविरोधात हेरगिरी केल्यानंतर रबिंदरने आयुष्याची शेवटची 12 वर्षं न्यूयॉर्क, वर्जिनिया आणि मेरीलँडमध्ये अत्यंत गरिबीत घालवली.
'रॉ' ने रबिंदर सिंहवर एवढी बारकाईने पाळत ठेवूनही ते पळून गेले. याकडे अपयश म्हणून बघितलं जातं. मी यासंबंधी या प्रकरणाशी संबंधित 'रॉ'च्या कमीत कमी 5 वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या सर्वांनीच या प्रकरणावर बोलायला नकार दिला.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








