मोरारजी देसाई यांना मिळाला होता पाकिस्तानचा सर्वोच्च सन्मान

मोरारजी देसाई
फोटो कॅप्शन, मोरारजी देसाई
    • Author, रेहान फझल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी, दिल्ली

माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांचा आज जन्मदिवस. यानिमित्ताने त्यांच्या कारकीर्दीचा घेतलेला वेध.

खूप वर्षांपूर्वी नेहरूंचे सचिव एम. ओ. मथाई त्यांच्या एका मित्रासोबत कुतुबमिनार पाहायला गेले होते.

त्या मित्राने कुतुहलाने मथाईंना विचारलं, 'मोरारजी देसाई माणूस म्हणून कसे आहेत?' मथाई म्हणाले, "हा समोर लोखंडाचा खांब दिसतोय ना, त्याला फक्त गांधी टोपी घातलीत की, तुमच्या समोर मोरारजी देसाई साकार होतील... शरीराने आणि डोक्याने... दोन्ही अर्थांनी ते असेच साधे, परखड आणि कठोर आहेत."

'पुरुषोत्तमदास टंडन आणि मोरारजी देसाई ही भारतीय राजकारणातील आपल्याला भेटलेली दोन सर्वांत परखड माणसं आहेत,' असं नेहरूंनी एकदा मथाईंना सांगितलं होतं.

१९७७ ते १९७९ या कालावधीत भारताचे पंतप्रधान राहिलेले मोरारजी देसाई त्यांच्या कठोर गांधीवादी विचारांसाठी प्रसिद्ध होते आणि त्यांचा प्रामाणिकपणाही असाच टोकाचा होता.

एकदा त्यांच्यावर उजव्या विचारसरणीचे / राइटिस्ट असल्याचा आरोप करण्यात आला, तेव्हा ते हसून म्हणाले होते, "होय, मी राइटिस्ट आहे, कारण आय बिलिव्ह इन डुइंग थिंग्ज राइट."

रेहान फझल यांनी केलेलं विश्लेषण

भारतामध्ये राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगणं फारसं चांगलं मानलं जात नाही, किमान सार्वजनिक स्तरावर तर नाहीच. पण मोरारजीभाईंनी पंतप्रधान होण्याची स्वतःची इच्छा कधीही लपवली नाही.

नेहरूंच्या निधनानंतर विख्यात पत्रकार कुलदीप नय्यर लालबहादूर शास्त्रींचा संदेश घेऊन मोरारजी देसाईंकडे गेले. जयप्रकाश नारायण किंवा इंदिरा गांधी यांच्यापैकी एका नावावर सहमती होणार असेल, तर मी पंतप्रधानपदाची निवडणूक लढवणार नाही, असं शास्त्रांनी म्हटलं होतं.

लाल बहादुर शास्त्री

नय्यर यांनी शास्त्रींचा संदेश मोरारजी देसाईंपर्यंत पोचवला, तेव्हा मोरारजी तत्काळ म्हणाले, "जयप्रकाश नारायण? तो तर गोंधळलेला माणूस आहे... आणि इंदिरा गांधी? दॅट चिट ऑफ अ गर्ल!"

मोरारजींचे पुत्र कांती देसाई नय्यर यांना म्हणाले, "तुमच्या शास्त्रीजींना जरा थांबायला सांगा. मोरारजी देसाईंना ते हरवू शकणार नाहीत."

कुलदीप नय्यर यांनी कार्यालयात परतल्यावर तत्काळ यूएनआय टीकरवर बातमी चालवली, तिचा मथळा होता: "मोरारजी इज द फर्स्ट वन टू थ्रो हिज हॅट इन द रिंग" [मोरारजी सर्वांत पहिल्यांदा स्पर्धेत उतरले आहेत].

या बातमीचा परिणाम म्हणून दुसऱ्या दिवशी संसदभवनामध्ये कामराज कुलदीप नय्यर यांच्या कानात कुजबुजले, "थँक यू".

रेहान फजल आणि कुलदीप नय्यर
फोटो कॅप्शन, रेहान फझल आणि कुलदीप नय्यर

शास्त्रींनीही तत्काळ त्यांना बोलावून सांगितलं, "आता आणखी बातमी देण्याची गरज नाही. स्पर्धा संपलेय."

यानंतर मोरारजी देसाईंनी कधीही कुलदीप नय्यर यांना माफ केलं नाही.

नेहरूंच्या अंत्यविधीच्या दिवशीच मोरारजींचे समर्थक लोकांना सांगत फिरत होते की, आता पंतप्रधान पद मोरारजींच्या खिशात आहे, त्यामुळे या सगळ्याचा दोष त्यांच्याच समर्थकांकडे जातो, असं समजवायचा प्रयत्न नय्यर यांनी केला.

पंतप्रधान होण्याची मोरारजी देसाईंनी इतक्या उघडपणे व्यक्त केलेली इच्छा त्यांच्याच विरोधात गेली आणि लालबहादूर शास्त्री भारताचे पंतप्रधान झाले.

इंदिरा गांधींनी अर्थ मंत्रीपद काढून घेतलं

शास्त्रींच्या निधनानंतरही मोरारजींनी पंतप्रधान होण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना पुरेसं समर्थन मिळालं नाही. इंदिरा गांधींनी त्यांच्यावर उप-पंतप्रधान आणि अर्थ मंत्रीपदाची जबाबदारी सोपवली.

पण थोड्याच काळात दोघांमध्ये मतभेद उत्पन्न झाले. राष्ट्रीय विकास परिषदेच्या बैठकीत एका मुख्यमंत्र्यांनी इंदिरा गांधींना विचारलेल्या प्रश्नापासून या मतभेदांची सुरुवात झाल्याचं इंदर मल्होत्रा यांनी म्हटलं आहे.

इंदिरा गांधी

फोटो स्रोत, PHOTODIVISION

इंदिरा गांधी त्या प्रश्नाचं उत्तर देत होत्या, तेवढ्यात मोरारजी देसाईंनी त्यांना मधेच अडवून सांगितलं, "या प्रश्नाचं उत्तर मी अधिक चांगल्या पद्धतीने देऊ शकतो."

मोरारजी आपल्या मंत्रिमंडळात असणार नाहीत, असं इंदिरा गांधींनी त्या क्षणीच ठरवून टाकल्याचं पी. एन. हक्सर यांनी नंतर माझ्याशी बोलताना सांगितलं.

नंतर काँग्रेसचा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार, बँकांचं राष्ट्रीयीकरण आणि प्रिव्ही पर्स अशा मुद्द्यांवरही त्यांनी इंदिरा गांधींच्या विरोधात भूमिका घेतली. त्यांच्यातील संघर्ष इतका टोकाला गेला की इंदिरांनी त्यांच्याकडून अर्थ मंत्रालयाची जबाबदारी काढून घेण्याचं ठरवलं.

आपल्याला उप-पंतप्रधानपदावरही राहण्याची इच्छा नाही, असं मोरारजी देसाईंनी इंदिरा गांधींनी पत्र लिहून कळवलं.

मोरारजींच्या पंतप्रधान होण्यामागील जेपींची भूमिका

१९७७ साली इंदिरा गांधींचा निवडणुकीत पराभव झाला आणि जनता पक्ष सत्तेत आला, तेव्हा मोरारजी देसाई यांना भारताचा चौथा पंतप्रधान करण्यात आलं, यामध्ये आचार्य कृपलानी आणि जयप्रकाश नारायण (जेपी) यांनी खूप मोठी भूमिका निभावली.

जयप्रकाश नारायण

कुलदीप नय्यर म्हणतात, "जनता पक्षामध्ये जगजीवन राम यांना जास्त समर्थन होतं, पण जगजीवन राम यांनी संसदेत आणीबाणीचा प्रस्ताव मांडला होता, त्यामुळे त्यांच्याकडे पंतप्रधानपद दिलं जाण्याचा प्रश्नच नव्हता, असं खुद्द जेपींनी मला सांगितलं होतं."

स्वतःचं मूत्र पिण्याची सवय

मोरारजींनी दारूबंदीचं कट्टर समर्थन केलं होतं. स्वतःचं मूत्र पिण्याबाबत ते करत असलेले युक्तिवादही बहुतांश भारतीयांच्या पचनी पडले नाहीत.

१९७८ साली मोरारजी देसाई फ्रान्स सरकारचे पाहुणे म्हणून गेले, तेव्हा तिथे भारतीय राजदूत आर. डी. साठे यांच्या घरी थांबले.

भारतीय गुप्तचर संस्था 'रॉ'चे माजी अधिकारी बी. रमन यांनी 'काऊ बॉईज ऑफ रॉ' या पुस्तकामध्ये लिहिलं आहे की, पंतप्रधान देसाई दिल्लीला परतल्यावर साठे साहेबांच्या घरी गेले.

त्यांचा नोकर मद्य आणून देत होता, तेव्हा राजदूत साठे यांच्या पत्नीने त्याला विचारलं, "तू नवीन ग्लास वापरतोयस ना?"

मग त्या माझ्याकडे वळून म्हणाल्या, "मोरारजी स्वतःचं मूत्र पिण्यासाठी कोणता ग्लास वापरत होते, ते मला माहीत नाही. त्यामुळे मी सगळे जुने ग्लास फेकून दिले."

मोरारजी देसाई नाइट-क्लबमध्ये गेले तेव्हा...

१९६८ साली मोरारजी देसाई अर्थ मंत्री म्हणून एका संमेलनात सहभागी होण्यासाठी कॅनडाला गेले होते, तेव्हा या संदर्भातला एक मजेशीर किस्सा घडला.

त्यांच्या सोबत त्यांचे अतिशय निकटवर्तीय आणि विख्यात अर्थशास्त्रज्ञ लक्ष्मीकांत झासुद्धा होते. त्या वेळी आयएएस अधिकारी व्यंकटचार कॅनडामध्ये भारताचे उच्चायुक्त होते.

जॉर्ज वर्गीज यांनी 'फर्स्ट ड्राफ्ट' या त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलं आहे की, "एकदा काम लवकर संपल्यावर झा आणि व्यंकटचार यांनी एका नाइट-क्लबमध्ये येण्यासाठी मोरारजी देसाईंचं मन वळवलं."

मोरारजी देसाई

फोटो स्रोत, PHOTO DIVISION

देसाईंनी पहिल्यांदा नाक मुरडलं, पण आपण ज्या गोष्टींचा विरोध करता त्या गोष्टी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्या आणि अनुभवल्या, तर त्यांचा विरोध आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने करता येईल, असा युक्तिवाद या दोघांनी केला.

शेवटी ते तिघेही नाइट-क्लबमध्ये गेले. ते बसल्यावर एका बारटेण्डर मोरारजींना विचारलं, "तुम्हाला काय प्यायला आवडेल?"

मोरारजींनी उद्धटपणे उत्तर दिलं, "मी दारू पीत नाही." मग ती मुलगी मोरारजीभाईंच्या मांडीवर बसण्याचा प्रयत्न करत लाडाने म्हणाली, "सो यू वॉन्ट योर डेम टू बी सोबर" (म्हणजे तुमची सोबतीण तुमच्या समोर सोबर असावी अशी तुमची इच्छा आहे तर).

सुन्न झालेले मोरारजी त्या मुलीला उडवून लावत म्हणाले, "मला मुली आवडत नाहीत." त्यावर ती मुलगी म्हणाली, "तुम्ही सज्जन गृहस्थ तर नक्कीच नाहीयात."

मोरारजी देसाईंनी काहीच न पिता नाइट-क्लबमधून निघायचं ठरवलं. झा आणि व्यंकटचारींनाही मुकाट तिथून बाहेर पडावं लागलं.

नटवर सिंह यांच्याशी वाद

पंतप्रधान झाल्यानंतर मोरारजी देसाईंनी भारतीय परराष्ट्र सेवेतील नटवर सिंह यांची बदली ब्रिटनहून झांबियाला केली. आणीबाणीची घोषणा झाली त्या दिवशी नटवर सिंह यांनी स्वतःच्या घरी शॅम्पेनची पार्टी दिल्याचं सांगून कोणीतरी मोरारजींचे कान भरले होते.

१९७८ साली झांबियाचे पंतप्रधान भारताच्या सरकारी दौऱ्यावर आले. इतर देशांचे राष्ट्रप्रमुख भारताच्या दौऱ्यावर येतात तेव्हा त्यांच्या सोबत त्या देशातील भारतीय राजदूतही भारतात येतात, असा पायंडा आहे.

पण नटवर सिंह यांनी भारतात येण्याची तयारी सुरू केली, तेव्हा त्यांना परवानगी नाकारण्यात आली. तरीही ते भारतात आले. ही खूप गंभीर अवज्ञा असल्याचं मानलं गेलं.

रेहान फजल

पुढच्या दिवशी सकाळी आठ वाजता नटवर सिंह यांनी आपल्याला भेटायला निवासस्थानी उपस्थित राहावं, असा आदेश मोरारजी देसाईंनी दिला.

यासंबंधीची आठवण सांगताना नटवर सिंह म्हणतात, "तुम्ही न बोलावताच आलात, असं पंतप्रधान म्हणाले. मी म्हटलं, तुम्हीच तर मला भेटायला बोलावलंयत. तुम्ही भारतात आलायंत त्याबद्दल मी बोलतोय. तुम्ही परवानगीविना इथे आलायंत, असं मोरारजी म्हणाले. त्यावर मी त्यांना या संदर्भातील पायंडा काय आहे याचा दाखला दिला. थोडा वेळ देसाई गप्प राहिले. मग म्हणाले, तुम्ही त्या दहशतवादी न्कोमाला इतकं प्रोत्साहन का देताय. मी म्हटलं, ते दहशतवादी नाहीयेत, उलट अतिशय आदरणीय स्वातंत्र्यसैनिक आहेत. नंतर मी निघण्यासाठी उठलो तेव्हा, मी कुठे थांबलोय, असं त्यांनी मला विचारलं."

"माझ्या सासूबाईंच्या घरी."

"तुमची पत्नी कुठेय?"

"खाली कारमध्ये बसलेय."

"त्यांना आत बोलवा."

"सर, मी असं करणार नाही. इथे मी काही सोशल कॉलवर आलेलो नाही."

"तुम्ही वाद कशाला घालताय. बोलवा त्यांना."

आपण मला सरकारी कामासंबंधीचा आदेश देऊ शकता, पण वैयक्तिक बाबींमध्ये मला आदेश देण्याचा तुम्हाला काहीही हक्क नाही, असं मी त्यांना अतिशय आदरपूर्वक सांगितलं.

मोरारजी देसाई अतिशय नाराज सुरात मला म्हणाले, "तुम्ही जाऊ शकता."

नंतर त्यांनी माझ्या सासूबाईंकडे तक्रार केली, "तुमचा जावई खूप उद्धट आहे."

मोरारजी देसाई कुटुंब

फोटो स्रोत, MADHUKESHWAR DESAI

पाकिस्तानी लेखक ग्रुप कॅप्टन एस.एम. हाली यांनी 'पाकिस्तान डिफेन्स जर्नल'मध्ये लिहिलं आहे की, "कहूता आण्विक योजनेचा आराखडा दहा हजार डॉलरांना भारताला विकण्याचा प्रस्ताव १९७७ साली 'रॉ'च्या एका गुप्तहेराने मांडला होता. मोरारजी देसाईंना याबद्दल कळलं तेव्हा त्यांनी तत्काळ जनरल झिया उल हक यांना फोन केला आणि कहूतामध्ये पाकिस्तान अणुबॉम्ब तयार करत असल्याचं आपल्याला कळलं आहे असं त्यांना सांगितलं. याचा परिणाम असा झाला की, 'रॉ'चा तो गुप्तहेर पकडला गेला आणि भारताला त्या गोपनीय कामाचा आराखडा मिळू शकला नाही."

जनता पक्षात फूट

मोरारजी देसाईंच्या दुर्दैवाने जनता पक्षामध्ये सुरुवातीपासूनच फूट पडायला लागली. मोरारजीभाई, जगजीवन राम आणि चरण सिंह यांच्यात पहिल्या दिवसापासूनच मतभेद होते.

कुलदीप नय्यर सांगतात की, चरण सिंह यांच्या मनधरणीसाठी आपण पुढाकार घ्यावा असा सल्ला त्यांनी मोरारजींना दिला, त्यावर मोरारजी म्हणाले, "मी चरण सिंहाचं चूरण सिंह करून टाकीन."

मोरारजी देसाई

फोटो स्रोत, WWW.SAINIKSAMACHAR.NIC.IN

याउपर म्हणजे जयप्रकाश नारायण पटण्याला आजारी पडलेले असताना त्यांना भेटायला जावं, असा सल्ला कुलदीप नय्यर यांनी दिला, तेव्हा मोरारजी म्हणाले, "मी महात्मा गांधींना बघायलाही गेलो नव्हतो, मग जेपी काय चीज़ आहे."

मोरारजींनी मोशे दायान यांना भारतात बोलावलं तेव्हा...

सार्वजनिक जीवनात आदर्श वर्तन असावं, असं मोरारजींचं मत होतं, पण पुत्रप्रेमापासून त्यांचीही सुटका झाली नाही.

इंदर मल्होत्रा सांगतात त्यानुसार, १९७७ साली मोरारजी देसाईंनी विजयानंतर पहिली पत्रकार परिषद घेतली, तेव्हा ते उपस्थित होते.

त्या वेळी मोरारजी म्हणाले, "भारत आणि सोव्हिएत संघ यांच्यातील करार मी पुन्हा पाहीन आणि तो भारताच्या हिताचा नसेल, तर तो रद्द करून टाकीन."

अटल बिहारी वाजपेयी

फोटो स्रोत, AFP

भारताच्या मध्यपूर्वेसंबंधीच्या धोरणाचाही आपण पुनर्विचार करू, असं ते म्हणाले. त्यानंतर मोरारजी मॉस्कोला गेले होते. त्यांच्या सोबत त्यांचा मुलगा कांती देसाईसुद्धा होते. परत येताना काही वेळासाठी त्यांचं जहाज तेहरानला थांबलं.

कांती देसाई हिंदुजा बंधूंना भेटण्यासाठी तिथेच थांबले. यावरून त्या काळी खूप गदारोळ झाला होता.

त्यानंतर काही दिवसांनी घडलेली घटना. अटलबिहारी वाजपेयी स्वतःच्या घरात बसले होते. तेव्हा त्यांना मोरारजींच्या प्रमुख सचिवांचा फोन आला. मोरारजींनी वाजपेयींना आपल्या घरी बोलावल्याचं सचिवांनी सांगितलं. वाजपेयी मोरारजींच्या घरी पोचले, तर तिथे इस्राएलचे परराष्ट्र मंत्री मोशे दायांना बसल्याचं त्यांना दिसलं.

वाजपेयींनी नंतर त्यांना सांगितलं, "त्यांना आमंत्रित करण्यापूर्वी माझ्याशी चर्चा तरी करायची."

मोरारजी देसाई

फोटो स्रोत, MADHUKESHWAR DESAI

पण मोरारजींचा मुलगा कांतीभाई यांनीच त्यांना निमंत्रित केलं होतं, हा यातील गंभीर भाग होता.

खाजगी आणि सार्वजनिक जीवनामध्ये मोरारजी देसाई कितीही वादग्रस्त राहिले असले, तरी त्यांना भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांचे सर्वोच्च सन्मान- भारतरत्न आणि निशान-ए-पाकिस्तान देण्यात आले होते.

त्यांची निष्ठा आणि संयम यांची काही लोकांकडून प्रशंसा केली गेली, पण बहुतांश लोकांच्या दृष्टीने ते एक रुढीवादी गृहस्थ होते, आणि त्यांच्या जीवनात राजकीय लवचिकतेला फारशी जागा नव्हती.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)