अहमद शाह मसूद : रशिया, तालिबान ज्याला हात लावू शकले नाहीत, त्याची हत्या लादेनने कशी केली?

अहमद शाह मसूद

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, रेहान फजल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

दोन वर्षांपूर्वी, तुम्ही काबूल विमानतळावर उतरला असता, तर सर्वात आधी तुम्हाला अहमद शाह मसूदचं मोठं पोस्टर दिसलं असतं.

एवढेच नाही तर काबूलच्या मुख्य ट्राफिक सर्कललाही त्यांचे नाव देण्यात आलंय. 9 सप्टेंबरला त्यांची पुण्यतिथी संपूर्ण अफगाणिस्तानमध्ये 'मसूद डे' म्हणून साजरी करण्यात आली.

पण आता तालिबान सत्तेत परत आल्यानंतर सर्व काही बदललं आहे.

सर्वांत आधी काबूल विमानतळावर लावलेला त्यांचा फोटो फाडण्यात आला आणि त्यांच्या नावावर असलेल्या ठिकाणांची नावेही बदलण्यात आली.

पण अफगाणिस्तानातील अनेक लोकांसाठी ते अजूनही राष्ट्रीय नायक आहेत. अमेरिकन लेखक रॉबर्ट कॅप्लान यांनी त्यांची तुलना माओ आणि चे गवेरा यांच्याशी केली होती.

नुकत्याच प्रकाशित झालेल्या त्यांच्या 'अफगाण नेपोलियन, द लाइफ ऑफ अहमद शाह मसूद' या चरित्राच्या लेखिका सँडी गॉल लिहितात, "त्यांच्या रशियन शत्रूंनीही आपल्या या प्रतिस्पर्ध्याच्या धैर्याची प्रशंसा केली. आठ वर्षांत रशियाने त्यांच्यावर किमान नऊ वेळा तरी हल्ले केले होते.

ते आयुष्यभर तालिबानचे सर्वांत मोठे विरोधक राहिले. जगातील अनेकांनी त्यांच्या बुद्धिमत्तेची, नम्रतेची, धैर्याची आणि त्यांच्या पर्शियन साहित्यातील ज्ञानाची नेहमीच प्रशंसा केली. वयाच्या 22 ते 49 वर्षांपर्यंतचे त्यांचे संपूर्ण आयुष्य लढण्यात घालवले. "

तालिबानच्या गोटातून जेव्हा ते जिवंत परतले...

तालिबानप्रमाणे त्यांनी अल् कायदाशी कधीही तडजोड केली नाही.

अफगाण प्रतिकारातील अनेक जण परकीय समर्थनाच्या आशेने देश सोडून बाहेर जात राहिले, मात्र तत्कालिन सोव्हिएत युनियनने जेव्हा अफगाणिस्तानचा ताबा घेतला होता, तेव्हाही त्यांनी कधी आपला देश सोडला नाही आणि अतिशय कठीण परिस्थितीत पंजशीरमध्ये लढा चालू ठेवला.

व्यक्तिशः ते साधे जीवन जगले. त्यांच्यावर कधीही सत्तेचा दुरुपयोग किंवा भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. एका ब्रिटीश अधिकाऱ्याने त्यांची तुलना युगोस्लाव्हियाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या मार्शल टिटोंशी केली होती.

अहमद शाह मसूद

फोटो स्रोत, SPEAKING TIGER

सँडी गॉल लिहितात, "जेव्हा तालिबानने काबूलच्या दिशेने आगेकूच केली होती, तेव्हा साथीदारांनी मनाई करूनही ते तडजोडीचा प्रयत्न करण्यासाठी एकटेच तालिबानच्या छावणीत गेले. त्यांच्या साथीदारांना भीती होती की ते तिथे गेल्यावर तालिबानी त्यांना मारून टाकतील. पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव असा होता की ते तिथून जिवंत परतले."

अहमद शाह मसूदला जिवंत परत पाठवल्याबद्दल मुल्ला उमरने आपल्या एका कमांडरला बडतर्फ केले होते.

त्यांना वाचनाची इतकी आवड होती की, 1996 मध्ये त्यांना काबूल सोडावे लागले तेव्हा त्यांनी तेथून 2000 पुस्तके सोबत घेतली.

तालिबानसमोर कधीही हार मानली नाही

अहमद शाह मसूदने रशियाविरुद्धच्या लढाईत अत्यंत साधी पण प्रभावी रणनीती अवलंबली होती.

ए.आर. रोवन त्यांच्या 'ऑन द ट्रेल ऑफ लायन अहमद शाह मसूद' या पुस्तकात लिहितात, "रशियन तळांवर

रॉकेट आणि मोर्टार डागण्यापूर्वी ते त्यांच्या प्रवेशाच्या आणि बाहेर पडण्याच्या मार्गावर अनेक भूसुरुंग पेरायचे. त्यानंतर ते हल्ला करायचे. रशियन सैनिकांनी बाहेरून कुमक मागवली की, ते या भूसुरुंगांना बळी पडायचे.”

अहमद शाह मसूद

फोटो स्रोत, Getty Images

काही महिन्यांच्या लढाईनंतर रशियनांनी पंजशीर खोरे सोडले. त्यानंतर त्यांनी नऊ वेळा या खोऱ्यावर हल्ला केला आणि प्रत्येक वेळी मसूदने त्यांना परत जाण्यास भाग पाडले.

तालिबानला पाकिस्तानचा भक्कम पाठिंबा असूनही आणि त्यांची संख्या तिप्पट असूनही मसूदला कधीही पराभूत करता आले नाही.

मसूदने पंजशीर खोऱ्याच्या तोंडावर असलेला सालंग बोगदा डायनामाइटने उडवून दिला आणि एकप्रकारे स्वत:ला स्वतःच्या क्षेत्रात बंदिस्त करून घेतलं. मग त्यांनी गावोगावी जाऊन लोकांना आपल्या क्षेत्राच्या रक्षणासाठी सर्वस्व झोकून देण्यासाठी प्रेरित केलं.

रशियन बॉम्बहल्ला करत असतानाही करत राहिले काम

रशियनाने जेव्हा एकदा हवाई हल्ला केला होता, तेव्हा सँडी गॉल अहमद शाह मसूदजवळ बसले होते.

सँडी लिहितात, "जेव्हा मी मसूदशी हस्तांदोलन केले, तेव्हा माझ्या नजरेत सर्वांत आधी त्यांचे डोळे भरले. ते एका बुद्धिमान माणसाचे डोळे होते. त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर जी परिपक्वता होती, ती क्वचितच 28 वर्षांच्या एखाद्या व्यक्तीमध्ये पाहायला मिळते.

आम्ही बसणारच होतो तेव्हा आमच्या डोक्यावर रशियन विमानं दिसायला लागली. मसूद आणि त्याचे साथीदार पटकन जवळच्या घराकडे निघाले. त्यांनी मला त्यांच्या मागे येण्याचा इशारा केला."

त्यांनी पुढे लिहिले आहे की, "त्या बॉम्बस्फोटादरम्यानच चहा पीत असताना मसूदने त्याला आलेली पत्रं वाचली आणि त्यांना उत्तंरही लिहिली. त्याच्या एकूण वागण्यावरून असं वाटत होतं की, तो काहीतरी आदेश देत असणार. त्याचा आत्मविश्वास आणि निर्भयपणा पाहून मी खूप प्रभावित झालो. परिस्थितीवर त्याचे पूर्ण नियंत्रण असल्यासारखं वाटत होतं. मसूद कधीच इंग्रजी शिकला नाही. पण तो फ्रेंच अगदी अस्खलितपणे बोलत होता."

ओसामाने मारेकऱ्यांना पत्रकार बनवून पाठवलं

ओसामा बिन लादेन हा देखील सुरुवातीला रशियाविरुद्धच्या लढाईत मसूदसोबतच होता, पण नंतर त्याचे मसूदशी प्रचंड मतभेद झाले आणि तेच त्याच्या हत्येचे कारण ठरले.

ऑगस्ट 2002 मध्ये अहमद शाह मसूदची मुलाखत घेण्यासाठी दोन अरब पत्रकार आले होते. त्याच्याकडे बेल्जियमचे पासपोर्ट होते. नंतर त्यांनी ते पासपोर्ट बेल्जियम दूतावासातून चोरल्याचे उघड झाले.

वास्तविक, मसूदला मारण्यासाठी त्यांना अल कायदाने पाठवले होते.

त्यापैकी एकाचे नाव अब्देसत्तार दहमाने होतं. तो 39 वर्षांचा होता. दुसऱ्या व्यक्तीचे नाव बोआरी-अल-कुएर होतं. त्याचं वय होतं 31 वर्षे होते. तो चांगला उंचापुरा होता आणि एखाद्या बॉक्सरसारखा दिसत होता.

अहमद शाह मसूद

फोटो स्रोत, Getty Images

दोघांनीही दाढी ठेवली नव्हती आणि शर्ट- ट्राऊझर्स घातले होते. मसूदच्या सांगण्यावरून एरिया कमांडर बिस्मिल्ला खान यांनी त्यांना घेण्यासाठी चेक पॉइंटवर कार पाठवली होती.

महिनाभरापूर्वी पश्तून नेता अब्दुल रसूल सय्याफला त्याचा जुना इजिप्शियन मित्र अबू हानी याचा फोन आला होता की, अहमद शाह मसूदची मुलाखत या दोन अरब मित्रांना काहीही करून मिळवून द्या.

दोघेही लंडनहून आधी इस्लामाबादला गेले आणि नंतर तेथून काबूलला पोहोचले. तेथून ते पंजशीरला आले आणि तेथे काही दिवस सय्याफचा पाहुणे बनून राहिले.

अबोल स्वभावाचे गूढ मारेकरी

अमरुल्लाह सालेहने नंतर स्कॉटलंड यार्डला दिलेल्या निवेदनात म्हटलं की, "पंजशेरी ड्रायव्हरने अफगाण अधिकाऱ्यांना सांगितलं की, ते दोघे त्याला वाहन सावकाश चालवायला सांगत होते. कारण त्यांच्याकडे नाजूक उपकरणं होती.”

त्या भागाचा कमांडर बिस्मिल्ला खाँ यानेही नमूद केलं की, दोघांनाही दाढी नसली तरी त्यांच्या हनुवटीजवळील त्वचा पिवळी होती. त्यावरून असं दिसत होतं की, त्यांची आधी मोठी दाढी होती; जी त्यांनी अलीकडेच काढली असावी.

याकडे त्यांचे लक्ष गेले होते, पण त्यावेळी त्यांनी दुर्लक्ष केलं होतं

काही दिवस सय्याफसोबत राहिल्यानंतर या पत्रकारांना खोऱ्यात आणून अस्ताना येथील मसूदच्या गेस्ट हाऊसमध्ये त्यांची सोय करण्यात आली. इथेच एक ब्रिटिश पर्यटक आणि लेखक मॅथ्यू लीमिंग यांच्यासोबत त्यांची भेट झाली.

अहमद शाह मसूद

फोटो स्रोत, Getty Images

मॅथ्यूने नंतर 'द स्पेक्टेटर'मध्ये 'ब्रेकफास्ट विथ द किलर्स' या शीर्षकाच्या लेखात लिहिले, "हे दोन लोक मला अबोल, घुम्या स्वभावाचे गूढ लोक वाटत होते. मसूदच्या हत्येनंतर मला समजले की मी त्यांच्यासोबत पाच दिवस घालवले होते. जेवणाच्या टेबलावर मी जेव्हा त्यांना तुम्ही कुठून आला आहात, हे विचारलं. तेव्हा त्यांनी सांगितलं की, मोरक्कोवरून; पण आम्ही बेल्जियमचे आहोत.

जेव्हा मी पर्यटनस्थळ म्हणून मोरक्कोबद्दल त्यांच्याशी बोलायला लागलो, तेव्हा त्यांनी संभाषणात अजिबात सर दाखवला नाही. ते दोघंही भात आणि मांस खात राहिले.

मॅथ्यू लिहितात, "एक-दोन दिवसांनंतर, जेव्हा माझ्यासोबत बऱ्यापैकी परिचय झाल्यावर त्यांनी विचारलं की,

तुमच्याकडे जनरल मसूदचा नंबर आहे का? मी उत्तर दिले ‘नाही.’ मला वाटत नाही की ते त्यांचा नंबर कोणाला देतात.

मी त्यांना विचारलं की, तुम्हाला त्याला का भेटायचंय? तेव्हा त्यांनी ‘टीव्ही फिल्म’साठी असं उत्तर दिलं.”

शेवटी बोलावणं आलं...

त्यावेळी मसूदचा सर्वांत जुना मित्र मसूद खलीली अफगाणिस्तानचे भारतातील राजदूत होते. 5 सप्टेंबर 2001ला ते कझाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांना भेटण्यासाठी दिल्लीहून अलमाटीला गेले. मसूदने त्यांना फोन करून भेटायला बोलावले.

7 सप्टेंबरला खलीली यांनी अलमाटीहून ताजिकिस्तानची राजधानी दुशान्बेला जायला उड्डाण केलं.

खलीली त्यांच्या हॉटेलमध्ये झोपणार होते, तेव्हा अमरुल्ला शाहने त्यांना फोन केला आणि सांगितले की मसूद आले आहेत आणि त्यांना लगेचच भेटायचे आहे.

खलीलीने आपले झोपायचे कपडे बदलून दुसरे कपडे घातले आणि मसूदचा पुतण्या आणि मिलिटरी अटॅच वदुद सोबत मसूदच्या काळ्या बुलेटप्रूफ मर्सिडीज कारमध्ये बसून त्यांच्या घरी पोहोचले.

स्पेक्टॅटर

फोटो स्रोत, Getty Images

खलीलीने स्कॉटलंड यार्डला दिलेल्या निवेदनात म्हटलं की, "मी आणि मसूद काश्मीर तसंच भारतातील दहशतवादावर बोलत राहिलो. रात्री 12.30 वाजता मी मसूदची रजा घेतली. तो मला बाहेरपर्यंत सोडायलाही आला.

मला त्याच्या लोकांनी सांगितलं की, दुसऱ्या दिवशी आम्ही 10 ते 11 च्या दरम्यान अफगाणिस्तानला जाऊ. खोजा बहिउद्दीनच्या फ्लाइटला 40 मिनिटे लागली. दरम्यान मी कमांडरचे अनेक फोटो काढले."

संध्याकाळी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रोटोकॉल ऑफिसर असीम आले आणि त्यांनी मसूद यांना विचारले, 'तुम्हाला अरब पत्रकारांना भेटायला आवडेल का? त्यांना उत्तर आघाडीच्या परिसरात येऊन जवळपास एक महिना झाला असून ते गेल्या नऊ दिवसांपासून खोजा बहाउद्दीनमध्ये आपल्याला भेटण्याची वाट पाहत आहेत.

मसूदला विचारले जाणारे प्रश्न अगोदर दिले गेले

अहमद शाह मसूदने त्यांना दुसऱ्या दिवशी भेटीची वेळ दिली. त्या रात्री मसूद आणि खलीली एकत्र राहिले.

रात्री दीड वाजेपर्यंत ते एकमेकांना कविता ऐकवत होते. दुसऱ्या दिवशी अकराच्या सुमारास अहमद शाह त्यांच्या कार्यालयात पोहोचले.

मसूद खलीली यांनी स्कॉटलंड यार्डला सांगितले की, "अहमद शाह यांनी खाकी शर्ट आणि लष्करी शैलीचे जॅकेट घातले होते. मला माझा नवीन पासपोर्ट काही दिवसांपूर्वीच मिळाला होता. मी त्यांना तो दाखवला तेव्हा त्यांनी मी तो खिशातच ठेवावा असे सांगितले, नाहीतर तो हरवेल.

मसूद यांनी सांगितलं की, दोन अरब पत्रकार दोन आठवड्यांपासून त्यांची वाट पाहत आहेत. मी आंघोळ करायला जात होतो, पण या मुलाखतीला फक्त 5-10 मिनिटं लागतील असे सांगून मसूदने मला थांबवले."

ओसामा बिन लादेन

फोटो स्रोत, Getty Images

खलीली यांनी पुढे सांगितलं की, "मुलाखतीदरम्यान मी मसूदच्या उजव्या बाजूला बसलो. मी त्यांच्या इतका जवळ होतो की, त्यांचा खांदा मला स्पर्श करत होता. मी मुलाखत घेणाऱ्याला विचारले, की तुम्ही कोणत्या वृत्तपत्राचे आहात? त्याने उत्तर दिले, मी वृत्तपत्राचा प्रतिनिधी नाही; युरोपच्या इस्लामिक सेंटरमधून आलो आहे.

मी मसूदला सांगितले, की हे पत्रकार नाहीत. मसूदने मला त्यांच्या कोपराने एक हलका धक्का दिला आणि म्हणाला, त्यांना त्यांचे काम करू द्या. मग मसूदने त्यांना विचारले की तुम्ही किती प्रश्न विचारणार आहात? मुलाखतकाराने एक पान काढले आणि त्याचे प्रश्न वाचायला सुरुवात केली. त्याला एकूण 15 प्रश्न होते. त्यापैकी 8 ते 9 प्रश्न ओसामा बिन लादेनशी संबंधित होते.”

बॉम्ब मारेकऱ्यांच्या पट्ट्यात लपवला होता

त्यांचा पहिला प्रश्न होता, अफगाणिस्तानची परिस्थिती कशी आहे?

खलीलीने भाषांतर करताच भयंकर स्फोट झाला.

खलीली यांनी सांगितलं, "मला स्फोट ऐकू आला नाही, पण मला आगीचा एक निळा गोळा माझ्या दिशेने येताना दिसला. मी शुद्धीवर होतो, हे मला आठवतंय. मला माझ्या छातीवर कोणाचा तरी हात असल्याचं जाणवलं. तो अहमद शाह मसूदचा हात होता. यानंतर माझी शुद्ध हरपली.”

स्फोटाने संपूर्ण घर हादरले. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की, अहमद शाहचे सहकारी आरेफ आणि जमशीद यांना वाटले की तालिबानने तेथे हवाई हल्ला केला आहे. अरब मारेकऱ्यांनी मसूदच्या समोर कॅमेरा लावला होता, पण प्रत्यक्षात मुलाखत घेणाऱ्या मारेकऱ्याच्या पट्ट्यात बॉम्ब लपवला होता.

मसूद खलिली

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मसूद खलिली

मसूदचे सर्व सुरक्षारक्षक धावत तिथे पोहोचले. जवळजवळ बेशुद्ध अवस्थेत असलेल्या मसूदने त्यांना प्रथम खलीलीला उचलण्यास सांगितले. मसूदला ताबडतोब एका कारमध्ये नेण्यात आले जी त्याच्यासोबत हेलिपॅडकडे निघाली.

मसूदचा गार्ड आरेफने नंतर त्याच्या साक्षीत सांगितले. "अहमद शाह मसूदना रक्तस्त्राव होत होता. त्याच्या उजव्या हाताच्या बोटाचा एक छोटासा भाग कापला गेल्याचंही मला दिसले. मसूद, खलीली आणि इतर जखमींना हेलिकॉप्टरने ताजिकिस्तानमधील फरखर शहरातील जवळच्या विमानतळावर नेण्यात आले."

भारतीय डॉक्टरांनी मसूदला मृत घोषित केले

मसूद खलीली यांनी नंतर सांगितलं, "मला हेलिकॉप्टरमध्ये असल्यासारखं वाटलं. मी सुमारे 10-15 सेकंद माझे डोळे उघडले. मला मसूदच्या चेहऱ्यावर आणि केसांवर रक्त दिसले. यानंतर मी पुन्हा बेशुद्ध झालो."

"मला आठ दिवसांनंतर पुन्हा शुद्ध आली. तोपर्यंत मला जर्मनीतील रुग्णालयात नेण्यात आलं होतं. माझ्या पत्नीने मला सांगितले की अहमद शाह मसूद आता राहिले नाहीत."

जेव्हा खलीलीच्या पत्नीने त्यांचं सामान शोधलं तेव्हा तिला त्यांचा पासपोर्ट सापडला. अहमद शाह मसूदने तो जबरदस्तीने त्यांच्या शर्टच्या वरच्या खिशात ठेवला होता.

मसूद खलीली

फोटो स्रोत, Getty Images

खलीली यांनी आठवण सांगितली, "माझ्या पत्नीने माझा पासपोर्ट उघडला. 15 व्या पानापर्यंत अनेक खिळे अडकले होते. यामुळे कदाचित माझा जीव वाचला असेल. मी विचार केला की, माझ्याऐवजी कमांडरने तो पासपोर्ट खिशात ठेवला असता तर. माझ्यापेक्षा अफगाणिस्तानसाठी ते महत्त्वाचे होते."

मसूद फरखार येथे पोहोचताच तेथे उपस्थित असलेल्या भारतीय डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. स्फोटानंतर काही मिनिटांतच अहमद शाह मसूदचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या रक्षकांनी सांगितले.

मसूदच्या हत्येची बातमी लपवण्यात आली होती

हा हल्ला काही दिवस बाहेरच्या जगापासून लपवून ठेवण्यात आला होता.

याचे कारण म्हणजे तालिबान याचा फायदा घेऊन उत्तरी आघाडीविरुद्ध नवीन लष्करी मोहीम सुरू करू शकलं असतं.

9/11 च्या 48 तास आधी मसूदची हत्या झाली होती, पण 9/11 मुळे या घटनेची पुरेशी चर्चा झाली नाही.

दोघांची वेळ हा निव्वळ योगायोग होता. कारण अल कायदाचे मारेकरी अहमद शाह मसूदना मारण्याची योजना अनेक आठवड्यांपासून आखत होते. या हत्येमागे अल कायदाचा हात असल्याचे मसूद खलीलींचे मत आहे.

9/11 हल्ला

फोटो स्रोत, Getty Images

त्यांनी स्कॉटलंड यार्डला दिलेल्या निवेदनात सांगितले होते की, "ओसामा बिन लादेनला संपूर्ण अफगाणिस्तान आणि मध्य आशियामध्ये एक प्रकारची धार्मिक दरी निर्माण करायची होती. अहमद शाह मसूदना मार्गातून हटवल्याशिवाय हे शक्य झाले नसते."

"ओसामाला माहीत होते की, तो न्यूयॉर्कमध्ये जे काही करणार आहे, त्यानंतर त्याला सुरक्षेची गरज आहे. कमांडर मसूदची हत्या ही एक प्रकारे तालिबानचा नेता मुल्ला उमरला दिलेली भेट होती, जेणेकरून भविष्यात गरज पडल्यास तो त्यांना आवश्यक सुरक्षा पुरवेल.”

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify,आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)