अफगाणिस्तान: 'शाळा अन् शिक्षण नसलेलं जीवन जगण्यापेक्षा मरण बरं'

- Author, योगिता लिमये
- Role, अफगाणिस्तान प्रतिनिधी
17 वर्षांची हबीबा सांगते, "मी रोज सकाळी या आशेने उठते की आज तरी शाळा उघडेल. ते [तालिबान] म्हणतात की, आम्ही लवकरच शाळा सुरू करू, पण आज दोन वर्षं उलटली शाळा सुरूच झाल्या नाहीत. माझा त्यांच्यावर विश्वास नाहीये, माझं मन दुखावलंय."
हे सांगताना तिने तिचे डोळे मिचकावले आणि दाताखाली ओठ चावले, जेणेकरून डोळ्यातून पाणी येऊ नये.
तालिबानने अफगाणिस्तानात माध्यमिक शाळा बंद केल्या आहेत. त्यामुळे हबीबा आणि तिच्यासारख्या शेकडो हजारो किशोरवयीन मुलींचं शाळेत जाणं बंद झालंय. अशी कारवाई करणारा अफगाणिस्तान एकमेव देश आहे.
आज शाळा बंद होऊन दीड वर्ष लोटलं, पण त्यांच्या जखमा ताज्याच आहेत.
या मुलींच्या मनात भीती आहे. त्यांना वाटतं की, त्यांना जे सहन करावं लागतंय, त्याबाबतचा जगाचा रोष कमी होत चाललाय. पण त्यांना रोज तेच दुःख सहन करावं लागतंय. या आठवड्यात दुसरी शाळा सुरू झाली आणि ते ही त्यांच्याशिवाय...यामुळे त्यांचं दुःख आणखी तीव्र झालंय.

तमाना म्हणते, "मुलांना शाळेत जाता येतं, त्यांना हवं ते करता येतं. मी जेव्हा हे पाहते तेव्हा मला खूप वाईट वाटतं. माझा भाऊ जेव्हा शाळेला जायला निघतो तेव्हा तर मी गळून पडते," हे सांगताना तिचा आवाज थरथरत होता, तिच्या गालावर अश्रूंचे थेंब ओघळले होते, पण ती तिचं मन मोकळं करत होती.
"माझा भाऊ शाळेला जाताना मला म्हणायचा की, मी तुझ्याशिवाय शाळेला जाणार नाही. पण मी त्याला मिठीत घेऊन सांगितलं की तू जा, मी लवकरच तुझ्यासोबत येईन."
"लोक माझ्या आई-वडिलांना म्हणतात की, तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाहीये, तुम्हाला मुलगे आहेत. पण मला ही मुलांसारखे अधिकार हवेत," तमाना सांगते.

फोटो स्रोत, Getty Images
तालिबान सरकारने महिलांवर जे काही निर्बंध लादले आहेत ते पाहता शाळा पुन्हा सुरू होण्याच्या आशा आता मावळल्या आहेत.
हबीबा सांगते, सुरुवातीच्या टप्प्यात थोडं स्वातंत्र्य होतं, पण हळूहळू ते ही संपलं.
माध्यमिक शाळांवर बंदी घातल्यानंतर डिसेंबर 2021 मध्ये तालिबानने पहिला आदेश काढला की, जर कोणत्याही महिलेला 72 किमी पेक्षा जास्त प्रवास करायचा असेल तर तिच्यासोबत पुरुष नातेवाईक असणं गरजेचं आहे.
मार्च 2022 मध्ये तालिबान सरकारने मुलींसाठी माध्यमिक शाळा पुन्हा सुरू केल्या जातील असं सांगितलं. पण या शाळा काही तासांसाठीच उघडल्या जाणार होत्या.
हे निर्बंध लादून दोन महिने झालेही नसतील तोपर्यंत पुढचा आदेश आला की, महिलांनी डोक्यापासून पायापर्यंत झाकलेले कपडे घालावे. चेहरा ही झाकला जाईल याची काळजी घ्यावी.
नोव्हेंबर महिन्यात महिला आणि मुलींच्या पार्क, जिम आणि स्विमिंग पूलमध्ये जाण्यावर बंदी घालण्यात आली होती. मुलींना यापुढे विद्यापीठात अर्थशास्त्र, अभियांत्रिकी आणि पत्रकारिता हे विषय शिकता येणार नव्हते.
पुढे एका महिन्यानंतर मुलींसाठी विद्यापीठांचे दरवाजेही बंद करण्यात आले. हा मोठा धक्का होता. आरोग्य क्षेत्र वगळता महिलांच्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थांमध्ये काम करण्यावरही बंदी घालण्यात आली.

महताब सांगते, "जर स्त्रियांवरील या मर्यादा वाढतच गेल्या तर मला वाटत नाही की हे जीवन स्त्रियांसाठी जगण्या लायक राहील. माणूस म्हणून आम्हाला आमचे मूलभूत अधिकार मिळालेले नाहीत. शिक्षणाशिवाय जीवनाला अर्थ नाही. त्यामुळे असं जीवन जगण्यापेक्षा मरण बरं वाटतं."
2021 च्या मे महिन्यात पूर्वीचं अफगाणिस्तान सरकार आणि तालिबान दरम्यान युद्ध सुरू होतं. यावेळी सय्यद उल-शुहादा शाळेत झालेल्या बॉम्बस्फोटात महताब जखमी झाली होती.
ती सांगते, "माझ्या मानेवर, चेहऱ्यावर आणि पायावर जखमा झाल्या होत्या. ते खूप वेदनादायक होतं, पण मी अभ्यास सुरू ठेवला. मी मिड-टर्म परीक्षाही दिली होती, पण तालिबान सत्तेवर आल्यावर सगळंच संपलं."

फोटो स्रोत, Getty Images
सत्तेवर आल्यावर तालिबानने सांगितलं होतं की, जोपर्यंत वातावरण शांत होत नाही तोपर्यंत मुलींसाठी शाळा आणि विद्यापीठे बंद ठेवण्यात येतील. या मुद्द्यावर तालिबान सरकारमध्येही मतभेद आहेत. पण मुलींसाठी शाळा कॉलेज सुरू करावीत असं म्हणणाऱ्यांच्या प्रयत्नांना यश आलेलं नाही.
तालिबानचं म्हणणं आहे की, महिलांवर इतर निर्बंध लादण्यात आलेत कारण महिलांनी हिजाब किंवा इस्लामिक कायद्यांचं पालन केलेलं नाही. तालिबानने जे निर्बंध लागू केलेत त्याची अंमलबजावणी
सगळीकडे एकसारखी होते असं नाही. पण त्यांच्या या निर्बंधांमुळे भीती आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय.
तमना म्हणते, "आम्ही नेहमी हिजाब घालतो. पण त्यामुळे फरक पडत नाही. त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे? मला समजत नाही."

अफगाणिस्तानमधील एखाद्या स्त्रीने हिजाब घातला नाही असं कधी घडलंच नाही. अगदी तालिबान सत्तेवर येण्यापूर्वी आणि सत्तेवर आल्यानंतरही हे घडलं नाही.
महिलांवर लादलेल्या निर्बंधांमुळे त्यांच्यासाठीची सार्वजनिक ठिकाणे कमी होत चालली आहेत. यावर लैला बासीम यांनी काबूलमध्ये महिलांसाठी एक लायब्ररी सुरू केली. मागच्या नोव्हेंबरमध्ये आम्ही या लायब्ररीला भेट दिली होती. खोलीच्या तीन भिंतीवरील कपाटांवर हजारो पुस्तकं नीटनेटकी रचून ठेवली होती. कधी वाचनासाठी तर कधी एकमेकींची भेट घेण्यासाठी महिला इथं येत असत.
पण आता लायब्ररी बंद आहे.
लैला सांगतात, "तालिबान्यांनी दोनदा लायब्ररी बंद केली. आम्ही पुन्हा ती सुरू करण्याचा प्रयत्न केल्यावर आम्हाला धमक्या येऊ लागल्या. महिलांसाठी लायब्ररी सुरू करण्याची तुझी हिंमतच कशी होते अशा धमक्यांचे फोन येऊ लागले. एकदा तर ते थेट लायब्ररी मध्येच आले आणि म्हणाले की, महिलांना पुस्तकं वाचण्याचा अधिकार नाहीये. शेवटी ही लायब्ररी सुरू चालवणं खूप जोखमीचं झालं म्हणून मला ती बंद करावी लागली."
त्या सांगतात की, तालिबानच्या धोरणांशी लढण्यासाठी आम्ही इतर मार्ग शोधणं सुरूच ठेऊ.
त्या पुढे सांगतात की, "मला भीती वाटते हे खरंय, पण लायब्ररी बंद केला म्हणून मार्ग बंद होतात असं नाही. इतरही मार्ग आहेत ज्याद्वारे अफगाण महिला आवाज उठवू शकतात. पण त्यासाठी समर्पण गरजेचं आहे आणि आम्ही ते सुरू केलंय आणि आम्ही त्यासाठी वचनबद्ध आहोत."

ज्या स्त्रिया त्यांच्या कुटुंबात एकट्याच कमावत्या आहेत, त्यांच्या तर गोष्टी खूपच अवघड झाल्या आहेत.
चाळीशी गाठलेली मीरा (नाव बदललं आहे) विधवा आहे. ती मुलींच्या शाळेत क्लिनर म्हणून काम करायची. तिच्या कुटुंबात 10 जण आहेत. शाळा बंद झाल्यावर तिची नोकरी गेली. त्यात देशात आर्थिक संकट असल्यामुळे तिच्या हाताला फारसं कामही मिळालं नाही.
ती आता काबूलच्या रस्त्यावर भीक मागते.
"मला असं वाटतं की मी जिवंत नाहीये. लोकांना माहीत आहे की माझ्याकडे काहीच नाही म्हणून ते मला मदत करण्याचा प्रयत्न करतात. पण सन्मानाशिवाय जगण्यापेक्षा मरण कवटाळणं कधीही चांगलंच." हे सांगताना मीरा अगदी असह्यपणे रडत होती. ती पुढे सांगते, कधी मला बटाटे मिळाले तर आम्ही ते शिजवून खातो. आणि दुसऱ्या दिवशी त्या बटाट्याच्या साली खातो."
एवढा संघर्ष करूनही मीराला वाटतं की तिच्या मुलींनी शाळेत जावं.
ती म्हणते, "मुली शिकल्या तर त्यांना नोकऱ्या मिळतील. माझ्या एका मुलीला वकील बनवायचं आहे आणि दुसर्या मुलीला डॉक्टर बनवायचं आहे. मला त्यांच्या शिक्षणासाठी भीक मागावी लागली तरी चालेल, मला त्यांना शिकवायचं आहे. पण त्या विद्यापीठात जाऊ शकत नाही कारण तालिबानने निर्बंध लावलेत"
त्यामुळे आता प्रत्येक घरात त्रास किंवा दु:खाशिवाय काहीच उरलेलं नाही.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









