ते फुटबॉलच्या मैदानात हजारोंची गर्दी जमवून लोकांना चाबकाने मारतात

- Author, नूर गुल शफाक
- Role, बीबीसी प्रतिनिधी
सूचना : काही मजकूर वाचकांना विचलित करू शकतो.
अफगाणिस्तानमध्ये तालिबान राजवटीत गुन्हेगारांना सार्वजनिक ठिकाणी फटके मारून शिक्षा दिली जात आहे.
"तालिबानच्या अधिकाऱ्यांनी त्या फुटबॉल स्टेडियमवर फटके मारण्यासाठी आणलेल्या त्या माणसाला पाहून माझं हृदय जोरजोरात धडधडायला लागलं. माझ्यासमोर जे काही घडत होतं ते मी एखाद्या चित्रपटात किंवा स्वप्नात नाही तर प्रत्यक्ष समोर घडताना मी बघत होतो यावर विश्वासच बसत नव्हता."
हे शब्द आहेत अफगाणिस्तानात राहणाऱ्या 21 वर्षीय जुम्मा खान यांचे. सुरक्षिततसेसाठी आम्ही त्यांचं नाव बदललं आहे.
22 डिसेंबर 2022 ला मध्य अफगाणिस्तानात असणाऱ्या तारिनकोट शहरातल्या फुटबॉल स्टेडियममध्ये हजारो लोकांच्या गर्दीसमोर 22 लोकांना फटके मारले जात असताना त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं.
या 22 लोकांमध्ये 2 महिलाही होत्या आणि या सगळ्यांवर वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते.
तालिबानच्या अधिकाऱ्यांनी या घटनेच्या आधीच एक दिवस संपूर्ण शहरात याची माहिती दिलेली होती.
त्या शहरातल्या मशिदीवरील भोंगे आणि रेडिओवर जास्तीत जास्त संख्येने लोकांना 'गुन्हेगारांना धडा शिकवत असताना'चं दृश्य बघण्यासाठी स्टेडियमवर येण्यास सांगितलं जात होतं.
या शिक्षा नेमक्या कुठे दिल्या जातात?
अशा पद्धतीच्या सार्वजनिक शिक्षा देण्यासाठी खेळांच्या मोठमोठ्या मैदानांचा वापर केला जातो. 1990च्या दशकात तालिबानने पहिल्यांदा अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवलं आणि अशा पद्धतीने शिक्षा देण्याची ही परंपरा सुरु झाली.
तारिनकोट स्टेडियमची क्षमता 18,000 लोकांची आहे, पण खान म्हणतात की त्यादिवशी त्याहीपेक्षा जास्त लोक तिथं उपस्थित होते.
खान यांनी बीबीसीला सांगितलं की, "तो दिवस गुरुवारचा होता आणि प्रचंड ऊन होतं. गुन्हेगारांना स्टेडियमच्या मध्ये असलेल्या हिरवळीवर बसवण्यात आलं होतं. तिथे जमलेले लोक देवाकडे या गुन्हेगारांना वाचवण्याची प्रार्थना करत होते."
तालिबानच्या सर्वोच्च न्यायालयाने अशा पद्धतीची शिक्षा दिल्याचं ट्विटरवरून मान्य केलं आणि नेमकं किती लोकांना शिक्षा देण्यात आली, त्यामध्ये पुरुष आणि महिला किती होत्या हेही ट्वीट करून सांगितलं.
बीबीसीशी बोलताना सरकारचे प्रवक्ते जबिहुल्ला मुजाहिद म्हणाले की,
“शरिया कायद्यानुसार, आम्हाला अशा शिक्षा देणं बंधनकारक आहे. कुराणमध्ये, अल्लाहने सांगितलंय की लोकांनी या शिक्षा सार्वजनिकपणे बघितल्या पाहिजेत जेणेकरून त्यांना त्याच्यातून शिकता येईल. शरिया कायद्यानुसार त्यांची अंमलबजावणी करणं हे आमचं कर्तव्य आहे.”
खान म्हणतात की "18 ते 37 वयोगटातील सर्व पुरुषांना 25 ते 39 फटके मारण्यात आले."
"त्यापैकी काही लोक वेदनेने प्रचंड ओरडत होते, काही रडत होते तर बाकीचे निमूटपणे शांत राहून फटके सहन करत होते. माझ्या एका नातेवाईकाला चोरी केल्याबद्दल 39 फटक्यांची शिक्षा सुनावली होती. त्यांनी मला सांगितलं की 20 फटके खाल्ल्यानंतर त्यांचं शरीर सुन्न झालं आणि पुढे काहीच जाणवलं नाही."
पण त्यांनी सांगितलं की, "त्यादिवशी तालिबानने महिलांना मात्र तिथं मारलं नाही."
9/11 च्या हल्ल्यानंतर दोन वर्षांनी खान यांचा जन्म झाला होता. या हल्ल्यानंतर अमेरिका आणि नाटोच्या सैन्यांनी अफगाणिस्तानवर हल्ला केला आणि तालिबानचा अफगाणिस्तानातला पहिला कार्यकाळ संपुष्टात आणला.

फोटो स्रोत, AFP
तालिबानच्या पहिल्या कार्यकाळात सार्वजनिक ठिकाणी दिल्या जाणाऱ्या शिक्षेबद्दल खान यांनी त्यांच्या मोठया भावांकडून अनेक गोष्टी ऐकल्या होत्या. गुन्हेगारांचे हातपाय कापून फासावर लटकवल्याचे किस्सेही त्यांना माहिती होते. पण स्वतःच्या डोळ्यांनी असं काहीतरी बघण्याची ही त्यांची पहिलीच वेळ होती.
शिक्षा दिल्यानंतर लोक त्या स्टेडियममधून जाण्याचा प्रयत्न करू लागल्याचं त्यांनी सांगितलं.
"बघायला आलेल्यांपैकी बहुतांश लोक हे माझ्याच वयाचे होते पण तालिबानच्या सैनिकांनी आम्हाला तिथून जाऊ दिलं नाही. मात्र अनेकांनी भिंती आणि कुंपणावर चढून उड्या मारल्या."
तालिबान एक सुयोग्य आणि कायदेशीर शासक म्हणून जगभर त्यांची ओळख निर्माण करू पाहत आहे. त्यामुळे अशा पद्धतीच्या शिक्षांची माहिती जगभरात पोहोचली तर आंतरराष्ट्रीय पातळीवर नकारात्मक प्रतिक्रिया उमटण्याची भीती तालिबानला आहे.
त्यामुळेच तालिबानचे सर्वोच्च नेते मुल्ला हिबतुल्ला अखुंदजादा यांनी अशा पद्धतीच्या शिक्षा रेकॉर्ड करण्यावर बंदी घातली आहे.
मात्र खान यांनी गुप्तपणे या घटनेचा व्हीडिओ शूट करून बीबीसीला पाठवला आणि बाकीच्या प्रत्यक्षदर्शींनी तो व्हीडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आणि काही क्षणातच तो प्रचंड व्हायरल झाला.
खान म्हणतात की, "त्यादिवशी त्यांनी जे काही पाहिलं, ते आठवलं की त्यांना प्रचंड भीती वाटते आणि अशीच शिक्षा त्यांनाही होईल असं त्यांना वाटत."
"आता मी प्रत्येक शब्द सांभाळून बोलतो आणि मी दाढीही वाढवलीय," असं खान यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, EPA
किती लोकांना शिक्षा देण्यात आलीय?
बीबीसीला असं आढळलं आहे की नोव्हेंबर 2022 पासून तालिबान सरकारने अधिकृतपणे सार्वजनिक शिक्षेची घोषणा केली आणि सर्वोच्च न्यायालयानं याबाबत सांगताना सांगितलं की अशा एकूण 50 घटना घडल्या आहेत आणि त्यामध्ये 346 लोकांना शिक्षा देण्यात आली आहे.
यामध्ये किती महिला आणि पुरुष होते याची माहिती मात्र सुप्रीम कोर्टाने दिली नसली तरी यामध्ये किमान 51 महिला आणि 233 पुरुषांना शिक्षा देण्यात आल्याची माहिती आहे. यातली 60 प्रकरणं अज्ञात आहेत.
या सगळ्यांना फटके देण्यात आले आणि काहींची रवानगी तुरुंगात करण्यात आली.
यापैकी दोन पुरुषांना मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली यापैकी एकाला दक्षिण पश्चिम अफगाणिस्तानमधील फराहमध्ये आणि दुसऱ्या व्यक्तीला पूर्व लघमान प्रांतात मृत्युदंड ठोठावण्यात आला.
13 नोव्हेंबरनंतर अशा पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी शिक्षा देण्याचे प्रमाण वाढलं आहे, तालिबानच्या सर्वोच्च नेत्याने देशातल्या न्यायसंस्थेला कायद्यांची काळजीपूर्वक अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिल्यानंतर हे प्रमाण वाढल्याचं दिसून आलं.
कोणत्या गुन्ह्यांना शिक्षा दिली जाते?
तालिबान सरकारचं असं म्हणणं आहे की ते अफगाणिस्तानच्या इस्लामिक न्याय प्रणालीनुसार अशा शिक्षा देतात. शरिया कायद्यामध्ये असणाऱ्या कठोरातल्या कठोर तरतुदी तिथे न्यायदान करताना वापरल्या जातात.
चोरी, खून, व्यभिचार, पुरुषांमधील लैंगिक संबंध, ‘बेकायदेशीर लैंगिक संबंध’, भ्रष्टाचार, घरातून पळून जाणे, खून, अनैतिकता यासह दंडनीय गुन्ह्यांचे एकोणीस प्रकार यामध्ये आहेत.
या शिक्षेची किंवा गुन्ह्यांची परिभाषा कशी केली जाते हे नेहमीच स्पष्ट नसतं मात्र काही प्रकरणांची सविस्तर स्पष्टीकरणं उपलब्ध आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
अनेक लोकांना चोरीसारख्या गुन्ह्यांमध्ये 39 फटक्यांची शिक्षा दिली जाते. तर काहींना तीन महिने ते एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा देण्याची तरतूद देखील यामध्ये आहे.
लैंगिक गुन्हे, ज्यांना तालिबान सरकार "झिना" (व्यभिचार) असं म्हणतं ज्यामध्ये "बेकायदेशीर लैंगिक संबंध" किंवा "अनैतिक संबंध" यांचा समावेश असतो. अशा गुन्ह्यांचं प्रमाणही मोठं आहे.
आंतरराष्ट्रीय निरीक्षक आणि मानवाधिकार कायद्यांसाठी काम करणाऱ्यांसाठी विशेष चिंतेची बाब म्हणजे. घरातून पळून गेलेल्यांना देण्यात आलेल्या शिक्षेची सात प्रकरणं.
अशा प्रकरणांमध्ये घरगुती हिंसाचार आणि बालविवाहाला बळी पडलेल्या महिलांचा समावेश असण्याची शक्यता जास्त आहे आणि अशा महिलांना या शिक्षा होण्याची शक्यता असते.
दोन पुरुषांच्या लैंगिक संबंधांना बेकायदेशीर ठरवणारी सहा प्रकरणं देखील यानिमित्ताने समोर आली ज्याला सुप्रीम कोर्टाच्या निवेदनात 'लिवात' असं म्हटलं जातं.
कोणत्या प्रांतात सर्वाधिक शिक्षा ठोठावण्यात आल्या आहेत?
बीबीसीला असं आढळलं आहे की अफगाणिस्तानच्या 34 पैकी 21 प्रांतांमध्ये अशा पद्धतीच्या सार्वजनिक शिक्षा देण्यात आलेल्या आहेत. मात्र काही प्रांतांमध्ये इतर प्रांतांपेक्षा हे प्रमाण जास्त आहे.
अफगाणिस्तानच्या पूर्वेकडे असणाऱ्या लघमान प्रांतात सर्वाधिक सात प्रकरणं घडली होती, त्यानंतर पक्तिया, घोर, परवान आणि कंदाहार यांचा क्रमांक लागतो.
शिक्षा झालेल्या लोकांच्या संख्येच्या बाबतीत, हेलमंडमध्ये सर्वाधिक 48 लोकांना शिक्षा देण्यात आली. बदख्शानमध्ये 32 लोकांना, परवानमध्ये 31, घोर आणि जॉझजानमध्ये 24, कंदाहार आणि रोझगानमध्ये 22 आणि राजधानी काबुलमध्ये 21 लोकांना या शिक्षा देण्यात आली.
तालिबानच्या सुप्रीम कोर्टानं पुष्टी केलेल्या प्रकरणांच्या आधारावरच हे आकडे समोर आले आहेत अशीही अनेक प्रकरणं असू शकतात ज्यांची नोंद करण्यात आलेली नाही.
संयुक्त राष्ट्र, मानवाधिकार संघटना आणि जगभरातील देशांनी तालिबानला अशा शिक्षा देणं थांबविण्याची विनंती केलेली आहे तरीही तालिबान याबाबत त्यांचं धोरण बदलणार असल्याची कोणतीही शक्यता सध्यातरी दिसत नाही.

अधिकृत निवेदनांमध्ये तालिबान असं सांगत आलंय की लोकांना सार्वजनिकरित्या शिक्षा करणे हा इतरांसाठी देण्यात आलेला एक 'धडा' आहे आणि यामुळे गुन्हेगारी कमी होऊ शकते.
असं असलं तरी अशा घटनांचे साक्षीदार असणाऱ्या जुम्मा खान यांच्यासारख्या नागरिकांनी सांगितलं की असे भयानक प्रकार पाहून ते मानसिकदृष्ट्या खचले आहेत.
खान म्हणतात की "ज्यांना शिक्षा झाली त्यांना अपमानित केले जाते आणि त्यानंतर त्यांना त्यांच्या घराच्या बाहेरही पडता येत नाही."
यावर प्रतिक्रिया देताना तालिबानचे प्रवक्ते जबिहुल्ला मुजाहिद यांनी बीबीसीला सांगितलं की,
"अल्ला लोकांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेईल. आम्ही शरिया कायद्याच्या विरोधात जाऊ शकत नाही."

तालिबानमध्ये काम करणाऱ्या न्यायालयाच्या ट्विटर अकाउंटवरून बीबीसी पश्तोने ही माहिती गोळा केली आहे. तालिबान सुप्रीम कोर्टाने दिलेली विधानं इथं एकत्रित करण्यात आलेली आहेत.
नोव्हेंबर 2022 ते 5 ऑगस्ट 2023 पर्यंतच्या प्रकरणांची माहिती यामध्ये घेण्यात आलेली आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये तालिबानच्या सर्वोच्च नेत्याने अफगाणिस्तानात सार्वजनिक शिक्षेची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. या आठ महिन्यांच्या कालावधीतील ही सगळी प्रकरणं आहेत.
अफगाणिस्तानातल्या सुप्रीम कोर्टाची आकडेवारी हा प्राथमिक स्रोत असला तरी UNAMA मानवाधिकार मे 2023 या अहवालाचीही मदत यामध्ये घेण्यात आलेली आहे.
शिक्षा देण्यात आलेलं ठिकाण, लोकांची संख्या, लिंग आणि शिक्षेचा प्रकार यासाठीचे संपूर्ण आकडेवारी उपलब्ध नाही. त्यामुळे उपलब्धतेवर आधारित आकडेवारी प्रकाशित करण्यात आलेली आहे.
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








