सोराया : बुरख्याविना, स्लीव्हलेस ड्रेसमध्ये फिरणारी अफगाणिस्तानची राणी

फोटो स्रोत, ULLSTEIN BILD VIA GETTY IMAGES
महिलांनी बुरखा घालू नये आणि पुरुषांनी एकापेक्षा अधिक लग्नं करू नये, असे विचार होते अफगाणिस्तानची राणी बनलेल्या सोराया यांचे.
अमानुल्ला खान यांनी 1919 साली जेव्हा अफगाणिस्तानची सत्ता हातात घेतली, तेव्हा त्यांची पत्नी सोराया तार्जी यांच्या विचारांकडे लोकांचं लक्ष वेधलं गेलं. अनेक शतकं रुढीवादी संस्कृतीत राहणाऱ्या लोकांसाठी सोराया यांचे विचार अगदी नवे होते.
काही वर्षांनंतर अमानुल्ला खान यांनी आपली पदवी बदलून 'अमीर के बादशाह' अशी केली आणि ते अफगाणिस्तानचे 'शाह' झाले.
अमानुल्ला यांच्या सत्तेचा काळ 1929 पर्यंत चालला. त्या दरम्यान अमानुल्ला आणि राणी सोराया या दोघांनी अफगाणिस्तानातील महिला आणि मुलींच्या शिक्षणासाठी अनेक प्रयत्न केले.
1926 साली अमानुल्ला खान हे एकेठिकाणी म्हणतात, "मी भले जनतेचा राजा आहे. मात्र, शिक्षणमंत्री माझी पत्नीच आहे."
अमानुल्ला यांच्या या विधानानं अफगाणिस्तानातील सोराया यांची भूमिकाही स्पष्ट केली होती.
2014 साली अमानुल्ला खान आणि सोराया तर्जी यांची सर्वात छोटी मुलगी प्रिंसेस इंडिया यांनी मुलाखतीत म्हटलं की, "माझ्या आईने मुलींसाठी पहिली शाळा उघडली आणि आम्हा दोन्ही मुलींना शाळेत पाठवून स्वत:पासूनच सुरुवात केली."
1929 साली जेव्हा अमानुल्ला खान यांनी सत्तेवरून बाजूला करण्यात आलं, तेव्हा त्यांनी भारतात आश्रय घेतला. त्यानंतरच मुंबईत त्यांच्या मुलीचा जन्म झाला. त्यामुळे तिचं नावं इंडिया ठेवण्यात आलं.

फोटो स्रोत, RYKOFF COLLECTION / GETTY IMAGES
इंडिया यांनी अल-जजिराला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की, "माझ्या आईने केलेल्या कार्याचा अफगाणिस्तानातील लोक आजही आदर करतात. लोक आजही माझ्या आईच्या भाषणांची आठवण काढतात. अफगाण महिलांना स्वतंत्र राहण्यासह लिहिण्या-वाचण्याला त्यांनी प्रोत्साहन दिलं होतं."
इतिहासकार सांगतात की, राणी सोराया या त्यांच्या काळातील सर्वात विलक्षण महिलांमधील एक होत्या.
'ज्ञान मिळवा'
राणी सोराया अफगाणिस्तानच्या महिलांशी थेट संपर्कात राहात असत आणि त्यांच्या अधिकारांबाबत सातत्यानं चर्चा करत असत.
1926 साली अफगाणिस्तानच्या स्वातंत्र्य दिनी त्यांनी दिलेलं भाषण महिलांबाबत त्यांची भूमिका अधिक स्पष्ट करतं.
त्या म्हणाल्या होत्या, "स्वातंत्र्य आपलं सगळ्यांचं आहे, म्हणून आपण सर्वांनी ते साजरं केलं पाहिजे. मात्र, तुम्ही यावर विश्वास ठेवाल का, की सुरुवातीपासूनच आपल्या देशाच्या सेवेसाठी पुरुषांचीच आवश्यकता राहिलीय. महिलांचाही सहभाग असला पाहिजे, जसा आपल्या देशाच्या सुरुवातीच्या काळात आणि इस्लामच्या उदयाच्या काळात महिलांचा सहभाग होता."
"आपण त्यांच्या उदाहरणातून शिकलं पाहिजे की, राष्ट्रनिर्माणात सर्वांनी सहभागी व्हायला हवं आणि हे शिकल्याशिवाय शक्य होऊ शकत नाही. त्यामुळे आपण सगळ्यांनी अधिकाधिक ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेणेकरून इस्लामच्या सुरुवातीला महिलांनी जशी भूमिका बजावली, तशीच भूमिका महिला आता पार पाडू शकतील," असं त्या म्हणायच्या.
राणी सोराया यांनी अफगाणिस्तानत मुलींसाठी पहिली प्राथमिक शाळा काबूलमध्ये 1921 साली उघडली. 'मस्तुरात स्कूल' असं या शाळेचं नाव.
अरब न्यूजच्या एका लेखात जोनॉथन गोरनॉल आणि सय्यद सलाउद्दीन यांनी सांगितलं होतं की, 1928 साली मस्तुरात स्कूलच्या 15 विद्यार्थिनींना उच्च शिक्षणासाठी तुर्कस्तानला पाठवण्यात आलं.

फोटो स्रोत, ULLSTEIN BILD VIA GETTY IMAGES
अरब न्यूजमधील या लेखाचा मथळा होता - 'अफगाणिस्तानची राणी सोराया : काळाच्या पुढे असणारी महिला'
शिक्षणतज्ज्ञ शिरीन खान बुर्की त्यांच्या पुस्तकात लिहितात, 'अविवाहित मुलींना शिक्षणासाठी परदेशात पाठवण्याच्या निर्णयाची त्यावेळी अफगाणिस्तानात बरीच टीका झाली.'
मुलींना तुर्कस्तानात शिक्षणासाठी पाठवण्याचा निर्णयाकडे त्यावेळी पाश्चिमात्य संस्कृती स्वीकारण्याच्या दृष्टीनं पाहिलं गेलं.
'लँड ऑफ द अनकनक्वेरेबल : द लाईव्ह ऑफ कंटेपररी अफगाण वुमन' या पुस्तकात लेखिका शिरीन बुर्की म्हणतात की, अफगाणिस्तानातील शासक वर्ग महिलांना बरोबरीचं स्थान देऊ पाहत होता, ते अफगाणिस्तानातील तळगाळातील वास्तावापासून फार वेगळं आणि दूरचं होतं.
आई-वडिलांचा प्रभाव
राणी सोराया तार्जी यांचे वडील महमूद तार्जी अफगाणिस्तानच्या प्रभावशाली नेते आणि विचारवंत होते. त्यांनी देशात उदारमतवादी धोरणं आणली होती.
त्यांच्या विचारांचा प्रभाव केवळ मुलगी सोराया यांच्यावरच नव्हता, तर आणखी एका मुलावर होता, जो पुढे जाऊन त्यांचा जावई आणि अफगणिस्तानचा शासक बनला.
सॅन डिएगो स्टेट युनिव्हर्सिटीमधील प्रोफेसर इमेरिटा हुमा अहमद गोश म्हणतात की, 'तार्जी यांनी महिलांसाठी धोरणं बनवणं आणि लागू करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी एकच लग्न केलं होतं. कुटुंबातील महिलांना शिकण्याची आणि काम करण्याची संधी दिली. कुटुंबातल्या महिला बुरख्याविना सार्वजनिक ठिकाणी दिसत.'
हुमा गोश सांगतात, अमानुल्ला यांनी बुरखा आणि बहुविवाह पद्धतीविरोधात सार्वजनिकरित्या अभियान चालवलं. त्यांनी केवळ काबूलमध्येच नव्हे, तर देशातल्या अनेक ठिकाणी मुलींच्या शिक्षणावर जोर दिला.

फोटो स्रोत, ULLSTEIN BILD VIA GETTY IMAGES
'एका सार्वजनिक सभेत अमानुल्ला यांनी म्हटलं होतं की, इस्लाम महिलांना आपलं शरीर लपवण्यासाठी बुरखा परिधान करण्याचा आदेश देत नाही. अमानुल्ला यांचं हे भाषण संपल्यानंतर सोराया यांनी आपला बुरखा हटवला आणि तेथील महिलांनाही त्याबाबत विश्वास दिला.'
वेगवेगळ्या प्रसंगी काढलेल्या फोटांमध्ये सोराया हॅट परिधान केल्याचेही दिसून येतात.
कुटुंब
सोराया यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1899 रोजी सीरियाची राजधानी दमास्कस इथं झाला. त्यावेळी दमास्कस उस्मानिया राजवटीचा भाग होता.
सोराया लहानपणापासून तिथं राहिल्या आणि शिक्षण घेतलं. त्यानंतर त्या अफगाणिस्तानात परतल्या.
अमानुल्ला खान यांचे वडील हबीबुल्ला खान जेव्हा 1901 मध्ये अफगाणिस्तानात एक श्रीमंत व्यक्ती बनले, त्यावेळी परदेशात राहाणारी अनेक कुटुंब मायदेशी परतत होती.
तार्जी यांना सरकारमध्ये सहभागी होऊन देशातच्या विकासाची जबाबदारी सांभाळण्याचं निमंत्रण देण्यात आलं होतं.
प्रिन्स अमानुल्ला खान आणि सोराया तार्जी यांचं एकमेकांवर प्रेम होतं आणि त्यांनी 1913 साली लग्न केलं. हबीबुल्ला खान यांच्या हत्येनंतर अमानुल्ला हे त्यांच्या खुर्चीवर बसले आणि देशाची सत्ता या दाम्पत्याच्या हातात आली.

फोटो स्रोत, ULLSTEIN BILD VIA GETTY IMAGES
अमानुल्ला खान यांनी अफगाणिस्तानला ब्रिटिश साम्राज्यापासून स्वतंत्र केलं आणि 1919 साली त्यांनी स्वतंत्र अफगाणिस्तानची घोषणा केली.
अल जझिराचे पत्रकार तानया गौदसूजिया यांनी 2014 साली एका लेखात म्हटलं होतं की, राणी सोराया घोड्यावर बसून शिकार करत असत आणि त्यांच्याकडे ऑक्सफर्ड विद्यापीठाची मानद पदवी होती.
'सोराया यांची सीरियन वंशाची आई असमा रस्मिया तर्जी यांनी अफगाणिस्तानातील महिलांसाठी पहिलं नियतकालिक सुरू केलं होतं, ज्यात त्या यशस्वी महिला आणि इस्लामी जगतात उंचीवर पोहोचलेल्या महिलांबाबल लेख प्रसिद्ध करत असत.'
या नियतकालिकाचं नाव 'इरशाद-ए-निस्वां' आणि त्यांची मुलगी सोराया या प्रकाशनात त्यांची मदत करत असे. सोराया यांनी लैंगिक समानतेशी संबंधित गोष्टींनाही प्रोत्साहन दिलंय.
या नियतकालिकानंतर अफगाणिस्तानात अनेक प्रकारची प्रकाशनं निघाली.
राणीचा दौरा
1927-28 मध्ये राणी सोराया आणि त्यांच्या पतीने युरोपचा दौरा केला. तिथे त्यांचा मोठ्या प्रमाणात मान-सन्मान करण्यात आला.
गोरनॉल आणि सलाहउद्दीन यांच्या माहितीनुसार, युरोप दौऱ्यात असताना सोराया यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असे.
या दौऱ्यादरम्यान या दाम्पत्यानं युरोपमध्ये जे पाहिलं, ते आपल्या देशात जाऊन लागू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या दौऱ्यातील त्यांचे काही फोटो अफगाणिस्तानातील लोकांची नाराजी ओढवणारे ठरले.
राणी सोराया यांनी युरोपियन पुरुषांसोबत बुरख्याविना होत्या आणि काही फोटोंमध्ये तर त्या स्लिव्हलेस ड्रेसमध्ये होत्या.
अहमद गोश सांगतात की, रुढीवादी मौलाना आणि प्रांतीय नेत्यांनी या फोटोंना देशाच्या संस्कृती, धर्म आणि सन्मानासोबत खेळण्याचा प्रकार मानला.
काही सूत्रं असंही मानतात की, या फोटोंना चुकीच्या पद्धतीने तयार करून अफगाणिस्तानात ब्रिटिश साम्राज्याशी संबंधित लोकांनी वाटले होते. जेणेकरून देशात अस्थिरता पसरेल.

राजघराण्याविरोधात नाराजी वाढत चालली होती आणि अखेर 1929 साली त्यांना देश सोडून इटलीत शरणागती घ्यावी लागली. त्याचसोबत, अफगाणिस्तानच्या विकासाचा कार्यक्रमही थांबला.
1928 साली शेवटच्या दिवसात अफगाणिस्तानात गृहयुद्धाचे संकेत मिळत होते. याच दरम्यान हबीबुल्लाह कालाकनी यांनी काही काळासाठी सत्ता मिळवली. मात्र, शेवटी मोहम्मद नादिर शाह यांना सत्ता मिळाली, ती 1929 ते 1933 पर्यंत त्यांच्याच हातात राहिली.
नादिर शाह यांनी मुलींसाठीच्या शाळा बंद केल्या, बुरखा पद्धत पुन्हा लागू केली. मात्र, नादिर शाह यांचा मुला आणि अफगाणिस्तानचा मोठ्या कालावधीसाठी शासक राहिलेले मोहम्मद जहीर शाह यांच्या काळात (1933-1973) अमानुव्वा यांच्या काळातील धोरणं पुन्हा लागू करण्यात आले.
तत्कालीन स्थितीत काळाच पुढे असलेली महिला
राणी सोराया यांचा मृत्यू 1968 साली इटलीत झाला. त्याआधी आठ वर्षांपूर्वी पतीचं निधन झालं.
सोराया यांचं पार्थिव लष्करी सन्मानासह रोमच्या विमानतळावरून अफगाणिस्तानात आणलं गेलं आणि तिथे राजकीय सन्मान देऊन दफन करण्यात आलं.
1927 साली टाइम मासिकानं 100 प्रभावशाली महिलांच्या यादीत सोराया यांचा समावेश केला होता आणि त्यांचा फोटो मुखपृष्ठावर छापलं होतं.
पत्रकार सूयिन हेयनेज यांनी त्यांच्याबद्दल लिहिलं होतं की, 'अफगाणिस्तानची राणी आणि राजा अमानुल्ला खान यांच्या पत्नीच्या रुपात 1920 च्या दशकात मध्यपूर्वेतील सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये सोराय यांचा समावेश होतो आणि त्यांच्या पुरोगामी विचारांमुळे त्यांना जगभरात वेगळी ओळख मिळाली.'
शिक्षणासह त्यांनी महिलांना राजकारणात येण्याची संधी सुद्धा दिली आणि लग्नाच्या वयाची मर्यादाही वाढवली.
2018 साली मॉड्रन डिप्लोमसीमध्ये प्रकाशित एका लेखात संशोधकाने अमानुल्ला यांनी अफगाणिस्तानात महिलांसाठी केलेल्या कार्याचा आढावा घेतला होता.
त्यात त्यांनी म्हटलं होतं की, विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अमानुल्ला यांनी घटनात्मक आंदोलनाला प्रोत्साहन दिल्यानं अफगाणिस्तानातील महिलांना काही प्रमाणात स्वातंत्र्य आणि मानवाधिकार मिळू शकले.
'मात्र, सेव्हिएतच्या समर्थानमुळे डाव्या सरकारचं पतन आणि मुजाहिदीन, तालिबान यांच्या हातात अफगाणिस्तानची सत्ता गेल्यानंतर सर्व मूल्य मातीमोल झाले,' असं ते म्हणतात.
गेल्या दोन दशकात अफगाणिस्तानातील महिलांनी पुन्हा स्वातंत्र्य मिळवलं होतं. मात्र, आता पुन्हा एकदा अफागणिस्तानात तालिबानची सत्ता आलीय. सामाजिक मूल्य आणि मानवाधिकारांचं हनन होण्याची शक्यता आता वर्तवली जातेय.
मात्र, तालिबानचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद यांनी म्हटलंय की, अफगाणिस्तानात महिलांना शिकण्याचं स्वातंत्र्य असेल.
आता सगळ्यांची नजर अफगाणिस्तानकडे असून सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे, अफगाणिस्तानात महिलांचं स्थान आणि महिलांचे अधिकार नेमके काय असतील?
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








