शेख हसीनांचं सरकार कोसळल्यानंतर बांगलादेश आणि पाकिस्तानमधील जवळीक वाढलीय?

शेख हसीना

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, आर्ची अतेन्द्रिला
    • Role, बीबीसी न्यूज बांगलादेश

बांगलादेश आणि पाकिस्तानचे संबंध 1971 पासून नाजूक स्वरूपाचेच राहिलेले आहेत. शेख हसीना यांच्या आवामी लीगचे सरकार असताना दोन्ही देशांचे संबंध युद्ध आणि गुन्हेगारी प्रकरणांमुळे खराब झालेले आहेत.

मात्र, आता शेख हसीनांचं सरकार कोसळल्यानंतर बांगलादेशात अनेक बदल झाले, त्यापैकी पाकिस्तान आणि बांग्लादेशातील संबंधांबाबतही चर्चा सुरू झाली आहे.

बांगलादेशातील एका संघटनेने 11 सप्टेबर 2024 रोजी पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांचा स्मृतिदिन साजरा केला. बांगलादेशात पहिल्यांदा जिनांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला.

इतर देशांप्रमाणे पाकिस्ताननेही प्रा. मोहम्मद युनुस यांचं बांगलादेशचे मुख्य सल्लागार नियुक्त झाल्याबद्दल अभिनंदन केलं.

पाकिस्तानचा बांग्लादेशातील दूतावासदेखील चांगलाच सक्रिय आहे.

बांगलादेशात नियुक्त असलेल्या पाकिस्तानच्या उच्चायुक्तांनी विद्यमान सरकारच्या सल्लागारांची भेट घेतली आहे. यासह त्यांनी खालिदा जिया यांच्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या नेत्यांचीही भेट घेतली.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

पाकिस्तान-बांगलादेशमधील राजकीय संबंधांमध्ये काही बदल होतील का?

पाकिस्तानला बांगलादेशात किती रस आहे आणि पाकिस्तानसोबतच्या संबंधांमध्ये सुधारणा झाल्यास बांगलादेशला काय फायदा होऊ शकतो?

या प्रश्नांची उत्तरं आपण या विश्लेषणात्मक लेखातून जाणून घेणार आहोत.

शाहबाज शरीफ यांनीही केलं अभिनंदन

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी बांगलादेशच्या नव्या सरकारचे प्रमुख सल्लागार प्रा. मोहम्मद युनुस यांच्यासोबत होणाऱ्या चर्चेतून द्विपक्षीय संबंधांमध्ये सुधारणा करण्याबाबत उत्सुकता दाखवली आहे.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताज जोहरा बलोच यांनी बीबीसी बांगलासोबत बोलताना सांगितले की, "पाकिस्तानने नेहमीच बांगलादेशसोबत सकारात्मक संबंध प्रस्थापित होण्याच्या दृष्टीने भूमिका घेण्यास प्राथमिकता दिली आहे."

शाहबाज शरीफ (फाइल फोटो)

फोटो स्रोत, RAHAT DAR/EPA-EFE/REX/SHUTTERSTOCK

फोटो कॅप्शन, शाहबाज शरीफ (फाइल फोटो)

त्या म्हणाल्या, "कधी कधी काही अडचणीही आल्यात, मात्र त्या त्यातून मार्ग काढत संबंध अधिक मजबूत बनवण्याचे प्रयत्न केल्यास आम्ही परस्पर हित साधू शकतो."

बांगलादेशचे प्रसिद्ध लेखक फहाम अब्दुल सलाम यांच्या मते, गेल्या 15 वर्षांमध्ये बांगलादेश सरकारने पाकिस्तानसोबतच्या संबंधांकडे भारताच्या चष्म्यातून पाहिले आहे. त्यामुळे दोन्ही देशातील संबंध अजूनही 1971 च्या इतिहासाजवळच घुटमळत आलेले आहेत.

पाकिस्तानने माफी मागण्याची बांगलादेशची अपेक्षा

1971 च्या रक्तापातासाठी पाकिस्तानने माफी मागावी, हा बांगलादेशात कायम महत्वाचा विषय राहिलेला आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी या विषयावर अनेकदा भाष्यही केले. मात्र, शासकीय पातळीवर तसे प्रयत्न झाले नाही.

याबाबत पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताज जोहरा बलोच यांच्या मते, 1971 चा काळा इतिहास दोन्ही देशांना ज्ञात आहे. मात्र, या विषयावर दोन्ही देशांनी मार्ग काढलेला असून 1974 सालीच याविषयावर एक सामंजस्य करार झालेला आहे.

1971 च्या युद्धानंतर पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती याह्या खान यांना राष्ट्रपतीपदावरून पायउतार व्हावे लागले होते. मात्र, त्यानंतर जुल्फिकार अली भुट्टो हे सत्तेत आल्यानंतरही दोन्ही देशांतील कटुत्व संपुष्टात येऊ शकलं नाही.

बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान (फाइल फोटो)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान (फाइल फोटो)
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

आंतरराष्ट्रीय समूहाच्या प्रयत्नानंतर 1974 साली पाकिस्तान आणि बांगलादेशच्या नेत्यांनी एकमेकांच्या देशात दौरे केले.

23 फेब्रुवारी 1974 साली पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो यांनी लाहोरमध्ये शेख मुजीबुर रेहमान यांचे स्वागत केले होते. यावेळी पाकिस्तानात बांगलादेशचे राष्ट्रगीतही गायले गेले. त्याच्या एक दिवस आधीच पाकिस्तानने बांगलादेशला औपचारिकरित्या मान्यता दिली होती.

त्याच वर्षी जून महिन्यात जुल्फिकार अली भुट्टो यांनीही बांगलादेशचा दौरा केला होता. त्यावेळी भुट्टो म्हणाले होते, "पाकिस्तानी जनता तुमच्या निर्णयाचा आदर करत असून पाकिस्तान सरकार बांगलादेशचे सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्याचा सन्मान करते."

बांगलादेश, पाकिस्तान आणि भारतादरम्यान एप्रिल 1974 साली एक त्रिपक्षीय सामंजस्य करार झाला होता. त्यावेळी जुल्फिकार अली भुट्टो यांनी बांगलादेशातील जनतेने मागे घडलेला इतिहास विसरून पाकिस्तानला माफ करावं,असे आवाहन केले होते.

शेख मुजीबुर रेहमान यांनीसुद्धा भूतकाळ विसरून नव्याने सुरुवात करण्याचे आवाहन केल्याची नोंद न्यूयॉर्क टाइम्सच्या एका विशेष बातमीपत्रात सापडते.

त्यावेळी दोन्ही नेत्यांच्या दूरदृष्टीमुळे दोन्ही देशांतील संबंध वाढीस लागण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे मुमताज जोहरा बलोच यांनी सांगितले.

त्या म्हणाल्या, "पाकिस्तानातील वर्तमान पिढी त्या घटनेनंतर जन्माला आलेली असल्याने बांगलादेशचा सन्मान करते. त्यामुळे 50-60 वर्षांनी पुन्हा त्या विषयावर पुन्हा चर्चा करण्याची आवश्यकता नाही."

2002 साली पाकिस्तानचे लष्करप्रमुख तथा राष्ट्रपती जनरल परवेज मुशर्रफ यांनीसुद्धा ढाका दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी 1971 च्या घटनेबाबत पश्चाताप व्यक्त केला होता.

मात्र, बांगलादेशकडून या सर्व प्रकारांकडे अधिकृतरित्या माफीच्या दृष्टीने पाहिलं जात नाही.

पाकिस्तान आणि बांगलादेशचे ध्वज

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शेख हसीना सरकार पडल्यानंतर पाकिस्तान आणि बांगलादेशमधील संबंधांना नवी उभारी मिळेल का?

1971 च्या युद्धात मृत्यूमुखी पडलेले विचारवंत मुनीर चौधरी यांचे चिरंजीव आसिफ मुनीर यांच्या मते, माफीचं प्रकरण लावून धरत पाकिस्तानला खजील करण्याची आवश्यकता नाही.

ते म्हणाले, "पाकिस्तानी जनतेचा 1971 च्या घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. मात्र, असे असले तरी ते त्याबाबत दुखी नाहीतच असेही नाही. 1970 च्या दशकातही पाकिस्तानी कलाकार आणि लेखकांनी बांगलादेशासाठी आवाज उठवण्यासाठी सुरुवात केली होती."

फहाम अब्दुल सलाम यांनी 1998 साली पाकिस्तान दौऱ्यावेळी त्यांना आलेला अनुभव सांगितला.

ते म्हणाले, "एका टॅक्सीचालकाला जेव्हा मी बांगलादेशी आहे असं सांगितलं तेव्हा त्याने माझा हात हातात धरून 1971 च्या घटनेबाबत माफी मागितली होती. त्या प्रसंगाने मी प्रचंड प्रभावित झालो होतो."

फहाम अब्दुल सलाम हेही कबुल करतात, की पाकिस्तानमध्ये बांगलादेशबाबत सर्वांची भावना सारखी नाही. मात्र, पाकिस्तानमध्ये त्या घटनेबाबत नक्कीच एक अपराधभाव जाणवतो.

"1971 किंवा 1972 नंतर जन्माला आलेली मुलं त्या घटनेसाठी जबाबदार असू शकतात का? तुम्ही तुमच्या आजोबांच्या गुन्ह्यांसाठी जबाबदार ठरता का?" असा सवालही त्यांनी केला.

लाल रेष

इतर काही महत्त्वाच्या बातम्या :

लाल रेष

पाकिस्तान-बांगलादेश संबंधांमध्ये सुधारणा शक्य आहे ?

पाकिस्तान ट्रेड डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या वेबसाईटनुसार, पाकिस्तानने बांगलादेशच्या चामडे, टेक्स्टाईल आणि गारमेंट क्षेत्रात अब्जावधी डॉलरची गुंतवणूक केलेली आहे.

बांगलादेश पाकिस्तानातून कापूस, कापड, केमिकल्स, खनिज, विजेचे साहित्य आणि मशिनरी आयात करतो, तर पाकिस्तान बांगलादेशाकडून ताग आणि तागनिर्मित वस्तू, हायड्रोजन पॅरॉक्साइड, कृत्रिम फायबर, टेक्सटाईल आणि औषधी वस्तूंची आयात करतो.

पाकिस्तानच्या सरकारी आकड्यांनुसार, 2023 साली बांगलादेशाने पाकिस्तानला 60 कोटी 33 लाख डॉलरपेक्षा जास्त वस्तूंची निर्यात केली, तर पाकिस्तानमधून बांगलादेशला 65 कोटी 50 लाख डॉलरच्या वस्तू निर्यात केल्या गेल्या.

2019 साली बांगलादेशने पाकिस्तानातून 8 कोटी 30 लाख डॉलरपेक्षा अधिक वस्तूंची आयात केली.

शेख मुजीबुर रहमान झुल्फिकार अली भुट्टो यांना मिठी मारताना

फोटो स्रोत, REUTERS

फोटो कॅप्शन, शेख मुजीबुर रहमान झुल्फिकार अली भुट्टो यांना मिठी मारताना

यावरून हेही सिद्ध होते की, बांगलादेश पाकिस्तानातून येणाऱ्या आयातीवर बराच अवलंबून आहे. ही एक मोठी व्यापारी तूट आहे, मात्र तौहिद हुसेन यांच्या मते, ही फार मोठी समस्या नाही.

भारत चीनमधून होणाऱ्या आयातीवर अवलंबून आहे, मात्र, अमेरिका आणि युरोपात वस्तू निर्यात करतो. त्यामुळे अर्थव्यवस्था आणि व्यापारी दृष्टीने या सामान्य बाबी आहे.

ते म्हणाले, "समजा आम्ही पाकिस्तानातून जास्त कापूसगाठी खरेदी केल्या तर पाकिस्तानला फायदा होईल, मात्र त्यापासून तयार केलेले कापड आम्ही अमेरिकेला निर्यात करतो. त्यामुळे आम्हाला कच्चा मालाच्या रुपात कापसाची गरज आहे. या सर्व गोष्टी एकमेकांशी संबंधीत आहे."

फहाम अब्दुल सलाम यांच्या मते, पाकिस्तानमध्ये बांगलादेशला व्यापारासाठी चांगल्या संधी आहेत. त्यांनी बांगलादेशच्या 'येलो' या ब्रँडचे उदाहरण दिले. ज्याच्या काही शाखा पाकिस्तानातही आहेत.

ते म्हणाले, "पाकिस्तानात 20 लाखांपेक्षा अधिक बांगलादेशी नागरिक राहतात. आम्ही त्यांचा बाजारपेठेच्या दृष्टीनेही विचार करू शकतो."

दोन्ही देशांचे संबंध वृद्धिंगत झाल्यास व्यापारासाठी नवीन संधी निर्माण होतील, असे फहाम अब्दुल सलाम यांना वाटते.

पाकिस्तान आणि बांगलादेशचे नकाशे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पाकिस्तानच्या बांगलादेशसोबतच्या संबंधांवरून वाद वाढत आहेत

बांगलादेशच्या काळजीवाहू सरकारच्या वित्त आणि वाणिज्य मंत्रालयाच्या सल्लागारांनीसुद्धा दोन्ही देशांतील व्यापारी संबंध मजबूत बनवण्याबाबत चर्चा केली आहे.

मुमताज जोहरा बलोच यांनीसुद्धा पाकिस्तान व्यापारी दृष्टीकोनाला महत्व देत असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, "व्यापार, कृषी, विज्ञान आणि तंत्रज्ञान आदी क्षेत्रांत दोन्ही देशांच्या जनेतेचे संबंध यापूर्वीच प्रस्थापित झालेले आहेत."

त्यांच्या मते, SAARC आणि OIC सारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांचे सदस्य या नात्याने दोन्ही देश एकत्र येऊन महत्वपूर्ण भूमिका पार पाडू शकतात.

या दोन्ही देशांतील जनतेलाही एकमेकांच्या जवळ आणण्याची गरज असल्याचे बीबीसीसोबत बोलताना तज्ज्ञांनी सांगितले.

असिफ मुनिर यांच्या मते, दोन्ही देशांमध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक साधर्म्य आहे. बांगलादेशमध्ये पाकिस्तानातील साहित्य, टीव्ही मालिका आणि चित्रपटांना डोक्यावर घेतलं जातं.

मात्र, पाकिस्तान दौऱ्यावेळी तेथे राहणाऱ्या गरीब बांगलादेशी नागरिकांकडे पाकिस्तानी नागरिक तुच्छतेच्या भावनेने पाहत असल्याचं निदर्शनास आल्याचेही आसिफ मुनीर यांनी नमुद केले.

ते म्हणाले, "ही मानसिकता बदलण्यासाठी बांगलादेशचे उदारमतवादी धोरण अधिक व्यापक करण्याची गरज आहे."

तर "दोन्ही देशांतील जनता, विशेषत तरुण पिढीमध्ये मैत्रीची भावना आहे. ज्याआधारे परस्परसंबंध वृद्धींगत होण्यास मदत होऊ शकते." असे मुमताज जोहरा बलोच म्हणाल्या.

पाकिस्तान-बांगलादेश पर्यटन

पाकिस्तानने बांगलादेशातील नागरिकांसाठी व्हिजाची फी रद्द केली आहे. यावरून दोन्ही देशांत थेट विमानवाहतूक सुरू करण्याबाबत पाकिस्तान उत्सुक असल्याचे दिसून येते.

पाकिस्तानी विद्यार्थी बांगलादेशातील शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षणासाठी जातात. तसेच पाकिस्तानातील काही प्रेक्षणीय स्थळं पाहण्याची बांगलादेशी नागरिकांची इच्छा आहे.

मात्र, बांगलादेश तिन्ही बाजूंनी भारताच्या सीमांनी वेढलेला असल्याने बांगलादेशी नागरिक कमी खर्चाच्या दृष्टीने भारतातच पर्यटन करण्यावर भर देतात.

बांगलादेशातील 20 लाख नागरिक पाकिस्तानात राहतात

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बांगलादेशातील 20 लाख नागरिक पाकिस्तानात राहतात

तौहिद हुसैन सांगतात, "पाकिस्तानाला गेल्यानंतर भारतात जाणं कठीम होऊ शकतं असं जर एखाद्या बांगलादेशी नागरिकास वाटल्यास तो कधीच पाकिस्तानात जाणार नाही."

आशियाच्या या भागात भारताचे पाकिस्तान आणि चीनसोबतचे संबंध तणावपूर्ण आहेत.

बांगलादेश आणि चीनचे संबंध चांगले आहेत. अवामी लीगच्या सरकारच्या काळात भारताला बांगलादेश आणि पाकिस्तान संबंधांबाबत चिंता करण्याची आवश्यकता नव्हती.

असे असले तरी बांगलादेश अशा परिस्थितीतही भारताला पूर्णपणे दुर्लक्षित करू शकत नाही, हे वास्तवही नाकारता येणार नाही.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)