जेव्हा शेख हसीना यांना इंदिरा गांधींनी दिल्लीमध्ये आश्रय दिला होता

फोटो स्रोत, Getty Images
- Author, रेहान फजल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
(बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणानं माजी पंतप्रधान शेख हसीना आणि माजी गृहमंत्री असदुज्जमान खान कमाल या दोघांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. या पार्श्वभूमीवर हा लेख पुन्हा शेअर करत आहोत.)
15 ऑगस्ट 1975: शेख हसीना, त्यांचे पती डॉ. वाजेद आणि बहिण रेहाना ब्रसेल्समध्ये बांगलादेशचे राजदूत सनाऊल हक यांच्याकडे थांबल्या होत्या.
तिथून त्यांना पॅरिसला जायचं होतं, मात्र एक दिवस आधी डॉ. वाजेद यांचा हात गाडीच्या दरवाज्यात चिमटला गेला.
त्यामुळे पॅरिसला जायचं की नाही या विचारात असतानाच सकाळी 6.30 वाजता राजदूत सनाऊल हक यांचा फोन वाजला.
दुसरीकडे हुमायून रशीद चौधरी हे बांगलादेशचे जर्मनीतील राजदूत होते.
आज सकाळीच बांगलादेशमध्ये लष्कराने उठाव केल्याचं त्यांनी सांगितलं. तुम्ही पॅरिसला न जाता ताबडतोब जर्मनीला परत या, असं ते म्हणाले.
लष्करी उठावात शेख मुजीब मारले गेल्याचं राजदूत सनाऊल हक यांना कळताच त्यांनी या दोन मुली आणि जावयांना कोणतीही मदत देण्यास नकार दिला. एवढंच नव्हे तर त्यांना त्यांचं घर सोडून जाण्यासही सांगितलं.

फोटो स्रोत, UN
काही वर्षांपूर्वी शेख मुजीब यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात या घटनेची आठवण करून देताना शेख हसीना म्हणाल्या, "जणू काही आम्ही त्यांच्यावर ओझं झालेलो, खरं पाहता शेख मुजीब यांनीच त्यांना बेल्जियममध्ये बांगलादेशचे राजदूत केलं होतं आणि ती एक राजकीय नियुक्ती होती. आम्हाला त्यांनी जर्मनीला जाण्यासाठी कार देण्यासही नकार दिला."
मात्र, जर्मनीतील बांगलादेशचे राजदूत हुमायून रशीद चौधरी यांच्या मदतीने ते सर्वजण कसेतरी जर्मनीला पोहोचले. त्यानंतर अर्ध्या तासातच युगोस्लाव्हियाच्या दौऱ्यावर असलेले बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री डॉ. कमल हुसैनदेखील तिथे पोहोचले.
त्याच दिवशी सायंकाळी जर्मन प्रसारण संस्था डॉयचेवेले आणि काही जर्मन वृत्तपत्रांचे पत्रकार त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी राजदूतांच्या घरी आले.

फोटो स्रोत, GETTY IMAGES
शेख हसीना आणि त्यांची बहीण रेहाना यांच्यावर एवढा मोठा आघात झाला होता की त्या त्यांच्याशी काहीच बोलल्या नाहीत. परराष्ट्र मंत्री कमाल हुसैनदेखील तिथे उपस्थित होते, मात्र त्यांनीही एक चकार शब्दही तोंडातून काढला नाही.
राजदूत चौधरी यांनी हे आवर्जुन सांगितलं की शेख यांच्या दोन्ही मुली त्यांच्यासोबत आहेत. या दरम्यान युगोस्लाव्हियाचे राष्ट्राध्यक्ष मार्शल टिटो यांनी त्यांच्या आरोग्याबाबत विचारणा केली, परंतु हे ठरवता येत नव्हतं, की हे लोक आता कुठे राहतील?

फोटो स्रोत, PIC COURTESY- SIRAJUDDIN AHMED
हुमायून रशीद चौधरी यांचा मुलगा नौमन रशीद चौधरी यांनी बांगलादेशातील प्रसिद्ध वृत्तपत्र 'द डेली स्टार' च्या 15 ऑगस्ट 2014 च्या अंकात एक लेख लिहिला.
15 ऑगस्ट : 'बंगबंधूच्या मुली' या मथळ्याखाली लिहिलेल्या लेखात ते म्हणाले, “एका राजकीय कार्यक्रमात माझ्या वडिलांनी पश्चिम जर्मनीतील भारताचे राजदूत वाय. के. पुरी यांना विचारलं की, शेख हसीना आणि त्यांच्या कुटुंबीयांना भारत राजकीय आश्रय देऊ शकतो का? त्यांनी उत्तर दिले की, मी याची माहिती घेतो.
दुसर्या दिवशी ते माझ्या वडिलांना त्यांच्या कार्यालयात भेटायला आले आणि म्हणाले की साधारणपणे भारतात राजकीय आश्रय देण्याची प्रक्रिया लांबलचक असते.
त्यांनी स्वतःच सुचवलं की तुम्ही दिल्लीत चांगलेच प्रसिद्ध आहात कारण स्वातंत्र्यापूर्वी तुम्ही तिथल्या बांगलादेश मोहिमेचे प्रमुख होता. इंदिरा गांधी आणि त्यांचे सल्लागार डी. पी. धर आणि पी. एन. हक्सर यांचं तुमच्यावर प्रेम आहे. तुम्ही थेट त्यांच्याशीच संपर्क का साधत नाही?"
क्षणाचाही विलंब न करता चौधरी यांनी पुरी यांच्यासमोरच डी. पी. धर आणि हक्सर यांना फोन लावला. मात्र त्यावेळी दोघेही भारताबाहेर होते.

फोटो स्रोत, PIC COURTESY- SIRAJUDDIN AHMED
इंदिरा गांधींना फोन करायला त्यांना संकोच वाटत होता, कारण त्या दोघांच्या हुद्दयात खूप फरक होता. त्या देशाच्या पंतप्रधान होत्या तर चौधरी हे फक्त एक सामान्य राजदूत होते.
इंदिरा गांधींना ते अनेकदा भेटले होते, पण गेल्या तीन वर्षांपासून त्यांचा त्यांच्याशी संपर्क नव्हता.
राजकारणात तीन वर्षांचा कालावधी हा खूप मोठा कालावधी असतो. दुसरं म्हणजे, भारतात त्यावेळी आणीबाणी लागू करण्यात आलेली आणि स्वत: इंदिरा गांधी अनेक समस्यांना सामोरं जात होत्या.

फोटो स्रोत, PIC COURTESY- SIRAJUDDIN AHMED
नौमन रशीद चौधरी लिहितात, “कुठूनही कोणताही मार्ग सापडत नसल्याचं लक्षात आल्यावर हुमायून चौधरी यांनी शेवटी थकून-माघार घेऊन इंदिरा गांधींच्या कार्यालयात फोन केला. भारतीय राजदूत पुरी यांनी त्यांना नंबर दिलेला. चौधरी यांना अपेक्षित नव्हतं की हा फोन टेलिफोन ऑपरेटरच्याही पुढे जाईल. इंदिरा गांधींनी स्वत: फोन उचलल्याचं कळल्यावर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. इंदिरा गांधींना त्यांनी सर्व काही सांगितलं. बंगबंधूंच्या मुलींना राजकीय आश्रय देण्याचं त्यांनी ताबडतोब मान्य केलं.”
19 ऑगस्ट रोजी राजदूत पुरी यांनी चौधरी यांना कळवलं की त्यांना दिल्लीतून कळवण्यात आलंय की शेख मुजीब यांच्या मुली आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिल्लीला पोहचवण्याची तात्काळ व्यवस्था करण्यात यावी.

फोटो स्रोत, PIB
24 ऑगस्ट 1975 रोजी एअर इंडियाच्या विमानाने शेख हसीना आणि त्यांचं कुटुंब दिल्लीतील पालम विमानतळावर पोहोचलं. मंत्रिमंडळातील एका सहसचिवांनी त्यांचं स्वागत केलं. सर्वप्रथम त्यांना ‘रॉ’च्या 56, रिंग रोड येथील सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं. नंतर त्यांना डिफेन्स कॉलनीतील घरात हलवण्यात आलं.
दहा दिवसांनी, 4 सप्टेंबर रोजी ‘रॉ’चे अधिकारी त्यांना घेऊन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या 1, सफदरजंग रोड येथील निवासस्थानी गेले.
इंदिरा गांधीना भेटल्यावर शेख हसीना यांनी त्यांना विचारले की, “15 ऑगस्टला काय घडलं याची इत्यंभूत माहिती तुमच्याकडे आहे का?
तिथे उपस्थित असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, त्यांच्या कुटुंबातील एकही सदस्य जिवंत राहिलेला नाही. हे ऐकून शेख हसीना यांना रडू कोसळलं.
शेख हसीना यांचे चरित्रकार सिराजुद्दीन अहमद लिहितात, "इंदिरा गांधींनी, हसीना यांना मिठी मारून त्यांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला.
त्या म्हणाल्या की, तुमचं झालेलं नुकसान भरून काढता येणार नाही. तुम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. आजपासून तुम्ही तुमच्या मुलाला वडील आणि मुलगी तुमची आई असल्याचं समजा."

फोटो स्रोत, PIC COURTESY- SIRAJUDDIN AHMED
सिराजुद्दीन अहमद यांच्या म्हणण्यानुसार, शेख हसीना यांच्या भारतातील वास्तव्यादरम्यान त्यांची इंदिरा गांधीसोबत झालेली ही एकमेव भेट होती. मात्र, रॉच्या गुप्तचर अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, शेख हसीना आणि इंदिरा गांधी यांच्यात अनेकदा भेटीगाठी झालेल्या.
या भेटीनंतर दहा दिवसांनी शेख हसीना यांना इंडिया गेटजवळील पंडारा पार्कच्या सी ब्लॉकमध्ये फ्लॅट देण्यात आला.
त्यामध्ये तीन बेडरूम आणि काही प्रमाणात फर्निचरही होतं. हळूहळू त्यांनी काही फर्निचरची खरेदी केली.
लोकांमध्ये न मिसळण्याच्या आणि घराबाहेर न पडण्याच्या कडक सूचना त्यांना देण्यात आल्या होत्या. त्यांचा वेळ जावा यासाठी त्यांना एक टेलिव्हिजनही देण्यात आलेला.
त्यावेळी टेलिव्हिजनवर फक्त दूरदर्शन ही एकच वाहिनी दिसायची आणि त्यावरही कार्यक्रमांचं फक्त दोन तास प्रसारण केलं जायचं.

फोटो स्रोत, PIC COURTESY- SIRAJUDDIN AHMED
‘रॉ’ चे एक माजी गुप्तचर अधिकारी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगतात, “शेख हसीना यांच्या सुरक्षेसाठी दोन लोकांना तैनात करण्यात आलेलं, एक होते पश्चिम बंगालवरून बोलविण्यात आलेले इन्स्पेक्टर सत्तो घोष आणि दुसरे होते 1950 च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी पी. के. सेन. विशेष म्हणजे इन्स्पेक्टर घोष यांना कर्नल म्हणून शेख हसीना यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेलं. तर आयजी स्तरावरील पी. के. सेन यांना इन्स्पेक्टर म्हणून हसीना यांच्या सुरक्षेसाठी ठेवण्यात आलेलं. हे दोन्ही अधिकारी सावलीसारखे हसीना यांच्या सोबत राहत असंत.
1 ऑक्टोबर 1975 रोजी हसीना यांचे पती डॉ. वाझेद यांनाही अणुऊर्जा विभागात फेलोशिप देण्यात आली.
‘रॉ’चे माजी अधिकारी सांगतात, "शेख हसीना यांचा संपूर्ण खर्च भारत सरकार करत होतं. त्यांचा खर्च अत्यंत नाममात्र होता आणि कोलकाता येथे राहणाऱ्या चित्तरंजन सुतार या त्यांच्या एका सूत्राद्वारे त्यांना ही रक्कम उपलब्ध करून दिली जात असे."

फोटो स्रोत, Getty Images
हसीना यांचा दिल्ली प्रवास पूर्णपणे गुप्त ठेवण्याचा प्रयत्न केला गेलेला, परंतु बांगलादेश सरकारला याची पूर्ण कल्पना होती की शेख हसीना यांचं कुटुंब दिल्लीत वास्तव्याला होतं.
मे 1976 च्या सुरुवातीला बांगलादेशचे भारतातील उच्चायुक्त शमसुर रहमान हे आपल्या पत्नीसह शेख हसीना आणि त्यांची बहीण रेहाना यांना त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेलेले आणि दोन्ही बहिणी त्यांना मिठी मारून रडल्यादेखील होत्या.
शेख रेहाना 1976 मध्ये वरिष्ठ माध्यमिक शाळेच्या परीक्षेला बसणार होत्या पण बांगलादेशातील घटनांमुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडावं लागलं होतं.
जुलै 1976 मध्ये शांतीनिकेतनमध्ये त्यांना प्रवेश देण्याची व्यवस्था करण्यात आलेली, परंतु सुरक्षेच्या कारणास्तव या विचाराला नंतर तिलांजली देण्यात आली.
24 जुलै 1976 रोजी शेख रेहाना यांचा विवाह शफीक सिद्दीकी यांच्यासोबत लंडनमध्ये पार पडला. मात्र हसीना आणि त्यांचे पती या लग्नात सहभागी होऊ शकले नाहीत.

या काळात इंदिरा सरकारमधील मंत्री प्रणव मुखर्जी आणि त्यांचे कुटुंबीय हसिना आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सतत संपर्कात होते. अनेकवेळा हसीना यांची मुलं प्रणव मुखर्जींच्या सरकारी निवासस्थानी खेळताना दिसायची.
प्रणव मुखर्जी त्यांच्या 'ड्रमॅटिक डिकेड' या आत्मचरित्रात लिहितात की, दोन्ही कुटुंबातील सदस्य फक्त अनेकदा भेटायचेच नाहीत तर ते दिल्लीबाहेर पिकनिकलासुद्धा जायचे.
दरम्यान 1977 मध्ये निवडणुका झाल्या आणि इंदिरा गांधींचा निवडणुकीत पराभव झाला. नवे पंतप्रधान मोरारजी देसाई हे ‘रॉ’च्या कारवायांमध्ये फारसा रस घेत नसत.
एमए वाजेद मियाँ त्यांच्या 'बंगबंधू शेख मुजीबुर रहमान' या पुस्तकात लिहितात, "शेख हसीना आणि डॉ. वाझेद यांनी रेहानाला दिल्लीत आणण्यासाठी ऑगस्ट 1977 मध्ये मोरारजी देसाई यांची भेट घेतलेली.
रेहाना यांना दिल्लीत आणण्याची व्यवस्था मोरारजी देसाईंनी केलेली. डिसेंबर 1977 च्या दुसऱ्या आठवड्यात रेहाना दिल्लीत आल्यादेखील होत्या आणि शेख हसीना यांच्या पंडारा पार्क येथील फ्लॅटमध्ये त्यांच्यासोबत राहिल्या होत्या.

फोटो स्रोत, Getty Images
मात्र हळूहळू मोरारजी देसाईंनी हसीना यांच्या सुरक्षेतून आपला हात काढून घ्यायला सुरूवात केली होती.
सिराजुद्दीन अहमद लिहितात, "डॉ. वाजेद आणि हसिना यांच्यावर हळूहळू असा दबाव टाकला जाऊ लागला की ते स्वतः भारत सोडून दुसरीकडे निघून जातील.
सर्वात आधी त्यांचं वीजेचं बिल भरणं बंद करण्यात आलं आणि नंतर वाहनाची सुविधाही काढून घेण्यात आली. डॉ. वाजेद यांनी अणुऊर्जा आयोगाकडे त्यांची फेलोशिप एक वर्ष वाढवण्यासाठी अर्ज केला, परंतु तीन महिने कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांच्यासमोर आर्थिक समस्या उभ्या राहिल्या.
शेवटी, मोठ्या संकोचाने मोरारजींनी त्यांची फेलोशिप आणखी फक्त एक वर्ष वाढवण्याचे आदेश दिले.
जानेवारी 1980 मध्ये इंदिरा गांधी पुन्हा सत्तेवर आल्या आणि शेख हसीना यांच्या सर्व समस्या पुन्हा एकदा दूर झाल्या.

फोटो स्रोत, PIC COURTESY- SIRAJUDDIN AHMED
4 एप्रिल 1980 रोजी शेख हसीना आपल्या मुलांसह रेहाना यांना भेटण्यासाठी लंडनला रवाना झाल्या.
1980 मध्येच अवामी लीगचे अनेक नेते शेख हसीना यांना भेटण्यासाठी दिल्लीत आले आणि त्यांना ढाक्याला येण्याची विनंती केली.
हसीना यांनी ढाक्याला जावं असं डॉ. वाजेद यांना वाटत नव्हतं. त्यांचं असं म्हणणं होतं की हसीना यांनी राजकारणापासून दूर राहावं.
सरतेशेवटी, 17 मे 1981 रोजी शेख हसीना त्यांची मुलगी आणि अवामी लीगचे नेते अब्दुस समद आझाद आणि कोरबान अली यांच्यासह ढाक्याला रवाना झाल्या.

फोटो स्रोत, Getty Images
ढाका विमानतळावर सुमारे 15 लाख लोकांनी त्यांचं स्वागत केले. फेब्रुवारी 1982 मध्ये डॉ. वाजेद यांनी बांगलादेश अणू आयोगात सामील होण्यासाठी अर्ज केला. अणू आयोगाने त्यांना राहण्यासाठी मोहाखली येथे दोन खोल्यांचं घर दिलं.
हसीना वाजेद त्यांच्यासोबत त्याच घरात राहिल्या आणि त्यांच्या मुलांनी धनमोंडी येथील स्कोल्स्का माध्यमिक विद्यालयात प्रवेश घेतला.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








