बांगलादेशः शेख मुजीबुर रेहमान यांची कबर पाकिस्तानने आधीच खणून ठेवली होती तेव्हा

शेख मुजीबुर रहमान

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, रेहन फजल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

पाकिस्तानमधल्या 'नुक्ता-ए-नजर' या टीव्हीवरच्या कार्यक्रमात 2015 साली राजा अनार खाँ या एका माजी पोलीस अधिकाऱ्याची मुलाखत दाखवण्यात आली.

शेख मुजीबुर यांच्यावर नजर ठेवण्यासाठी आपल्याला एका कैद्याच्या वेशात फैसलाबाद तुरुंगात ठेवण्यात आल्याचं त्यांनी या कार्यक्रमात सांगितलं होतं.

त्यावेळी अनार खाँ हे स्पेशल ब्रँचमधले एक तरुण पोलीस इन्स्पेक्टर होते. अनार खाँनी सांगितलं, "मला कोणत्या अपराधाची शिक्षा झाल्याचं शेख यांनी मला विचारलं. माझ्यावर एका मुलीला पळवल्याचा आरोप असल्याचं मी त्यांना खोटं सांगितलं. ख्वाजा अयूब नावाच्या दुसऱ्या एका कैद्यावर मुजीब यांच्यासाठी जेवण तयार करण्याची जबाबदारी होती. शिवाय मुजीबना त्यांच्या पाईपसाठी तंबाखूही उपलब्ध करून दिली जाई."

रात्र झाली की अनार खाँ शेख यांच्या कोठडीबाहेर झोपत. सकाळी तेच शेख यांच्या कोठडीचं कुलूप उघडत. शेख मुजीबना ते 'बाबा' हाक मारत.

राजा अनार खाँ यांनी सांगितलं, "भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर लष्करी शासनाने आम्हा दोघांना ईशान्येकडे 150 मैलांवर असणाऱ्या मियाँवाली तुरुंगात पाठवण्याचा निर्णय घेतला. आमच्यावर हल्ला करत शेख यांना सोडवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो अशी भीती त्यांना वाटत होती."

"शेखना ज्या गाडीत बसवण्यात आलं ती गाद्या आणि ब्लँकेट्स यांनी इतकी भरली होती की त्यामध्ये शेख यांना बसण्यासाठी जागाच उरली नव्हती. गाडीच्या बाजूच्या काचांवर मुद्दाम चिखल लावण्यात आला होता. म्हणजे आत कोण बसलंय हे कोणालाच कळू शकलं नसतं. रस्त्यावर इतके सैनिक का, असं शेख यांनी विचारल्यावर खाँ यांनी सैनिकी सराव सुरू असल्याचं सांगितलं होतं."

मुजीब यांच्या सुटकेसाठी इंदिरा गांधींचं पत्र

अमेरिकेतले भारताचे राजदूत लक्ष्मीकांत झा यांच्यामार्फत इंदिरा गांधींनी 13 मे 1971 ला अमेरिकेचे राष्ट्रपती रिचर्ड निक्सन यांना एक पत्र पाठवलं. मुजीब यांना तुरुंगात टाकण्यात आल्याविषयीची काळजी त्यांनी या पत्रातून व्यक्त केली होती.

11 ऑगस्टला त्यांनी निक्सन यांना आणखीन एक पत्र लिहिलं. मुजीब यांच्यावर लष्करी कोर्टात खटला चालवण्यात येणार असून त्यांना परदेशातून कोणतीही कायदेशीर मदत मिळू शकणार नसल्याच्या याह्या खान यांच्या वक्तव्याविषयी त्यांनी या पत्रातून काळजी व्यक्त केली होती. मुजीब यांचा जीव वाचवण्यासाठी आपली ताकद वापरण्याचं आवाहन इंदिरा गांधींनी या पत्राद्वारे जगभरातल्या 23 राष्ट्राध्यक्षांना केलं होतं.

इंदिरा गांधी आणि शेख मुजीबुर रहमान

फोटो स्रोत, PIB

'मिथ्स अँड फॅक्टस - बांगलादेश लिबरेशन वॉर' या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक बी. झेड खसरो लिहितात, "मुजीब खानना मृत्यूदंड द्यायला याह्या खान यांचा व्यक्तीगत पातळीवर विरोध असल्याचं अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांचं म्हणणं होतं.

मुजीबना मृत्यूदंड दिल्यास त्यामुळे पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिमा खराब होईल असा इशारा त्यांनी सैन्यातल्या त्यांच्या ज्येष्ठ सहकाऱ्यांना दिला होता. याह्या खान यांना ओशाळवाणं वाटेल असं काहीही करायला निक्सन तयार नव्हतं. म्हणूनच त्यांनी त्यावेळचे अमेरिकेचे पाकिस्तानातले राजदूत जोसेफ फॉरलँड यांना याविषयी जनरल याह्या खान यांच्याशी स्वतः बोलायला सांगितलं."

'मिथ्स अँड फॅक्टस - बांगलादेश लिबरेशन वॉर'

"मुजीब यांनी दया याचिका केली आणि ती आपल्याजवळ आली तर बिगर लष्करी सरकार सत्तेत येत नाही तोवर त्यावर आपण निर्णय घेणार नाही असं याह्या यांनी फॉरलँड यांना सांगितलं होतं. मुजीब देशद्रोही असल्याचं आपलं मत असलं तर आपण त्यांना जीवे मारणार नाही, याविषयी निश्चिंत रहावं असंही त्यांनी सांगितलं होतं."

मियाँवाली तुरुंग

शेख मुजीब मियाँवाली जेलमध्ये असतानाच्या काळातच तिथे इंग्रजी 'एल' अक्षराच्या आकाराचं एक एअर रेड शेल्टर तयार करण्यात आलं. यामध्ये गाद्या आणि चादरींची तरतूदही करण्यात आली होती.

आपल्याला ठार केल्यानंतर दफन करता यावं म्हणून तुरुंगात आपली कबर खोदून ठेवण्यात आली होती, असं शेख मुजीबुर रहमान यांनी बांगलादेशात परतल्यानंतर लोकांना सांगितलं.

पण असं काही नसल्याचं अनार खाँ यांचं म्हणणं होतं. कदाचित हे सांगून लोकांची सहानुभूती मिळवण्याचा मुजीब यांचा हा प्रयत्न होता.

शेख मुजीबुर रहमान

फोटो स्रोत, bangladesh liberation war museum

फोटो कॅप्शन, पाकिस्तानच्या तुरुंगात असताना शेख मुजीब यांचा जारी केलेला फोटो

तुरुंगात असताना शेख मुजीब यांना कोणतंही वर्तमानपत्रं, रेडिओ किंवा टीव्ही उपलब्ध करून देण्यात आला नाही, हे खरं आहे. पण त्यांना वाचनासाठी पुस्तकं दिली जात. आपल्याला तुरुंगात वाचन साहित्य मिळत असल्याचं नंतर मुजीब यांनी इटालियन पत्रकार ओरियाना फलाची यांना सांगितलं होतं.

मुजीब यांच्या चरित्राममध्ये सैयद बदरूल अहसन लिहीतात, "6 डिसेंबरला सुरू झालेल्या युद्धाचा शेवट होईपर्यंत लष्करी कोर्टाने मुजीब यांना मृत्यूदंड सुनावलेला होता. पण युद्धानंतर याह्या खाँ यांनी भुट्टोंच्या हाती सत्ता सोपवली. पाकिस्तानी जनतेला संबोधित करताना त्याच दिवशी संध्याकाळी भुट्टो म्हणाले की पूर्व पाकिस्तानावर सध्या शत्रूचा कब्जा असला तरी लवकरच आम्ही आमच्या बांधवांच्या हितार्थ तो सोडवून घेऊ. यामध्ये बांधव हा शब्द पूर्व पाकिस्तानातील बंगालींना उद्देशून होता."

सिहाला गेस्ट हाऊस

पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर शेख मुजीब यांना हेलिकॉप्टरद्वारे इस्लामाबादजवळच्या सिहाला गेस्ट हाऊसला नेण्यात आलं. राजा अनार खाँ आणि तुरुंगाचे अधीक्षक शेख अब्दुर रहमानही त्यांच्यासोबत गेले. त्यानंतर पूर्व पाकिस्तानचे राष्ट्रपती अयूब खाँ यांचे माहिती सचिव अल्ताफ गौहर यांनाही गेस्ट हाऊसच्या त्याच खोलीत नजरबंद करण्यात आलं जिथे एकेकाळी मुजीब होते.

भुट्टो - शेख मुजीब भेट

राष्ट्रपती झाल्यानंतर झुल्फिकार अली भुट्टो 27 डिसेंबर 1971 ला शेख मुजीब यांना भेटायला सिहाला गेस्ट हाऊसला आले. या भेटीदरम्यान अनार खाँ पडद्यामागे उभे राहून भुट्टो आणि मुजीब यांचं बोलणं ऐकत होते. ही चर्चा तेव्हा रेकॉर्ड करण्यात आली होती.

भुट्टोंच्या आयुष्यावरील 'झुल्फी भुट्टो ऑफ पाकिस्तान'मध्ये स्टॅनली वॉलपर्ट या टेप्सचा दाखला देत सांगतात, "चर्चेच्या सुरुवातीलाच मुजीब यांनी विचारलं - तुम्ही इथे कसे आलात? भुट्टो उत्तरले - आता मी पाकिस्तानचा राष्ट्रपती आणि मुख्य मार्शल लॉ अॅडमिनिस्ट्रेटर आहे. मुजीब म्हणाले - ऐकून बरं वाटलं. मला सांगा बंगालची परिस्थिती काय आहे? मला तिथली खूप काळजी वाटते आहे.'

यावर भुट्टोंनी त्यांना ढाक्यावर भारतीय सैन्याने कब्जा केल्याचं सांगितलं. हे ऐकून मुजीब म्हणाले, "त्यांनी आम्हाला मारून टाकलं. तुम्ही मला ढाक्याला जाऊद्या. मला वचन द्या की जर भारतीयांनी मला तुरुंगात टाकलं तर तुम्ही माझ्यातर्फे लढाल."

भुट्टोंनी वचन दिलं, "आपण दोघे मिळून लढू मुजीब."

शेख मुजीबुर रहमान आणि ज़ुल्फीकार अली भुट्टो
फोटो कॅप्शन, शेख मुजीबुर रहमान आणि ज़ुल्फीकार अली भुट्टो

य़ापुढे व़ॉलपर्ट लिहितात, "भुट्टोंसारख्या चाणाक्ष व्यक्तीशी आपला सामना असल्याचं मुजीब ओळखून होते. आपलं प्रत्येक वाक्य रेकॉर्ड होतंय, हेही त्यांना माहित होतं. मला ढाक्याला जाऊन परिस्थिती सावरू द्या, भारतीय सैन्य दाखल व्हावं अशी आपली कधीच इच्छा नव्हती, असं ते म्हणाले. यावर त्यांच्यावर आपला विश्वास असल्याचं भुट्टोंनी त्यांना सांगितलं. म्हणूनच आपण त्यांना मुक्त करण्याचा निर्णय घेतल्याचंही भुट्टो म्हणाले. पुढे त्यांनी आपल्या मनातली इच्छा सांगितली. ते म्हणाले, मुजीब भाई यापुढेही आपण एकत्र राहू याची शक्यता किती आहे? मुजीब म्हणाले, मी ढाक्यात एक सभा घेईन. माझ्या लोकांशी बोलेन आणि मग तुम्हाला याबद्दल सांगीन."

यानंतर पुढे 11 दिवस सारंकाही अनिश्चित होतं. यादरम्यान भुट्टो मुजीबना अनेकदा भेटले.

स्टॅनली वॉलपर्ट लिहितात, "27 तारखेला झालेल्या भेटीत दोन-तीन गोष्टी एकत्र करण्याचं ठरलं होतं असं भुट्टोंनी मुजीब यांना सांगितलं. संरक्षण, परराष्ट्र धोरणं आणि चलनावर आमचा हक्क असू द्या असं ते म्हणाले. यावर मुजीब म्हणाले, पण यासाठी मला ढाक्याला जाण्याची परवानगी देण्यात यावी. यावर भुट्टोंनी त्यांना राष्ट्रपती, पंतप्रधान असं हवं ते पद घेण्याची ऑफर दिली.

मुजीबना सोडण्यासाठी भुट्टो गेले विमानतळावर

1971 मध्ये शेख मुजीब यांनी न्यूजवीक या मासिकाला मुलाखत दिली. त्यात त्यांनी सांगितलं की ज्या दिवशी बांगलादेश अस्तित्वात आला तेव्हाच त्यांना ठार मारण्यात येणार होतं. पण असं झाल्यास भारताच्या ताब्यातील 93,000 पाकिस्तानी युद्धबंदींचा जीव धोक्यात येईल असं सांगत भुट्टोंनी त्यांना वाचवलं.

7 जानेवारी 1972 च्या रात्री भुट्टो स्वतः मुजीब आणि कमाल हुसैन यांना सोडायला रावळपिंडीच्या चकलाला विमानतळावर गेले. आणि काहीही न बोलता त्यांनी मुजीब यांचा निरोप घेतला. मुजीबही मागे वळून न पाहता पटापट विमानाचा जिना चढून निघून गेले.

जाण्यापूर्वी मुजीब यांनी तुरुंगात त्यांच्यासोबत राहणाऱ्या राजा अनार खाँ यांना दोस्तोव्हस्कीचं पुस्तक 'क्राईम अँड पनिशमेंट' भेट दिलं.

शेख मुजीबुर रहमान

फोटो स्रोत, Getty Images

1974 मध्ये मुजीब इस्लामिक शिखर संमेलनात सहभागी होण्यासाठी लाहोरला आले असताना त्यांनी अनार खाँ यांच्याबद्दल चौकशी केली आणि त्यांना भेटायची इच्छा व्यक्त केली. पण अनार खाँ त्यांना भेटायला गेले नाहीत. आपल्या सरकारला हे आवडणार नाही आणि यासाठी त्यांना त्रास दिला जाईल अशी भीती त्यांना वाटत होती.

शेख मुजीब यांचं लंडनमध्ये आगमन

8 जानेवारी 1971 च्या सकाळी मुजीब यांचं विमान लंडनच्या हिथ्रो विमानतळावर पोहोचलं. पाकिस्तानच्या परराष्ट्र सेवेचा राजीनामा दिलेले आणि त्यावेळी लंडनमध्ये राहणारे एम. एम. रझाऊल करीम यांच्यासाठी ही एक अविश्वसनीय बातमी होती. आपल्या जुनाट लहान गाडीने ते विमानतळाच्या दिशेने सुसाट निघाले.

करीम पोहोचले तेव्हा शेख मुजीब पाईप ओढत बसले होते. डॉक्टर कमाल हसन आणि पाकिस्तानातून मुजीब यांच्यासोबत आलेले इतर काही अधिकारीही तिथे होते.

अधिकाऱ्यांनी करीम यांना पाहिल्यानंतर त्यांनी शेख यांना सॅल्यूट केला आणि न बोलता ते बाहेर निघून गेले.

Sheikh Mujibur Sheikh Mujibur Rahmen

'फ्रॉम रेबेल टू फाऊंडिंग फादर - शेख मुजीबुर रहमान' या आपल्या पुस्तकात सैयद बदरूल अहसन लिहितात, "बंगाली अधिकारी रेजाऊल करीम यांना व्हीआयपी लाऊंजमध्ये पाहून मुजीब यांच्या जीवात जीव आला. त्यांनी ताबडतोब चौकशी करायला सुरुवात केली. त्यांचा पहिला प्रश्न होता, बांगलादेश स्वतंत्र झाला हे खरं आहे का?

अहसन लिहितात, "ब्रिटिश सरकारने शेख यांना घ्यायला रॉल्स रॉईस कार पाठवली होती. पण मुजीब मात्र करीम यांच्या लहान कारमधून क्लॅरिजेस हॉटेलला आले. दुपारपर्यंत मुजीब यांनी ब्रिटिश पंतप्रधान एडवर्ड हीथ आणि विरोधी पक्ष नेते हॅरल्ड विल्सन यांची भेट घेतली होती. त्यांनी ढाक्याला फोन लावला आणि पाकिस्तानी सैन्याने अटक केल्यानंतर पहिल्यांदाच ते आपल्या कुटुंबीयांशी बोलले."

शेख मुजीबुर रहमान आणि ब्रिटिश प्रधानमंत्री एडवर्ड हीथ

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शेख मुजीबुर रहमान आणि ब्रिटिश प्रधानमंत्री एडवर्ड हीथ

"त्या संध्याकाळच्या त्यांच्या पत्रकार परिषदेला शेकडो पत्रकार हजर होते. एका पत्रकाराने त्यांना विचारलं - तुम्ही थेट ढाक्याला न जाता लंडनला यायचा निर्णय का घेतलात? शेख यांचं उत्तर होतं - हा भुट्टो साहेबांचा निर्णय होता. मी त्यांचा कैदी होतो."

दिल्लीमध्ये बंगालीत भाषण

दोन दिवस लंडनमध्ये राहिल्यानंतर 9 जानेवारीच्या रात्री मुजीब ढाक्याला रवाना झाले. ब्रिटिश सरकारने यासाठी त्यांना आपलं विमान दिलं. इंदिरा गांधींचे आभार मानण्यासाठी ते मध्ये काही तासांसाठी नवी दिल्लीत थांबले.

इंदिरा गांधी आणि शेख मुजीबुर रहमान

फोटो स्रोत, PHOTO DIVISION

फोटो कॅप्शन, इंदिरा गांधी आणि शेख मुजीबुर रहमान

डॉक्टर कमाल हुसैन सांगतात, "भारताचे तत्कालीन राष्ट्रपती गिरी, पंतप्रधान इंदिरा गांधी, त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ, तिन्ही सेनांचे प्रमुख, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सिद्धार्थशंकर रे हे शेख यांच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित होते. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं. एखादं कुटुंबच पुन्हा भेटतंय असं वाटत होतं."

सेनेच्या कँटोन्मेंटमधल्या मैदानावर मुजीब यांनी एका सभेद्वारे बांगलादेशाच्या स्वातंत्र्यलढयासाठी मदत केल्याबद्दल भारतीय जनतेचे आभार मानले. शेख यांनी इंग्रजीतून भाषण द्यायला सुरुवात केली पण व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या इंदिरा गांधींनी तेव्हा त्यांना बंगालीतून भाषण करण्याचा आग्रह केला.

ढाक्यात अभूतपूर्व स्वागत

दोन तास दिल्लीत थांबल्यानंतर शेख ढाक्यात दाखल झाले तेव्हा सुमारे 10 लाख लोक त्यांचं स्वागत करण्यासाठी ढाका विमानतळावर जमले होते.

पाकिस्तानच्या तुरुंगात 9 महिने राहिल्याने शेख मुजीब यांचं वजन अतिशय कमी झालं होतं. वाढलेले केस त्यांनी उजव्या हाताने मागे सारले आणि पंतप्रधान ताजउद्दीन अहमद यांनी पुढे येत आपल्या नेत्याला मिठी मारली.

दोघांच्या डोळ्यातून अश्रू वाहात होते. एका खुल्या ट्रकवर स्वार होत मुजीब रेसकोर्स मैदानाच्या दिशेने जाऊ लागले. गर्दी इतकी होती की दोन किलोमीटरचं अंतर कापायला त्यांना तीन तास लागले.

मुजीबुर रहमान

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ढाक्यात अभूतपूर्व स्वागत

रेसकोर्स मैदानावर, लाखोंच्या गर्दीसमोर बोलताना शेख मुजीब यांना पाकिस्तानी सैन्याच्या विरुद्ध बलिदान देणाऱ्या देशवासियांच्या आढवणीने रडू आलं. त्यांनी रवींद्रनाथ टागोरांची आठवण काढली. टागोरांचं स्मरण करत शेख म्हणाले, की बंगालचे लोक फक्त बंगाली बनून राहिले आहेत, अजून माणूस होऊ शकलेले नाहीत, असं तुम्ही एकदा म्हणाला होतात.

नाट्यमय शैलीत मुजीब म्हणाले, "आदरणीय कविराज, परत या आणि पहा, तुमच्या बंगाली लोकांचं अशा विलक्षण माणसांत रूपांतर झालंय ज्यांची तुम्ही एकेकाळी कल्पना केली होतीत."

याच भाषणादरम्यान त्यांना भुट्टोंना दिलेलं वचनही लक्षात होतं. बांगलादेश आणि पाकिस्तानात भविष्यात संबंध कसे असतील हे आपण आपल्या लोकांना विचारून सांगू, असं वचन त्यांनी दिलं होतं.

मुजीब यांनी भुट्टोंना उद्देशून म्हटलं - कोणत्याही दोन संपन्न देशांमध्ये असतात तसेच बांगलादेश आणि पाकिस्तानात आता संबंध असतील.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)