बांगलादेशच्या 'मेगाफोन डिप्लोमसी'वर भारत नाराज झालाय का?

भारत बांगलादेश

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, अनबरासन एथिराजन
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना सत्तेतून बेदखल झाल्याच्या महिन्याभरानंतरही भारत आणि बांगलादेश या दोन देशांमधील संबंध थंडावलेलेच आहेत.

शेख हसीना भारतात असल्यामुळे भारत आणि बांगलादेश यांच्यात तणाव निर्माण झाला आहे.

गेल्या महिनाभराहून अधिक काळात घडलेल्या घटना पाहता भारत आणि बांगलादेशचे संबंध कोणत्या वळणावर आहेत, याचा आढावा घेणं महत्त्वाचं ठरेल.

शेख हसीनांचं भारतात असल्यानं अडचण?

शेख हसीना यांच्याकडे भारताच्या समर्थक म्हणून पाहिलं जायचं. त्यांच्या 15 वर्षांच्या कार्यकाळात बांगलादेश आणि भारत यांच्यात आर्थिक आणि राजनैतिक संबंध चांगले होते.

हसीना यांचा कार्यकाळ भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर होता. कारण त्यांनी बांगलादेशातील भारतविरोधी बंडखोर गटांवर कारवाई केली होती.

त्याचबरोबर सत्तेवर असताना भारत आणि बांगलादेशमधील अनेक सीमा वादांवरही त्यांनी तोडगा काढला होता.

मात्र, भारतातील सध्याचा त्यांचा आश्रय आणि त्या किती काळ भारतातच राहतील याबद्दलची अनिश्चितता या दोन्ही बाबी उभय देशांमधील संबंध सुधारण्याच्या प्रयत्नात अडचणीच्या ठरत आहेत.

बांगलादेशमधील सरकारची सूत्रे हाती घेतल्यानंतर मोहम्मद युनूस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बांगलादेशमधील सरकारची सूत्रे हाती घेतल्यानंतर मोहम्मद युनूस

गेल्या आठवड्यात एक गोष्ट स्पष्ट झाली. मोहम्मद युनूस यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना भारताला विनंती केली की, तिथे असेपर्यंत शेख हसीना यांनी कोणतीही राजकीय वक्तव्यं करू नये. भारताने त्यांना असं करण्यापासून थोपवावं, असंही ते म्हणाले.

युनूस म्हणाले, “बांगलादेशने भारताकडे शेख हसीना यांना परत बोलावण्याची मागणी करेपर्यंत भारत त्यांना ठेवू इच्छित असेल तर त्यांना शांत रहावं लागेल.”

शेख हसीना भारतात आल्यावर त्यांनी सार्वजनिकरित्या एक वक्तव्य केलं होतं. त्याबद्दल युनूस बोलत होते. त्या वक्तव्यानंतर त्यांनी आतापर्यंत तरी सार्वजनिक पातळीवर कोणतंही विधान केलेलं नाही.

मोहम्मद युनूस यांची वक्तव्यं भारताला आवडली नाहीत?

बांगलादेशमध्ये जुलै-ऑगस्टमध्ये झालेल्या आंदोलनादरम्यान अनेक हत्या झाल्या. या प्रकरणी शेख हसीना यांना परत आणून त्यांच्यावर खटला दाखल करावा, अशी मागणी केली जात आहे.

बांगलादेश सरकारचे सल्लागार प्रा. मोहम्मद युनूस यांनी एका मुलाखतीत म्हटलं आहे की, संबंध सुधारण्यासाठी दोन्ही देशांना एकत्रितपणे काम करावं लागेल. सध्या दोन्ही देशातील संबंध लयाला गेले आहेत.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने यावर प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही; मात्र, या वक्तव्यांमुळे भारतीय अधिकारी दुखावले गेलेत असं सांगितलं जात आहे.

एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर बीबीसीला सांगितलं, “भारत सध्या बांगलादेशातून येणाऱ्या अधिकृत आणि महत्त्वाच्या लोकांच्या अनधिकृत वक्तव्यांवर जास्त भर देत आहे.”

ग्राफिक्स
ग्राफिक्स

'मेगाफोन डिप्लोमसी' काय आहे?

माजी भारतीय राजनैतिक अधिकारी बांगलादेश सरकारचे सल्लागार युनूस यांच्या राजकीय भूमिकेमुळे आश्चर्यचकित झाले आहेत. त्यांच्या या पवित्र्याला ‘मेगाफोन डिप्लोमसी’ म्हटलं जात आहे. म्हणजे सध्या दोन्ही देश वादग्रस्त मुद्यांवर प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून चर्चा करत आहेत.

वीणा सीकरी बांगलादेशमध्ये भारताच्या उच्चायुक्त होत्या. त्या म्हणतात, “भारत बांगलादेशबरोबर चर्चा करू इच्छित आहे आणि त्याबाबतचे संकेत अंतरिम सरकारला देण्यात आले आहेत.”

त्या म्हणाल्या की, काही मुद्दे आहेत ज्यांच्यावर चर्चा होऊ शकते. मात्र, दोन्ही देशातील संबंध लयाला गेले आहेत हे युनूस हे कोणत्या आधारावर बोलत आहेत याची मात्र माहिती नाही.

मात्र, बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री या आरोपांचं खंडन करतात.

भारताच्या उच्चायुक्त पदी राहिलेल्या वीणा सीकरी
फोटो कॅप्शन, भारताच्या उच्चायुक्त पदी राहिलेल्या वीणा सीकरी

बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाचे सल्लागार तौहीद हुसैन बीबीसीशी बोलताना म्हणाले, “भारतीय नेते प्रसारमाध्यमांशी बोलू शकत नाही का? जर डॉ. युनूस यांना काही विशेष मुद्द्यांवर प्रश्न विचारण्यात आले तर ते आपले विचार मांडतीलच. जर तुम्हाला टीकाच करायची असेल तर मग प्रत्येक गोष्टीवर टीका होऊ शकेल.”

काही आठवड्यांपूर्वी मोहम्मद युनूस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फोनवर चर्चा झाली. मात्र, बांगलादेश आणि भारतामध्ये मंत्र्यांच्या पातळीवर आतापर्यंत कोणतीच चर्चा झालेली नाही.

बांगलादेशसाठी शेख हसीना यांना परत आणणं किती सोपं?

जोपर्यंत दुसरा एखादा देश शेख हसीना यांना आत्मसमर्पण करण्यासाठी परवानगी देत नाही; तोपर्यंत त्या इथे राहू शकतात, असं दिसतंय.

बांगलादेशच्या इंटरनॅशनल क्राइम्स ट्रिब्युनलचे नवनियुक्त मुख्य याचिकाकर्ते मोहम्मद ताजूल इस्लाम यांनी म्हटलं की, शेख हसीना यांना परत आणण्यासाठी पावलं उचलली जात आहेत. जेणेकरून आंदोलनांदरम्यान झालेल्या हत्यांसाठी त्यांच्यावर खटला चालवला जाऊ शकेल.

बांगलादेशमधील विद्यार्थी आंदोलक

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बांगलादेशमधील विद्यार्थी आंदोलक

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, “बांगलादेशमध्ये झालेल्या नरसंहारासाठी त्यांनाच मुख्य आरोपी केलं आहे. त्यामुळे त्यांना कायदेशीरपणे इथे आणण्याचा प्रयत्न करू; म्हणजे त्यांच्यावर खटला चालवता येईल.”

तज्ज्ञांचं मत आहे की, बांगलादेशने औपचारिक विनंती केली तरी हसीना यांना परत आणणं शक्य होणार नाही.

रीवा गांगुली दास सुद्धा बांगलादेशमध्ये माजी उच्चायुक्त होत्या

त्या म्हणतात, “शेख हसीना भारतात पाहुण्या म्हणून राहत आहेत. त्यांच्याशी आमची दीर्घकाळ मैत्री होती. जर त्यांच्यासाठी इतकंही केलं नाही तर भविष्यात लोक भारताकडे एक विश्वासार्ह मित्र म्हणून पाहतील का?”

लाल रेष

या बातम्याही वाचा:

लाल रेष

भारतावर बांगलादेशच्या विरोधी पक्षांशी चर्चा न करण्याचा आरोप

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

मोहम्मद युनूस यांनी आपल्या एका मुलाखतीमध्ये विरोधी पक्षांशी संपर्क न केल्याबद्दल भारतावर टीका केली आहे.

ते म्हणाले, “बांगलादेशात प्रत्येक जण इस्लामवादी आहे असा भारताचा नॅरेटिव्ह आहे. बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टी इस्लामवादी आहे. त्याशिवाय प्रत्येक जण इस्लामवादी आहे आणि ते भारताचा अफगाणिस्तान करतील, असं त्यांना वाटतं. भारताच्या मते बांगलादेश शेख हसीनांच्या हातात सुरक्षित आहे. भारताने ही धारणाच करून ठेवली आहे.”

मात्र, भारतीय विश्लेषक मोहम्मद युनूस यांच्या या मताशी सहमत नाहीत.

वीणा सीकरी म्हणतात, “मी मोहम्मद युनूस यांच्या या वक्तव्याशी सहमत नाही. बांगलादेशातील आमचे उच्चायुक्त कोणतंही लेबल न लावता राजकीय पक्षांशी बोलतात.”

2001 ते 2006 मध्ये बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीच्या आघाडी सरकारवेळी भारत आणि बांगलादेशाचे संबंध बिघडले होते.

भारताने या सरकारवर ईशान्य भारतातील बंडखोरांना आश्रय देण्याचा आरोप लावला होता.

बांगलादेशातील अनेक लोक सांगत आहेत की, भारताने बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीशी संपर्क करायला हवा. या पक्षाला विश्वास आहे की जेव्हाही निवडणुका होतील, तेव्हा त्यांचाच विजय होईल.

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर

बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीचे सेक्रेटरी जनरल फखरुल इस्लाम आलमगीर म्हणतात, “पाच ऑगस्टपासून (ज्या दिवशी शेख हसीना सरकार कोसळलं) आतापर्यंत एकाही भारतीय अधिकाऱ्यांनी आमच्याशी संपर्क केलेला नाही. मला याची कारणं कळत नाहीयेत.

"दुसऱ्या बाजूला बांगलादेशातील चीनचे उच्चायुक्त आणि युरोपियन देशांचे उच्चायुक्त बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीशी सातत्याने संपर्कात आहेत."

बांगलादेशातील शेख हसीना सरकार कोसळल्यावर देशात सुरक्षा व्यवस्थेचा अभाव होता. त्यामुळे धार्मिक अल्पसंख्यांकावर हल्ले वाढले आहेत. भारताने बांगलादेशातील हिंदूंवर कथित इस्लामवाद्यांनी हल्ले केल्याच्या वृत्तांवर चिंता व्यक्त केली आहे.

गेल्या काही आठवड्यांपासून इस्लामी कट्टरवाद्यांनी सुफी मजारची तोडफोड केली आहे. बांगलादेशमध्ये सुन्नी मुस्लीम बहुसंख्येने आहेत. दर्गा आणि मकबरे त्यांच्या धर्माच्या विरुद्ध आहे असं कट्टर इस्लामी लोक मानतात.

सिराजगंज जिल्ह्यातील अली ख्वाजा अली पगला पीराचा मजारची देखभाल करणाऱ्या व्यक्तीच्या पत्नीने सांगितलं, “काही दिवसांपूर्वी माझ्या सासऱ्यांच्या मजारची काही लोकांनी तोडफोड केली. आम्ही कोणतंही गैर-इस्लामी काम करू नये असं ते म्हणाले.”

बांगलादेशातील धार्मिक प्रकरणांच्या मंत्रालयाचे सल्लागार एएफएम खलिद हुसैन म्हणाले की, ज्या लोकांनी धार्मिक स्थळांची तोडफोड केली आहे त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल.

भारताला कट्टरतावाद्यांची भीती

बांगलादेशात इस्लामी कट्टरपंथियांनी त्यांचं वर्चस्व पुन्हा एकदा निर्माण करण्यात यश मिळवलं तर त्यांची संख्या कितीही कमी असली तरी भारतासाठी ती धोक्याची घंटा असेल, असं तज्ज्ञांचं मत आहे.

मात्र, गेल्या काही आठवड्यांमध्ये विविध गुन्ह्यांचा आरोप असलेल्या एका इस्लामी कट्टरतावाद्याची सुटका करण्यात आली.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी

गेल्या महिन्यात शेख हसीना सरकारच्या विरोधात आंदोलन करणारे नऊ संशयित तुरुंग फोडून पळाले. मात्र, त्यांच्यापैकी चार लोकांना पुन्हा अटक करण्यात आली.

अंसारुल्ला बांगला टीमचे प्रमुख जशीमुद्दीन रहमानी यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली. शेख हसीना सरकारने या संघटनेला दहशतवादी संघटना घोषित केलं होतं.

2015 मध्ये, नास्तिक ब्लॉगरच्या हत्येच्या आरोपात त्यांना पाच वर्षांची शिक्षा झाली होती. मात्र, त्यांच्याविरोधात आणखी बरेच खटले होते. त्यामुळे शिक्षा पूर्ण झाल्यावरही ते तुरुंगातच होते.

रीवा गांगुली दास म्हणतात, “गेल्या काही महिन्यांपासून अनेक कट्टरवाद्यांना सोडण्यात आलं आहे. त्यापैकी काही लोकांविषयी भारताकडेही माहिती आहे.”

रीवा गांगुली दास म्हणतात की हे अतिशय गंभीर प्रकरण आहे.

(बीबीसी बांगला सेवा, ढाकाच्या मुकिमुल हसन यांच्या अतिरिक्त वार्तांकनासह)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)