बांगलादेश ग्राऊंड रिपोर्ट: हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांची काय परिस्थिती आहे?

बांगलादेशमधील महिला

फोटो स्रोत, DEBALIN ROY/BBC

    • Author, जुगल पुरोहित
    • Role, बीबीसी प्रतिनिधी, बांगलादेशातून

अनु तालुकदार सध्या संभ्रमात आहे.

बीएची प्रथम वर्षाची विद्यार्थिनी अनु तालुकदार गेल्या आठवड्यापर्यंत माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या सरकारच्या विरोधात होणाऱ्या आंदोलनात सहभागी होती. तेव्हा ती स्वत:ची हिंदू म्हणून फारशी ओळख सांगायची नाही. आता तिला ती सांगायला लावली जात आहे, असं ती सांगते.

राजधानी ढाका मधील प्रसिद्ध ढाकेश्वरी मंदिरात बीबीसीशी बोलताना अनु तालुकदार म्हणाली, “आम्हाला अतिशय असुरक्षित वाटतंय. आम्हाला आधी लक्षात आलं नाही पण आता आमची सुद्धा पीडितांमध्ये गणना होत आहे.

"आमच्या सरकारविरोधात आंदोलन आणि जनतेचा रोष दाखवण्यात आम्ही हिरिरीने पुढे होतो मात्र अचानक आम्हीच त्या आंदोलनाचे शिकार झालो आहोत," अनु सांगते.

शेख हसीना यांनी सत्ता सोडल्यावर हिंदू आणि इतर अल्पसंख्यांकांबरोबर जो हिंसाचार झाला त्याबद्दल अनु सांगत होती.

अनुने मला सांगितलं की आज देशात सत्ता परिवर्तन झालंय ते आमच्या आंदोलनामुळे झालं आहे. त्यात तिने आणि इतरांनी सहभाग घेतला होता. या लोकांचं रक्षण करण्याची जबाबदारी हंगामी सरकारची आहे असं अनुला वाटतं.

बांगलादेशात सध्या दोन नवे देश नांदत आहेत असं वाटेल हे चित्र आहे.

पहिल्या देशात, दिवसागणिक परिस्थिती सामान्य होत असल्याचे संकेत मिळत आहेत.

आंदोलन करणारे विद्यार्थी आता भिंतीवर नवीन रंग देत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःसाठी निधी गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत. ऑफिस, दुकानं आणि बाजारपेठा उघडत आहेत आणि ग्राहकांची गर्दी होत आहे.

रस्त्यावर वाहतुकीचं व्यवस्थापन आधी विद्यार्थी आणि स्वयंसेवकांवर अवलंबून होतं. आता ट्रॅफिक पोलीस हळूहळू ती जबाबदारी सांभाळत आहेत.

स्थानिक लोकांच्या मते जीवनावश्यक वस्तू मिळत आहेत आणि त्यांच्या किमती सुद्धा स्थिर आहेत.

शेख हसीना यांनी देश सोडेपर्यंत झालेल्या शेकडो विद्यार्थ्यांच्या मृत्यूला पोलीस जबाबदार आहेत असं मानलं जात होतं आणि त्यांच्याविरुद्ध राग होता. आता पोलीसही हळूहळू कामावर परत येत आहेत.

दुसऱ्या देशाचा विचार करायचा झाला तर ज्या भागात हिंदू, ख्रिश्चन, आणि इतरांसारखे अल्पसंख्याक राहतात, तिथे परिस्थिती वेगळी आहे.

वर जे लिहिलं आहे ते त्यांच्या बाबतीतही बहुतांशपणे खरं आहे. मात्र हिंसाचार, भीतीची भावना आणि असुरक्षितता अजूनही तिथे वास करत आहे.

शेख हसीना देश सोडून गेल्यावर देशातल्या 52 जिल्ह्यांत अल्पसंख्यांकावर 200 पेक्षा जास्त हल्ले झाले आहेत असं अल्पसंख्याक लोकांसाठी काम करणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे. त्यांच्या नेत्यांनी सार्वजनिक पातळीवर आंदोलनं केली. भारत सरकारने आणि संयुक्त राष्ट्रांनीही त्यावर प्रतिक्रिया दिली.

मंगळवारी बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार मोहम्मद युनुस यांनी ढाकेश्वरी मंदिराला भेट दिली आणि सांगितलं की देश सगळ्यांसाठी सारखाच आहे.

हिंदू आणि इतर अल्पसंख्याक लोकांवर किती प्रमाणात हिंसाचार झाला आहे हे समजून घेण्यासाठी आम्ही ढाका शहराच्या बाहेर निघालो आणि कोमिला भागाचा दौरा केला. कोमिला हे भारताच्या त्रिपुरा राज्याच्या सीमेवर आहे. या भागाला जातीय हिंसाचाराचा इतिहास आहे.

ख्रिश्चन को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे ऑफिस

फोटो स्रोत, Debalina Roy/BBC

फोटो कॅप्शन, ख्रिश्चन को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे ऑफिस

आमच्या प्रवासाचा पहिला टप्पा म्हणजे मदनपूर होता. हे गाव ढाक्याहून तीस किलोमीटर आहे.

मदनपूरच्या चिंचोळ्या गल्ल्यांमधून आम्ही लोखंडाच्या एका गेटसमोर पोहोचलो. जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा आमच्यासमोर एक ऑफिस होतं आणि त्याची स्थिती भीषण होती.

तिथे जळलेली कागदपत्रं आणि फर्निचर विखुरलेलं होतं. खिडक्या तुटल्या होत्या.

हे ख्रिश्चन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट युनियनचं ऑफिस होतं. अल्प रकमेचे कर्ज देणारी ही संस्था आहे. इथे कधीकधी प्रार्थना सभा आयोजित केल्या जात असत.

जेव्हा आम्ही या ठिकाणी बातमीसाठी व्हीडिओ शुटिंग करत होतो तेव्हा एका गार्डने आम्हाला इशारा दिला की, “इथे जास्त वेळ थांबू नका. ते लोक आमच्यावर नजर ठेवून आहोत आणि ते कधीही परत येऊ शकतात.”

काही दिवसांपूर्वी या जागेची जाळपोळ करणाऱ्या लोकांबद्दल तो बोलत होता. त्याचं म्हणणं होतं की ते आता मोकळे फिरताहेतच, मात्र त्याने हेही सांगितलं की हल्लेखोर वारंवार तिथे परत येतात आणि जे सामान मिळतं ते लुटून घेऊन जात आहेत.

लाल रेष
लाल रेष

गार्डने दबक्या आवाजात सांगितलं, “तुम्ही यायच्या काही मिनिटांपूर्वीच ते इथून गेले आहेत.”

हल्ल्याच्या भीतीपायी अल्पसंख्याक समुदायाचे लोक ही जागा सोडून गेले आहेत. मात्र या ऑफिसचा मॅनेजर आमच्याबरोबर हायवेवर भेटायला तयार झाला.

त्याने या घटनेबद्दल सांगितलं, “पाच ऑगस्टला रात्री 10 वाजून 40 मिनिटांनी सुरक्षा रक्षकाने फोन करून आम्हाला या घटनेची माहिती दिली आणि आम्ही तिथे पोहोचलो. मी पाहिलं की सगळं जळून खाक झालं आहे. म्हणजे आमच्या वस्तू, आमचे धार्मिक ग्रंथ आणि पैसे, दस्तावेज, सगळंच.”

“त्यानंतर तिसऱ्या दिवशी जेव्हा सकाळी नऊ वाजताच्या सुमारास मी ऑफिसला पोहोचलो. काही लोक बळजबरीने माझ्या ऑफिसमध्ये आले आणि मला विचारायला लागले की मी तिथे का आलो आहे? मी सांगितलं की हे माझं ऑफिस आहे,” मॅनेजरने सांगितले.

बाईक शोरूमचे मालक बिमल चंद्र डे यांचे म्हणणे आहे की, ते अल्पसंख्याक असल्यामुळे त्यांच्या शोरूमवर हल्ला करण्यात आला.

फोटो स्रोत, DEBALIN ROY/BBC

फोटो कॅप्शन, बिमल चंद्र डे

आमच्याविषयीची नापसंती ही काही नवीन नाही.

ते पुढे म्हणाले, “2020 मध्ये आम्ही याच इमारतीत एक चर्च आणि समाजसेवा सुरू केली होती. मात्र याआधी कधी असा हल्ला झाला नाही. आम्हाला धमक्या बऱ्याच मिळाल्या होत्या. पण त्या सगळं बोलण्यापुरतं होतं.”

वारंवार प्रयत्न करूनही आम्हाला तक्रार करायला कोणीही पोलीसवाला सापडला नाही असं आम्हाला त्या मॅनेजरने सांगितलं.

कोमिलामध्ये आम्ही बाइकच्या शोरुममध्ये गेलो. त्याचे मालक बिमल चंद्र डे आहेत.

त्यांनी आम्हाला सांगितलं की 5 ऑगस्टच्या आधीपासूनच ते उपचारासाठी भारतात आहेत. ते सांगतात की जेव्हा त्यांना शेख हसीना यांनी देश सोडल्याची बातमी मिळाली तेव्हा त्यांनी कर्मचाऱ्यांना तातडीने शटर बंद करण्यास सांगितलं कारण त्यांना आधीपासूनच हिंसाचार होण्याची शंका होती.

त्यांची शंका खरी ठरली.

जमावाने शोरूमवर हल्ला केला, बाईक चोरल्या आणि शोरूमला आग लावल्याचं बिमल सांगतात.

फोटो स्रोत, DEBALIN ROY/BBC

प्रत्यक्षदर्शींनी आम्हाला सांगितलं की दुपारी निदर्शकांनी शेख हसीना यांच्या विरोधात घोषणाबाजी केली आणि बिमल यांच्या शोरुमवर हल्ला केला.

काही लोक बाईक चोरून घेऊन गेले आणि मग शोरुमला आग लावली. हा सगळा घटनाक्रम दुपारी झाला.

बिमल चंद्र डे यांच्या आसपास असलेल्या एकाही दुकानाला त्यांनी हातसुद्धा लावला नाही.

ख्रिश्चन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट युनियन

फोटो स्रोत, DEBALIN ROY/BBC

फोटो कॅप्शन, ख्रिश्चन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट युनियनच्या कार्यालयाची तोडफोड करून आग लावण्यात आली.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

व्हीडिओ कॉलवर बोलताना बिमल चंद्र डे यांनी आम्हाला सांगितलं, “आम्ही या देशात अल्पसंख्याक असल्यामुळे आमच्यावर हल्ला झाला. बांगलादेशमध्ये हिंदू म्हणून जन्माला येणं ही माझी सर्वांत मोठी चूक होती.”

“हल्ला करणाऱ्यांना माहिती होतं की आम्ही प्रतिकार करणार नाही म्हणून. ते काहीही करू शकतात.”

ते शेख हसीना यांचे समर्थक होते म्हणून त्यांच्यावर हल्ला केला का असा प्रश्न आम्ही त्यांना विचारला.

त्यावर ते म्हणाले, “बांगलादेशमध्ये जर समजा कुणी म्हटलं की आम्ही (आमचा समुदाय) अवामी लीग नाही तर दुसऱ्या पक्षाला पाठिंबा देतो, तर कोणीही विश्वास ठेवणार नाही.”

“माझ्या कामानिमित्त मी अवामी लीग आणि इतर पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घ्यायचो. ही काही चुकीची गोष्ट तर नाही ना? मला नाही वाटत मी काही चुकीचं केलं आहे,” डे सांगतात.

बिमल डे हे सध्या भारतात आहेत आणि बांगलादेशात परतणे हे त्यांचे प्राधान्य आहे.

हंगामी सरकारकडे त्यांची एकच मागणी आहे. “मला न्याय हवा आहे. मला जे इतकं नुकसान सहन करावं लागलं, ज्या लोकांनी माझ्याबरोबर हे केलं त्यांना शिक्षा मिळायला हवी.”

डे यांच्या बेचिराख झालेल्या शोरुम पासून काही किलोमीटर अंतरावर कोमिलाच्या मुख्य मंदिरात आमची भेट अनिर्बन सेनगुप्ता यांच्याशी झाली. त्यांनी आम्हाला सांगितलं की, ते रोज या मंदिरात प्रार्थना करायला येतात. हिंदूंवर झालेला हल्ला अचानक झालेला नाही असं त्यांचं म्हणणं होतं.

 अनिर्बन सेनगुप्ता
फोटो कॅप्शन, अनिर्बन सेनगुप्ता

सेनगुप्ता यांनी आम्हाला सांगितलं, "विद्यार्थ्यांच्या क्रांतीनंतर पोलीस तर दिसेनासे झाले आहेत. मात्र सामान्य जनता समाजात धार्मिक शांतता टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे. खरी परिस्थिती तर अशी आहे की मुस्लीम समाजातील काही लोक आमच्या मंदिराचं संरक्षण करायला येतात."

कोमिला आणि आसपासच्या गावात राहणाऱ्या हिंदू समाजाच्या इतर लोकांनी आम्हाला सांगितलं की त्यांच्याबरोबर हिंसाचार तर झाला नाही मात्र त्यांना भीती वाटते आहे.

गावात राहणाऱ्या एका हिंदू व्यक्तीने सांगितलं, “बांगलादेशात हिंदू लोकांच्या घरी दरोडे पडले आणि जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. सरकारला आता काहीतरी लगाम घालण्याची गरज आहे.”

त्यांच्या काळजीचं मूळ इतिहासात आहे.

2021 मध्ये कोमिला येथूनच हिंसाचार सुरू झाला होता आणि त्यात अनेक लोक मारले गेले होते. मुस्लींमांच्या जमावाने अनेक मंदिरं उद्धवस्त केली होती.

खरंतर बांगलादेशात हिंदू आणि मुस्लीम अनेक पिढ्या एकत्र राहतात. बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यातही त्यांनी मिळून योगदान दिलं होतं. तरीही बांगलादेशच्या जातीय हिंसाचाराचा इतिहास आजही तितकाच जुना आहे.

कोमिलाच्या जवळ असलेला नौखालीचा भाग स्वातंत्र्यानंतर झालेल्या हिंसाचारासाठी आजही ओळखला जातो. तेव्हा हजारो लोकांना मारून टाकण्यात आलं होतं आणि महिलांवर बलात्कार झाले होते.

लाल रेष

या बातम्याही वाचा -

लाल रेष

सोशल मीडिया आणि व्हायरल व्हीडिओ

खोट्या माहितीमुळे भीतीत भर पडली.

बीबीसीने केलेल्या एका तपासात लक्षात आलं आहे की, चुकीच्या बातम्या पसरवून अराजकता वाढवण्याची एक मोहीम चालवली गेली. एका विश्लेषणानुसार बहुतांश अकाऊंटचा उगम भारतात झाला होता.

अनेक चुकीचे नॅरेटिव्ह एका हॅशटॅगअंतर्गत चालवण्यात आले होते. त्याला एक्स (आधीचे ट्विटर) वर 4 आणि 9 ऑगस्ट या तारखांना 7 लाख मेन्शन्स होते अशी माहिती 'ब्रँडवॉच' या मॉनिटरिंग टुलकडून मिळाली आहे.

एका व्हायरल पोस्टमध्ये दावा केला होता की क्रिकेटपटू लिटन दासचं घर जाळण्यात आलं आहे. तसंच इस्लामिक कट्टरवाद्यांनी त्याच्या घराला आग लावली आहे असा दावा एका दुसऱ्या अकाउंट वरून करण्यात आला होता.

बीबीसी व्हेरिफाय ने स्थानिक बातम्यांबरोबर या दाव्याची पडताळणी केली. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की सोशल मीडियावर जे फोटो लिटन दासचं घर म्हणून फिरत होते ते फोटो बांगलादेश क्रिकेट टीमचे माजी कर्णधार मश्रफे मूर्तजा यांच्या घराचे होते. ते सत्ताधारी अवामी पक्षाचे सदस्य आहे आणि बांगलादेशच्या संसदेचेही ते सदस्य होते आणि मुस्लीम होते.

बांगलादेशातील इस्लामी कट्टरवाद्यांनी एका मंदिरावर हल्ला केला असा दावा आणखी एका वायरल पोस्टमध्ये करण्यात आला होता. ही आग चितगाव येथील नवग्रह मंदिराच्या जवळ लागल्याचा दावा केला होता. प्रत्यक्षात त्या मंदिर जळलेलं नव्हतं.

मदरशातील विद्यार्थी करत आहेत मंदिराचे रक्षण

ढाक्यातील गुलशन भागात माझी भेट राजकीय विश्लेषक अश्रफ कैसर यांच्याशी त्यांच्या कार्यालयात झाली.

ते म्हणाले, "अल्पसंख्यांकांवर हल्ले होत आहे याचा मला खूप दुःख आहे आणि मला वाटतं की हे हल्ले व्हायला नको. मात्र याची एक वेगळी बाजू सुद्धा आहे. मदरशामधील विद्यार्थी मंदिरांचं रक्षण करत आहेत. मुस्लीम कुटुंब हिंदू कुटुंबाना जेवण देत आहेत. मुस्लीम कुटुंबं हिंदू कुटुंबाचं रक्षण करत आहेत पण चांगली उदाहरणं समोर येत नाहीत.

"मला वाटतं की हा नॅरेटिव्ह सत्तेत राहिलेल्या पक्षाच्या व्यापक रणनीतीचा भाग आहे. यामुळे शेजारी देश असलेल्या भारताला बांगलादेशातील प्रकरणात मध्ये गुंतवता येईल. अशा गोष्टी पूर्ण जगात पसरतात आणि त्यामुळे बांगलादेश वर इस्लामी कट्टरवाद्यांनी ताबा घेतला आहे आणि हा देश आता सुरक्षित नाही असा वातावरण तयार करण्यात मदत होते," कैसर सांगतात.

अश्रफ कैसर

फोटो स्रोत, DEBALIN ROY/BBC

फोटो कॅप्शन, राजकीय विश्लेषक अश्रफ कैसर म्हणतात की 'हिंदूंमधील असुरक्षिततेची भावना भाजप आणि अवामी लीगला जोडते.'

असुरक्षिततेच्या भावनेमुळे बीजेपी आणि अवामी लीग कसे जवळ येतात हे स्पष्ट करण्यासाठी ते म्हणाले, "बांगलादेशातील हिंदूंचं रक्षण करणे भाजपच्या राजकारणाचा एक महत्त्वाचा पैलू आहे. एक प्रकारे ही अवामी लीगची राजकीय मदत करण्यासारखा आहे कारण आठ किंवा नऊ आठ ते नऊ टक्के हिंदू लोकसंख्या अवामी लीगसाठी एक मोठी वोट बँक आहे."

महत्त्वाचं म्हणजे बांगलादेशच्या राज्यघटनेत धर्मनिरपेक्षता हे एक मूल्य होतं आणि इस्लाम हा देशाचा धर्म नव्हता. त्यानंतर हे बदलण्यात आलं इस्लाम हाच देशाचा धर्म झाला आणि धर्मनिरपेक्षता काढून टाकण्यात आली. सध्याच्या राज्यघटनेत हे दोन्ही मूल्य एकत्रितपणे नांदतात.

मात्र देशाची भूमिका संशयास्पद आहे.

आंतरराष्ट्रीय संस्था फ्रीडम हाऊसने गेल्या वर्षी शेख हसीना यांच्या कार्यकाळात बांगलादेशची ओळख ‘अंशत: स्वतंत्र देश' अशी दिली होती.

फ्रीडम हाऊसने म्हटलं होतं “अल्पसंख्याक समाजाच्या लोकांना बळजबरी, छळ आणि हिंसाचाराचा सामना करावा लागत आहे. त्याच हिंदू, ख्रिश्चन, शीख, बौद्ध यांच्याबरोबरच शिया आणि अहमदिया मुस्लिमांचाही समावेश आहे. अनेकदा समाजकंटक त्यांच्याविरोधात हिंसाचार करतात, त्यांच्या धार्मिक स्थळांना लक्ष्य करतात. धार्मिक अल्पसंख्यकांच्या विरुद्ध हिंसेला सोशल मीडियावर जाणूनबुजून भडकावण्यात येते. गेल्या काही वर्षांत हिंदूंची घरं, त्यांचे व्यवसाय आणि मंदिराची तोडफोड केली. त्यांना आग लावण्यात आली. असे हल्ले 2023 मध्येही झाले आहेत.”

गोपाल देबनाथ यांचे म्हणणे आहे की, गृहमंत्र्यांनी त्यांना सुरक्षेचे आश्वासन दिले आहे

फोटो स्रोत, DEBALIN ROY/BBC

फोटो कॅप्शन, गोपाल देबनाथ

ढाकेश्वरी मंदिराच्या परिसरात आमची भेट हिंदू समुदायातील अनेक नेत्यांशी झाली. गोपालचंद्र देबनाथ त्यांच्यापैकी एक होते.

सरकारने दिलेली आश्वासनं आणि हळूहळू सुधारत असलेली परिस्थिती यामुळे त्यांची चिंता थोडी कमी झाली आहे.

त्यांनी आम्हाला सांगितलं, "काल मला गृहमंत्र्यांनी सांगितलं की तुमचं आणि आमचं रक्त सारखं आहे. मग तुम्ही का घाबरता? तुम्हीच नाही पण तुमच्या समाजाच्या कोणत्याही सदस्याला कधीही मदत हवी असेल तर माझ्याशी संपर्क करू शकता. येथील हिंदू समुदायाचे लोक अतिशय शांततेत राहतात. पण इथे काही लोकांचा एक छोटा गट आहे तिथे लोकांना वाटतं की जर आपण देश सोडून गेलो तर ते आपल्या जमिनीवर आणि आपल्या संपत्तीवर ताबा मिळवू शकतात. राजकीय कारणांमुळे सुद्धा ते आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करतात."

हिंदू मोठ्या प्रमाणावर बांगलादेश सोडून जाऊ शकतात यावर गोपाल देबनाथ म्हणाले की ते इतर लोकांसारखे बांगलादेशातच राहणं पसंत करतील.

मदरशाचे विद्यार्थी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 12 ऑगस्टच्या रात्री ढाका येथील मंदिराच्या सुरक्षेसाठी मदरशाचे विद्यार्थी उभे आहेत. पोलिस ठाण्यांमध्ये पोलिसच नसतात आणि अशा स्थितीत लोक स्वतःच गट तयार करून पाळत ठेवण्याचे काम करत आहेत.

जेव्हा आम्ही ढाकेश्वरी मंदिरातून बाहेर निघत होतो, तेव्हा मंदिराच्या गेटवर आम्ही दोन लोकांना हातात काठ्या घेऊन बसलेले पाहिलं.

त्यांच्यापैकी एक मोहम्मद सैफुझ झमन होते. ते मौलवी आहेत.

मी त्यांना विचारलं की ते मंदिराबाहेर काय करत आहेत?

ते म्हणाले, "जेव्हापासून पोलीस बेपत्ता झाले आहेत, तेव्हापासून लोकांना असुरक्षित वाटत आहे. मला हे माहिती आहे म्हणून मी इथे आलो आहे, जेणेकरून त्यांना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागू नये."

"मी संपूर्ण जगाला सांगू इच्छितो की, बांगलादेश धर्माच्या आधारावर विभागलेला नाही. फक्त मीच नाही तर अनेक मुस्लीम संघटना आळीपाळीने या मंदिराचं संरक्षण करत आहेत."

“आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करत आहोत.”

(बीबीसीच्या ग्लोबल इन्फॉर्मेशन टीम आणि बीबीसी व्हेरिफायच्या अतिरिक्त वार्तांकनासह)

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन