Indo Pak War: ढाक्यातील गव्हर्नमेंट हाऊसवर भारताच्या मिग विमानांनी हल्ला केला तेव्हा..

फोटो स्रोत, BB BISHNOI
- Author, रेहान फझल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
14 डिसेंबर 1971 रोजी सकाळी पूर्व पाकिस्तानच्या प्रतिनिधीने केलेला अर्जन्ट कॉल ढाक्यामधील इंटरकॉन्टिनेन्टल हॉटेलातल्या टेलिफोन ऑपरेटरने उचलला.
त्या हॉटेलात थांबलेले संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासित उच्चायुक्तालयाचे प्रतिनिधी जॉन केली यांच्याशी बोलायचं असल्याची मागणी फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने केली.
केली यांनी फोन उचलला तेव्हा समोरच्या व्यक्तीने सांगितलं की पूर्व पाकिस्तानचे गव्हर्नर डॉक्टर ए. एम. मलिक त्यांच्याशी बोलणार आहेत. केली व त्यांचे सहकारी पीटर विलर यांनी गव्हर्नर हाऊसमध्ये येऊन आपल्या मंत्रिमंडळातील सदस्यांशी चर्चा करून त्यांना सल्ला द्यावा, अशी विनंती मलिक यांनी केली.
केली यांनी त्यांच्या सोबत रेड क्रॉसचे प्रतिनिधी स्वॅन लॅम्पेल यांनाही आणावं, असं मलिक यांनी सांगितलं. दूरध्वनीवरील हे संभाषण भारतीय हवाई दल आणि लष्कराच्या पूर्व कमांडने इंटरसेप्ट करून ऐकलं. या बैठकीत पूर्व पाकिस्तानातील लष्करी कायद्याचे प्रशासक आणि तिथले पाकिस्तानी हवाई दलाचे प्रमुखसुद्धा सहभागी होणार आहेत, हे यातून भारतीय सैन्यदलाला कळलं.
या संभाषणाचं शब्दांकन करून तो मजकूर भारतीय पूर्व कमांडमधील सिग्नल इंटेलिजन्सचे प्रमुख लेफ्टनंट कर्नल पी. सी. भल्ला यांनी सकाळी साडेनऊ वाजता पूर्व कमांडचे प्रमुख मेजर जनरल जे. एफ. आर. जेकब यांना नेऊन दिला.
जनरल जेकब यांनी तत्काळ शिलाँगमध्ये हवाई दलाच्या पूर्व कमांडची धुरा सांभाळणारे एअर व्हाइस मार्शल देवेशर यांना फोन केला. ढाक्याला गव्हर्नमेंट हाऊसमध्ये होणाऱ्या या बैठकीत भारतीय हवाई दलाची विमानं अडथळा आणू शकली, तर पाकिस्तानी सैन्यावर शस्त्रं खाली ठेवण्यासाठी मानसिक दबाव निर्माण होईल, असं या दोन भारतीय सेनाधिकाऱ्यांनी ठरवलं.
बैठक सुरू होण्याच्या एक तास आधी हल्ल्याचे आदेश
14 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता ही बैठक होणार होती. आपल्याला ढाक्यामधील गव्हर्नमेंट हाऊसवर हल्ला करायचा आहे, असा आदेश भारतीय हवाई दलाच्या पूर्व कमांडला बैठकीच्या केवळ एक तास आधी मिळाला.
या संदर्भातील माहिती देताना थोडासा संभ्रम निर्माण झाला.
ही बैठक सर्किट हाऊसला होणार असल्याचं गुवाहाटीमधील ग्रुप कॅप्टन माल्कम वोलेन यांना सांगण्यात आलं. वोलेन धावतपळत ऑपरेशन रूममध्ये गेले. तिथे विंग कमांडर भूप बिश्नोई काही सहकारी वैमानिकांसह चहा पीत होते.

वोलेन यांनी बिश्नोई यांना लगोलग माहिती दिली आणि 11 वाजून 50 मिनिटांनी विमानं ढाक्याच्या आकाशात असायला हवीत असं सांगितलं. त्या क्षणी पाकिस्तानी प्रमाणवेळेनुसार सकाळचे 11 वाजून 25 मिनिटं झाली होती.
नकाशा म्हणून त्यांच्याकडे बर्मा शेल कंपनीने काढलेला एक पर्यटकांसाठीचा नकाशा देण्यात आला. बिश्नोई यांनी तो नकाशा साइड पॉकेटमध्ये ठेवून दिला.
अखेरच्या क्षणी लक्ष्य बदललं
बीबीसीशी बोलताना विंग कमांडर भूप बिश्नोई म्हणाले, "त्या वेळी हल्ला करण्यासाठी आमच्याकडे फक्त 24 मिनिटं होती. त्यातली 21 मिनिटं गुवाहाटीहून ढाक्याला पोचायला लागणार होती. म्हणजे तयारीसाठी हातात फक्त तीन मिनिटं होती. मी माझ्या मिग-21 विमानाचं इंजिन बंद करून हूड बंद करत होतो इतक्यात एक माणूस कागद फडकावत माझ्या दिशेने धावत येत असल्याचं दिसलं.

फोटो स्रोत, WING COM. BHOOP BISHNOI
"कागदावर लिहिलेलं, 'नॉट सर्किट हाऊस- गव्हर्नमेंट हाऊस'. मी तो संदेश वाचला, पण माझ्या सहकारी वैमानिकांना हे सांगणं खूप अवघड होतं, कारण मी रेडिओवर हे सांगितलं असतं, तर आम्ही काय करायला चाललो आहोत हे सगळ्या जगाला कळलं असतं. ढाक्याच्या दिशेने उड्डाण केल्यावर नकाशे पाहायचे असं मी ठरवलेलं आणि मग तिकडे जाऊन गव्हर्नमेंट हाऊस शोधता आलं असतं."
हासिमारा इथे विंग कमांडर एस. के. कौल यांनासुद्धा या मोहिमेमध्ये सहभागी करून घेण्यात आलं
दरम्यान, गुवाहाटीहून 150 किलोमीटर पश्चिमेला हासिमारा इथे विंग कमांडर आर. व्ही. सिंग यांनी 37 स्क्वॉड्रनचे सीओ विंग कमांडर एस. के. कौल यांना बोलावलं आणि ढाक्याचं गव्हर्न्मेन्ट हाऊस उद्ध्वस्त करायचं आहे असं सांगितलं. यावर कौल यांनी पहिला प्रश्न विचारला, "गव्हर्नमेंट हाऊस आहे कुठे?" त्यांनासुद्धा बर्मा शेल कंपनीने प्रसिद्ध केलेला एक-दोन इंची लांबी-रुंदीचा पर्यटकांसाठीचा नकाशा देण्यात आला.
तोवर बिश्नोई यांना गुवाहाटीहून उड्डाण करून वीस मिनिटं झाली होती. तीन मिनियांमध्ये आपण आपल्या लक्ष्य स्थानापर्यंत पोचू, असा अंदाज त्यांनी बांधला होता. त्यांनी नकाशा खिशातून बाहेर काढला आणि त्यात पाहून त्यांच्या सहकारी वैमानिकांना रेडिओद्वारे संदेश पाठवला की, ढाका विमानतळाच्या दक्षिणेला लक्ष्य शोधण्याचा प्रयत्न करावा. आता सर्किट हाऊसऐवजी गव्हर्नमेंट हाऊस हे लक्ष्य असल्याचं बाकीच्यांनाही कळलं. त्यातील तिसऱ्या क्रमांकाचे वैमानिक विनोद भाटिया यांनी पहिल्यांदा गव्हर्नमेंट हाऊस शोधलं. त्या इमारतीच्या चारही बाजूंनी आवार हिरव्या गवताने भरलं होतं. भारतातील राज्यांच्या राजधान्यांमधील राजभवनाचं आवार असंच असतं.

बिश्नोई सांगतात, "आमचं लक्ष्य योग्य आहे की नाही हे तपासण्यासाठी मी माझं मिग विमान खूप खाली आणलं. तिथे बऱ्याच गाड्या येत-जात असल्याचं मला दिसलं, अनेक लष्करी वाहनंसुद्धा उभी होती आणि इमारतीच्या घुमटावर पाकिस्तानी झेंडा फडकत होता. आपल्याला इथेच हल्ला करायचा असल्याचं मी माझ्या सहकाऱ्यांना सांगितलं."
गव्हर्नर मलिक यांनी त्यांच्या कुटुंबियांना हॉटेलात पाठवण्याचा प्रयत्न केला
या वेळी गव्हर्नर डॉक्टर ए. एम. मलिक त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसोबत गव्हर्नमेंट हाऊसमध्ये चर्चा करत होते. इतक्यात संयुक्त राष्ट्रांचे प्रतिनिधी जॉन केली तिथे पोचले. मलिक मंत्रिमंडळासोबतच्या बैठकीतून मधेच उठून गेले आणि केली यांचं स्वागत केलं. सद्यस्थितीविषयी आपलं काय म्हणणं आहे, असं मलिक यांनी केली यांना विचारलं.

फोटो स्रोत, S K KAUL
केली म्हणाले, "तुम्हाला आणि मंत्रिमंडळातील सदस्यांना मुक्तिवाहिनी लक्ष्य करू शकते." मलिक यांनी तटस्थ क्षेत्र म्हणून निवडल्या गेलेल्या इंटरकॉन्टिनेन्टल हॉटेलात आश्रय घ्यावा, असा सल्ला केली यांनी दिला. पण तत्पूर्वी मलिक यांना स्वतःच्या पदाचा व त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांनाही आपापल्या पदांचा राजीनामा द्यावा लागेल, असं ते म्हणाले.
आपण याबद्दल विचार करतो आहोत, पण आपण ल़ढाई सुरू असताना मैदानातून पळ काढला असं इतिहासात लिहिलं जाऊ नये अशी आपली इच्छा असल्याचं मलिक यांनी सांगितलं.
आपली ऑस्ट्रियन पत्नी व मुलगी यांना इंटरकॉन्टिनेन्टल हॉटेलात पाठवलं तर चालेल का, असं त्यांनी केली यांना विचारलं. तसं करायला हरकत नाही, पण याची माहिती आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांपर्यंत पोचेलच आणि गव्हर्नर यांना स्वतःच्या भवितव्याची शाश्वती नसल्यामुळे त्यांनी स्वतःच्या कुटुंबीयांना या हॉटेलात पाठवलं अशी बातमी पसरेल.
बिश्नोई यांच्या मिग विमानाचा गव्हर्नमेंट हाऊसवर हल्ला
हे बोलणं होत असताना अचानक गव्हर्नमेंट हाऊस खालची जमीन हादरल्यासारखं वाटलं.
बिश्नोई यांनी सोडलेली रॉकेटं त्या इमारतीवर पडू लागली होती. पहिल्या फेरीत प्रत्येक वैमानिकाने 16 रॉकेटं सोडली. बिश्नोई यांनी मुख्य घुमटाखालील खोली लक्ष्य केली होती. इमारतीच्या आत हाहाःकार उडाला. केली व त्यांचे सहकारी वेलर लोखंडी कुंपणाबाहेर उडी मारून आले आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी बागेत उभ्या असणाऱ्या एका जीपखाली लपले.

फोटो स्रोत, BHOOP BISHNOI
जॉन केली 'थ्री डेज् इन ढाका' या पुस्तकात लिहितात, "हल्ला होत असताना मला पूर्व पाकिस्तानचे मुख्य सचिव मुझफ्फर हुसैन भेटले. त्यांचा चेहरा फिका पडला होता. मी वीस यार्डांवरील एका बंकरपाशी धावलो, तर तिथे आधीच पाकिस्तानी सैनिक भरलेले होते. माझ्या समोर मेजर जनरल राव फरमान अली धावत बाहेर पडले. तेसुद्धा बचावासाठी काहीतरी आडोसा शोधत होते. भारतीय सैन्य आमच्याशी असं का वागतं आहे, असं त्यांनी धावताना मला विचारलं."
विंग कमांडर बिश्नोई यांच्या नेतृत्वाखाली उडणाऱ्या चार मिग-21 विमानांनी धुळीने व धुराने वेढलेल्या गव्हर्नमेंट हाऊसवर 128 रॉकेट सोडली. ही विमानं तिथून माघारी गेली, तेव्हा फ्लाइट लेफ्टनंट जी. बाला यांच्या नेतृत्वाखाली 4 स्क्वाड्रनची दोन व मिग-21 तिथे बॉम्बवर्षावासाठी पोचली.
बाला व त्यांचा उजवा हात असणारे हेमू सरदेसाई यांनी गव्हर्नमेंट हाऊसला दोनदा फेरी मारली, आणि प्रत्येक वेळी चार-चार रॉकेटं तिथे टाकली जात होती. खाली विमानभेदी तोफा भारतीय विमानांना लक्ष्यं करण्याच्या प्रयत्नात होत्या, पण त्यांचा काही प्रभाव दिसत नव्हता.
गव्हर्नर मलिक व त्यांच्या सहकाऱ्यांचे फिके पडलेले चेहरे
याच वेळी रेड क्रॉसचे प्रतिनिधी स्वॅन लॅम्पेलसुद्धा गव्हर्नमेंट हाऊसमध्ये पोचले. ते बैठकीसाठी उशिरा पोचले होते. हल्ला होत असताना त्यांनी स्वतःची कार रस्त्यापाशीच सोडली.

फोटो स्रोत, PAKISTAN ARMY
नंतर त्यांनी 'इन द मिड्स्ट ऑफ द स्टॉर्म विध द रेडक्रॉस इन द फील्ड' या पुस्तकात स्पष्टीकरण देताना म्हटलं हे की, "गव्हर्मेन्ट हाऊसच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी कोणीच सुरक्षारक्षक उपस्थित नव्हता. मग मलिक व त्यांचे मंत्रिमंडळीय सदस्य जिथे बैठकीसाठी बसलेले त्या खोलीत आम्ही कोणत्याही अडथळ्याविना पोचलो. टेबलाच्या चारही बाजूंना बसलेल्या लोकांचे चेहरे फिके पडले होते. सगळे खूप थकल्यासारखे वाटत आहेत आणि ते आतून ढासळले असावेत, असं वाटत होतं. त्यांना जनरल याह्यां खान यांच्याकडून कोणताही संदेश मिळाला नाही. सर्वांना एखाद्या तटस्थ क्षेत्रांमध्ये आश्रय घ्यायचा होता. त्यांचा जीव आज त्यांच्या हातांमध्ये होता."
45 मिनिटांनी तिसरा हल्ला
मिग-21 विमानांनी सहा हल्ले केले आणि 192 रॉकेटं सोडली, तरीही गव्हर्नमेंट हाऊस उद्ध्वस्त झालं नाही. पण इमारतीच्या अनेक भिंती, खिडक्या व दरवाजे यांचं नुकसान झालं. हल्ला थांबल्यावर त्यांचे सहकारी एक मैल अंतरावरील संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयात रवाना झाले.

फोटो स्रोत, BHOOP BISHNOI
तिथे हजर असलेले लंडन ऑब्झर्वरचे प्रतिनिधी गाविन यंग यांनी केली यांना सुचवलं की, पुन्हा गव्हर्नमेंट हाऊसमध्ये जाऊन तिथल्या नुकसानीचा अंदाज घ्यावा. भारतीय विमानं लगेच परत येऊ शकणार नाहीत, त्यांना इंधन व अस्त्रं भरून परतायला किमान एक तास तरी लागेल, असा गाविन यांचा अंदाज होता.
केली व गाविन परत गव्हर्नमेंट हाऊसमध्ये येईपर्यंत मलिक व त्यांचे सहकारी इमारतीतल्याच एका बंकरमध्ये गेले होते. अजूनही राजीनामा देण्याबाबत मलिक यांनी निर्णय घेतला नव्हता. ते अजून सल्लामसलत करत होते, इतक्यात पुन्हा वरून गोळीबार होत असल्याचा आवाज ऐकू आला.
भारतीय हवाई दलाने 45 मिनिटांच्या आत गव्हर्नमेंट हाऊसवर तिसरा हल्ला चढवला होता.
कौल व मसंद यांनी इमारतीच्या खिडक्यांना लक्ष्य केलं
या वेळी हल्ल्याची धुरा हंटर विमान उडवणारे विंग कमांडर एस. के. कौस व फ्लाइंग ऑफिसर हरीश मसंद यांच्यावर होती.
कालांतराने हवाई दलप्रमुख झालेले कौल बीबीसीशी बोलताना म्हणाले, "ढाक्यात हे गव्हर्नमेंट हाऊस कुठे आहे, तेसुद्धा आम्हाला माहीत नव्हतं. कलकत्ता आणि मुंबई यांच्यासारखं ढाका हे मोठं शहर होतं. आम्हाला बर्मा शेल कंपनीने काढलेला ढाका शहराचा एक जुना रोडमॅप देण्यात आला होता. त्याची आम्हाला खूप मदत झाली."

फोटो स्रोत, BHOOP BISHNOI
कौल यांच्या नेतृत्वाखाली पथकाने याचीही काळजी घेतली की, आसपासच्या लोकांचं फारसं नुकसान होऊ नये.
कौल पुढे म्हणाले, "आम्ही आधी इमारतीच्या जवळून विमानं नेली जेणेकरून आसपास उभे असलेले लोक पांगतील आणि त्यांचं काही नुकसान होणार नाही. तसंच आम्ही रॉकेट हल्ल्यासोबतच गोळीबारसुद्धा केला. शिवाय, त्यांच्या लहान शस्त्रांच्या कक्षेबाहेर राहण्यासाठी आम्ही विशिष्ट उंचीवरून हल्ला करत होतो."
विंग कमांडर कौल यांच्या सोबत गेलेले त्यांचे विंग मॅन फ्लाइंग ऑफिसर हरीश मसंद यांच्याशीही बीबीसीने संवाद साधला.
मसंद म्हणाले, "गव्हर्नमेंट हाऊसच्या समोर पहिल्या मजल्यावर एक मोठा दरवाजा किंवा खिडकीसारखं काहीतरी होतं, असं मला आठवतंय. तिथे एखादं सभागृह असेल अशा अंदाजाने आम्ही त्या जागेला लक्ष्य केलं. हल्ला झाल्यावर आम्ही इंटरकॉन्टिनेन्टल हॉटेलच्या जवळून विमानं उडवत नेली, तेव्हा तिथे छतावरून, गच्चीवरून आणि सज्जातून अनेक लोक इथलं दृश्य बघायला बाहेर आल्याचं आम्हाला दिसलं."
गव्हर्नर मलिक यांनी थरथरत्या हातांनी राजीनामा लिहिला
त्या वेळी गगव्हर्नमेंट हाऊसमध्ये हजर असलेल्या गाविन यंग यांनी 'गाविन यंग वर्ल्ड्स अपार्ट ट्रॅव्हल्स इन वॉर अँड पीस' या पुस्तकात लिहिलं की, "भारतीय जेट विमानं गर्जना करत हल्ला करायला आली. जमीन हादरली. आता आपण शरणार्थी आहोत, असं मलिक म्हणाले. केली माझ्याकडे बघत होते. आपल्याला परत इथे यायची काय गरज होती, असा प्रश्नच ते त्यांच्या नजरेतून मला विचारत होते.

फोटो स्रोत, Getty Images
अचानक मलिक यांनी एक पेन काढलं आणि थरथरत्या हातांनी एका कागदावर काहीतरी खरडलं. ते राजीनामा लिहित असल्याचं केली आणि मी पाहिलं. राष्ट्राध्यक्ष याह्यां खान यांना संबोधित करून त्यांनी राजीनामापत्र लिहिलं. अजून हल्ला सुरू होता, इतक्यात मलिक यांनी त्यांचे बूट व मोजे काढले, शेजारी बातरूममध्ये हात-पाय धुतले, रुमालाने डोकं झाकलं आणि बंकरच्या कोपऱ्यात नमाझ पढायला लागले. हा गव्हर्न्मेन्ट हाऊसचा शेवट होता. पूर्व पाकिस्तानच्या अखेरच्या सरकारचासुद्धा हा शेवट होता."
सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हॉटेलात आश्रय घेतला
या हल्ल्यानंतर लगेचच गव्हर्नर मलिक यांनी मंत्रिमंडळातील सदस्यांसह इंटरकॉन्टिनेन्टल हॉटेलचा मार्ग पत्करला. या हल्ल्यामुळे युद्धाचा काळ कमी झाला, तसंच दुसऱ्या महायुद्धातील बर्लिनप्रमाणे रस्तोरस्ती लढण्याची वेळ आली नाही.

फोटो स्रोत, BHOOP BISHNOI
पूर्व पाकिस्तानचे तत्कालीन जनसंपर्क अधिकारी सिद्दिक सालिक यांनी 'विटनेस टू सरेंडर' या पुस्तकामध्ये या घटनेचा उल्लेख केला आहे. ते लिहितात, "भारतीयांच्या हवाई हल्ल्याने गव्हर्नमेंट हाऊसच्या मुख्य हॉलचं छत उडवून टाकलं, पण तिथे उपस्थित असलेल्या पाकिस्तानी सरकारच्या एकाही प्रतिनिधीचा जीव गेला नाही. त्या हॉलमध्ये काचेच्या पेटीत ठेवलेले काही मासे तेवढे मारले गेले.

फोटो स्रोत, CREDIT LANCER PUBLICATION
गव्हर्नर, त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी आणि ज्येष्ठ अधिकारी इंटरकॉन्टिनेन्टल हॉटेलात आश्रयाला गेले. रेड क्रॉसने हे हॉटेल तटस्थ क्षेत्र म्हणून जाहीर केलं होतं. या ज्येष्ठ अधिकाऱ्यांमध्ये मुख्य सचिव, पोलीस महानिरीक्षक व ढाका विभागाचे आयुक्त यांचाही समावेश होता. तटस्थ क्षेत्रात प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी स्वतःला पाकिस्तानी सरकारपासून दूर केलं, कारण पाकिस्तानी सरकारचा भाग नसलेल्यांनाच तटस्थ क्षेत्रात प्रवेश दिला जात होता."
एस. के. कौल यांना महावीर, तर बिश्नोई व मसंद यांना वीर चक्र
दोनच दिवसांनी पाकिस्तानी सैन्याच्या 93 हजार सैनिकांनी भारतीय सैन्यासमोर शरणागती पत्करली आणि बांग्लादेशच्या स्वातंत्र्याचा मार्ग मोकळा झाला.

फोटो स्रोत, SK KAUL
भारताचे माजी विदेश सचिव आणि बांग्लादेशात उच्चायुक्त राहिलेले जे. एन. दीक्षित यांनी 'लिबरेशन अँड बियाँड' या पुस्तकात लिहिल्यानुसार, "गव्हर्नमेंट हाऊसच्या इतर कोणत्याही खोलीचं नुकसान झालं नाही. पाकिस्तानी सैन्याने 16 डिसेंबरला शरणागती पत्करल्यावर मी त्या खोलीची पाहणी केली. या हल्ल्याने पूर्व पाकिस्तानच्या सत्ताधीशांची सर्वाधिक हानी झाली ती मानसिक पातळीवरची होती, त्यामुळे ते शस्त्रं खाली ठेवायला लगेच सहमत झाले, असं माझ्या बांग्लादेशी मित्रांनी सांगितलं."
या युद्धामध्ये असाधारण शौर्य दाखवल्याबद्दल विंग कमांडर एस. के. कौल यांना महावीर चक्र आणि विंग कमांडर बी. के. बिश्नोई व हरीश मसंद यांना वीर चक्र देण्यात आलं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








