'हा' एक मासा ठरतोय भारत आणि बांगलादेशच्या संबंधांमधील तणावाचं कारण

भारत-बांगलादेशमधील 'फिश डिप्लोमसी' काय आहे? त्याला यंदा तडा जाऊ शकतो?

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, सौतिक बिस्वास आणि एथिराजन अनबरासन
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

बांगलादेशात शेख हसीना पंतप्रधान पदावरून पायउतार झाल्यानंतर नवीन हंगामी सरकार सत्तेत आलं आहे. तेव्हापासून बांगलादेशमधील राजकीय स्थैर्य धोक्यात आलं आहे. याचे भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांमधील संबंधांवर काय परिणाम होतील, याची चर्चा सतत सुरू आहे.

त्यातच आता बांगलादेशातून पश्चिम बंगालमध्ये निर्यात होणाऱ्या अत्यंत लोकप्रिय अशा 'हिलसा' माशावर लादण्यात आलेल्या बंदीमुळे दोन्ही देशांमधील राजकीय संबंधाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

'हिलसा' (Hilsa) हा पश्चिम बंगालमधील लोकांचा आवडता मासा आहे. मात्र, एकीकडे ऑक्टोबर महिन्यात, लाखो लोक दुर्गा पूजा उत्सवासाठी सज्ज होत असताना दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये हिलसा माशाचा तुटवडा भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दुर्गा पूजा हा पश्चिम बंगालमधील सर्वांत मोठा उत्सव आहे. या निमित्ताने कामानिमित्त दूर गेलेले लोक कुटुंबात एकत्र आले की विविध प्रकारच्या माशांचे पदार्थ केले जातात.

पश्चिम बंगालमधील हिलसा माशाच्या तुटवड्यामागचं कारण असणार आहे, बांगलादेश सरकारचं नवं धोरण. कारण हिलसा माशाचं जगातील सर्वाधिक उत्पादन बांगलादेशात होतं. शेजारच्या बांगलादेशातून हिलसा माशाची सर्वाधिक निर्यात भारतात केली जाते.

मात्र, आता बांगलादेशनं भारताला हिलसा माशाचा पुरवठा करण्यासंदर्भातील धोरण कठोर केलं आहे. बांगलादेशनं या माशाच्या निर्यातीवरील बंदी अधिक तीव्र केली आहे.

बांगलादेशच्या मत्स्यपालन आणि पशुधन मंत्रालयाच्या सल्लागार फरिदा अख्तर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेशात नवं हंगामी सरकार सत्तेत आल्यानंतर महिनाभरातच हिलसा माशाच्या निर्यात धोरणामध्ये नव्यानं पावलं टाकली जात आहेत.

भारताला हिलसा माशांची निर्यात केल्यामुळे स्थानिक सर्वसामान्य बांगलादेशी नागरिकांना हिलसा विकत घेणं कठीण होऊन बसतं. कारण या माशाचे भाव वाढतात.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

त्यामुळे, हा मासा बांगलादेशी ग्राहकांच्या आवाक्यात राहावा यासाठी हे पाऊल उचलण्यात येत आहे.

"बंदी असतानाही अजूनही बांगलादेशमधून भारतात बरेच मासे निर्यात केले जात आहेत. यावेळेस आम्ही हिलसा माशाची निर्यात होऊ देणार नाही," असं फरिदा अख्तर यांनी बीबीसीला सांगितलं.

हिलसा हा बांगलादेशचा 'राष्ट्रीय मासा' आहे. हा मासा तसा महाग असतो. त्यामुळे फक्त श्रीमंत आणि उच्च मध्यमवर्गीयांनाच तो विकत घेणं शक्य होतं. हिलसा मासा गरिबांच्या आवाक्याबाहेर असतो.

हिलसा माशाची डिश हा एक अतिशय महागडा पदार्थ असतो.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मोहरीच्या ग्रेव्हीतील हिलसा माशाची डिश हा एक अतिशय महागडा पदार्थ असतो.

फरिदा अख्तर पुढे म्हणाल्या की "बांगलादेशमधील आधीचं सरकार दुर्गापूजा उत्सवाच्या वेळेस हिलसा माशाच्या निर्यातीवरील बंदी उठवत असे. ते सरकार याला 'भेट' असं म्हणत असे. मात्र यावेळेस, आम्ही अशी काही 'भेट' देण्याची गरज आहे, असं मला वाटत नाही."

"कारण समजा जर आम्ही असं केलं तर भारतात हिलसा माशाची मोठ्या प्रमाणात निर्यात होईल आणि आमच्याच लोकांना हा मासा खाण्यासाठी उपलब्ध राहणार नाही," अख्तर पुढे सांगतात.

शेख हसीना यांची 'हिलसा डिप्लोमसी'

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

माजी पंतप्रधान शेख हसीना यांची 'हिलसा डिप्लोमसी' प्रसिद्ध मानली जात होती. पण त्या सत्तेतून पायउतार झाल्यानंतर त्यांच्या धोरणाच्या वेगळे असलेले हे पाऊल उचलण्यात आले आहे.

शेख हसीना यांनी दुर्गा पूजा उत्सवाच्या काळात नेहमीच भारतात हिलसा माशाची निर्यात करण्यास परवानगी दिली होती.

शेख हसीना यांनी अनेक प्रसंगी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना हिलसा मासा पाठवला होता. भारत आणि बांगलादेशमध्ये पाणी वाटपावरून दीर्घकाळापासून वाद सुरू आहे.

हा वाद मिटण्याच्या आशेनं शेख हसीना यांनी 2017 मध्ये भारताचे तत्कालीन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना 30 किलोचा हिलसा मासा भेट म्हणून पाठवला होता.

संपूर्ण बांगलादेशात काही महिन्यांपूर्वी विद्यार्थ्यांची निदर्शनं सुरू होती. नंतरच्या काळात या निदर्शनांची तीव्रता वाढून ती हिंसक झाली. त्या पार्श्वभूमीवर 5 ऑगस्ट 2024 ला शेख हसीना यांना नाट्यमयरित्या बांगलादेशच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

या बातम्याही वाचा:

बांगलादेशातून पलायन केल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस शेख हसीना भारतात राहतील, असं वाटत होतं.

भारतात आश्रय घेत असतानाच युके, अमेरिका आणि युएईमध्ये आश्रय मिळवण्याचे त्यांचे आतापर्यंतचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत.

तळलेला हिलसा, सोबत मिरची, टोमॅटो आणि कांदा हे देखील खूप लोकप्रिय आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, तळलेला हिलसा, सोबत मिरची, टोमॅटो आणि कांदा हे देखील खूप लोकप्रिय आहे.

भारत आणि बांगलादेशमधील नवं हंगामी सरकार

सध्या शेख हसीना यांचं भारतातच वास्तव्य असल्यामुळे, बांगलादेशच्या नव्या हंगामी सरकारबरोबर चांगले संबंध तयार करण्याचे भारताचे प्रयत्न अधिकच गुंतागुंतीचे झाले आहेत. यासंदर्भात भारतासमोर अनेक आव्हानं आहेत.

बांगलादेश हा भारतासाठी धोरणात्मकदृष्ट्या, व्यूहरचनात्मकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा भागीदार आणि मित्र देश आहे. भारताच्या सीमेच्या सुरक्षेबाबत बांगलादेशचं स्थान महत्त्वाचं आहे.

विशेषतः ईशान्य भारतातील राज्यांना लागून असलेल्या सीमेच्या सुरक्षेसंदर्भात बांगलादेश अतिशय महत्त्वाचा आहे.

बांगलादेशमधील नव्या हंगामी सरकारला हिलसा माशांच्या निर्यातीला परवानगी देऊन भारताप्रती सद्भावना दाखवता आली नसती का, असा प्रश्न बीबीसीनं फरिदा अख्तर यांना विचारला.

जगात हिलसा माशाचं सर्वाधिक उत्पादन बांगलादेशात होतं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जगात हिलसा माशाचं सर्वाधिक उत्पादन बांगलादेशात होतं.

त्यावर त्या उत्तरल्या, "आम्ही इतर अनेक मार्गांनी ही सद्भावना दाखवू. भारत आमचा जुना मित्र आहे. मात्र आमच्या लोकांना वंचित ठेवून आम्हाला काहीही करायचं नाही."

"सद्भावनेचा, चांगले संबंध असण्याचा मुद्दा या गोष्टीपेक्षा वेगळा आहे," अख्तर म्हणाल्या.

बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेतील 'हिलसा'चं स्थान

हिलसा (Tenualosa ilisha) माशाच्या उत्पादनात बांगलादेश जगात आघाडीवर आहे. हिलसा माशाची प्रजाती माशांच्या हेरिंग प्रजातीशी संबंधित आहे. हेरिंग ही माशाची प्रजाती पृथ्वीवरील समुद्र, महासागरांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळते.

तर हिलसा मासा बंगालच्या उपसागरात आणि त्याचबरोबर बांगलादेशमधील नद्यांमध्ये देखील विपुल प्रमाणात सापडतो.

बांगलादेशातील एकूण मत्स्य उत्पादनाच्या जवळपास 12 टक्के मासे हिलसा प्रजातीचे असतात. तर हिलसा माशांपासून मिळणाऱ्या उत्पन्नाचं बांगलादेशच्या जीडीपीमधील योगदान जवळपास 1 टक्का इतकं आहे.

मासेमार दरवर्षी तिथे जवळपास 6,00,000 टनांपर्यंत हिलसा मासे पकडतात. यातील बहुतांश मासे समुद्रात पकडले जातात.

2017 मध्ये हिलसा माशाला बांगलादेशचं 'भौगोलिक मानांकन' (Geographical Indicator Tag) म्हणून मान्यता देण्यात आली होती.

बांगलादेश सरकार मागील काही वर्षांपासून दरवर्षी दुर्गा पूजा उत्सवाच्या काळात भारतात 3,000 - 5,000 टन हिलसा माशाची निर्यात करण्यास परवानगी देत आलं आहे, असं वरिष्ठ मत्स्यपालन अधिकारी नृपेंद्र नाथ बिस्वास यांनी 'द डेली स्टार' या वृत्तपत्राला सांगितलं.

"मात्र बांगलादेशातील हिलसा माशाचा तुटवडा लक्षात घेऊन यावर्षी बांगलादेश सरकारनं भारतात हिलसा माशाच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे," असं बिस्वास म्हणाले.

बांगलादेशातील प्रसार माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांवरून असं दिसतं की हिलसा माशाच्या निर्यातीवर बंदी घालूनदेखील बांगलादेशातील स्थानिक बाजारपेठेत त्याच्या किमतीत वाढ झाली आहे.

गेल्या वर्षी 1.5 किलो वजनाच्या हिलसा माशाचा भाव जवळपास 1,800 टाका (अंदाजे 1260 रुपये ), तर 1.2 किलो हिलसा माशाचा भाव 1,600 टाका (अंदाजे 1120 रुपये) आणि एक किलो हिलसाचा भाव 1,500 टाका ( अंदाजे 1050 रुपये) होता. (टाका हे बांगलादेशी चलन आहे. )

यावर्षी हिलसा माशाचा भाव मागील वर्षीपेक्षा 150-200 टाका जास्त आहे, असं व्यापारी म्हणतात.

हिलसा माशांच्या भाववाढीसाठी माशांच्या मासेमारीत झालेली घट कारणीभूत असल्याचं मासेमार सांगतात.

"मागील तीन महिन्यांत आम्ही सुमद्रात पाच वेळा जाऊन मासेमारी करण्याचा प्रयत्न केला; मात्र, खराब हवामानामुळे आम्हाला तसंच परत यावं लागलं," असं होसैन मिआह सांगतात.

बंगाली समाजातील हिलसा माशाचं महत्त्व

भारत आणि बांगलादेश दोन्ही देशांमधील बंगाली लोकांमध्ये सांस्कृतिकदृष्ट्या हिलसा माशाला महत्त्वाचं देण्यात आलं आहे. त्यामुळे, या माशाच्या तुटवड्यामुळे अनेकांची निराशा होईल.

हिलसा मासा लोकप्रिय असण्यामागचं कारण म्हणजे त्यापासून तयार करता येणारे असंख्य स्वादिष्ट पदार्थ होय. हा मासा वेगवेगळ्या पद्धतींनी बनवता येतो.

मोहरीची पेस्ट लावून हिलसा मासा वाफवता येतो. यामुळे आधीच लज्जतदार असलेला हा मासा अधिक चविष्ट होतो. त्याबरोबरच या माशाला मसाल्यांचा पातळ थर देऊन तळता येतं. यामुळे तो अतिशय कुरकुरीत होतो.

अनेक लेखकांनी हिलसा माशाचं कौतुक करणारं वर्णन केलं आहे. चित्रिता बॅनर्जी त्यातील एक आहेत. चित्रिता बॅनर्जी बंगाली-अमेरिकन खाद्य इतिहासकार आणि लेखिका आहेत.

"मला वाटतं की प्रसिद्ध बंगाली खाद्यपदार्थांमध्ये हिलसा माशाचं स्थान हे अनेक गोष्टींच्या मिश्रणातून निर्माण झालं आहे. ते फक्त त्याच्या शारीरिक सौंदर्यामुळेच नाही. हिल्साच्या अनोख्या वैशिष्ट्यांमुळेच बंगाली लेखकांनी त्याचं वर्णन 'डार्लिंग ऑफ द वॉटर' किंवा 'प्रिन्स अमंग फिश' असं केलं आहे," असं चित्रिता म्हणाल्या.

हिल्साच्या चवीचं वर्णन करताना त्या पुढे म्हणतात, "हिलसा मासा काटेरी असला तरी त्याचं लुसलुशीत मांस, उत्तम पोत आणि उत्कृष्ट चव या गोष्टींचा होणारा मिलाफ यातून असंख्य रुचकर पदार्थ तयार करता येतात."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)