बांगलादेशात सत्तांतर घडवणारे 'हे' विद्यार्थी कोण आहेत आणि ते आता काय करतायेत?

नुसरत तबस्सुम
फोटो कॅप्शन, नुसरत तबस्सुम
    • Author, जुगल पुरोहित आणि देबलीन रॉय
    • Role, ढाका, बांगलादेश

मीर महफूज उर रहमान 18 जुलैच्या दुपारी आपल्या घराबाहेर पडला. ढाक्यामध्ये सरकारच्या विरोधात होत असलेल्या निदर्शनांमध्ये मित्रांसोबत सहभागी होण्यासाठी तो जात होता.

सोशल मीडियावर त्याने निदर्शनांना पाठिंबा दिला होता. मात्र तोपर्यंत त्याला या निदर्शनांमध्ये प्रत्यक्ष सहभागी होता आलं नव्हतं.

मीरच्या घरचे त्याला लाडानं 'मुग्धो' म्हणायचे.

त्या दिवशी दुपारनंतर मुग्धो आपलं घर, कुटुंबीय यांना पुन्हा पाहू शकला नाही. पण त्याची एक व्हीडिओ क्लिप त्या दिवशी व्हायरल झाली.

क्लिपमध्ये तो पाण्याच्या बाटल्यांची एक पिशवी पकडताना आणि अश्रूधुरामुळे त्रस्त अवस्थेत रस्त्यावरून चालताना दिसत होता. त्यात लोकांना पाणी हवंय का? असं वारंवार विचारत होता.

त्यानंतर काही क्षणांनी मुग्धोच्या डोक्याला गोळी लागली आणि त्याचा मृत्यू झाला.

मुग्धोचं वय अवघं 25 वर्ष होतं आणि तो पदव्युत्तर पदवीसाठीचं शिक्षण घेत होता. अभ्यासाबरोबरच ऑनलाइन अ‍ॅपद्वारे तो पार्टटाइम कामही करायचा. त्याच्या घरच्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तो यातून महिन्याला चांगली कमाईही करायचा.

त्याचा भाऊ मीर महमूद उर रहमान उर्फ दिप्तो (30 वर्षे) यानं सांगितलं की, "मुग्धो हा सरकारी नोकरीच्या शोधात नव्हता. पण, पुढील पिढ्यांना न्याय मिळावा म्हणून तो आंदोलनात सहभागी होण्यासाठी गेला होता."

बांगलादेशात अनेक आठवड्यांपासून सुरू असलेल्या निदर्शनांमुळे मुग्धोसारख्या अनेक विद्यार्थ्यांना जीव गमावावा लागला. सर्वसामान्य नागरिकदेखील हिंसेच्या तडाख्यात सापडले.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालानुसार, 16 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान झालेल्या या हिंसाचारात 600 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.

मुग्धो बंधू
फोटो कॅप्शन, मुग्धो बंधू

हिंसक झालेली निदर्शने आणि लोकांमधील वाढता असंतोष यामुळे बांगलादेश सत्तांतर झालं. पाच ऑगस्टला बांगलादेशच्या तत्कालीन पंतप्रधान शेख हसिना यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर त्यांनी बांगलादेशातून पलायन करून भारतात आश्रय घेतला.

बांगलादेशात सरकारविरोधात निदर्शनं करणारे विद्यार्थी एक नवी शक्ती म्हणून उदयाला आले आहेत.

देशाचं नेतृत्व कोण करणार? रस्त्यांवर, सार्वजनिक ठिकाणी पोलिसांच्या गैरहजेरीत कायदा सुव्यवस्था कशी राखली जाणार? या आणि अशा असंख्य प्रश्नांवर उत्तर शोधण्याचा प्रयत्न विद्यार्थी नेते करत आहेत.

कोण आहेत हे विद्यार्थी नेते?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

भारताचे बांगलादेशबरोबर मैत्रिपूर्ण संबंध आहेत. या संबंधांना ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. दोन्ही देशांमध्ये 4,000 किलोमीटर पेक्षा जास्त लांबीची सीमा आहे.

बांगलादेशातील विद्यार्थ्यांना भारताबरोबरच्या संबंधांबद्दल काय वाटतं? त्यांची नेमकी विचारसरणी कशी आहे? ते करत असलेल्या गोष्टींबद्दल, त्यांच्या भूमिकेबद्दल काही लोक प्रश्नचिन्ह का उपस्थित करत आहेत?

ढाका विद्यापीठाच्या परिसरात आमची भेट नुसरत तबस्सुमशी झाली.

निदर्शनांच्या आधी ती महाविद्यालयात एक सर्वसाधारण विद्यार्थी नेता होती. मात्र आज संपूर्ण बांगलादेश तिला ओळखतो.

काही विद्यार्थ्यांना तिच्याबरोबर सेल्फी घ्यायची होती. तर काही विद्यार्थ्यांना आपल्या आईवडिलांशी तिची भेट घालून द्यायची होती.

मी तिला विचारलं की, हंगामी सरकार आल्यानंतर आता ती पुढे काय करू इच्छिते?

ती म्हणते, "आता माझं फक्त एक ध्येय आहे. ते म्हणजे देशाला स्वतंत्र आणि समृद्ध बनवणं."

नुसरत म्हणते, "माझी स्वत:बद्दलची स्वप्नं आता मागे पडली आहेत. माझ्या देशात आमुलाग्र बदल करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक क्षेत्रात हा बदल घडवून आणावा लागेल."

"मात्र यासाठी किती वेळ लागेल ही बाब देशाच्या जनतेवर अवलंबून असेल. लोकांनी पाठिंबा दिला तर हे काम लवकरसुद्धा पूर्ण होऊ शकतं," असंही ती म्हणाली.

बांगलादेशातील विद्यार्थी

नुसरत राज्यशास्त्रामध्ये पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत आहे. तिचे काही मित्र हंगामी सरकारमध्ये वेगवेगळ्या पदांवरही आहेत.

बांगलादेशातील सरकारी नोकऱ्यांमध्ये असलेलं आरक्षण (माजी सैनिकांच्या कुटुंबीयांसाठी असलेला कोटा) रद्द करण्यासाठी ही निदर्शनं सुरू झाली होती. मात्र सुरक्षा दलांनी केलेली कारवाई आणि सत्ताधाऱ्यांनी या निदर्शनांबाबत घेतलेली भूमिका यामुळे बांगलादेशातील परिस्थिती आणखी चिघळली.

निदर्शनं अधिक हिंसक होत गेली आणि मग त्यांनी सरकारविरोधी भूमिका घेतली. त्यातूनच तिथे सत्ताबदल घडला.

विश्लेषकांच्या मते, या निदर्शनांमध्ये विरोधी राजकीय पक्षांची देखील भूमिका होती. त्यांचाही सहभाग होता.

जोबैदा नसरीन ढाका विद्यापीठात प्राध्यापिका आहेत. त्या म्हणतात, "सुरुवातीच्या काळात या निदर्शनांमध्ये सहभागी होणारे बहुतांश विद्यार्थी ढाका विद्यापीठातलेच होते. त्यांच्यावर डाव्या विचारसरणीचा प्रभाव होता.

"मात्र नंतरच्या काळात ही निदर्शनं देशभर पसरली तेव्हा निदर्शनांमध्ये वेगवेगळ्या विचारसरणी आणि संघटनांचे लोकही सहभागी होत गेले."

"सरकार विरोधातील निदर्शनांना व्यापक स्वरुप देण्यात उजव्या विचारसरणीच्या संघटना आणि शेख हसीना यांच्या सरकार विरोधातील राजकीय पक्षांची भूमिकाही महत्त्वाची होती."

जोबैदा नसरीन
फोटो कॅप्शन, जोबैदा नसरीन

सध्या बांगलादेशातील सत्ता हंगामी सरकारच्या हातात आहे. हंगामी सरकार स्थापन करण्यात विद्यार्थ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

शेख हसीना यांचं सरकार जाऊन हंगामी सरकार आलं असलं, तरी या हंगामी सरकारसमोर अनेक प्रश्न, समस्या आहेत. बांगलादेशात निवडणुका कधी होणार? सतत होत असलेला हिंसाचार कधी थांबणार? देशातील अल्पसंख्यांकांना सुरक्षित वाटण्यासारखी परिस्थिती कधी निर्माण होणार? असे हे प्रश्न आहेत.

हंगामी सरकारनं बांगलादेशात हिंसाचार सहन केला जाणार नाही, असं वारंवार म्हटलं आहे. विशेषतः अल्पसंख्यांकांच्या बाबतीत होत असलेल्या हिंसाचाराला थारा दिला जाणार नाही, असे संकेत दिले आहेत.

लाल रेष

या बातम्याही वाचा :

लाल रेष

काय आहे सद्यस्थिती?

बांगलादेशात सध्या विद्यार्थ्यांवर आरोप होत आहे. निदर्शनांमध्ये जे विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहिले नाहीत, त्यांना पाठिंबा दिला नाही त्यांना आंदोलक विद्यार्थी लक्ष्य करत असल्याचा हा आरोप होत आहे.

त्यांच्यावर गर्दी किंवा जमावाच्या ताकदीचा वापर करत असल्याची टीका होत आहे. बांगलादेशातील प्रसारमाध्यमांमध्ये या प्रकारच्या घटनांच्या बातम्या येत आहेत.

प्राध्यापिका जोबैदा सांगतात, "इतर विद्यापीठात शिकवणारे प्राध्यापक खूप चिंताग्रस्त आहेत. विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दिला नाही, असं सांगून त्यांना धमकावलं जातं आहे. आता त्यांच्यावर बहिष्कार टाकला जाईल. असं सांगितलं जातं आहे. काही लोकांना नोकऱ्यांवरूनही काढलं जाईल, असं म्हटलं जात आहे."

पण, नुसरत यांच्या मते, "आता जो विरोध होत आहे, तो गेल्या 16 वर्षात बांगलादेशात लागू करण्यात आलेल्या धोरणांना होत आहे. समाजाच्या वेगवेगळ्या घटकांमध्ये संताप आहे," असं त्या म्हणतात.

"मला वाटतं की, समाजात हळूहळू बदल, सुधारणा होतील. विद्यार्थी पुन्हा त्यांच्या शिक्षणावर लक्ष केंद्रीत करतील आणि परिस्थिती आटोक्यात येईल," असंही त्या म्हणाल्या.

जोबैदा नसरीन
फोटो कॅप्शन, जोबैदा नसरीन

बांगलादेशात अल्पसंख्यांक समुदाय आणि त्यातही विशेषतः हिंदू समुदाय मोठ्या प्रमाणात शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाचे पाठिराखे आहेत. मात्र, शेख हसीना सरकारच्या विरोधात झालेल्या निदर्शनांमध्ये आम्हाला बांगलादेशातील हिंदू समुदायाचे विद्यार्थीही दिसले.

सज्जल कुमार प्रामाणिक यानं अकाउंटिंग आणि इन्फॉर्मेशन सिस्टम्स मध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे.

सज्जल कुमार सांगतो की, "शेख हसीना यांचं अवामी लीगचं सरकार बांगलादेशात अल्पसंख्यांक समुदायांचं संरक्षण करायचं असं लोकांना वाटायचं. अर्थात त्यांच्या कार्यकाळात देखील दंगली झाल्या. मात्र मला असं वाटत नाही."

कोरोनाच्या संकटानंतर बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेसमोर अडचणी उभ्या झाल्या. आधीप्रमाणे बांगलादेशची अर्थव्यवस्था वेगाने विस्तार करू शकली नाही. सध्याची आकडेवारी सांगते की, मागील काही वर्षात बांगलादेशातील महागाईदर सातत्यानं वाढत गेला आहे.

बांगलादेशातील सद्यस्थितीमुळे सज्जल सारख्या तरुणांना त्यांच्या भवितव्याची चिंता वाटते आहे.

"नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न केला असता अनेक अडचणी समोर उभ्या ठाकल्या. परीक्षेआधीच प्रश्नपत्रिका फुटत होत्या. परिणामी या सर्व कारणांमुळे लोकांमध्ये सरकारविरोधातील असंतोष आणि संताप वाढत गेला."

सद्यस्थितीबाबत तरुण आनंदी आहेत का?

नुसरत प्रमाणेच नजीफा जन्नतही विद्यार्थी नेता आहे. बांगलादेशातील खासगी विद्यापीठांमध्ये झालेल्या निदर्शनांचं नेतृत्व तिनं केलं होतं.

"नवीन सरकारनं (हंगामी सरकार) सर्वात आधी या आंदोलनाशी निगडीत सर्वांशी संपर्क साधला पाहिजे. मात्र, आतापर्यंत असं काही होताना मी पाहिलेलं नाही. बहुधा सरकार स्थिरावण्यासाठी वेळ घेतं आहे," असं ती म्हणाली.

अनिका शर्मिला विद्यार्थिनी आहे. ती म्हणाली की, "रस्त्यांवर, सार्वजनिक ठिकाणी अधिक सुरक्षेची, सुरक्षित वातावरणाची आवश्यकता आहे. महिलांच्या कार्यालयातही सुरक्षा असली पाहिजे."

मुफ्तसिम अलवी अनिकाचा मित्र आहे.

तो म्हणाला, "आमच्या देशातील अल्पसंख्यांक समुदायाच्या लोकांना जी वागणूक दिली आहे, त्यांच्यासोबत जे होतं आहे, ते पाहून मी आनंदी नाही. मला वाईट वाटतं. विशेषतः हिंदू समुदायाच्या लोकांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं आहे."

नजीफा जन्नत
फोटो कॅप्शन, नजीफा जन्नत

बांगलादेशात निवडणुका कधी होणार? असंही आम्ही विद्यार्थ्यांना विचारलं.

अभिजीत कर्मोकार कलाकार (आर्टिस्ट) असल्याचं सांगतो. अनेक आठवड्यांपासून तो निदर्शनांमध्ये सहभागी होता. तो म्हणाला, "हो! निवडणुका तर होतील. मात्र मला वाटतं की काही काळानंतर निवडणुका झाल्यास ते योग्य ठरेल."

फैज हैरुज देखील विद्यार्थिनी आहे. तिनं सांगितलं की "पुढील तीन महिन्यांत निवडणुका होऊ नये असं मला वाटतं. तीन किंवा चार वर्षांनी निवडणुका व्हाव्यात असं मला वाटतं."

फैज हैरुज
फोटो कॅप्शन, फैज हैरुज

शेख हसीना सरकार आणि भारतामध्ये मैत्रिचे, सौहार्दाचे संबंध होते. 5 ऑगस्टला पदाचा राजीनामा दिल्यानंतर शेख हसीना यांनी बांगलादेशातून पलायन करत भारतात आश्रय घेतला होता.

अर्थात बांगलादेशातील हंगामी सरकारबरोबरही चांगले संबंध ठेवण्याची भारताची इच्छा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: तसं म्हटलं आहे.

पण नुसरतच्या मते, "जर भारत आमच्याकडून चांगला शेजारी असण्याची अपेक्षा बाळगत असेल तर भारताला देखील त्याच पद्धतीनं वागावं लागेल. आतापर्यंत भारताचं जे धोरण होतं, ते योग्य नाही. कारण एक देश कोणत्याही पक्षाचा किंवा कुटुंबाचा नसतो."

"एका छोट्या गटाशी चांगले संबंध ठेवून त्या गटाच्या प्रत्येक चुकीकडे दुर्लक्ष करून त्यांना प्रोत्साहन देता येईल, असं भारताला वाटत असेल तर, भारतासारख्या चांगल्या देशाकडून मला अशी अपेक्षा नाही."

मुग्धोच्या कुटुंबियांच्या भावना

मुग्धोचं कुटुंब दु:खातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे.

मुग्धोचा जुळा भाऊ मीर महबूब उर रहमान उर्फ स्निग्धो याला मी विचारलं की, बांगलादेशानं मुग्धो ला कसं लक्षात ठेवावं?

"आम्हाला फक्त इतकंच वाटतं की, त्याचं बलिदान लोकांनी नेहमी लक्षात ठेवावं. त्याला देशाबद्दल तळमळ होती. आपल्या देशाची सेवा करायची त्याची नेहमीच इच्छा होती. वायुदलात पायलट होऊन त्याला बांगलादेशची सेवा करायची होती."

"त्यासाठी त्यानं दोन वेळा प्रयत्न केला, मात्र त्यात त्याला यश आलं नाही. मात्र मला वाटतं की अखेर जे झालं, त्याबद्दल असं म्हटलं जाऊ शकतं की त्यानं देशसेवाच केली."

"भविष्यात कदाचित लोक त्याला विसरतील. मात्र मी जेव्हा आरशात स्वत:चा चेहरा पाहीन, तेव्हा मला त्याची आठवण येईल. कारण आमचा चेहरा एकसारखाच आहे."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.