बांगलादेशातल्या राजकीय अस्थिरतेमुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी का आलंय?

बांगलादेशातल्या अराजकामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी का आलंय? वाचा

फोटो स्रोत, SOMNATH KANNAR

    • Author, भाग्यश्री राऊत आणि सोमनाथ कन्नर
    • Role, बीबीसी मराठीसाठी

बांगलादेशातील राजकीय अस्थिरता आणि सत्तांतराचे परिणाम भारतासोबतच्या व्यापारावर झाले आहेत. वाणिज्य मंत्रालयातील आकडेवारीनुसार, भारताचा बांगलादेशसोबतचा 2023-24 या आर्थिक वर्षातील व्यापार 1,35,285 कोटी रुपये इतका आहे.

यामध्ये कृषिमालाचा मोठा वाटा आहे. कापूसगाठी, संत्री, मिरची आदी कृषिमालाचा यात समावेश होतो. बांगलादेशकडे भारतीय कृषीमालासाठी मोठी बाजारपेठ म्हणून पाहिलं जातं.

महाराष्ट्रातील फळे, भाजीपाला इत्यादींना बांगलादेशातून मोठी मागणी असते. त्यामुळे येथील भाजीपाला आणि फळ पिकांना चांगले दरही मिळतात.

मात्र, बांगलादेशातील राजकीय अनागोंदीमुळे महाराष्ट्रातील भाजीपाला आणि फळ पिकांच्या दरावर परिणाम झाला आहे.

सूत, खाद्यतेल, मसाल्याचे पदार्थ, हिरवी मिरची इत्यादी शेतमाल बांगलादेशकडून प्रामुख्याने आयात केला जातो.

सध्याच्या राजकीय अशांततेमुळे या निर्यातीला धोका निर्माण झाला आहे, विशेषत: मिरची आणि सूत निर्यातीवर याचा परिणाम होत आहे.

व्यापारात व्यत्यय येऊन निर्यातीत घट झाल्यामुळे भारतातील कापसाच्या किमती कमी होऊ शकतात.

याबाबत ग्लोबल ट्रेड रिसर्च या संस्थेचे संस्थापक अजय श्रीवास्तव यांनी चिंता व्यक्त केली आहे, ते म्हणातात, "बांगलादेशात राजकीय अशांतता जाणवत आहे, मात्र तेथील सर्व राजकीय गटांनी कापडनिर्मिती आणि इतर कारखान्यांचे संरक्षण करावे. व्यापार आणि आर्थिक देवाण-घेवाण टिकवून ठेवण्यासाठी सीमेपलीकडे कच्च्या आणि पक्क्या मालाचे पुरवठामार्ग खुले ठेवणे आवश्यक आहे."

मराठवाड्याचा बांगलादेशसोबत थेट व्यापार कसा?

मराठवाड्यातील जालना आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मिरचीची निर्यात बांगलादेशात केली जाते.

या दोन जिल्ह्यात पिकवल्या जाणाऱ्या हिरव्या मिरचीला बांगलादेशात मोठी मागणी आहे.

जालना जिल्ह्यीतील जाफराबाद आणि भोकरदन तालुक्यातून दररोज जवळपास 500 टन हिरवी मिरची बांगलादेशात पाठवली जाते.

ही उलाढाल दररोज तीन कोटी रुपयांच्या घरात असते.

मराठवाड्यातील जालना आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मिरचीची निर्यात बांगलादेशात केली जाते.

फोटो स्रोत, SOMNATH KANNAR

जाफराबाद हे हिरव्या मिरचीची मोठी बाजारपेठ म्हणून ओळखले जाते. येथील व्यापारी बांगलादेशात हिरवी मिरची पाठवतात.

बांगलादेशात मिरचीला चांगले दर मिळत असल्याने या भागात मिरची पिकाची लागवडही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

बांगलादेशातील परिस्थितीचा मिरची व्यापाऱ्यांना फटका

महाराष्ट्रातून शेतकऱ्यांचा माल घेऊन बांगलादेशमध्ये विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना तेथील अस्थिर परिस्थितीतीचा फटका बसला आहे.

मिरचीची टिकून राहण्याची क्षमता कमी असल्याने ती वेळेत पोहोचवणे गरजेचे असते.

भारत-बांगलादेश सीमेवर बराच वेळ वाहने रोखली गेल्याने व्यापाऱ्यांची मिरची खराब झाली. परिणामी आर्थिक नुकसान सहन करावे लागले.

बांगलादेशातल्या अराजकामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी का आलंय? वाचा

फोटो स्रोत, SOMNATH KANNAR

सिल्लोड तालुक्यातील वसई येथील शेतकरी अनिल नरोटे म्हणातात, "यंदा गावात अनेक शेतकऱ्यांचे मिरचीचे प्लॉट हवामानामुळे खराब झाले. मी माझा प्लॉट कसोशीने जपला. खर्च जवळपास नेहमीपेक्षा दुप्पट झालेला आहे. मजुरीचे दरही वाढलेले आहेत. यंदा मिरचीतून चांगले पैसे मिळतील अशी अपेक्षा होती. पण पदरी निराशाच पडली."

बांगलादेशातल्या अराजकामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी का आलंय? वाचा

फोटो स्रोत, SOMNATH KANNAR

जाफराबाद येथील मिरचीचे व्यापारी फरदीन खान हे नियमित बांगलादेशमध्ये मिरची पाठवतात. त्यांच्याशी बीबीसीने संपर्क साधला.

फरदीन खान सांगतात, "जाफराबाद तालुक्यातील मिरचीची गुणवत्ता इतर प्रदेशातील मिरचीपेक्षा अधिक चांगली असल्याने तिला बांगलादेशात चांगली मागणी असते. तसेच तिथे अतिवृष्टी आणि पुरामुळे स्थानिक मिरची ऑगस्टपर्यंत बाजारात येत नाही. त्यांची मिरची बाजारात येईपर्यंत आपल्या मिरचीला दरही चांगले मिळतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सीमेवर गाड्या रोखून धरल्याने आमचा बराचसा माल खराब झाला.

"बांगलादेश सुरक्षा दलाने सुरक्षा पुरवत मिरचीचे ट्रक आत सोडले. मात्र, आपल्याकडे गाड्या रोखल्याची चर्चा वाढल्याने व्यापाऱ्यांनी धास्ती घेतली व माल खरेदी केला नाही. परिणामी किलोमागे 10 ते 12 रुपयांनी दर कोसळले."

या बातम्याही वाचा - 1971 युद्ध : कराचीवर हल्ला करताना भारतीय नौदलाच्या बोटीवरचे कर्मचारी रशियन भाषेत का बोलत होते? Indo Pak War: ढाक्यातील गव्हर्नमेंट हाऊसवर भारताच्या मिग विमानांनी हल्ला केला तेव्हा.. Indo Pak War: बांगलादेश पाकिस्तानमधून वेगळा का झाला? त्याचं नक्की कारण काय? एक आठवडा, जेलमधल्या हत्या आणि दोन सत्तापालट : बांगलादेशच्या इतिहासातल्या रक्तरंजित दिवसांची कहाणी

या बातम्याही वाचा :

या बातम्याही वाचा - 1971 युद्ध : कराचीवर हल्ला करताना भारतीय नौदलाच्या बोटीवरचे कर्मचारी रशियन भाषेत का बोलत होते? Indo Pak War: ढाक्यातील गव्हर्नमेंट हाऊसवर भारताच्या मिग विमानांनी हल्ला केला तेव्हा.. Indo Pak War: बांगलादेश पाकिस्तानमधून वेगळा का झाला? त्याचं नक्की कारण काय? एक आठवडा, जेलमधल्या हत्या आणि दोन सत्तापालट : बांगलादेशच्या इतिहासातल्या रक्तरंजित दिवसांची कहाणी

भोकरदन येथील व्यापारी इकबाल शेख म्हणतात, "शेतकरी आणि व्यापारी यांच्यासाठी हा कठीण परीक्षेचा काळ आहे. नुकतेच दर वाढायला सुरुवात झाली होती. गेल्या आठवड्यात 42 रुपये किलोपर्यंत दर मिळाले होते. मात्र, आता सुपर माल 32 रुपयांना जातोय. लवकरच परिस्थिती पूर्वपदावर येईल अशी आशा आहे."

दरम्यान, याबाबत भोकरदन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव ढोले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, "बांगलादेश हा आपल्या मिरचीसाठी चांगली बाजारपेठ ठरत आहे. तालुक्यातून बांगलादेशात दररोज 200 टन मिरची निर्यात केली जाते. एका सिजनला जवळपास मिरचीचा 50 ते 60 कोटी रुपयांचा व्यापार होतो.

"सध्याच्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना फटक बसला आहे. मात्र, या भागातील मिरचीला देशांतर्गत दिल्ली, तेलंगणा (हैदराबाद), पश्चिम बंगाल (कोलकाता), बिहार (पटना) आणि उत्तर प्रदेशातही चांगली मागणी आहे. त्यामुळे मिरची यापेक्षा कमी दराने विकली जाणार नाही, अशी अपेक्षा आहे."

संत्रा निर्यातीवर परिणाम होऊ शकतो का?

बांगलादेशात विदर्भातला नागपुरी संत्रा मोठ्या प्रमाणात निर्यात होतो. दरवर्षी विदर्भातून दीड ते दोन लाख टन संत्री बांगलादेशमध्ये जात होती. पण गेल्या एक वर्षांपासून बांगलादेशनं आयात शुल्क वाढवलं. त्यामुळे ही निर्यात 30 हजार टनानं कमी झाली.

आता बांगलादेशमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीचा नेमका संत्रा निर्यातीवर कसा परिणाम होऊ शकतो? तर सध्या घाबरण्याचं काहीच कारण नसल्याचं महाऑरेंज असोसिएशनचे कार्यकारी संचालक श्रीधर ठाकरे सांगतात.

बांगलादेशातल्या अराजकामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी का आलंय? वाचा

फोटो स्रोत, SOMNATH KANNAR

ते बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हणाले, "बांगलादेशमध्ये सध्या परिस्थिती बिकट असली तरी सध्या संत्र्याचा हंगाम नाही. संत्र्याच्या आंबिया बहाराचा हंगाम सप्टेंबरपासून सुरू होतो. एक महिना तरी आयात-निर्यातीवर परिणाम होईल. पण, एक महिन्यानंतर सगळं काही सुरळीत होईल अशी आशा आहे. कारण, आयात-निर्यात करणाऱ्यांचे संबंध चांगले असतील आणि एकमेकांवर विश्वास असेल तर व्यवसाय थांबत नसतो. संत्र्याचा हंगाम सुरू होईपर्यंत बांगलादेशमधली परिस्थिती रुळावर येईल असं वाटतं."

विदर्भातील शेतकऱ्यांवर काय परिणाम होईल?

बांगलादेशमध्ये मोठी गारमेंट इंडस्ट्री आहे. त्यासाठी सर्वाधिक कापूस आणि सूत हे भारतातून निर्यात होते.

महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशात सर्वाधिक कापसाचं उत्पादन होतं.

विदर्भातल्या यवतमाळ, बुलडाणा, अकोला, अमरावती, नागपूर, वाशिम आणि वर्धा हे जिल्हे सर्वाधिक कापूस उत्पादन घेणारे जिल्हे आहेत.

2023-24 मध्ये भारतातून एकट्या बांगलादेशला 34 टक्के कापसाची निर्यात झाली होती. पण सध्या बांगलादेशमधल्या राजकीय अराजकतेमुळे आणि हिंसक आंदोलनामुळे या कापूस निर्यातीवर काही परिणाम झालाय का? हे देखील जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केलाय.

पण सध्या कापूस निर्यातीवर कुठलाच परिणाम होणार नाही, असं ज्येष्ठ कापूस सल्लागार गोविंद वैराळे यांना वाटतं.

बीबीसी मराठीच्या बातम्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा.
फोटो कॅप्शन, बीबीसी मराठीच्या बातम्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

वैराळे हे कापूस उत्पादन आणि विक्री याबद्दल शेतकऱ्यांना आणि कापूस मिलला सुद्धा ते सल्ला देतात. तसेच, 'स्पेशल प्रोजेक्ट ऑन कॉटन' हा केंद्राच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचा एक प्रोजेक्ट असून गोविंद वैराळे महाराष्ट्राचे कोऑर्डीनेटर म्हणून काम बघतात.

ते बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हणाले, "सध्या कापूस निर्यातीचा हंगाम संपलेला आहे. गेल्या हंगामात 28 लाख कापसाच्या गाठी भारतातून निर्यात झाल्या. त्यापैकी 20 लाख कापसाच्या गाठी या एकट्या बांगलादेशमध्ये निर्यात झाल्या. ही कापूस निर्यात मोठी असल्यानं बांगलादेशकडे पुरेसा साठा असेल. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीचा फारसा परिणाम होईल असं वाटत नाही.

"पण 1 सप्टेंबरपासून भारताचा कापूस निर्यातीचा अधिकृत हंगाम सुरू होईल. तोपर्यंत बांगलादेशातील परिस्थिती सुधारली नाहीतर इथून निर्यात होणाऱ्या कापसावर परिणाम होईल. बांगलादेशला होणारी निर्यात थांबली तर त्याचा शेतकऱ्यांवरही परिणाम होतो. कारण, देशात मोठ्या प्रमाणात कापसाचं उत्पादन असेल आणि निर्यात थांबल्यामुळे देशातले कापसाचे भावही पडतात."

बांगलादेशमधल्या परिस्थितीमुळे भारताच्या निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता असली तरी त्याचा एक चांगला फायदा भारताला होऊ शकतो असंही गोविंद वैराळे सांगतात.

ते म्हणतात, "बांगलादेशला कापसाची निर्यात झाली नाहीतर तिथली गारमेंट इंडस्ट्री ठप्प होण्याची शक्यता आहे. अशावेळी शेजारचे जे देश बांगलादेशकडून कापड आणि रेडीमेड कपडे खरेदी करत होते ते भारताकडे वळतील. त्यामुळे भारताच्या कापडाची मागणी वाढून भारताला फायदा होईल."

सूत निर्यातीवर काय परिणाम?

महाराष्ट्रात विदर्भात कापसाचं उत्पादन जास्त होतं. इथल्या कापसापासून सूत तयार करून ते बांगलादेशमध्ये निर्यात केलं जातं.

गिमाटेक्स इंडस्ट्री गेल्या 25 वर्षांपासून कापसापासून सूत तयार करण्याचं काम करतेय. या इंडस्ट्रीतून बांगलादेशला सूत निर्यात केलं जातं.

गिमाटेक्स इंडस्ट्रीचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत मोहोता बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हणाले, "बांगलादेशमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून परिस्थिती वाईट आहे. त्याचा परिणाम म्हणून आधीच सूत निर्यातीवर परिणाम झाला आहे. दोन महिन्यांपासून 15 ते 20 टक्के सूत निर्यात कमी झाली आहे. आता बांगलादेशातील परिस्थिती आणखी बिघडली. त्यामुळे सूत निर्यातीवर निश्चितच परिणाम होतोय."

बांगलादेशमधली परिस्थिती रुळावर येईल अशी आशा मोहोता यांना आहे.