प्रेयसीची हत्या करून पुरलं, त्यावर बांधकाम केलं; नागपुरात 'दृश्यम' स्टाईल गुन्हा कसा उघडकीस आला?

- Author, भाग्यश्री राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी
प्रियकरानं 'दृश्यम' चित्रपटाच्या स्टाईलनं आपल्या प्रेयसीची हत्या केल्याची घटना नागपुरात घडली आहे. लष्करात काम करणाऱ्या तरुणानं प्रेयसीची हत्या करून मृतेदह पुरला आणि पुरावे नष्ट करण्याच्या हेतूनं त्यावर चक्क सिमेंट काँक्रिटचं प्लास्टर देखील केलं, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
नागपुरातील बेलतरोडी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे.
पण, ही घटना नेमकी कशी घडली?
जोत्स्ना प्रकाश आकरे (32) असं खून झालेल्या तरुणीचं नाव असून अजय वानखेडे (34) असं आरोपीचं नाव आहे. गेल्या 28 ऑगस्टला जोत्स्ना घरातून गायब झाली होती आणि आता 55 दिवसानंतर तिचा खून झाल्याची माहिती नागपूर पोलिसांनी दिली.
पोलिसांनी सांगितले की आरोपीने बुट्टीबोरी भागात रेल्वे रुळाच्या जवळ दाट झाडी असलेल्या परिसरात मृतदेह पुरला होता. एक मोठा खड्डा खोदून तिथं मृतदेह टाकला. त्यानंतर वर प्लास्टिक टाकून त्यावर दगडं टाकले आणि त्यावर सिमेंट काँक्रिटचं प्लास्टर देखील केलं होतं.
पोलिसांनी त्या खड्ड्यातून मृतदेह काढून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला आहे. पण, पोलिसांना या हत्येचा उलगडा कसा झाला?

हत्येचा उलगडा कसा झाला?
पोलिस उपायुक्त रश्मिता राव यांनी पत्रकार परिषद घेऊन या घटनेची माहिती दिली. त्यानुसार, जोत्स्ना आकरे ही 32 वर्षांची असून ती मूळची कळमेश्वरची रहिवासी आहे. ती नागपुरात मैत्रिणीसोबत भाड्यानं राहायची आणि एमआयडीसीतल्या टीव्हीएस शोरुममध्ये काम करायची.
जोत्स्ना 28 ऑगस्टला रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घरातून गेली. पण, सकाळ होऊनही ती परतली नाही. त्यामुळे जोत्स्नाचा भाऊ रिद्धेश्वर आकरे यांनी बेलतरोडी पोलीस ठाण्यात बहीण बेपत्ता असल्याची तक्रार दिली.
त्यानुसार बेलतरोडी पोलिसांनी मिसिंगची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी जोत्स्नाच्या मोबाईलचं लोकेशन तपासलं असता ते हैदराबादमध्ये आढळून आलं.


अनेक दिवसांनीही बहिणीचा शोध लागला नाही हे पाहून रिद्धेश्वरने पुन्हा एकदा पोलीस स्टेशन गाठले. आणि बहिणीचा घातपात झाला असावा अशी शंका व्यक्त केली.
पोलिसांनी तपासाला गती दिली. जोत्स्नाच्या मोबाईलवर कॉल केला असता तो एका ट्रक चालकाने उचलला आणि हा मोबाईल ट्रकमध्ये सापडला असल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी ट्रक चालकाला पोलीस बेलतरोडी स्टेशनमध्ये बोलवले आणि त्याने तो मोबाईल पोलिसांच्या ताब्यात दिला.
पोलिसांनी सर्व कॉल रेकॉर्ड्स तपासले आणि त्यातून पुढील गोष्टींचा उलगडा झाला.
'दृश्यम' चित्रपटात देखील पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मोबाईल ट्रकमध्ये फेकल्याचे दाखवले आहे. त्यामुळे असे वाटते की ती व्यक्ती प्रवास करत आहे. त्याच प्रमाणे आरोपीने केले असावे असा संशय आहे.
पोलिसांनी मोबाईलमधून कॉल रेकॉर्ड तपासले असता अजय वानखेडे आणि जोत्स्ना यांचे वारंवार फोन दिसले. तसेच काही पैशांचे व्यवहार देखील दिसून आले.

जोत्स्नाचं शेवटचं लोकेशन आणि आरोपीचं लोकेशन देखील सारखंच दिसलं. तसेच चौकशीदरम्यान पोलिसांनी बेसा चौकातील सीसीटीव्ही फुटेज सुद्धा मिळाले होते. त्यामध्ये एक गाडी आढळून आली. त्यामुळे पोलिसांना आणखी संशय बळावला आणि त्यांनी त्यादृष्टीनं तपास करायला सुरुवात केली.
घटना घडल्याच्या दोन दिवसानंतर आरोपी हा पुण्याच्या रुग्णालयात मधुमेहासाठी उपचार घेत होता. रुग्णालयाला फोन करून डिस्चार्ज देऊ नका असं सांगितलं होतं. पण, आरोपी तोवर फरार झाला होता.
मधल्या काळात त्यानं अटकपूर्व जामिनासाठी नागपूर सत्र न्यायालयात अर्जही केला होता. त्यामुळे आरोपी हाच आहे हे पोलिसांना समजलं. कोर्टानं त्याचा जामीन फेटाळला.
त्यानंतर गेल्या 18 ऑक्टोबरला आरोपी स्वतःच पोलिसांसमोर शरण आला आणि आपण हत्या केल्याचं त्यानं कबुल केलं. पोलिसांनी गुन्हा दाखल करून 21 ऑगस्टला पुरलेला मृतदेह बाहेर काढला.
पण, अजयनं जोत्स्नाची हत्या का केली?
अजय वानखेडे हा नागपूर महापालिकेच्या माजी अधिकाऱ्यांचा मुलगा असून तो लष्करात फॉर्मासिस्ट म्हणून गेल्या 12 वर्षांपासून काम करतो. सध्या तो नागालँड इथं काम करतोय.
याआधीच त्याची दोन लग्नं होऊन त्याचा घटस्फोट देखील झाला. तो तिसऱ्या लग्नासाठी मुलगी शोधत होता. त्यात मॅट्रीमोनी साईटवरून त्याची जोत्स्नासोबत ओळख झाली.
जोत्स्नाचा देखील घटस्फोट झाला होता. ती देखील लग्नासाठी मुलगा शोधत होती. लग्नासाठी जोत्स्नाच्या घरी बैठकही झाली होती. पण, काही कारणांमुळे त्यांचं लग्न होऊ शकलं नाही. त्यानंतरही हे दोघं एकमेकांच्या संपर्कात होते हे कॉल रेकॉर्डवरून समोर आलं आहे.
दरम्यानच्या काळात मे महिन्यात अजयचं तिसरं लग्न सुद्धा झालं होतं. घटनेच्या दिवशीही ती अजयसोबत बोलत होती. तसेच त्याला भेटण्यासाठी ती घराबाहेर पडली होती हे देखील मोबाईल लोकेशनवरून समोर आलं.
तसेच अजयचे फक्त जोत्स्नासोबत संबंध नव्हते तर आणखी काही तरुणींसोबत देखील संबंध होते. त्याला आणखी काही प्रेयसी होत्या असंही तपासात समोर आलं आहे. त्याचं हे चारित्र्यसुद्धा जोत्स्नाच्या हत्येचं कारण असण्याचा संशय पोलिसांना आहे.

जोत्स्नाचा मृत्यू नेमका कसा झाला यासंबंधी पोलीस चौकशी करत आहेत आणि तिच्या मृतदेहाचे अवशेष तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
पण, आतापर्यंत केलेल्या तपासावरून ही हत्या पूर्वनियोजित होती, असंही पोलीस उपायुक्त रश्मिता राव यांनी सांगितलं.
आरोपी अजयला मधुमेहाचा गंभीर आजार आहे. कधीही त्याच्या रक्तातील साखर वाढून तो बेशुद्ध होऊ शकतो. त्यामुळे तपासात देखील अडचणी येत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
तसेच ही हत्या करण्याआधी 'दृश्यम' चित्रपट कितीवेळा पाहिला होता आणि तो चित्रपट पाहून ही हत्या केली का? असा प्रश्नही आरोपीला विचारणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
आरोपीनं खड्डा खोदून मृतदेह पुरवून सिमेंट काँक्रिटचं प्लास्टर करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पण, इतकं त्यानं एकट्यानं केलं का की आणखी कोणी या गुन्ह्यामध्ये सहभागी होतं, याचाही तपास बेलतरोडी पोलीस करत आहेत.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











