बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील 'या' 5 आरोपींबाबत आतापर्यंत कोणती माहिती समोर आलीय?

बाबा सिद्दिकी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बाबा सिद्दिकी
    • Author, अभिनव गोयल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

महाराष्ट्रातील माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या घालून हत्या करण्यात आली.

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी तीन ते चार दशकं बाबा सिद्दिकी काँग्रेसमध्ये सक्रिय होते. राजकारणासह सिनेसृष्टीतल्या कलाकारांशीही त्यांचे जवळचे संबंध होते.

बाबा सिद्दिकी यांच्यावर आरोपींनी पाच गोळ्या झाडल्या. त्यापैकी तीन गोळ्या त्यांना लागल्या. या गोळीबारात जखमी झालेल्या बाबा सिद्दिकी यांना तातडीनं जवळील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन आरोपींचा यात सहभाग होता.

मुंबई गुन्हे शाखेचे उपायुक्त दत्ता नलावडे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.

घटनास्थळी तिघांनी गोळीबार केला होती. त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली असून एक फरार असल्याचं नलावडे म्हणाले.

फरार आरोपीचा तपास केला जात असल्याचीही माहिती पोलिसांनी दिलीय.

दरम्यान, रविवारी (13 ऑक्टोबर) रात्री पोलिसांनी या प्रकरणी पुण्यातून प्रवीण लोणकर यालाही अटक केली आहे.

लॉरेन्स बिश्नोई गँगशी संलग्न असलेला शुभम लोणकरचा भाऊ प्रवीण लोणकर याला पुण्यातून अटक करण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मते, आरोपींपैकी एक हरियाणा आणि दुसरा उत्तर प्रदेशचा आहे.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

गुरमैल सिंह

हरियाणाच्या कैथल जिल्ह्यातील नरड गावातील रहिवासी असलेल्या गुरमैल सिंहला मुंबई पोलिसांनी बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात अटक केली आहे.

बीबीसीचे सहयोगी पत्रकार कमल यांनी गुरमैलच्या आजीशी याबाबत चर्चा केली. गुरमैल आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असल्याचं आजीनं सांगितलं.

आजीच्या मते, वडिलांच्या मृत्यूनंतर गुरमैलच्या आईनं दुसरं लग्न केलं होतं. त्यांना आणखी एक मुलगा आणि मुलगीही आहे.

"तो माझा नातू होता, पण आता माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही," असं गुरमैलच्या आजीचं म्हणणं आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना गुरमैलच्या आजीनं म्हटलं की, "तो जर एवढे मोठे कृत्य करत असेल, तर आमचा त्याच्याशी काय संबंध? तो शत्रू आहे? सगळ्यांचा जीव महत्त्वाचा आहे."

कैथल जिल्ह्याचे पोलीस उपअधीक्षक कार्यालयानं बीबीसीला सांगितलं की, आरोपी गुरमैल आधीही तुरुंगात गेला होता. त्याच्यावर आधीचे तीन गुन्हे आहेत.

आरोपी गुरमैलचे कैथलमधील घर.

फोटो स्रोत, BBC/Kamalnath

फोटो कॅप्शन, आरोपी गुरमैलचे कैथलमधील घर.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

31 मे 2019 ला कैथल जिल्ह्याच्या नरड गावातील रहिवासी राम कुमार यांनी पोलिसांत एक एफआयआर दाखल केली होती.

त्यानुसार राम कुमार यांचा मोठा मुलगा, सुनीलवर बाईकवरून आलेल्या पाच जणांनी धारदार शस्त्रं आणि लाठ्या काठ्यांनी हल्ला केला होता. त्यात सुनीलचा मृत्यू झाला होता.

कैथल जिल्ह्याच्या उपअधीक्षक मुख्यालयाच्या माहितीनुसार, गुरमैल या हत्याकांडातही आरोपी होता. त्यानंतर तो तुरुंगात गेला होता.

“सुनील हत्याकांडात गुरमैलला 7 जुलै 2023 ला जामीन मिळाला होता. तेव्हा त्याच्या आजोबांनी त्याच्या जामीनासाठी प्रयत्न केले होते,” असं पोलिसांनी सांगितलं.

पीडित राम कुमार यांनी बीबीसीबरोबर बोलताना म्हटलं की, "जामिनावर सुटल्यानंतर गुरमैलनं आम्हाला खूप त्रास दिला. महिनाभरापूर्वीपर्यंत तो गावातच होता."

पोलिसांच्या माहितीनुसार, कैथल तुरुंगात गुरमैलकडे फोनही सापडला होता. त्यानंतर त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.

तसंच, नुकताच गुरमैलविरोधात तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस उपअधीक्षक कार्यालयाच्या माहितीनुसार, 12 ऑगस्ट 2024 ला सेगा गावातील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीला मारहाण करण्यात आली होती. त्यात गुरमैलचं नाव समोर आलं होतं.

धर्मराज कश्यप

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील अटक झालेला दुसरा आरोपी धर्मराज कश्यप आहे. धर्मराजचं कुटुंब उत्तर प्रदेशच्या बहराइच जिल्ह्याच्या कैसरगंजमध्ये राहतं.

कैसरगंजचे सीओ अनिल कुमार यांनी बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं की, “धर्मराज कश्यप कैसरगंजमधील गंडारा वस्तीचा रहिवासी आहे. त्याचे वडील मासे विकायचं काम करतात.”

“धर्मराज, मुंबईत राहत होता. त्याठिकाणी तो भंगाराचं काम करायचं. त्याचं वय 20 वर्षांपेक्षा कमी असल्याचं सांगितलं जात आहे. कुटुंबीय त्याच्याशी संपर्कात नव्हते,” असंही ते म्हणाले.

अनिल यांच्या मते, “धर्मराजवर जिल्ह्यात कोणतंही गुन्हेगारी प्रकरण दाखल नाही. पहिल्यांदाच अशा एखाद्या प्रकरणात त्याचं नाव समोर आलं आहे.”

धर्मराजच्या आईनं एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलं की, "तो दोन महिन्यांपूर्वीच घरून गेला होता. भंगारचं काम करायला जात असल्याचं त्यानं सांगितलं होतं. तो तिथं काय करत होता, हे मला माहिती नाही."

"धर्मराजनं घरी सांगितलं होतं की, तो पुण्याला जात आहे. सकाळी जेव्हा पोलीस घरी आले, तेव्हा आम्हाला याबाबत माहिती मिळाली. घरून गेल्यानंतर त्याच्याशी एकदाच बोलणं झालं होतं. तो पैसे पाठवत नाही किंवा आमच्याशी बोलतही नाही," असं त्यांनी सांगितलं.

बाबा सिद्दिकी आणि त्यांचा मुलगा झिशान सिद्दिकी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बाबा सिद्दिकी आणि त्यांचा मुलगा झिशान सिद्दिकी

आरोपी धर्मराज कश्यपनं तो अल्पवयीन असल्याचा दावा केला होता. आरोपीचे वकील सिद्धार्थ अग्रवाल यांना एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलं की, “पोलिसांनी आज आरोपींना कोर्टात हजर केलं. आम्ही आक्षेप नोंदवला असून शक्य ते पुरावे आम्ही कोर्टाला दिले आहेत.”

“कोर्टानं एका आरोपीला 21 ऑक्टोबरपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर इतर आरोपींना ऑसिफिकेशन टेस्ट (बोन फ्युजनच्या आधारे वय तपासणे) नंतर सादर करण्यास सांगितलं आहे. पोलिसांनी 14 दिवसांची कोठडी मागितली होती. पण कोर्टानं 7 दिवसांचीच कोठडी सुनावली आहे,” असं ते म्हणाले.

एएनआय या वृत्त संस्थेच्या माहितीनुसार, आरोपी धर्मराजची बोन ऑसिफिकेशन चाचणी झाली असून त्यात तो अल्पवयीन नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

तपासणीनतंर धर्मराजला न्यायालयात हजर करण्यात आलं. तिथून कोर्टानं त्याचीही पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.

बोन ऑसिफिकेशन टेस्टमध्ये शरीरातील काही हाडांचा एक्स रे केला जातो. त्यावरून व्यक्तीचे वय काय हे समजते.

शिवकुमार

सिद्दिकी हत्याकांडांतील तिसऱ्या आरोपीचं नाव शिवकुमार गौतम उर्फ शिवा आहे. सध्या तो फरार असल्याचं मुंबई पोलिसांचं म्हणणं आहे.

कैसरगंजचे सर्कल ऑफिसर अनिल कुमार यांच्या मते, शिवकुमार गौतम हादेखील गंडारा वस्तीचा रहिवासी आहे.

त्यांच्या मते, “शिवकुमार गौतम आणि धर्मराज दोघं शेजारी असून दोघं मुंबईत राहत होते. शिवकुमारचे वडील गवंडी काम करत होते. शिवकुमार याच्या विरोधातही कोणताही गुन्हा दाखल नाही.”

एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना आरोपी शिवाच्या आई म्हणाल्या की, "तो पुण्याला गेला होता आणि तिथं भंगारचं काम करायचा. मला हीच माहिती होती. मुंबईबाबत मला काहीही माहिती नव्हती."

त्यांनी सांगितलं की, "तो होळीला घरी आला होता. परत गेल्यानंतर तो आलाच नाही. फोनवरूनही कधी बोलला नाही. त्याचं वय 18-19 वर्षे असेल.”

प्रवीण लोणकर

मुंबई गुन्हे शाखेनं पुण्यातून प्रवीण लोणकरला पुण्यातून अटक केली आहे.

एएनआय वृत्तसंस्थेनं मुंबई पोलिसांच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण लोणकर हा शुभम लोणकरचा भाऊ आहे. शुभमनं सोशल मीडियावर पोस्ट करून लॉरेन्स बिश्नोई गँगतर्फे हत्येची जबाबदारी स्वीकारली होती.

शुभम लोणकर सध्या फरार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. अकोल्याचे पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी बीबीसी मराठीसोबत बोलताना शुभम बाबत माहिती दिली.

त्यांच्या मते, सिद्दिकी यांची हत्या झाल्यानंतर अकोला पोलिसांनी जानेवारी महिन्यात कारवाई केलेल्या प्रकरणातील आरोपींची पुन्हा झाडाझडती घेतली. त्यावेळी शस्त्र तस्करीच्या आरोपात अकोट पोलिसांनी 10 आरोपींना अटक केली होती. त्यात प्रकरणात शुभम लोणकर आणि त्याचा भाऊ प्रविण लोणकर या दोघांना पुण्यातल्या वारजे परिसरातून अटक केली होती.

बाबा सिद्दिकी आणि पोलिसांच्या ताब्यातील आरोपी

फोटो स्रोत, Getty Images/ANI

फोटो कॅप्शन, बाबा सिद्दिकी आणि पोलिसांच्या ताब्यातील आरोपी

त्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली. पण, तेव्हा चौकशीत शुभम लोणकरच्या मोबाईलमध्ये लॉरेन्स बिश्नोईसोबतचे दोन व्हिडिओ कॉल आणि काही ऑडिओ कॉल सापडले होते. सिद्दिकी यांची हत्या झाल्यानंतर फक्त तपासासाठी या 10 आरोपींना पोलिस ठाण्यात बोलावण्यात आलं. तेव्हा शुभम आणि प्रविण गायब असल्याचं समजलं. त्यानंतर प्रवीणला पुण्यातून अटक झाली तर शुभम फरार आहे.

शुभम लोणकर हा मूळचा अकोटमधील नेव्हरी बुद्रुक गावचा रहिवासी आहे. त्याचं शिक्षणही अकोटमध्येच झालं असून तो 32 वर्षाचा आहे. तो आणि त्याचा भाऊ प्रवीण लोणकर पुण्यात दूध डेअरीमध्ये काम करत असल्याचं आमच्या चौकशीत समोर आलं होतं,असंही सिंह यांनी सांगितलं.

दरम्यान अकोला पोलिसांनी शुभम लोणकरचे लाँरेन्स बिश्नोईसोबत व्हिडिओ आणि ऑडिओ कॉल फॉरेंसिक तपासणीसाठी पाठवले असून त्याचा अहवाल अद्यापही यायचा आहे.

मोहम्‍मद यासीन अख्तर

सिद्दिकी हत्याकांडात पंजाबच्या जालंधरचा रहिवासी असलेल्या मोहम्मद यासीनचं नावही समोर आलं आहे. मुंबई पोलिस त्याचा तपास करत आहेत.

पंजाब पोलिसांतील नकोदरचे पोलीस उपअधीक्षक सुखपाल सिंह यांनी याबाबत एक पत्रकार परिषद घेतली. मुंबई पोलिसांनी यासीनबाबत पंजाब पोलिसांनी मदत मागितल्याचं त्यांनी सांगितलं.

सुखपाल सिंह यांच्या मते, “मोहम्मद यासीनवर साल 2022 मध्ये एफआयआर दाखल झाला होता. त्याच प्रकरणात यासीनला 6 जुलै 2022 ला जलंधर पोलिसांनी अटक केली होती. तेव्हापासून 7 जून 2024 पर्यंत तो तुरुंगात होता.”

मोहम्मद यासीन अख्तर

फोटो स्रोत, sourced by Pradeep Sharma

फोटो कॅप्शन, मोहम्मद यासीन अख्तर

त्यांच्या मते, “तुरुंगातून बाहेर आल्यानंतर यासीन गावात परतलेला नाही. तेव्हापासून तो फरार आहे. आम्ही गंभीर गुन्ह्यांतील आरोपींवर नजर ठेवतो. पण यासीन सध्या फरार आहे.”

“यासीनवर गंभीर स्वरुपाचे 9 गुन्हे दाखल आहेत. त्यात हत्या, हत्येचा प्रयत्न, दरोडा अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. पंजाबबरोबरच हरियाणाच्या कैथलमध्येही त्याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत,” असंही ते म्हणाले.

पोलिसांच्या मते, यासीनचे वडील जमीन अख्तर हे सिद्दिकी प्रकरणात मुलाचं नाव आल्यापासून बेपत्ता आहेत. तर त्याच्या आई आणि बहिणीचा आधीच मृत्यू झाला आहे.

मुंबई पोलिसांची पत्रकार परिषद

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाबाबत मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे म्हणाले की, "माजी मंत्री बाबा सिद्दिकी त्यांच्या मुलाच्या कार्यालयाबाहेर आले, तेव्हा निर्मल नगर पोलीस ठाण्याचा हद्दीत त्यांची हत्या झाली आहे.

"या घटनेच्या नंतर लगेचच सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र दाभाडे आणि त्यांच्या सोबतच्या कर्मचाऱ्यांनी धाडस दाखवत घटनास्थळावरच दोन आरोपीना पकडलं आहे."

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींकडून दोन पिस्तूल आणि 21 राउंड गोळ्या जप्त केल्या आहेत.

या घटनेत लॉरेन्स बिश्नोई गँगच्या संभाव्य भूमिकेबाबत आम्ही चौकशी करत आहोत, असंही पोलीस म्हणाले.

मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे

घटनेनंतर एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे. बाबा सिद्दीकी यांना नॉन-कॅटेगराईज्ड सुरक्षा देण्यात आली होती. त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आलेली नव्हती, तीन अधिकारी त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते.

नलावडे म्हणाले की, लॉरेन्स बिश्नोई आणि सलमान खान यासोबतच इतरही बाजूने आम्ही चौकशी करत आहोत. सोशल मीडियावर प्रसारित होत असलेली पोस्ट खरी आहे की खोटी हेदेखील आम्ही तपासत आहोत, असं पोलिसांनी सांगितलं.

या प्रकरणातील आरोपी मुंबईत कधी आले होते, कुठे राहत होते, हत्येसाठी त्यांना मदत कुठून करण्यात आली याबाबतही मुंबई पोलीस तपास करत असल्याचं सांगण्यात आलं.

कोण होते बाबा सिद्दिकी?

बाबा सिद्दिकी ऐंशीच्या दशकापासून राजकारणात सक्रिय होते. विद्यार्थीदशेतच त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

मुंबईत पदवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर ते दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर 1999, 2004 आणि 2009 मध्ये ते सलग तीन वेळा काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झाले. त्यांनी अन्न व नागरी पुरवठा, कामगार राज्यमंत्री पदाची जबाबदारीही सांभाळली होती.

सलमान आणि शाहरूखसह बाबा सिद्दिकी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सलमान आणि शाहरूखसह बाबा सिद्दिकी

यावर्षी फेब्रुवारीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होईपर्यंत गेल्या चार दशकांपासून ते काँग्रेसमध्ये सक्रिय होते.

बाबा सिद्दिकींचे 'बॉलिवूड कनेक्शन' नेहमीच चर्चेत होते. सलमान खान, शाहरुख खान, संजय दत्त यांसारख्या हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्यांशी त्यांचे जवळचे संबंध होते.त्याच्या इफ्तार पार्ट्यांनी नेहमी चर्चा असायची.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)