लॉरेन्स बिश्नोई: सलमानच्या हत्येच्या कटाशी जोडला गेला संबंध, खरंच दहशत की फक्त हवाच?

लॉरेन्स बिश्नोई

फोटो स्रोत, ANI

    • Author, संजीव चौहान,
    • Role, वरिष्ठ पत्रकार, बीबीसी हिंदीसाठी

मुंबईत माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्ये प्रकरणी पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोई गँगच्या भूमिकेची चौकशी करणार असल्याचं म्हटलं आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बातमी पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.

त्याबरोबरच भारत आणि कॅनडा या दोन देशांमधील संबंधही ताणले गेले आहेत. कॅनडाच्या पंतप्रधानांनी 14 ऑक्टोबर 2024 रोजी एका निवेदनात हरदीप निज्जर याच्या हत्येमागे भारतीय अधिकारी असल्याचं वक्तव्य केलं. त्यावर भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कॅनडा पोलिसांनी भारताचे गुप्तहेर आणि लॉरेन्स बिश्नोई एकत्रित काम करतात असा आरोप केला आहे.

------------

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर यावर्षी एप्रिल महिन्यात गोळीबार झाला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी 1735 पानांचं आरोपपत्र दाखल केलं आहे.

आरोपपत्रात अनेक ठिकाणी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाचा उल्लेख आहे. सलमान खानशी निगडीत असल्याने या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोईच्या नावाची चर्चा होतेय असंही नाही. कारण त्याची आधीपासूनच गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे.

गुन्हेगारी विश्वाशी संबंधित पोलीस अधिकारी आणि याबाबत बातम्या करणाऱ्या काही पत्रकारांच्या मते, बिश्नोई हा सलमान खानसारख्या हायप्रोफाईल लोकांना धमक्या देऊन स्वत:च्या नावाची दहशत वाढवण्याची शक्कल लढवतो.

अनेक दिवसांपासून गुजरातच्या तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईबाबत काही बातमी आलेली नव्हती, पण तेवढ्यात सलमान खानच्या घराबाहेर गोळीबाराची घटना घडली.

बिश्नोई म्हणतो-माध्यमांमुळेच नाव..

लॉरेन्स बिश्नोई याला काही वर्षांपूर्वी चंदीगढ जिल्हा न्यायलयात हजर करण्यासाठी नेलं जात असताना पोलीस आणि बघ्यांच्या गर्दीत माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देताना तो म्हणाला होता की, "मी एका पाठोपाठ एक खटल्यांमध्ये अडकत चाललोय. त्यामुळं बदनामी होत आहे. मात्र, माझं नाव मोठं करण्यात माध्यमांचा मोठा वाटा आहे."

लॉरेन्स बिश्नोई

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लॉरेन्स बिश्नोई

माध्यमांच्या भूमिकेबाबत दिल्ली पोलीस दलाच्या विशेष पथकाचे माजी डीसीपी एल. एन. राव यांनीही नाराजी व्यक्त केली. "लॉरेन्स बिश्नोई असो की, अन्य कुणी मोठा गुन्हेगार, माध्यमांनी त्यांच्याबाबत छापणं बंद केल तर पोलीस आणि तुरुंग प्रशासनाचा भार बराच कमी होईल," असं ते म्हणाले.

लॉरेन्स बिश्नोईच्या नावाची केवळ हवा झालेली आहे, की खरोखरच त्याची तेवढी दहशत आहे, याबाबत आम्ही तिहार तुरुंगाच्या महासंचालक पदावरून निवृत्त संजय बेनिवाल यांना विचारणा केली.

"बिश्नोईच्या नावाची फक्त हवा आहे, असं गृहित धरणं उचित ठरणार नाही. तुरुंगात राहूनही तो बाहेर आपल्या विश्वसनिय गुंड आणि शार्पशूटर्सच्या माध्यमातून त्याच्या मर्जीप्रमाणे गुन्हे घडवून आणतोय. पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाची हत्या असो किंवा अन्य काही घटना, त्यामुळं त्याची दहशत आहेच असं म्हणता येईल."

लॉरेन्स बिश्नोई

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लॉरेन्स बिश्नोई
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

बेनिवाल यांच्या मते, "लॉरेन्स बिश्नोईचं तुरुंगाबाहेर प्रभावी नेटवर्कींग आहे. ते मोडीत काढणं खूप गरजेचं आहे. त्याशिवाय पोलिसांचा लॉरेन्स बिश्नोईसारख्या गुन्हेगारांवर वचक बसणार नाही".

बिश्नोईला धास्ती वाटेल असं देशात एकही तुरुंग नाही का? यावर बेनिवाल म्हणाले की, "जो व्यक्ती तुरुंगातच स्व:तला अधिक सुरक्षित समजतो आणि तुरुंगाबाहेर जाऊ इच्छितच नाही, त्याला देशातील कोणत्याही तुरुंगाबद्दल भय का वाटेल? शत्रूंना त्याच्यापर्यंत पोहोचता येऊ नये म्हणून कायम उच्च सुरक्षा असलेल्या तुरुंगात राहावं, अशी त्याचीच इच्छा आहे."

दिल्ली पोलीस दलाच्या विशेष पथकाचे माजी डीसीपी एल. एन. राव दिल्ली उच्च न्यायालयात गुन्हेगारी प्रकरणांत वकिली करतात. ते म्हणाले की, "लॉरेन्स बिश्नोईसारखे गुन्हेगार तुरुंगातून बाहेर पडणं टाळतात. कारण त्यांना बाहेर असुरक्षित वाटतं. अशा गुन्हेगारी प्रकरणात त्यांची बाजू मांडणारे वकिलदेखली बऱ्याचदा न्यायालयीन सुनावणीवेळी गैरहजर राहतात. बिश्नोईसारख्या लोकांना जामीन मिळवायचा असतो, तेव्हाच ते न्यायालयात हजर राहतात.

दिल्लीतील काही प्रकरणांवरून असं दिसून येतं की, लॉरेन्स बिश्नोईचे वकील मुद्दामहून न्यायालयात हजर होत नाहीत, आणि त्यामुळं नाईलाजानं न्यायालयाला पुढची तारीख द्यावी लागते.

बचावासाठी वकीलही नाही

बिश्नोई प्रकरणात वकिलांच्या न्यायालयातील अनुपस्थितीबाबत बिश्नोई गँगच्या शूटर्सची बाजू मांडणारे वरिष्ठ क्रिमिनल लॉयर अशोक बेनीवाल यांना विचारणा केली.

त्यांच्या मते, "लॉरेन्स बिश्नोईला त्याच्यावर दाखल केलेल्या प्रत्येक गुन्ह्यासाठी वकील उभा करण्यात रस नाही. कारण यातील अनेक गुन्हे पोलिसांनी स्वत:ची पाठ थोपटून घेण्यासाठी त्याच्यावर लादले आहेत."

पोलिसांनी बहुतांश प्रकरणांत लॉरेन्स बिश्नोईचं गोवलं असल्याचं, अ‍ॅडव्होकेट बेनिवाल म्हणाले. त्यामागे पोलिसांचा शाबासकी मिळवण्याचाच हेतू शकतो. अशा प्रकरणांत न्यायालयात खटला चालवला जातो, तेव्हा मात्र पोलीस तथकथित प्रकरणांशी बिश्नोईचा संबंध सिद्ध करू शकत नाहीत.

दरम्यान, एल. एन. राव असंही म्हणाले की, "लॉरेन्स बिश्नोईसारख्या गुन्हेगारांना तुरुंगात पोहोचल्यावर तिथं आधीपासून असलेल्या कुख्यात गुन्हेगारांकडूनच गुन्हेगारी विश्वाचं बाळकडू मिळतं. नंतर तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांना पोलीस प्रशासन आणि भ्रष्ट व्यवस्थेकडून अभय दिलं जातं."

उत्तर प्रदेशचे माजी पोलीस महासंचालक विक्रम सिंह म्हणाले की, "लॉरेन्स बिश्नोईसारखे गुन्हेगार सुरुवातील स्वखुशीनेच गुन्हेगारी विश्वात प्रवेश करतात. पण नंतर अशा गुन्हेगारांना काही पोलीस आणि राजकीय लोक स्वत:च्या फायद्यासाठी वापरतात.

बीबीसी मराठीच्या बातम्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा.
फोटो कॅप्शन, बीबीसी मराठीच्या बातम्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा.

दिल्लीचे माजी पोलीस आयुक्त आणि उत्तर प्रदेश पोलीस दलाच्या स्पेशल टास्क फोर्सचे माजी प्रमुख अजय राज शर्माही तेच मत व्यक्त करतात.

त्यांच्या म्हणण्यानुसार "ज्या दिवशी देशातील पोलीस, राजकारणी आणि कायदा हे न घाबरता प्रामाणिकपणे लॉरेन्स बिश्नोईसारख्या गुंडांवर वचक ठेवण्याचा निश्चय करतील, तेव्हाच बिश्नोईसारख्यांचा खऱ्या अर्थाने बीमोड होईल.

बिश्नोईसारखे माथेफिरू तरुण तुरुंगातून बाहेर पडतात, तेव्हा त्या परिसरातील पोलिसांची त्याच्यावर करडी नजर असायला हवी.

सदर व्यक्ती जेलमधून सुटल्यावर कुठे जातो, काय करतो, कुणासोबत वावरतो, त्याच्या वाढत्या संशयी हालचालींवर लक्ष असलं पाहिजे. दुर्दैवाने पोलीस ते करत नाहीत.

त्याचाच परिणाम म्हणून लहानसहान अपराध करणारे तरुण बघता बघात लॉरेन्स बिश्नो्ईसारखे कुख्यात गुन्हेगार बनून पोलीस प्रशासनाची डोकेदुखी वाढवून ठेवतात."

तुरुंगात राहूनही गुन्हेगार बाहेर गुन्हेगारी घटना घडवून आणतात, याबाबात विचारलं असता दिल्लीचे माजी पोलीस आयुक्त नीरज कुमार म्हणाले की, कोणत्याही गुन्हेगाराला तुरुंगात ठेवण्यामागचा उद्देश, त्यांना समाजापासून दूर ठेवून गुन्हे करण्यापासून प्रतिबंधित करणं हा असतो. मात्र, अनेक प्रकरणात तुरुंग अधिकाऱ्यांच्या टेलिफोनवरूनच गुन्हेगार बाहेरच्या जगाशी संपर्क साधत असल्याचे समोर आले आहे.

तुरुंग अधिकाऱ्यांच्या कक्षातूनच गुन्हेगार बाहेर कॉल करत असेल, तर लॉरेन्स बिश्नोईसारख्यांवर नियंत्रण कसं ठेवलं जाईल. तुरुंगाच्या बाहेरील साथीदारांपेक्षा गुन्हेगाराचे तुरुंगातील कर्मचारी आणि अधिकाऱ्याशी असलेले संबंधच अधिक घातक ठरत असतात."

उत्तर प्रदेशचे माजी पोलीस महासंचालक प्रकाश सिंह यांच्या मते, "तुरुंगात जेरबंद असलेल्या लॉरेन्स बिश्नोईसारख्या गुंडांना बाहेरच्या गुन्हेगारी विश्वात नेटवर्क उभारणं आणि गंभीर अपराध घडवून आणणं जेवढं सोपं असतं तेवढं बाहेर राहून त्यांना शक्य होत नाही. मी 30 वर्षे पोलीस खात्यात सेवा दिलीय. त्या अनुभवावरून सांगतो सध्याच्या काळात गुन्हेगारांसाठी तुरुंगांइतके सुरक्षित ठिकाण दुसरे कुठलेच नाही. कारण तुरुंगात त्यांना पकडले जाण्याचं अथवा एन्काऊंटरमध्ये मारलं जाण्याचं अजिबात भय नसतं."

लॉरेन्स नावामागची कहाणी

लॉरेन्स बिश्नोईबाबत मध्यमांमध्ये उपलब्ध माहितीनुसार काही ठिकाणी त्याची जन्मतारीख 22 फेब्रुवारी 1992 तर काही ठिकाणी 12 फेब्रुवारी 1993 अशी आढळते. त्यावरुन त्याचं वय 31-32 वर्षे असल्याचं कळतं.

पंजाबच्या फजिल्लका विभागातील धत्तरांवाली गावात जन्मलेल्या बिश्नोई परिवारातील मुलाचे नाव लॉरेन्स कसे हाही एक रहस्याचाच विषय आहे.

पोलिसांच्या रेकॉर्डनुसार, लॉरेन्स बिश्नोईचे खरे नाव सतविंदर सिंह असे आहे. दरम्यान, लहानपणी दिसायला गोरा आणि गोंडस असल्याने कुटुंबीय त्याला लाडाने लॉरेन्स म्हणत. त्याच नावाने पुढे तो ओळखला जाऊ लागला.

लॉरेन्स बिश्नोईचे वडिल लाविंदर सिंह हरियाणा पोलीस दलात शिपाई होते. त्यांनी 1992 साली नोकरीस सुरूवात केली. मात्र, पाच वर्षांच्या सेवेनंतर स्वेच्छानिवृत्ती घेऊन त्यांनी शेती करायला सुरुवात केली.

लॉरेन्सने पंजाबच्या अबोहर येथून 12 वी उत्तीर्ण केल्यावर उच्च शिक्षणासाठी 2010-12 साली चंदीगढच्या डीएाव्ही कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. हळूहळू विद्यार्थी राजकारणात गोडी वाढत गेल्यावर त्यातूनच गोल्डी बराड याच्याशी त्याची मैत्री झाली. हा तोच बराड आहे, जो विदेशात राहून बिश्नोई गॅंगसाठी काम करतो विदेशातूनच सर्व सूत्र हलवतो.

लॉरेन्सने 2011-12 साली पंजाब विद्यापिठात एक विद्यार्थी संघटना स्थापन केली व स्वत: त्या संघटनेचा अध्यक्ष बनला.

गुन्हेगारी विश्वात पाऊल

ज्यावर्षी लॉरेन्सने विद्यार्थी संघटना स्थापन केली, त्याच वर्षी त्याच्यावर पहिला गुन्हा दाखल झाला. 2011-12 मध्ये विद्यार्थीदशेच्या अंतिम टप्प्यात त्याच्यावर दाखल झालेला पहिलाच गुन्हा खूनाचा प्रयत्न केल्याचा होता.

विद्यार्थी निवडणुकीत पराभव झाल्याच्या रागातू लॉरेन्सच्या सहकाऱ्याने प्रतिस्पर्धी विद्यार्थी नेत्यावर गोळ्या झाडल्या होत्या. त्या घटनेने लॉरेन्स बिश्नोईचे नाव पहिल्यांलादा पोलिसांच्या रोकॉर्डवर आले.

बिश्नोईला 2014साली पहिल्यांदा राजस्थान येथे अटक करून भरतपूर तुरुंगात ठेवण्यात आलं. त्याच्यावरील खटल्याच्या सुनावणीसाठी त्याला पंजाबच्या मोहाली येथे आणलं जात असताना तो पोलिसांच्या तावडीतून निसटला आणि फरार झाला.

2016 साली त्याला पुन्हा अटक करण्यात आली. 2021 साली संघटीत गुन्हेगारी आणि अंडरवर्ल्डशी संबंधित गुन्हे रोखण्यासाठीच्या मकोका कायद्यांतर्गत एका प्रकरणात सुरक्षेच्या कारणास्तव त्याला तिहार तुरुंगात हलविण्यात आले. तिहारला आणण्यापूर्वी तो पंजाबच्या बठिंडा तुरुंगात कैद होता.

पोलिसांच्या गराड्यात लॉरेन्स बिश्नोई.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पोलिसांच्या गराड्यात लॉरेन्स बिश्नोई.

दरम्यान, 2022 साली सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणात त्याला पंजाब पोलिसांकडून तुरुंगातूनच ताब्यात घेण्यात आले. 20222 सालीच गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने त्याला अंमली पदार्थ तस्करी प्रकरणात दोषी ठरवलं.

हे प्रकरण कच्छमधून पाकिस्तानी जहाजाद्वारे ड्रग्सची मोठी तस्करी करण्याशी संबंधीत होते. पोलिसांना या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोईचा हात असल्याचा संशय होता.

याप्रकरणी गुजरात पोलिसांकडून त्याला दिल्लीच्या तुरुंगातून काढून 23 ऑगस्ट 2023रोजी गुजरातच्या साबरमती तुरुंगात नेण्यात आलं. तेव्हापासून तो साबरमती तुरुंगातच आहेत.

विशेष म्हणजे याच दरम्यान 30 ऑगस्ट 2023 रोजी त्याच्याविरुद्ध केंद्रिय गृहमंत्रालयाने सीआरपीसीचे कलम 268 (1) नोंदवले. जेणेकरून त्याला पुढील एक वर्ष साबरमती तुरुंगातून बाहेर नेता येणार नाही. त्यामुळे त्याच्यावर इतर राज्यात सुरू असलेल्या खटल्यांच्या सुनावणीसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर केलं जातं.

सामान्यत गुन्हेगार अपराध केल्यानंतर पोलिसांपासून लपण्याचे प्रयत्न करतात. मात्र लॉरेन्स बिश्नोई आणि त्याची गँग कोणत्याही मोठ्या गुन्हेगारी कृत्याची जबाबदारी स्वत: घेतात.

देशातील विविध राज्यातील बहुचर्चीत गुन्हेगारी घटनांपैकी सिद्धू मूसेवाला आणि गतवर्षीच्या जयपूर येथील करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्येप्रकरणी त्याचे नाव चर्चेत होते.

आश्रयामुळे वाढते धाडस

विद्यार्थी राजकारणाद्वारे भविष्यात देशाच्या राजकारणात प्रवेश करण्याचे स्वप्न बघणारा विद्यार्थी आज कुख्यात गुन्हेगार कसा बनला?

बीबीसीनं माजी आयएएस अधिकारी आणि पंजाबचे शिक्षण विभागाचे सेवानिवृत्त सचिव राम लद्दर यांना याबाबत विचारलं.

ते म्हणाले की, " लॉरेन्स बिश्नोई तुरुंगातील अधिकारी आणि काही नेत्यांच्या संगनमताचे अपत्य आहे. अर्थात सर्वच तुरुंग अधिकारी, नेते किंवा प्रशासक यांच्यावर माझे आरोप नाही. मात्र, निश्चितच काही लोकांच्या आश्रयाशिवाय बिश्नोईसारखा सामान्य गुंड गुन्हेगारी विश्वात एवढा मोठा बनू शकत नाही."

लॉरेन्स बिश्नोई एकटा गुन्हेगार बनत नसतो.. ती एक मोठी लाट असते..

फोटो स्रोत, Getty Images

लॉरेन्स बिश्नोई भलेही कायदा आणि पोलिसांच्या दृष्टीने गुन्हेगार आहे. मात्र, बिश्नोई समाजावर त्याचा मोठा प्रभाव आहे. या गोष्टीला राजस्थानचे वरिष्ठ विधिज्ञ अशोक बेनिवालही दुजोरा देतात.

त्यांच्या मते, बिश्नोई समाजात लॉरेन्स बिश्नोईचं मोठं प्रस्थ आहे. देशात काय जगात कुठेही राहत असलेल्या बिश्नोई समाजात दोन पक्षात होणारे वाद लॉरेन्सच्या एका शब्दाने संपुष्टात येतात.