कॅनडाला स्टुडंट व्हिसावर गेलेला गोल्डी ब्रार गँगस्टर कसा बनला?

सिद्धू मुसेवाला, गोल्डी ब्रार पंजाब
फोटो कॅप्शन, गोल्डी ब्रार

कॅनडामध्ये राहणारा गँगस्टर सतिंदरजित सिंग उर्फ गोल्डी ब्रार याला भारक सरकारनं दहशतवाद विरोधी कायदा UAPA अंतर्गत 'दहशतवादी' घोषित केलं आहे. ब्रार हा पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचं म्हटलं जातं.

केंद्रीय गृह मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेत ब्रारला पाकिस्तानच्या संस्थांकडून पाठिंबा मिळतो, असं म्हटलं गेलं आहे. तसंच अनेक हत्यांमध्ये त्याचा समावेश असून तो कट्टर विचारसरणी मानणारा आहे, असंही म्हटलं आहे.

राष्ट्रवादाला पाठिंबा देणाऱ्या नेत्यांना फोनवरून धमकी देणं, खंडणी मागणं आणि वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हत्येची धमकी देणाऱ्या पोस्ट करण्या प्रकरणी त्याचं नाव समोर आलं होतं.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

ब्रार हा बब्बर खालसा इंटरनॅशनल या बंदी असलेल्या संघटनेचा सदस्य आहे. अत्याधुनिक शस्त्र, स्फोटकं आणि स्फोटक साहित्याची सीमेपलिकडं तस्करी करण्याच्या प्रकरणातही तो आरोपी आहे.

गोल्डी ब्रार मूळ पंजाबच्या श्री मुक्तसर साहीबचा असून कॅनडाच्या ब्रॅम्पटनमध्ये राहतो.

गृह मंत्रालयाच्या मते, गोल्डी ब्रार आणि त्याचे सहकारी पंजाबमध्ये शांतता आणि धार्मिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याठिकाणी टार्गेट किलिंग, टेरर मॉड्यूल तयार करणे आणि इतर राष्ट्रविरोधी कारवायांमध्येही तो सहभागी आहे. गोल्डी ब्रारच्या विरोधात इंटरपोलनं रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. त्याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंटही जारी करण्यात आलं आहे.

ब्रारला लॉरेन्स बिश्नोईच्या गँगचा महत्त्वाचा सदस्यही मानलं जातं. त्यानं 29 मे 2022 ला प्रसिद्ध सिद्धू मुसेवालाच्या हत्येची जबाबदारीही स्वीकारली होती.

गोल्डी ब्रार कोण आहे?

गोल्डी ब्रार याचं मूळ नाव सतिंदरजीत सिंग असून तो लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित आहे. जो पंजाब, हरियाणा, राजस्थान, दिल्ली आणि एनसीआरमध्ये सक्रिय आहे.

दहा वर्षांपूर्वीच ब्रार याचे गुन्हेगारी जगताशी असलेले लागेबांधे उघड झाले होते.

मात्र, मुसेवाला हत्याकांडानंतर पंजाबमध्येच नव्हे तर देशभरात त्याची चर्चा होऊ लागली.

बीबीसीने गोल्डी ब्रारबद्दलचं हे वृत्त 2022 मध्ये पहिल्यांदा प्रसिद्ध केलं होतं. ते पुन्हा शेयर करत आहोत.

पंजाब पोलिसांमधील अनेक वरिष्ठ अधिकारी आणि काही गोपनीय कागदपत्रांच्या आधारे हे वृत्त प्रसिद्ध केलं होतं. त्यावेळी गोल्डी ब्रारच्या कुटुंबीयांकडून किंवा त्यांच्या वकिलांकडून कोणतीही औपचारिक प्रतिक्रिया आलेली नव्हती.

गोल्डीने गुरलाल सिंह भलवान यांच्या हत्येचा कट रचला होता?

गोल्डीने लॉरेन्स बिश्नोईच्या साथीने फरीदकोट युथ काँग्रेसचे अध्यक्ष गुरलाल सिंह भलवान यांना मारण्याचा कथित कट रचला होता. 18 फेब्रुवारी 2021 रोजी ही हत्या झाली होती.

गोल्डी ब्रारने कथित पातळीवर नातेवाईक गुरविंदरपाल सिंहला गुरलाल सिंह भलवान याला मारण्यासाठी सांगितलं होतं.

गोल्डी ब्रारने भलवानला मारण्यासाठी शूटर्सची व्यवस्था केली. याप्रकरणातील आरोपींनी आपल्या जबानीदरम्यान गोल्डी याप्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचं सांगितलं.

या हत्येसाठी शूटर्ससाठी वाहन, हत्यारं, राहण्याचीही व्यवस्था केली.

सिद्धू मुसेवाला, गोल्डी ब्रार, पंजाब

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सिद्धू मुसेवाला हत्या

पण गोल्डीच्या नावावर दाखल झालेला हा पहिलाच गुन्हा नाही. गुरलाल हत्येनंतर गोल्डी ब्रारने कथितपणे फरीदकोट आणि मुक्तसर साहिब भागात वेगवेगळ्या माणसांना खंडणीसाठी कॉल करायला सुरुवात केली होती.

ऑक्टोबर 2020 मध्ये पंजाब आणि चंदिगढ पोलिसांच्या रडारवर गोल्डी होता. गोल्डी ब्रारचा भाऊ गुरलाल ब्रारची चंदिगढमध्ये बम्बीहा टोळीने हत्या केली होती.

गुरलाल पंजाब विद्यापीठात छात्र संघाचे माजी अध्यक्ष होते. एसओपीयू ही चंदिगढमधली पंजाब विद्यापीठाशी निगडित संघटना आहे. सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील आरोपी लॉरेन्स बिश्नोई हाही एसओपीयूशी निगडित आहे.

पोलीस सूत्रांनुसार गोल्डी बरारने गुरलाल ब्रारच्या हत्येचा बदला घेण्यासाठी असं केलं.

सुरुवातीचे अपराध

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

गोल्डीच्या नावावर 2012 मध्ये पोलिसात एक गुन्हा दाखल आहे.

मोगा नावाच्या शहरातील एका व्यक्तीने आरोप केला की ते गाडीतून जिमला जात होते. रेल्वे क्रॉसिंगजवळ काही माणसं हत्यारं घेऊन उभी होती. या माणसांनी हल्ला केला असं त्या माणसाचं म्हणणं होतं. ती माणसं तिथून फरारही झाली.

याप्रकरणातून 2015 मध्ये गोल्डीची सुटका करण्यात आली होती. कारण आरोप सिद्ध होऊ शकले नव्हते.

2013 मध्ये अबोहर नावाच्या गावी राहणाऱ्या राकेश रिंहवा यांनी आरोप केला की गोल्डी ब्रार आणि अन्य दोघांनी बंदुकीचा धाक दाखवून गाडीत खेचलं आणि धारदार शस्त्रांनी वार केले. याप्रकरणातूनही गोल्डीची सुटका झाली होती.

2020 मध्ये पंजाबमधल्या मलोट इथे रंजीत सिंहची हत्या केल्याप्रकरणी गोल्डीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आरोपींपैकी एक पवन नेहराने चौकशीदरम्यान सांगितलं की लॉरेन्स बिश्नोई आणि कॅनडात राहणारा गोल्डी ब्रार यांच्या आदेशानुसार रणजीत सिंह राणाची हत्या केली. रणजीतची आई मनजीत कौर यांनीही याला पुष्टी दिली. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

2020 नंतर गुन्ह्यांमधली गोल्डीचा गुन्ह्यांमधला कथित सहभाग वाढला आहे. या गुन्ह्यांमध्ये त्याचा कथित सहभाग आहे ती प्रकरणं जबरदस्तीने वसुली आणि हत्येची आहेत.

सिद्धू मुसेवाला, गोल्डी ब्रार, पंजाब

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सिद्धू मुसेवालाचे वडील

सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर गोल्डीचं नाव सगळ्यात आघाडीवर होतं. तेव्हापासून तो पंजाब पोलिसांच्या मोस्ट वाँटेड यादीत होता.

पोलिसांकडून न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या चार्जशीटनुसार गोल्डी ब्रार हा सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाइंड आहे.

गोल्डीने शूटर्सना गोळा केलं, वेगवेगळ्या लोकांना काम दिलं. त्याने विविध ठिकाणच्या नेमबाजांची फौज जमा केली. त्यांना हत्यारं, पैसे, त्यांची राहण्याची व्यवस्था केली.

गोल्डीनेच शूटर्सना मुसेवालाचीा संरक्षण व्यवस्था काढून टाकण्यात आल्याचं सांगितलं होतं. 29 मे तारखेलाच गोल्डीने वेगाने कामाला लागा असं सांगितलं होतं.

गोल्डीने विक्की मिदुखेराच्या कथित हत्येचा बदला घेण्यासाठी असं केल्याचं सांगण्यात येत आहे. चार्जशीटनुसार गोल्डीनेच शूटर्सच्या राहण्याची व्यवस्था केली. त्याने आणि लॉरेन्स बिश्नोईने सोशल मीडियाच्या माध्यमातून मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती.

गोल्डी आणि लॉरेन्सनची मैत्री

गोल्डी आणि लॉरेन्स हे दोघं देखील गुरलाल ज्या विद्यार्थी संघटनेशी संबंधित होते त्याच विद्यार्थी संघटनेशी संबंधित होता. 2009 मध्ये विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष असताना गोल्डी यानं बिश्नोई याची भेट घेतली होती. एलएलबी शिक्षण घेतलेला लॉरेन्स त्यावेळी राज्यशास्त्राचं शिक्षण घेत होता.

एप्रिल 2010 मध्ये, चंदीगडमधील पॉश सेक्टर-11 बंगल्यात पार्क केलेल्या एस्टीम आणि पजेरो कारला आग लागली होती. याशिवाय बंगल्यावर गोळीबार करण्यात आला.

पंजाब विद्यापीठ निवडणुकीदरम्यान वैमनस्यातून हे कृत्य केल्याचं पोलीस तपासात उघड झालं. पोलीसांनी 12 बोअर रायफल आणि 0.32 बोअर पिस्तुलासह पाच आरोपींना अटक केली आहे. लॉरेन्स बिश्नोई हा पहिल्यांदाच कायद्याच्या कचाट्यात सापडला.

लॉरेन्स बिश्नोई

फोटो स्रोत, Twitter

यानंतर लॉरेन्स बिश्नोईनं मागे वळून पाहिलं नाही. पंजाब, हरियाणा, राजस्थान, चंदीगड आणि दिल्ली येथं लॉरेन्सवर खून, खुनाचा प्रयत्न, शस्त्र बाळगणं, खंडणी, कार चोरी, घरात बेकायदेशीर प्रवेश करणं आणि शांतता भंग करणं या आरोपाखाली अनेक एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.

2018 पासून तुरुंगात असलेला, लॉरेन्स सध्या दिल्लीच्या तिहार तुरुंगात आहे आणि तिथून टोळी चालवल्याचा आरोप आहे. कॅनडा, पंजाब आणि इतर ठिकाणी पसरलेले त्याचे साथीदार आदेशाचं पालन करतात. सुमारे 700 लोक याच्याशी संबंधित असल्याचा अंदाज आहे.

बिश्नोई समाजाचा लॉरेन्स चिंकारा (काळे हरण) पवित्र मानतो, म्हणून त्यानं चिंकारा प्रकरणात दोषी ठरलेल्या सलमानच्या हत्येचा कट रचला.

एका अंदाजानुसार पंजाबमध्ये जवळपास 70 लहान-मोठ्या टोळ्या सक्रिय आहेत. ज्यामध्ये गुंड, ड्रग्ज तस्कर आणि अतिरेकी यांच्यातील संगनमताची प्रकरणेही समोर आली आहेत.

मूसेवाला खून प्रकरणातील 'मास्टरमाइंड'!

पंजाबमध्ये आम आदमी पक्षाच सरकार स्थापन झाल्या नंतर काही महिन्यांतच ही घटना घडली. घटनेच्या काही दिवस आधी मुसेवालाची सुरक्षा कमी करण्यात आली होती, ज्यामुळं भगवंत मान सरकारवर टीका झाली होती.

मुसेवाला हत्याकांडानंतर गोल्डी ब्रार याचं नाव पंजाब पोलीसांच्या 'मोस्ट वॉन्टेड' यादीत होतं. एका जुन्या प्रकरणाच्या आधारे सीबीआयच्या माध्यमातून त्याला परदेशातून भारतात आणण्यासाठी इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती.

पंजाब पोलीसांनी दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये गोल्डी ब्रारला मूसेवाला खून प्रकरणाचा 'मास्टरमाइंड' म्हणून वर्णन करण्यात आलं आहे.

आरोपानुसार, "गोल्डीनं विविध टोळ्यांकडून शूटर वाहनं, पैसे, शस्त्रं आणि निवारा यांची व्यवस्था केली."

28 मे रोजी, मूसेवालाची सुरक्षा सरकारनं कमी केली होती, म्हणून गोल्डीनं स्वतः शुटरना योजना अंमलात आणण्यास सांगितलं. मुसेवालाच्या हत्येनंतर गोल्डी आणि लॉरेन्स बिश्नोई यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हत्येची जबाबदारी स्वीकारली.

मुसेवाला

फोटो स्रोत, Getty Images

पंजाबमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अनेकांचं फेसबुक प्रोफाईल आहे. ते 'बंदुका, सोनं आणि गड्डी (कार)' असलेली चित्रं पोस्ट करतात, ज्यात गुंडांच्या परस्पर चकमकीच्या चित्रांचा समावेश आहे. पंजाबी गुंडांनी तुरुंगातून फेसबुक लाईव्ह केल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

यात आधुनिक शस्त्रे, चमकणाऱ्या गाड्या आणि जीवनशैली दाखवण्यात आली आहे, जी तरुणांना आकर्षित करण्यासाठी पुरेशी आहे. शिवाय, ते त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाइलवरही जबाबदारी स्वीकारतात.

पंजाबमधून 'बंदूक संस्कृती' लवकरच उखडून टाकली जाईल, असे भगवंत मान यांनी अनेकदा सांगितलं आहे. गोल्डीच्या अटकेवर प्रतिक्रिया देताना मान म्हणाले होते, "त्याला कायद्यानुसार जास्तीत जास्त शिक्षा देण्याचा प्रयत्न केला जाईल, जेणेकरून त्याच्या पीडितांना दिलासा मिळेल."

कॅनडाला कसा गेला?

गोल्डी ब्रार यांचं खरं नाव सतजिंदर सिंग असून तो मूळचा पंजाबमधील मुक्तसर साहिबचा आहे. अनेक पंजाबींप्रमाणे त्याचंही कॅनडाला जाण्याचं स्वप्न होतं. अधिकृत सूत्रांनुसार, 15 ऑगस्ट 2017 रोजी स्टुडंट व्हिसावर कॅनडाला गेला होता.

पंजाब पोलिसांच्या काही महिन्यांपूर्वीच्या अहवालानुसार, 'गोल्डी ब्रार ब्रॅम्प्टन, कॅनडात राहतो आणि लॉरेन्स बिश्नोई टोळीत सक्रिय भूमिका बजावतो.'

गोल्डीच्या प्रतिस्पर्धी बंबीहा टोळीचा प्रमुख असलेल्या लकी पटियाल यानं हे 'ऑपरेशन' आर्मेनियामधून चालवलं असल्याचं मानलं जातं.

लकी पटियाल याचा सहकारी सुखप्रीत सिंग बुधा याला नोव्हेंबर 2019 मध्ये आर्मेनियामधून भारतात प्रत्यार्पण करण्यात आलं, त्यानंतर पंजाब पोलीसांनी त्याला अटक केली. अर्मेनियाहून बेकायदेशीरपणे अमेरिकेत जाण्याचा प्रयत्न करताना बुधा याला अटक करण्यात आली.

काही महिन्यांपूर्वी पंजाब पोलिसांनी निवृत्त पासपोर्ट अधिकारी विधि चंद यांना चंदीगड येथून अटक केली होती. पोलीसांनी आरोप केला आहे की त्यांनी गौरव पटियालकडून 50,000 रुपये घेतले आणि त्याच्या नावावर आणि पत्त्यावर बनावट भारतीय पासपोर्ट बनवला होता.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)