बाबा सिद्दिकी यांचा अंत्यविधी मरीन लाईन्सवरील दफनभूमीत पार पडणार, झिशान सिद्दिकी यांची माहिती

बाबा सिद्दिकी

फोटो स्रोत, Facebook/Baba Siddique

फोटो कॅप्शन, बाबा सिद्दिकी (संग्रहित)

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत शनिवारी (12 ऑक्टोबर) गोळ्या घालून हत्या करण्यात आली. अज्ञात हल्लेखोरांनी बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्यांना जखमी अवस्थेत लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्यांचा मृत्यू झाला.

बाबा सिद्दिकी यांचा अंत्यविधी आज (13 ऑक्टोबर) रात्री साढेआठ वाजता मरीन लाइन्स स्टेशनजवळील बडा कब्रस्तान येथे पार पडणार आहे. मुलगा झिशान सिद्दिकी यांनी आपल्या एक्स अकाउंटवरुन याबाबत माहिती दिली आहे.

तत्पुर्वी नमाज ए जनाजा म्हणजे शेवटची प्रार्थना संध्याकाळी 7 वाजता त्यांच्या मकबा हाईट्स या राहत्या घरी होईल, असंही झिशान सिद्दिकी यांनी एक्स अकाउंटवरून सांगितले.

बाबा सिद्दिकींचे चिरंजीव आणि आमदार झिशान सिद्दिकी यांच्या खेरवाडी सिग्नलजवळ असलेल्या कार्यालयाकडे जात असताना बाबा सिद्दिकींवर तीन अज्ञातांकडून गोळीबार केला ज्यात त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी निर्मल नगर पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. यातील एक आरोपी हरियाणा तर दुसरा उत्तर प्रदेश इथला असल्याची माहिती आहे. मुंबई क्राईम ब्रांचकडून घटनेचा तपास केला जात आहे. दरम्यान, सिद्दिकी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात नेण्यात आला आहे.

बाबा सिद्दिकी हे गेली तीन ते चार दशकं राजकारणात सक्रिय होते. राजकीय आयुष्यातील बहुतांश काळ ते काँग्रेस पक्षात होते. काही महिन्यांपूर्वीच ते अजित पवारांच्या गटात गेले होते.

तसेच, हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांशी त्यांचे जवळचे संबंध होते. त्यामुळे सुद्धा ते चर्चेत असत.

बाबा सिद्दिकी यांनी काही महिन्यांपूर्वीच काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केला होता.

गोळ्या झाडण्यापूर्वी फुटले फटाके

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार सिद्दिकी यांच्यावर एकूण 5 गोळ्या झाडण्यात आल्या. त्यापैकी तीन गोळ्या त्यांना लागल्या. त्यातली एक गोळी त्यांच्या छातीजवळ लागली होती.

सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडण्यापूर्वी त्याठिकाणी फटाके फोडण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.

बाबा सिद्दिकी यांना 10-15 दिवसांपूर्वी धमकी मिळाली होती. त्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. सिद्दिकी यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आलेली होती.

सध्या आरोपींची चौकशी सुरू असून पोलिसांकडून काहीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करणारी घटना - राहुल गांधी

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून बाबा सिद्दिकी यांच्या मृत्यूवर शोक व्यक करत संवेदना प्रकट केल्या आहेत.

राहुल गांधी म्हणाले, “बाबा सिद्दिकी यांच्या मृत्यूची घटना धक्कादायक आणि स्तब्ध करणारी आहे. या कठीण प्रसंगी माझ्या सहवेदना सिद्दिकी कुटुंबीयांसोबत आहेत.”

स्क्रीनशॉट

फोटो स्रोत, X/@RahulGandhi

गांधी म्हणाले, “ही एक भयावह आणि महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करणारी घटना आहे. सरकारने याची जबाबदारी स्वीकारावी आणि सिद्दिकींना न्याय मिळवून द्यावा.”

दोषींवर कठोर कारवाई करा - मल्लिकार्जुन खरगे

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ‘एक्स’ अकाउंटवरून बाबा सिद्दिकी यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच आरोपींना लवकरात लवकर पडकून कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

खरगे म्हणाले, “बाबा सिद्दिकी यांच्या मृत्यूची वार्ता धक्का देणारी आहे. या दु:खाच्या घडीत माझ्या संवेदना सिद्दिकी यांचे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि कार्यकर्त्यांसोबत आहे.

या घटनेची सखोल आणि पारदर्शक चौकशी करुन दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी.”

स्क्रीनशॉट

फोटो स्रोत, X/@kharge

सरकारनेच गुन्हेगारांना पाठीशी घातले - विजय वडेट्टीवार

महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोपही केले.

विजय वडेट्टीवर म्हणाले, राज्य शासनाची Y दर्जाची सुरक्षा असताना माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या झाल्याची घटना अतिशय धक्कादायक आणि दुःखद आहे.

राज्य सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करत विजय वडेट्टीवार म्हणाले, “राज्यातील मोठ्या नेत्यावर असा गोळीबार होतो. महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश झाला आहे असं आम्ही सतत सांगतोय. मुंबई शांत होती, पण अलीकडे मुंबईत या घटना वाढत आहे.

मुंबईत पोलिसांचा धाक उरला नाही, कारण या सरकारनेच गुन्हेगारांना पाठीशी घातले आहे. गुन्हेगारांना सरकार वाचवते. एवढ्या मोठ्या नेत्यावर गोळीबार होतो, ही गंभीर बाब आहे, याची चौकशी झाली पाहिजे.”

सिद्दिकी यांच्या हत्येची घटना निषेधार्ह - असदुद्दीन ओवेसी

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनीही 'एक्स' अकाऊंटवरुन बाबा सिद्दिकी यांना श्रद्धांजली वाहिली.

ओवेसी म्हणाले, “बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची घटना निषेधार्ह आहे. यावरून महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती ढासळत असल्याचे दिसून येते. अल्लाह त्यांच्या आत्म्यास शांती देवो. सिद्दिकी यांचे कुटुंबीय, मित्र परिवार आणि कार्यकर्त्यांसह माझ्या संवेदना आहेत.”

ग्राफिक्स
ग्राफिक्स

दोन आरोपी पकडले-मुख्यमंत्री

बाबा सिद्दिकी यांच्यावरील हल्ल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली होती.

"बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार झाल्याची ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. या हल्ल्यासंदर्भात तात्काळ कठोर कारवाई करण्याचे निर्देश मी दिलेले आहेत. दोन आरोपी पकडण्यात आले आहेत.

"एक हरियाणाचा आहे आणि एक उत्तर प्रदेशचा आहे. तिसरा आरोपी फरार आहे. त्याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. त्यालाही लवकरच अटक केली जाईल," असं शिंदे म्हणाले.

चांगला नेता गमावला-अजित पवार

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही 'एक्स' अकाऊंटवरुन बाबा सिद्दिकी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

त्यांनी म्हटलं की, "राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी राज्यमंत्री, विधिमंडळात प्रदीर्घकाळ राहिलेले माझे सहकारी बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेल्या गोळीबाराची घटना अत्यंत दुर्दैवी, निषेधार्ह आणि वेदनादायी आहे.

"या घटनेत त्यांचं निधन झाल्याचं समजून मला धक्का बसला. मी माझा चांगला सहकारी, मित्र गमावला आहे. या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. बाबा सिद्दिकी यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो," असं अजित पवार म्हणाले.

बाबा सिद्दिकी आणि अजित पवार

फोटो स्रोत, Facebook/Baba Siddique

फोटो कॅप्शन, बाबा सिद्दिकी आणि अजित पवार

या घटनेची सखोल चौकशी करुन हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात येईल. हल्ल्यामागचा सूत्रधारही शोधण्यात येईल, असंही त्यांनी म्हटलं.

"बाबा सिद्दिकी यांच्या निधनामुळे अल्पसंख्याक बांधवांसाठी लढणारा, सर्वधर्मसमभावासाठी प्रयत्न करणारा एक चांगला नेता आपण गमावला आहे. त्यांचं निधन हे राष्ट्रवादी काँग्रेसचं मोठं नुकसान आहे. झिशान सिद्दिकी, सिद्दिकी कुटुंबिय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे," असं अजित पवार म्हणाले.

कोलमडलेली कायदा सुव्यवस्था चिंता वाढवणारी-शरद पवार

राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) गटाचे प्रमुख शरद पवार यांनी यासंदर्भात 'एक्स'वर ट्विट करत राज्य सरकारवर टीका केली आहे.

त्यांनी म्हटलं आहे की, "राज्याची कोलमडलेली कायदा सुव्यवस्था चिंता वाढवणारी आहे. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेला गोळीबार खेदजनक आहे. गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्या सौम्यतेने राज्याचा गाडा हाकणार असतील तर सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते.

"याची केवळ चौकशीच नको तर जबाबदारी स्वीकारून सत्ताधाऱ्यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याची गरज आहे. बाबा सिद्दिकी यांच्याप्रती भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करतो," पवार म्हणाले.

स्क्रीनग्रॅब

फोटो स्रोत, X.com

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

प्रफुल्ल पटेल

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनीही 'एक्स'वर बाबा सिद्दिकी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, "राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाबा सिद्दिकी यांच्या निधनाचं वृत्त ऐकून धक्का बसला. हा भ्याड आणि क्रूर हल्ला हल्ला आहे असं ते म्हणाले. यामागे ज्यांचा हात आहे, त्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी, असं त्यांनी म्हटलं आहे.

मिलिंद देवरा

शिवसेना शिंदे गटाचे नेते मिलिंद देवरा यांनी 'एक्स'वर म्हटलं आहे की, "बाबा सिद्दिकी यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. मी त्यांच्या कुटुंबियांना भेट देण्यासाठी निघालो आहे. या कठीण प्रसंगी त्यांचे सुपुत्र झिशान सिद्दिकी आणि त्यांच्या कुटुंबियांसमवेत माझ्या सहवेदना आहेत. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो."

मुंबई काँग्रेस

मुंबई काँग्रेसने आपल्या अधिकृत 'एक्स' अकाऊंटवरुन बाबा सिद्दिकी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की, "बाबा सिद्दिकी यांच्या निधनामुळे मुंबई काँग्रेस शोकाकूल आहे. त्यांनी लोकांसाठी अथकपणे केलेलं काम आणि सेवा कायमस्वरुपी लक्षात राहिल. या कठीण प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांप्रती आमच्या संवेदना आहेत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली."

स्क्रीनग्रॅब

फोटो स्रोत, X/@supriya_sule

सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी 'अतिशय धक्कादायक!' अशी प्रतिक्रिया देत राज्य सरकारवर टीका केली आहे.

त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, "मुंबईतील माजी आमदार व मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची बातमी अतिशय दुःखद आणि दुर्दैवी आहे. त्यांच्यासारख्या बुजुर्ग नेत्याला भररस्त्यात गोळी झाडून मारण्यात आले.

पुणे असो किंवा मुंबई राज्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा दाखविणारी ही आणखी एक घटना. बाबा सिद्दिकी यांना भावपूर्ण श्रद्धांजली. या कठिण प्रसंगी माझ्या संवेदना त्यांचे पुत्र झिशान यांच्यासोबत आहेत. त्यांच्यावर गोळीबार करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोरात कठोर कारवाई करावी."

आदित्य ठाकरे

बाबा सिद्दिकी यांची हत्या धक्कादायक आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो. ही महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेचं दुर्दैवी चित्र दाखवणारी घटना आहे. प्रशासन, कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.

बाबा सिद्दिकी यांचा राजकीय प्रवास

बाबा सिद्दिकी यांचा जन्म 30 सप्टेंबर 1958 ला झाला. त्यांचं शिक्षण बीकॉमपपर्यंत झालेलं आहे. सिद्दिकी यांनी वयाच्या 16-17 व्या वर्षापासून कॉंग्रेस पक्षात काम करण्यास सुरूवात केली.

बाबाज ऑर्गनायझेशन ऑफ सोशल सर्व्हीसेसमध्ये ते काम करू लागले.

त्यानंतर ते मुंबई प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सदस्य बनले. 1999 साली बाबा सिद्दिकी यांनी वांद्रे पश्चिममधून विधानसभा निवडणूक लढवली. तेव्हा ते पहील्यांदा विधानसभेवर निवडून गेले.

त्यानंतर 2014 पर्यंत विधानसभेवर ते सलग निवडून आले. नोहेंबर 2004 ते डिसेंबर 2008 या काळात कामगार , अन्न नागरी पुरवठा आणि अन्न व औषध प्रशासनाचे ते राज्यमंत्री होते. 2014 साली बाबा सिद्दिकी यांचा भाजपच्या आशिष शेलार यांनी पराभव केला.

2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी बाबा सिद्दिकी यांनी वांद्रे पश्चिमचा मतदारसंघ सोडून वांद्रे पूर्वमधून तयारी करायला सुरूवात केली. वांद्रे पूर्वमध्ये शिवसेनेचे बाळा सावंत हे आमदार होते. त्यांचं 2015 साली निधन झालं.

बाबा सिद्दिकी
फोटो कॅप्शन, बाबा सिद्दिकी

पोटनिवडणुकीत कॉंग्रेसकडून नारायण राणेंचा पराभव करत बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत निवडून आल्या. त्यानंतर बाबा सिद्दिकी मतदारसंघापलिकडे राजकीयदृष्ट्या फारसे सक्रीय दिसत नव्हते.

2019 च्या निवडणुकीसाठी वांद्रे पूर्वचा मतदारसंघ त्यांनी बांधला. पण बाबा सिद्दिकी यांनी निवडणूक न लढवता त्यांचा मुलगा झिशान सिद्दिकी याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं.

शिवसेनेकडून विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण नाराज तृप्ती सावंत यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.

मतांच्या विभाजनामुळे आणि शिवसेनेच्या अंतर्गत वादामुळे झिशान सिद्दिकी शिवसेनेच्या विश्वनाथ महाडेश्वर यांचा पराभव करत जिंकून आले. त्यावेळी शिवसेनेच्या बालेकिल्यात आणि मातोश्रीच्या दारात कॉंग्रेसने पराभव केल्यामुळे या लढतीची जोरदार चर्चा झाली होती.

काही महिन्यांपूर्वी बाबा सिद्दिकी यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी देत अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.

बाबा सिद्दिकी यांचं बॉलीवूड कनेक्शन

बाबा सिद्दिकी हे 15 वर्षं वांद्रे पश्चिमचे आमदार राहिले आहेत. वांद्र्यांच्या या भागात अनेक बॉलीवूड अभिनेते राहतात. दरवर्षी रमझान महिन्यात बाबा सिद्दिकी यांची इफ्तार पार्टी ही चर्चेत असते. त्या पार्टीला राजकीय नेत्यांबरोबर निम्म बॉलीवूड हजेरी लावतं.

सलमान खान, बाबा सिद्दिकी आणि शाहरूख खान.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सलमान खान, बाबा सिद्दिकी आणि शाहरूख खान. (संग्रहित)

काही वर्षांपूर्वी अभिनेत्री कॅटरिना कैफच्या वाढदिवसाच्या पार्टीत अभिनेता शाहरूख खान आणि सलमान खान यांच्यात जोरदार वाद झाला.

त्यानंतर काही वर्षं ते एकमेकांशी बोलत नव्हते. पण बाबा सिद्दिकी यांच्या इफ्तार पार्टीत त्यांनी दोघांना एकत्र आणलं. यावेळी या दोन्ही सुपरस्टारमध्ये समेट झाली होती. त्यावेळी बाबा सिद्दिकी यांच्या इफ्तार पार्टीची जोरदार चर्चा रंगली होती.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.