बाबा सिद्दिकी यांनी महायुतीमध्ये प्रवेश करून विचारधारेशी तडजोड केली आहे का?

बाबा सिद्दिकी
फोटो कॅप्शन, बाबा सिद्दिकी
    • Author, दीपाली जगताप
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

मुंबईतील काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांच्या पाठोपाठ काँग्रेसचा आणखी एक मोठा नेता आज (10 फेब्रुवारी) महायुतीमध्ये सामील होत आहे.

काँग्रेसचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी आज (10 फेब्रुवारी) अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत.

बाबा सिद्दिकी हे गेल्या 48 वर्षांपासून काँग्रेसमध्ये सक्रिय होते. त्यांनी दोन दिवसांपूर्वीच काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाबा सिद्दिकी 10 फेब्रुवारीला प्रवेश करतील, असं स्पष्ट केलं आणि चर्चांवर शिक्कामोर्तब झालं.

2017 पासून बाबा सिद्दिकी यांची तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू होती. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणात घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.

बाबा सिद्दिकी यांचे पुत्र झिशान सिद्दिकी हे वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार आहेत. तसंच, ते मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्षदेखील आहेत. झिशान सिद्दिकी यांनी मात्र अद्याप वडिलांसोबत राष्ट्रवादीत प्रवेश करण्याबाबत कोणतंही भाष्य केलेलं नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाच्या निमित्ताने बाबा सिद्दिकी यांची मुलाखत बीबीसी मराठीने घेतली.

काँग्रेस सोडण्याचं कारण, त्यांची नाराजी आणि भाजपसोबत सत्तेत जाताना विचारधारेशी तडजोड केली का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिली.

प्रश्न : 48 वर्षं काँग्रेसमध्ये सक्रिय राहिल्यानंतर एवढ्या वर्षांनी तुम्ही काँग्रेस का सोडत आहात?

बाबा सिद्दिकी : मी काँग्रेसमध्ये काम सुरू केलं 1977 मध्ये. त्यावेळी इंदिरा गांधी होत्या. मुंबईत तेव्हा गुलाब जोशी काका युनीयन लीडर होते. तेव्हापासून मी पक्षात आहे.

'कुछ तो वजह होगी जिसकी परदे लाली है' असं मी म्हणतोय. याचं कारण काँग्रेसमधल्या लोकांना माहिती आहे. मी 48 वर्षं एका पक्षात काढल्यानंतर त्यांच्याविषयी काहीही बोलणं मला पटत नाही. पुन्हा जेव्हा विषय निघेल त्यावेळी मी सांगेन.

माझे मतभेद होत होते, तेव्हा मी माझं मत मांडत होतो. तुम्हाला जेव्हा कळतं की तुम्ही जे काही म्हणत आहात ते त्यांना ठीक वाटत नाही, तेव्हा तो बाजूला हटता.

मतभेद असल्याशिवाय कोणी काय रात्रीत पक्ष सोडत नाही. मतभेद अनेक दिवसांपासून होते. माझ्यासारखे असे अनेक काँग्रेसी आहेत, ज्यांना बोलायचं आहे. पण ते बोलत नाहीत मागून बोलतात. यामुळेच काँग्रेसचं नुकसान होत आहे. पण मी स्वतः काँग्रेसविषयी असं काही बोलणं माझं कॅरेक्टर नाही. पण ते मला बोलले तर मी सोडणार नाही.

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

प्रश्न : राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत सत्तेत आहे आणि त्यांच्या पक्षात प्रवेश करणं तुमच्या विचारधारेला अनुसरून आहे असं वाटतं का?

बाबा सिद्दिकी : काँग्रेस कोणासोबत गेली हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. काँग्रेस शिवसेनेसोबत गेली. आजपर्यंत आम्ही मुंबईत शिवसेनेविरोधात निवडणूक लढवत आलोय आणि काँग्रेस शिवसेनेसोबत गेली. नितीश कुमारसोबत गेली. मग हे चालतं का?

अजित पवार हे सर्वांना सोबत घेऊन जाणारे आहेत. सर्व समाजाला, गंगा-जमूना तहजीब असावी, असं माझं मत आहे.

प्रश्न - विचारधारेचं काय? तुम्ही विचारधारेशी तडजोड करत आहात का?

बाबा सिद्दिकी : मी बऱ्याच गोष्टी बोलत नाहीय. काँग्रेसमध्येही कोण कोणासोबत बसतं, कोण कुठून आलंय हे सगळं आहेच ना. हे म्हणजे सोयीचं झालेलं आहे. पण आम्हाला आता सर्व समाजाचा विचार करायचा आहे.

प्रश्न : मीरा रोड, मोहम्मद अली रोड मुंबईत मुस्लीम बहुल भागात बुल्डोझर चालवण्यात आला. विरोधकांनी भाजपवर टीका केली. याबाबत तुमची भूमिका काय?

बाबा सिद्दिकी : माझ्या पक्ष प्रवेशाशी याचा संबंध तसा नाही. पण हे होत असेल चुकीचं आहे. मी यापुढे महाराष्ट्रात फिरणार आहे. त्यावेळी माझी भूमिका तुम्हाला कळेलच.

महाराष्ट्रात बाबा सिद्दिकी समाज सेवा ट्रस्ट आहे. त्यांच्या माध्यमातून राज्यभरात काम चालतं. मी राज्यभरात लोकांना भेटणार आहे त्यावेळी माझी भूमिका सांगेल.

बाबा सिद्दीकी
फोटो कॅप्शन, बाबा सिद्दीकी

राज्यभरातून पंचत समिती सदस्य, पदाधिकारी, नगरसेवक असे एकूण सुमारे 60 लोक आज माझ्यासोबत पक्ष प्रवेश करत आहेत.

मी काँग्रेसला केवळ शुभेच्छा देऊ इच्छितो.

प्रश्न : तुमचे पुत्र झिशान सिद्दिकी काँग्रेसचे आमदार आहेत. ते ही तुमच्या पाठोपाठ राष्ट्रवादीत प्रवेश करणार का?

बाबा सिद्दिकी : ते त्यांचा निर्णय घेतील. त्यांनी अनेक पदांवर काम केलंय. यामुळे मी त्याच्यासाठी काही ठरवू शकत नाही.

विधानसभा निवडणुकीवेली प्रवेश घेणार की नाही हे त्यांनाच विचारा, मी त्यांच्यावतीने सांगू शकत नाही.

काँग्रेसमध्ये एक निर्णय घेणारी सिस्टम सुरू आहे. यामुळेआपण बाजूला व्हावं असं वाटतं. लोक त्यामुळेच चालले आहेत हे दिसत आहे.

माझा प्रयत्न राहील की, मी ज्या पक्षात जाईल तो पक्ष मजबूत करीन. सर्व समाजासाठी काम करणार.

सबका अपनाअपना दर्द होता है, कोणी सांगत नाही हेच आहे. त्यामुळे पक्षाबद्दल मी काही सांगत नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला कारण मला जे योग्य वाटलं तो निर्णय घेतला.

प्रश्न : मग यापुढे वडील आणि मुलगा एकमेकांच्या विरोधात भूमिका मांडताना दिसतील?

बाबा सिद्दिकी : हे तर वेळच सांगेल. ते म्हणतात ना, 'इब्तिदा ए इश्क है रोता है क्या, आगे आगे देखिए होता है क्या'