पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या हत्येचा तपास कुठपर्यंत पोहोचलाय?

पत्रकार
फोटो कॅप्शन, शशिकांत वारिसे
    • Author, मुश्ताक खान
    • Role, बीबीसी मराठीसाठी

"वडील गेल्यापासून आजीची तब्येत ठीक नसते. पुढच्या महिन्यात त्यांचं वर्ष कार्य असल्याने मी सध्या गावातच आहेत. त्यांची आम्हाला खूप आठवण येते. सध्या मी आता स्थिर राहण्याचा प्रयत्न करत आहे. पण वडील गेल्यानंतर आमची घडी पूर्णपणे विस्कटली आहे."

"बाबा पत्रकार होते, त्यांना मदत होईल म्हणून मी रत्नागिरी आयटीआयमधून DTP चा कोर्स केला. अन्यथा मी तो कोर्स केला नसता."

पत्रकार शशिकांत वारिसे यांचा मुलगा यश अतिशय भावूक स्वरात सांगत होता.

"वर्ष कार्यानंतर मी नोकरी शोधण्यासाठी बाहेर पडणार आहे. आजीला रत्नागिरीतील आत्याकडे ठेवणार आहे. मला सरकारकडून नोकरीचं आश्वासन मिळालं होतं. पण त्यासाठी अजूनही कोणीही संपर्क केलेलं नाहीय," असं यश वारिसे सांगत होता.

7 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी दीड वाजता राजापूर पेट्रोल पंपजवळ थार गाडीने धडक देऊन पत्रकार शशिकांत वारिसे यांची हत्या करण्यात आली.

या हत्येप्रकरणी रिफायनरी समर्थन समितीचा अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर याला पोलिसांनी अटक केली.

या प्रकरणी सुरूवातीला आंबेरकरविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पण स्थानिकांच्या, विविध पत्रकार संघटनांच्या दबावानंतर त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल झाला.

या घटनेला आता एक वर्ष पूर्ण झालं आहे. या वर्षभरात वारिसे यांच्या हत्येचा प्रवास कुठपर्यंत पोहोचला आहे, त्यांचे कुटुंबिय सध्या कोणत्या परिस्थितीत आहेत, त्यांच्या भावना काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न बीबीसी मराठीने केला होता.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

रत्नागिरी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी या प्रकरणाबद्दल बीबीसी मराठीला माहिती दिली होती.

धनंजय कुलकर्णी यांनी सांगितलं होतं, “या गुन्ह्याच्या तापासासाठी रत्नागिरी पोलीसांनी एक विशेष तपास पथक तयार केलं होतं. या तपास पथकाचे प्रमुख डीवायएसपी दर्जाचे अधिकारी होते. त्यांनी सातत्याने तपास करून भक्कम असा पुरावा गोळा करून 90 दिवसांच्या आत न्यायालयामध्ये दोषारोप पत्र दाखल केलं होतं. सदरचा गुन्हा सध्या न्यायप्रविष्ट आहे.

"या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेला आरोपी अद्यापही जेलमध्ये म्हणजेच न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणातील त्याचे विविध अर्ज सध्या कोर्टांमध्ये दाखल आहेत आणि त्याची सुनावणी सुरू आहे."

शशिकांत वारिसे यांचे कौटुंबिक स्नेही मंगेश चव्हाण म्हणतात की, "जवळपास वर्षभरापूर्वी रिफायनरी विरोधातला आमचा आवाज बंद करण्यात आला. आमचा आवाज म्हणून शशिकांत वारिसे यांच्याकडे पाहत होतो. तेही आम्हाला आपल्या लेखणीच्या माध्यामातून न्याय देण्याचा प्रयत्न करत होते. ते राजापूरचेच असल्यानं त्यांना आंदोलनाबाबतचे बारीक-सारीक संदर्भ माहित असायचे. ते रिफायनरीबद्दलच्या छोट्या घडामोडीही समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम करत होते. त्यांच्या बातम्या थेट असायच्या आणि अन्यायाला वाचा फोडणाऱ्या असायच्या."

शशिकांत वारिसे यांची वृद्ध आई आणि 19 वर्षांचा मुलगा यश राजापूरमधील कशेळी गावात राहत आहेत. शशिकांत वारिसे यांच्या हत्येला एक वर्ष होत आला आहे.

त्यांच्या मुलाला सरकारी नोकरी देण्याचं आश्वासन पूर्ण होणं अजूनही बाकी आहे. त्याची आम्ही वाट बघत आहोत, मंगेश चव्हाण त्याबाबत आठवण करून देतात.

पोलीस

राज्य सरकारनं वारिसे कुटुंबियांना 25 लाखांची मदत केली होती. इतर ठिकाणाहून थोडी फार मदत मिळाली होती. शशिकांत यांच्या आईनं त्यांच्यावरील असलेल्या कर्जाचे पैसे भरले आहेत. उरलेल्या पैशापासून मिळणाऱ्या व्याजावर त्यांची गुजराण होत आहे.

हालाखीच्या परिस्थितीमध्ये याच पैशाचा त्यांना आधार आहे. यशला कायमची नोकरी मिळाली तर आम्हाला थोडं समाधान मिळेल, अशी भावना मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

वारिसे कुटुंबियांच्या कायम संपर्कात राहून मंगेश चव्हाण यांनी त्यांना आधार देण्याचं काम केलं आहे. न्यायलयीन लढाईमध्ये ते आणि त्यांची संघटना त्यांच्या मागे भक्कमपणे उभी आहे.

स्थानिक जमीन एजंट आणि रिफायनरी समर्थक पंढरीनाथ आंबेरकर याच्यावर शशिकांत वारिसे यांच्या हत्येचा आरोप आहे.

आंबेरकर गेल्या 11 महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत आहे. या दरम्यान त्याने जामीन घेण्याचा प्रयत्न केला. पण विविध कोर्टने तो नामंजूर केला आहे. न्यायालयामध्ये केस अद्यापही उभी राहिलेली नाहीये. वारिसे कुटुंबीय न्यायालयीन लढाईसाठी सज्ज आहेत.

दरम्यान संशयित आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याने कोर्टामध्ये आरोपमुक्त होण्यासाठी अर्ज केला आहे. या विरोधात शशिकांत वारिसे यांचे मेहुणे आणि या प्रकरणातील फिर्यादी अरविंद नागले यांनी खाजगी वकील उपलब्ध करून दिला आहे.

अपघाताचं ठिकाण
फोटो कॅप्शन, याच राजापूर पेट्रोल पंपा जवळ थार गाडीने ठोकरून पत्रकार शशिकांत वारिसे यांचा आवाज बंद करण्यात आला होता.

सरकारी वकीलांच्या जोडीला खाजगी वकील देखील शशिकांत वारिसे यांच्या खटल्यात बाजू मांडत आहेत. त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये ही न्यायलयीन लढाई जिंकायची आहे आणि शशिकांत वरिसे यांना न्याय मिळवून द्यायाचा आहे.

"या केसमध्ये बारसू सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटना वारिसे कुंटुंबीय आणि नेतावाईकांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. ज्या ज्या ठिकाणी त्यांना मदत लागत आहे, आम्ही पुढाकार घेऊन त्यांना करत आहोत," असं आंदोलक सत्यजित चव्हाण सांगतात.

सत्यजित चव्हाण हे रिफायनरी विरोधातील एक महत्त्वाचा चेहरा आहेत.

सत्यजित चव्हाण पुढे सांगतात की, "शशिकांत वारिसे यांची शैली वेगळी होती. एखादा विषय ते आक्रमकपणे मांडायचे. रिफायनरी विरोधातील आवाज त्यांनी राज्य पातळीवरच नव्हे तर देश पातळीवर बुलंद ठेवला होता. सरकारपर्यंत बारसू सोलगाव परिसरातील गावकऱ्यांचा आवाज त्यांच्यामुळे पोहोचत होता. आता त्याच्या जाण्याने त्यामध्ये कमतरता आली आहे."

"आमचं आंदोलन सुरू आहे. पण ना सरकार दखल घेत आहे, ना विरोधपक्ष. कोणीही आम्हाला दाद देत नाहीये. उद्धव ठाकरे यांच्याकडे आम्ही 8 महिन्यांपासून वेळ मागत आहोत. पण त्यांची वेळी काही आम्हाला मिळत नाहीये. नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार आमचा फोन घेत नाहीयेत," असंही सत्यजित चव्हाण म्हणाले.

रत्नागिरीच्या बारसू येथिल रिफायनरीविषयी शशिकांत वारिसे यांनी सतत लिखाण केलं.
फोटो कॅप्शन, रत्नागिरीच्या बारसू येथिल रिफायनरीविषयी शशिकांत वारिसे यांनी सतत लिखाण केलं.

"शरद पवार भेटतायत, पण पुढे काहीच होत नाहीये. आमच्या बद्दल विरोधीपक्षांना सहानुभूती आहे, पण आमचा विषय ते अजेंड्यावर घेत नाहीयेत," अशी नाराजीही सत्यजीत चव्हाण यांनी बोलून दाखवली.

सत्यजित चव्हाण म्हणतात की, "वारिसे असताना आमचा आवाज हा माध्यमाच्या पटलावर कायम असायचा. पण त्यांच्या जाण्याने तो हरवला आहे. जोपर्यंत काहीतरी मोठं होत नाही, आम्ही एखादं आंदोलन करत नाही किंवा मोर्चा काढत नाही, तोपर्यंत आमची माध्यमांकडून दखल घेतली जात नाहीये.

"शशिकांत वारिसे असताना आम्हाला लढण्याची ताकद मिळत होती. ते आमचं म्हणणं सरकारपर्यंत पोहोचवत होते. त्यांच्या जाण्याने आम्ही फार मोठ्या गोष्टीला मुकलो आहोत."

पत्रकार शशिकांत वारिसेंचा मुलगा यश
फोटो कॅप्शन, पत्रकार शशिकांत वारिसेंचा मुलगा यश

पंढरीनाथ आंबेरकर हा रिफायनरी समर्थकांना एकत्रित करायचा.

अशा परिस्थितीत निवडणुकीच्या तोंडावर पंढरीनाथ आंबेरकर बाहेर आला, तर कोणाला आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. सध्या जेलमधून बाहेर पडण्यासाठी तो वैयक्तिकरित्या देखील खूप प्रयत्न करत आहे.

"पत्रकारिता करत असताना भयमुक्त वातावरण निर्माण करणं सरकारचं काम आहे. देशाचा चौथा स्तंभच जर भितीच्या छायेत असेल तर राष्ट्र निर्मिती कशी होणार?" असा सवाल रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष आनंद तापेकर विचारतात.

"त्यामुळे शशिकांत वारिसे यांच्या हत्येतील आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे. सरकारी वकिलांनी आणि पोलिसांनी त्यासाठी संयुक्तपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. अशा प्रकरणांमध्ये आरोपी जर सुटले तर समाजामध्ये अत्यंत चुकीचा संदेश जाईल. या खटल्यात शशिकांत वारिसे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळेल, अशी अशा व्यक्त करतो," असं तापेकर म्हणाले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)